एका राजाने एका सूफी फकिराला एक सुवर्णपात्र भेट दिलं. त्या सुवर्णपात्रात एक मूल्यवान शोभेचा मासा पोहत होता.
फकिराला तो मासा पाहून दया आली. पात्र सुवर्णाचं असलं म्हणून काय झालं. त्यातही मासा बंदिवानच होता. तलावाची, नदीची, समुद्राची मुक्तता त्या पात्रात नव्हती.
फकिराने माशाला स्वतंत्र करण्याचा निर्धार केला. तो ते पात्र घेऊन तलावाकाठी गेला. त्या माशाला तलावात सोडून दिलं. मग त्याने त्या
पात्राकडे पाहिलं. सोन्याचं पात्र आता माशाचा तुरुंग उरलं नसलं तरी त्याच्या मूल्यामुळे आपल्यासाठी आसक्तीचा तुरुंग बनेल, हे ओळखून त्याने ते पात्रही त्या तलावात भिरकावून दिलं.
दुसऱ्या दिवशी आपण स्वतंत्र केलेला चमचमता मासा त्या स्वातंत्र्याचा कसा उपभोग घेतो आहे, हे पाहायला फकीर तलावाकाठी गेला… मासा तलावात फेकलेल्या त्या सुवर्णपात्रात पुन्हा जाऊन बसला होता… …त्यातच मुक्त विहरत होता.