`वाह… किती मस्त आहे…’ घरात शिरताच संध्याच्या तोंडातून पटकन शब्द बाहेर पडले आणि मानस तिच्याकडे पाहातच राहिला. संध्या म्हणजे अगदी शिस्तबद्ध मुलगी. प्रत्येक गोष्ट चार वेळा तपासून आणि निरखून प्रतिक्रिया देणारी. पण आज चक्क पहिल्या भेटीतच तिला हे घर पसंत पडलेले बघून त्याला देखील आश्चर्य वाटले. गेल्या पंधरा दिवसात चाळीस जागा बघितल्यानंतर आज चक्क संध्याने उत्स्फूर्तपणे या जागेला पसंती व्यक्त केली होती. त्याने आज जरा मोकळा श्वास सोडला होता.
तसा फ्लॅट छोटा म्हणजे वन बीएचके होता. बेडरूम तशी प्रशस्त होती आणि मुख्य म्हणजे बेडरूमला लागून एक छोटी अडगळीची खोली देखील होती. संध्याला ते घर मनापासून आवडले होते. संध्याला आवडले म्हणजे मानसचा होकाराचा नकाराचा प्रश्न नव्हताच. अर्थात त्याने कधी संध्याच्या कुठल्याच इच्छेला नाकारले नव्हते, हे देखील खरे. संध्यावर त्याचे मनापासून प्रेम होते आणि तिचे देखील त्याच्यावर. फक्त आता संध्याचे बाबा दुबईच्या कॉन्फरसवरून परत आले की, पुढचे पाऊल उचलायचे होते.
संध्या आणि मानस एकाच कंपनीत कामाला होते. तिथेच दोघांची ओळख झाली, पुढे ओळख प्रेमात रूपांतरित झाली. संध्या मूळची धारवाडची पण सध्या कामानिमित्त ती पुण्यात शिफ्ट झाली होती. जुन्या मालकाने त्याचा फ्लॅट विकायला काढला आणि मग संध्या नवीन घराच्या शोधात निघाली. तिच्या रूम पार्टनरने कोथरुडला एक जागा बघितली होती, पण संध्याला काही ती आवडली नाही. त्यात तिला आता मानसची साथ मिळालेली होती, त्यामुळे मग तिने एकटीसाठी जागा शोधायचे धाडस दाखवले होते.
संध्याला नवे घर मनापासून आवडले होते. जागा आधीच्या घरापेक्षा छोटी होती, पण आता होती ती तिच्या एकटीच्या मालकीची होती. रविवारी सगळे सामान शिफ्ट झाले आणि संध्याने हळूहळू घर लावायला सुरुवात केली. फ्लॅट पूर्ण फर्निश्ड असल्याने तिला तसे फार काही कष्ट करावे लागले नाहीत. तिचे सामान देखील तसे सुटसुटीत होते. नाही म्हणता म्हणता बुधवार उजाडला आणि संध्याच्या मनासारखे घर सजले. अडगळीच्या खोलीत तिला एक कोलाज सापडले, ते देखील भिंतीवर सजवले गेले. कोलाजमध्ये दोन स्त्रिया होत्या. नाकी डोळी निटस असलेल्या त्या स्त्रियांच्या डोळ्यात संध्याला एक वेगळीच आर्तता जाणवत होती. संध्याला चित्रकलेचे फार काही आकर्षण होते असे नाही, पण का कोण जाणे, या कोलाजने तिला प्रचंड भुरळ पाडली होती.
रविवारी संध्याने अडगळीच्या खोलीला पुन्हा आवरायला घेतले. फारसे काही सामान होते असे नाही, पण जुन्या भाडेकरूने
कॅलेंडरपासून सगळी रद्दी जमा करून ठेवलेली होती. `त्या सामानाची काय विल्हेवाट लावायची ती लावा’ असे नव्या मालकाने स्पष्ट सांगितल्याने, आता ती जबाबदारी मानसने उचलली होती. संध्याकाळी मानस भंगारवाल्याला आणेपर्यंत एकदा सगळे सामान नजरेखालून घालावे असे संध्याला वाटत होते. त्यात पहिल्या आवराआवरीमध्ये ते सुंदर कोलाज सापडल्यापासून इतर सामानात काय काय असेल अशी एक उत्सुकता उगाचच तिच्या मनाला लागलेली होती.
अडगळीच्या खोलीत रद्दीबरोबर एक जुना आरसा देखील टांगून ठेवलेला होता. पारा उडलेला तो आरसा देखील भंगारात काढावा म्हणून संध्याने हालवायला घेतला आणि अचानक आरशाच्या मागून एक डायरी खाली पडली. संध्या एकदम दचकली. तिने हातातला आरसा खाली ठेवला आणि एकदम उत्सुकतेने ती डायरी हातात घेतली. डायरी बरीच जीर्ण झालेली होती आणि पानेदेखील पिवळट पडायला लागलेली होती. तिने घाईघाईने डायरी उघडली आणि पहिले पान उलगडताच तिला मोठा धक्का बसला. पहिल्या पानावर `जर तुम्ही ही डायरी वाचत असाल, तर मी या जगात नाही हे नक्की समजावे…’ असे लिहिलेले होते. डायरीच्या पहिल्याच पानाने संध्याच्या मनात प्रचंड खळबळ माजवली. संध्याने हातातले सगळे काम बाजूला ठेवले आणि ती डायरी घेऊन हॉलमध्ये येऊन बसली.
– – –
बेलच्या आवाजाने तिची तंद्री भंगली आणि तिने लगबगीने जाऊन दार उघडले. दारात मानस उभा होता.
`अगं कुठे होतीस? किती वेळचा बेल वाजवतोय मी…’ मानस काहीशा नाराज स्वरात म्हणाला.
`सांगते सगळं. बस तू… मी पाणी आणते.’ बाहेर चांगलेच अंधारून आले होते. संध्याने पटापट घरातले दिवे लावले आणि ती किचनकडे वळली. ती परत आली, तेव्हा मानस हॉलमध्ये लावलेल्या त्या कोलाजमध्ये गुंगलेला होता.
`छान आहे ना? अरे या घराच्या अडगळीत टाकलेले होते.’ संध्याने कौतुकाने माहिती दिली.
`खरंच छान आहे. चित्रातल्या या स्त्रिया काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असे वाटते एकदम.’
`हो ना? मला पण अगदी सेम जाणवले होते बघ.’
`बरं ऐक, तो भंगारवाला अर्ध्या तासात येतो आहे. तू सामान काढलेस का सगळे?
`हो सगळे रेडी आहे. पण मला तुला काही वेगळेच सांगायचे आहे मानस..’
`बोल ना..’
संध्याने कोचावर ठेवलेली डायरी मानसच्या हातात दिली. `ही डायरी सापडली मला आवराआवरी करताना.’
`कोणाची आहे?’ मानसने डायरीची पाने चाळत विचारले.
`बहुदा जुन्या भाडेकरूची असावी. खूप विचित्र काय काय लिहिलेले आहे त्यात..’ अंग शहारत संध्या म्हणाली. मानसने उत्सुकतेने डायरीची काही पाने चाळली आणि पटकन् ती डायरी मिटवून टाकली.
`अगं कथा लिहीत असणार कोणीतरी. असे अनुभव सामान्य माणसाला थोडीच येतात?’
`पण हे खरे असेल तर? आणि त्या डायरीत उल्लेख केलेले घर हेच असेल तर?’ संध्याच्या डोळ्यात भीती दाटली होती.
`तू सगळी डायरी वाचलीस?’ तिच्याकडे निरखत मानसने विचारले.
`नाही पण अर्ध्याच्या वर वाचून झाली आहे. मला शेवट वाचायचा होता, पण धीर झाला नाही.’
मानसने प्रेमाने संध्याचा हात हातात घेतला. `असे काय काय लिहिलंय त्या डायरीत?’
`कोणा रेखा नावाच्या स्त्रीने लिहिली आहे ती डायरी. तिचा घटस्फोट झाला आणि ती विभक्त होऊन नव्या घरात राहायला आली. तुला माहितीये मानस, रेखाला देखील अडगळीच्या खोलीत एक कोलाज सापडले होते. डोळ्यात कमालीची आर्तता असलेल्या स्त्रीचे. रेखाने देखील ते चित्र हॉलमध्ये सजवले होते.’
`अगं हा निव्वळ योगायोग असू शकतो.’
`हो पण… पुढे पुढे त्या घरात तिला विचित्र भास जाणवायला लागल्याचे तिने लिहिले आहे. त्या कोलाजमधली स्त्री घरात वावरते आहे, तिला खुणावते आहे, आपल्याबरोबर येण्यासाठी विनवत आहे असे सारखे तिला जाणवत होते.’
`संध्या… तुला गेल्या दोन तीन दिवसांत खूप दगदग झाली आहे. त्यात हे असले काही बाही वाचत बसली आहेस. तो भंगारवाला येऊन गेला की आपण मस्त फिरायला जाऊया आणि आज बाहेरच जेवण करू.’
– – –
मानसला संध्याची जरा काळजी वाटायला लागली होती. गेले सहा सात दिवस ती कुठल्याशा विचारात पूर्ण गुंतल्यासारखी दिसत होती. शब्दाला शब्द येवढेच बोलत होती. तिच्यातले चैतन्य जणू नाहीसे झाले होते. संध्याने आज रजा टाकल्याचे त्याला ऑफिसमध्ये गेल्या गेल्या कळले आणि तडक रजा टाकून तो देखील संध्याच्या घरी धावला. चार पाच वेळा बेल वाजवल्यानंतर दरवाजा उघडला गेला. दारात आजारी भासणारी, डोळे खोल गेलेली संध्या पाहून त्याला धक्का बसला. एका रात्रीत किती बदल झाला होता संध्यामध्ये.
`संध्या अगं काय रूप करून घेतले आहेस हे स्वत:चे?’ संध्या फक्त फिकटशी हसली आणि अंगातले त्रास गेल्यासारखी कोचात बसली.
`चल आपण डॉक्टरकडे जाऊयात..’ काळजीच्या स्वरात मानस म्हणाला.
`अरे काही झाले नाहीये मला. थोडासा थकवा आला आहे एवढेच. तू बस मी पाणी आणते..’
`नको! तू बस. मी घेतो पाणी. चहा टाकू का आपल्याला?’ बोलता बोलता मानस किचनमध्ये गेला आणि समोरचे दृश्य पाहून थक्क झाला. दोन तीन दिवसांची खरकटी भांडी, कपडे जसेच्या तसे पडलेले होते. अन्न तर अर्ध्याच्या वर शिल्लक दिसत होते. ते देखील बाहेरुन मागवलेले होते.
`संध्या अगं बाहेरून कशाला जेवण मागवायचे? मला सांगायचे होते ना. मी घरचा डबा आणला असता.’
`अरे दोन दिवस काही करायची इच्छाच होत नाहीये. आणि काही मागवले अन ताटात घेतले की भूकच मरून जाते आहे.’
`तू माझ्या घरी चल बरं. काही दिवस आईच्या नजरेखाली आराम कर.’
संध्याने अत्यंत प्रेमाने त्याच्या खांद्यावर मान टेकवली. `किती काळजी करशील. अगदी उत्तम आहे मी. दोन दिवसात ठणठणीत बरे वाटायला लागेल मला. तुला बघून तर आताच फ्रेश वाटायला लागले आहे मला.’
ती नको नको म्हणत असताना देखील मानसने तिला सूप करून प्यायला दिले. संध्या आता बरीच तरतरीत वाटत होती. रात्री आईला झोपायला घेऊन येतो असे सांगून मानसने तिचा निरोप घेतला आणि तो आईला आणायला निघाला.
संध्या दार लावायला वळली तर किचनमध्ये भांडी पडल्याचा आवाज जाणवला. संध्या थोडी घाबरतच किचनकडे गेली आणि तिने दारातून आत डोकावून पाहिले. किचनच्या ओट्याशी दोन स्त्रिया काहीतरी काम करताना तिला दिसल्या आणि तेवढ्यात एकीने मागे वळून पाहिले आणि संध्याची शुद्ध हरपली.
आईला घेऊन मानस रात्री परत आला आणि घराचा दरवाजा सताड उघडा बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. संध्याला आवाज देत तो आत शिरला, मात्र संध्याची काहीच चाहूल जाणवत नव्हती. मानसने अडगळीच्या खोलीसकट सगळे घर पालथे घातले मात्र संध्या कुठेच नव्हती. अशा आजारी अवस्थेत ती कुठे गेली असावी या चिंतेत मानस हॉलमध्ये आला आणि समोरचा कोलाज बघून जागीच थबकला. समोरच्या कोलाजमध्ये आता दोनच्या जागी तीन स्त्रिया दिसत होत्या आणि त्या तिसर्या स्त्रीच्या डोळ्यातील आर्तता क्षणात त्याचे काळीज पिळवटून गेली.