कुमार सोहोनी मराठी नाटक-चित्रपटातले ताकदीचे दिग्दर्शक. असे दिग्दर्शक, ज्यांच्या प्रत्येक निर्मितीत दिग्दर्शन कौशल्य नजरेत भरते. गेल्याच वर्षी संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांच्या कारकीर्दीत २०१५ साली चक्क ५१ नाटके दिग्दर्शित करण्याचा सुवर्णयोगही साधला गेलाय. प्रायोगिक, हौशी, व्यावसायिक नाटकवाल्यांचा हक्काचा रंगधर्मी, अशी त्यांची चढती रंगकमान ही थक्क करून सोडणारी आहे. यंदा २०२४ या वर्षातही त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ हे नाटक विक्रमी प्रयोगांकडून महाविक्रमांकडे वाटचाल करीत आहे. शीर्षकापासून ते सादरीकरणापर्यंत दिग्दर्शक जागा असल्याचे प्रत्यंतर या निमित्ताने येतंय.
इंग्रजी शब्द हे ‘टायटल’पासून ते संवादापर्यंत आजकाल सर्रास वापरले जातात. त्याला मराठी नाटकेही अपवाद नाहीत. मोबाईल तर सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भागच बनलाय. इथे नाटकाचे शीर्षकच ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आहे! सोशल मीडियामुळे ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवून नवनवे मित्र बनविणे सुरू झालंय. त्यामुळे अपरिचितांची जवळीक, ओळख सहज होते. हरवलेली नातीही तपासून बघता येतात. एखादी ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ उभं आयुष्य बदलणारीही ठरू शकते. थोडक्यात, हे नाटकाचे नाव महत्त्वाची कामगिरी पार पाडते. त्याला कथेत संदर्भ आहे. नावातूनच नव्या पिढीला कनेक्ट करणारा विषय असावा, हे दिसतंय.
‘नवरा-बायकोच्या नाजूक आणि पवित्र नात्यात दुरावा निर्माण झाला तर त्याने एकूणच कौटुंबिक जीवनावर होणारे परिणाम’ या विषयावर अनेक कथानके यापूर्वी आलीत आणि येत आहेत. या नाटकातही तोच विषय आहे. माधव सहस्रबुद्धे या प्रौढ उद्योजकाची गोष्ट इथे मांडली आहे. त्याने एका सधन गुजराती तरुणीशी प्रेमविवाह केला होता. पण तो टिकला नाही. दोघांचं जगणं हे परस्परविरुद्ध. दोन टोकांचं. वादविवादातून अखेर घटस्फोटाच्या वादळापर्यंत हे नातं पोहचलं. तिने नवा जीवनसाथी निवडला आणि माधवला सोडचिठ्ठी दिली. बराच प्रयत्न करूनही तिच्याशी माधवची शेवटची भेट न झाल्याने तो अस्वस्थ. परदेशात ‘फाइव्ह स्टार’ जीवन ती जगतेय, यापलीकडे काही एक माहिती त्याच्याकडे नाही. काळ कुणासाठी कधीही थांबत नाही. माधव मुंबईत भल्यामोठ्या आलिशान घरात एकाकी जीवन जगतोय. उद्योजक म्हणून यशस्वी असला तरीही वैयक्तिक जीवनात अयशस्वी ठरलाय.
पडदा उघडतो आणि एक पॉश घर प्रकाशात येते. या घरात तसे ‘उपरे’ असलेले दोघेजण संवाद साधताहेत. दोघेजण माधवची वाट बघत आहेत. एक टिपिकल रिक्षावाला ज्याचे नाव जिग्या. जो या घरातलाच महत्वाचा सदस्य असल्यागत वावर करतोय. हा ‘रिक्षावाला’ की या घरचा ‘वारसदार’ असा प्रश्न पडणे स्वाभाविकच. तो नाना युक्त्या करून हसविण्याचा प्रयत्न करतोय. दुसरे गृहस्थ मिस्टर दामले, माधवच्या कार्यालयातले ज्येष्ठ कर्मचारी आणि विश्वसनीय दोस्त. तेही या घरात मुक्तसंचार करताहेत. या दोघांच्या भेटीतून ‘माधव’ या व्यक्तिरेखेवर भाष्य करण्यात येतंय. माधव हा तसा कविमनाचा, गाणं म्हणणारा, भावनिक प्रामाणिक माणूस, जो एकाकीपणातून एकाकीपणे बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय.
उद्योजक माधवच्या या घरात अचानक एके दिवशी एक बिनधास्त तरुणी मृण्मयी प्रगटते. तिची देहबोली संशयास्पद आणि गूढ. ती कोण, कशाला आलीय, तिचं काम काय, हे प्रश्न प्रारंभी सुटता सुटत नाहीत. पण ती माधवला टेन्शन देतेय. वाक्यावाक्याला नथीतून तीर मारतेय. रिक्षाचालक जिग्या तिची पर्स बघतो. त्यात एके ठिकाणी ‘मृण्मयी माधव सहस्त्रबुद्धे’ असे नाव सापडते आणि ही तरुणी माधवची मुलगी असल्याचे कळते. एवढी वर्षे आपल्या बापाने विचारपूस केली नाही, शोध घेतला नाही, याचं दु:ख तिला आहे. तिच्या मनात जन्मदाता बाप म्हणजे खलनायक हे चित्र आहे. समज-गैरसमज यावर दोघांची चर्चा होते. दोघेही आपली बाजू मांडतात. अखेर ती वडिलांना समजून घेते. गैरसमज दूर होतात. कथानक इथे संपते! आणि हे सारं काही एका ‘फ्रेंड रिक्वेस्ट’मुळे घडून येते. जिग्या तसेच मृण्मयीच्या फेसबुकमधली फसवणूकही धम्माल.
चित्रपटात बिझी असलेला ताकदीचा अभिनेता अजय पूरकर या नाटकाच्या निमित्ताने आता नाटकाकडे निर्माता आणि अभिनेता म्हणून वळला आहे ही नोंद घेण्याजोगी घटना. ‘बाजीप्रभू देशपांडे’, ‘तानाजी मालुसरे’ या गाजलेल्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका रसिकांना ठाऊक आहेत. आता चित्रपटातून रंगमंचावर ‘उद्योजक माधव सहस्त्रबुद्धे’चा मुखवटा त्याने चढविला आहे. ज्यात सहजता व संवेदनक्षमता भरलीय. दक्षिणेतल्या चित्रपटांत बिझी असूनही मराठी नाटकासाठी त्याने वेळ राखून ठेवला ही बाब कौतुकास्पदच. वेदना गिळून उभा असलेला बाप सुरेखच. संयमी संवादफेक, अभिनयातली ताकद, गाण्याचा गोड गळा यातून हा माधव रसिकांवर छाप पाडतो. वेळ आहे म्हणून नाटक करणारे बरेच असतील, पण इथे अजयने खास नाटकासाठी वेळ राखून ठेवलाय.
विनोदवीर आशिष पवार याचा रिक्षावाला श्रीमंत माणूस वाटतो. त्याचं घरातलं दु:ख हे स्वगतातून चांगले उभे केले आहे. पण ते मूळ कथानकाला भलतीकडेच घेऊन जाते. पहिल्या अंकात हसवणुकीचा एक कलमी कार्यक्रम त्याने यशस्वी केलाय. काही प्र्ासंग व संवादांना कात्री लावली तर नाट्य भरकटणार नाही. जिंग्याची पदरी पडलेली भूमिका चांगली जमली आहे. हक्काचे हसे वसूल होतात. भावनिक कोंडमारा झालेल्या मृण्मयीच्या भूमिकेत प्रियांका तेंडोलकर हिने बापासाठी केलेली तडफड नजरेत भरते तर अतुल महाजन यांचा दामले योग्य वाटतो. अभिनयात या चारही कलाकारांनी चांगले रंग भरले आहेत. तसं हे नाटक दोघा पात्रांमध्येही जमले असते.
विषय, आशय, शैली याची विविधता असणारी अनेक नाटके यापूर्वी कुमार सोहोनी यांनी दिग्दर्शनाच्या चौकटीत बसविली आहेत. २०१७च्या सुमारास याच नाटककाराचे ‘अर्धसत्य’ हे नाटक त्यांनी दिग्दर्शित केले होते. दीपक करंजीकर आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या त्यात भूमिका होत्या. त्या भूमिका आजही स्मरणात आहेत. तसेच प्र. ल. मयेकर आणि सोहोनी यांची नाटककार-दिग्दर्शक ही युती यापूर्वी सहाएक नाटकांत गाजली. ‘रातराणी’, ‘रेशीमगाठ’, ‘अग्निपंख’, ‘अथ मनुस जगन हं’, ‘मा अस् सावरीन’ अशा दर्जेदार नाटकांच्या सादरीकरणातून रंगेतिहास उभा केला होता. ही प्रसाद दाणी यांची संहिता तशी दीर्घांकाची, तरीही त्यात उत्तम जुळवाजुळव करण्यात आलीय. बापलेकीचा नात्यातला गोडवा, त्यांचा वैचारिक संघर्ष तसेच एका काळानंतरची भेट, यावरले हे नाट्य रसिकांना खिळवून ठेवते.
एका आलिशान घराचा सेट श्रीमंतीचं वातावरण निर्मिती करतो. उद्योजकाचे घर म्हणून त्याची भव्यता नजरेत भरते. रंगसंगतीही उत्तम. गृहसजावट अर्थात ‘इंटेरियर डेकोरेशन’ म्हणूनही याचा आराखडा अप्रतिम आहे. भिंतीतला बार, लयदार कमानी, भव्य कमळाचं चित्र, गॅलरी, झोपाळा सारं काही भारावून सोडणारे. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी कमाल केलीय. पडदा उघडताच प्रेमात पडावं अस सुरेख घर आहे.
संगीतकार अशोक पत्की याचं संगीत नाट्याला पूरक आहे. तर गुरू ठाकूर याचं गीतही ताल धरायला लावणारं. प्रकाशयोजना खुद्द दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी केल्याने त्यातून प्रसंगबदल नेमकेपणातून होतो. वेशभूषाही व्यक्तिरेखांना साथ देणारी आहे. एकूणच तांत्रिक बाजू चांगल्या जुळून आल्यात. पूर्ण तयारीची ‘टीम’ आहे.
प्रसाद दाणी यांच्या संहितेतले काही हळुवार संवाद आणि बाप-लेकीतला जाबजवाब परिणामकारक आहेत. प्रत्येक ‘स्त्री’ची समस्या वेगळी असते. तिच्या वैयक्तिक, भावनिक प्रश्नांना निश्चित अशी उत्तरे नसतात. हे प्रश्न तिचे तिनेच सोडवायचे असतात. यात एक घटस्फोटित आई. नवर्यापासून दूर. आणि एक मुलगी जी बापाचा शोध घेत त्याच्या जवळ पोहोचली आहे. पोरीला ओढ जशी बापाची आहे, तशीच बापालाही ओढ दोघींची आहे एकत्र. एका भावनिक नाट्याचा ‘प्लॉट’ विचार करायला लावतो.
कुटुंबाचं अस्तित्व हे परस्परांच्या प्रेम, आपुलकीतून जुळलेल्या नातेसंबंधात असतं. त्यात बाळाचा जन्म ही वैवाहिक जीवनातली सर्वात आनंददायी घटना. पण जर नवरा-बायकोच्या संबंधात काही कारणांनी दुरावा निर्माण झाला तर त्यांनी जन्म दिलेल्या मुलाबाळांचे पालक हे जिवंत असूनही त्यांना पोरकं व्हावं लागतं. पालकांचे प्रेम त्यांच्यापासून हिरावून घेतलं जातं. भांडण हे आईबापाचं पण फटका मात्र पोरांना बसतो. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत घटस्फोटाच्या अनेक घटना आपल्याकडे दिसतात. त्या उभ्या समाजजीवनाला हादरून सोडणार्या आहेत. कुटुंबव्यवस्था कोलमडून जाऊ नये, जीवनमूल्यांची जपवणूक व्हावी हा त्यामागला सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे. तो जागा असावा.
या नाट्यातही बाप-मुलीच्या नात्यांना जोडणारी हृदयस्पर्शी गोष्ट आहे. एक छुपा मेसेजही देण्यात आलाय. एका नाजूक नात्याचा त्यातला मागोवा अंतर्मुख करतो. त्यामुळे मन अस्वस्थ होते आणि हेच या प्रयोगाचे यश आहे.
फ्रेंड रिक्वेस्ट
लेखन : प्रसाद दाणी
दिग्दर्शन : कुमार सोहोनी
नेपथ्य : संदेश बेंद्रे
संगीत : अशोक पत्की
गीते : गुरू ठाकूर
व्यवस्थापन : प्रशांत माणगावकर, संतोष नाचणकर
सूत्रधार : दिगंबर प्रभू, समीर हम्पी
निर्माते : आकाश भडसावळे, शैलेश देशपांडे, अजय पूरकर