काय संतोषराव, मतदान केलंत की नाही? औंदा कुणाला मत दिलंत?
– संतोष जमखिंडीकर, सांगली
औंदा ‘नोटा’ला मतदान करणार होतो. पण नाही केलं… कारण कोणाकडून ‘नोटाच’ आल्या नाहीत. (कोणाला मतदान केलं हे तुम्हाला सांगून मला काही ‘नोटा’ मिळणार आहेत का? ते सांगा तर सांगतो. आपण कोणालाही मतदान केलं की तो जिंकून आल्यावर ‘नोटा’ घ्यायला दुसरीकडे जाणार. मग आपण का आपलं मत फुकट घालवायचं? एवढाच व्यवहारी विचार आहे बाकी काही नाही.
देशात कोणाचंही सरकार आलं तरी आपल्या परिस्थितीत काहीच फरक पडत नाही. हा चमत्कार सगळे राजकीय पक्ष कसे करून दाखवतात?
– कल्पना रसाळ, शेवगाव
कोणाचंही सरकार आलं तरी काही फरक पडत नाही. असा विचार करून बरेचजण मतदान करत नाहीत, त्यामुळे नेमके नको ते निवडून येतात आणि त्यांच्यामुळे कोणाच्याच परिस्थितीत काही फरक पडत नाही… आणि तुमच्या सारख्या लोकांना तो चमत्कार वाटतो. (कोणाचंही सरकार आलं तर ‘त्या कोणाच्याही’ परिस्थितीत किती फरक पडतो तो बघा. म्हणजे खरा चमत्कार कुठे घडतो ते कळेल.)
माझी प्रेयसी फार डोकं खायला लागली आहे हो हल्ली. तिची बायकोकडे तक्रार करू काय?
– बबन गोंधळे, बीड
तुमचा विमा काढलेला आहे काय? प्रेयसीचं स्वतःचं घरदार आहे का? बायकोने घराबाहेर काढल्यावर प्रेयसी तुम्हाला तिच्या घरात ठेवू शकते का? प्रेयसीला काही काम धंदा आहे का? तुम्हाला दोन वेळा खायला घालू शकते का? की, तुमची रस्त्यावर रहायची तयारी आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधा आणि मग काय गोंधळ घालायचाय तो गोंधळ घाला बबनराव गोंधळे.
आपली बायको किती संशयी आहे, ती किती ढालगज आहे, अशा अर्थाचे पांचट प्रश्न विचारणारे पुरुष इथे सतत दिसतात. तुम्हाला खरंच वाटतं बायका अशा असतात?
– मुग्धा पारसनीस, वर्धा
आधी मला जे वाटायचं ते वाटणं तुमचा हा प्रश्न वाचून बदललं. आता जे वाटतं ते सांगितलं तर तुम्हाला जे माझ्या बद्दल वाटतंय ते वाटणं बदलेल… आणि मी सुद्धा तुम्हाला ढालगज आणि पांचट उत्तर देणारा वाटेन… त्यामुळे आपण आपली झाकली मूठ पंधरा लाखाची ठेवलेली बरी.
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता उघड दार देवा, हे गाणं दादा कोंडके यांच्या सिनेमात असतं तर लोकांनी काय अर्थ घेतला असता?
– रोशन संखे, पालघर
रोशन दादा, का दादांच्या खांद्यावर बंदूक ठेवताय? अर्थ शोधणारे आत्ता आहे त्या गाण्यातही त्यांना हवा तो अर्थ शोधत असतील, की देहाची तिजोरी पुरुषाची आहे की बाईची आहे? त्या तिजोरीत ठेवा कसला आहे? तिजोरीचा नेमका कुठला दरवाजा उघडायचा आहे? आणि कळस म्हणजे या गाण्यात देवाला आळवलं असताना हे अर्थ शोधणारे देवीला आळवत असतील आणि वर दादांचे नाव घेत असतील. हे म्हणजे असं झालं.. अर्थ शोधणार गाव आणि दादांचं नाव!
हिंदी व्यावसायिक सिनेमावाले पूर्वी प्रेक्षकाचं मानसिक वय १५-१६ गृहीत धरायचे. तुम्ही मराठी नाटकवाले ते किती गृहीत धरता?
– दिवाकर साबळे, बेलापूर
नाटकवाल्यांचा जरा प्रॉब्लेम आहे. नाटकाचा प्रेक्षक प्रगल्भ आहे असं वाटून नाटक करावं तर काही मोठी मंडळी बालबुद्धीने वाद घालतात… आणि बालनाट्य केलं की सारी छोटी मंडळी प्रगल्भ बुद्धीने नाटक एन्जॉय करतात.. त्यामुळे नाट्यप्रेक्षकांचे मानसिक वय अजून ठरत नाहीय. (हे उत्तर वाचून तुम्ही नाटक बघू शकता आणि स्वत:चं मानसिक वय ठरवू शकता… त्याकरता नाटक बघायचं थांबवू नका.)
आयपीएल हे क्रिकेट आहे की सर्कस आहे, तुमचं मत काय?
– मोहन यादव, अक्कलकुवा
अर्थात क्रिकेट आहे, पण आर्थिक गणित असल्याने सर्कस करावी लागते.. आता सगळं काही फिक्स असूनसुद्धा काहीच फिक्स नसल्यासारखं खेळायचं, तसं दाखवायचं म्हणजे ‘तारेवरची सर्कस’ करावीच लागते ना.
देवाने धडधाकट हातपाय दिलेले असताना लोक कामधाम न करता भीक का मागत असतील?
– वनिता शिवलकर, बोरगाव
काही लोक तरुणपणी भीक मागून खातात, कारण मोठे झाल्यावर म्हातारपणी मुलाखतीत सांगता यायला हवं ना की मी अमकीतमकी वर्षं भीक मागून खाल्लंय म्हणून… (मुलाखत घेणार्या तुम्ही असाल तर उपप्रश्न विचारू नका की लोकांना का भिकेला लावताय? त्याच क्षणी तुमची नोकरी जाईल आणि तुम्हाला भीक मागून खावं लागेल… जनहितार्थ जारी…)