मुजरा म्हटल्यावर महाराष्ट्राला सर्वात आधी आठवतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच मराठी माणूस मनोमन महाराजांना जो करतो तो मुजरा, म्हणजे मान झुकवून एका हाताने केलेला नमस्कार… त्याचबरोबर दिल्लीच्या दरबारासमोर असा बळजबरीचा मुजरा करणे नाकारणार्या निधड्या छातीच्या वीरांचीही रोमांचकारक आठवण होते… अलीकडच्या काळात दिल्लीश्वरांपुढे मुजरे करून, हुजरेगिरीतून क्षणिक राजकीय लाभ मिळवणार्या काही नरपुंगवांचीही कटु आठवण या शब्दाने होते म्हणा…
…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र मुजरा म्हटल्यावर कोठ्यावरचं मुजरा नृत्य आठवतं… असते एकेकाची सांस्कृतिक परंपरा… मोदी यांनी मटण, मासे, मंगळसूत्र, मुसलमान या मार्गे मुजर्यापर्यंत केलेली वाटचाल आश्चर्यकारक आहे… अष्टौप्रहर सतत मी मी करणार्या या नेत्याने यावेळी आपण काय पराक्रम केले, हे न सांगता काँग्रेस सत्तेवर आल्यास काय काय करील, याची जी टेप लावली आहे, ती विनोदी आणि केविलवाणी आहे… काँग्रेसने या देशावर स्वातंत्र्य मिळाल्यापासून अखंड राज्य केलं, नंतरही राज्य केलं… त्यातल्या कोणत्याही काळात मोदी सांगतात त्यातलं काहीही झालेलं नाही… मग ते आता होईल, हा शोध मोदींनी कुठून लावला आहे? काँग्रेस मुस्लिमांसमोर मुजरा करते आहे, तर तुम्ही मुस्लिमद्वेष एवढीच हिंदुत्वाची बथ्थड व्याख्या असलेल्या तुमच्या व्होट बँकेसमोर ब्रेक डान्स करत आहात का? तुमचाही मुजराच सुरू आहे ना?
या निवडणुकीचा निकाल काहीही लागो… मोदी त्याआधीच पराभूत झालेले आहेत… ते ही निवडणूक निकालाच्या आधीच हरलेले आहेत, हे स्पष्ट आहे…
हा अंक प्रसिद्ध होत असेल, त्या तारखेला मतदानाचा शेवटचा टप्पा सुरू असेल आणि तीनच दिवसांनी निकाल लागणार आहे… मतदानानंतर निकालापर्यंतच्या काळात न्यूज चॅनेल्सवर एक्झिट पोल नावाच्या विशुद्ध भामटेगिरीला ऊत येईल, तो तीन दिवस टिकेल. मात्र, ज्याच्यापाशी किंचितही बुद्धी आहे, शहाणपणा आहे, असा माणूस या निवडणुकांच्या बाबतीत कसलाही अंदाज व्यक्त करण्याच्या फंदात पडणार नाही. देशाच्या मनात काय आहे, हे चार तारखेलाच कळणार आहे.
…मतपेटीतून काहीही निष्पन्न होऊ शकतं, इंडिया आघाडी सत्तेत येऊ शकते किंवा भाजप किंवा एनडीए हे बहुमतापर्यंतही सहज जाऊ शकतात. तीच या घटकेची सर्वात मोठी शक्यता मानली जात असताना मोदी मात्र पराजित झाले आहेत, ते कसे? या निवडणुकीच्या काळात दिसणारे मोदी सैरभैर आहेत, थकलेले आहेत, आत्मविश्वास गमावून भरकटलेले आहेत; त्यांची गाडी रुळांवरून घसरलेली आहे, हे त्यांच्या चाहत्यांनाही दिसत असेल; ते मान्य करतील की न करतील, तो वेगळा मुद्दा.
खरंतर मोदींच्या पाठिशी त्यांची १० वर्षांची कारकीर्द होती. अलीकडच्याच काळात त्यांनी अपूर्ण राममंदिराचं उद्घाटन करून प्रभू रामचंद्रांनाही पक्कं घर देणारा माणूस अशी आपलीच पूजा करून घेतली त्या सोहळ्यात. राममंदिर हा काही देशासमोरचा जीवनमरणाचा, रोजच्या जगण्याचा प्रश्न नाही, पण त्याने हिंदू अस्मिता सुखावली, हे नाकारताही येणार नाही. त्या बळावर ही निवडणूक ते सहज जिंकतील, अशी वातावरणनिर्मिती त्यांनीच केली होती. पण, राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीत आलाच नाही. पीयूष गोयल छाप मंडळींनी क्वचित कुठे ‘जो राम को लाये हैं, हम उन्हें ले आयेंगे’ असला पाचकळ प्रचार करून पाहिला. पण, त्याचा काही लोकांवर प्रभाव पडलेला दिसला नाही. उलट मोदींच्या हाताला धरून चाललेले रामलल्ला पाहून श्रद्धाळूंच्या मात्र मस्तकाची शीर तडतडली. राम मंदिराच्या आंदोलनात रक्त कोणी सांडलं, संघर्ष कोणी केला, बाबरी मशिदीचं पतन कोणी केलं, खटला कोणी लढवला, निकाल कोणी दिला आणि आयत्या पिठावर श्रेयाच्या रेघोट्या कोण ओढतंय, हे लोकांना दिसलंच. शिवाय, रामापेक्षा मी मोठा, हा मोदींचा भाव काही लपून राहिला नाही. संबित पात्रा नामक पात्राने भगवान श्री जगन्नाथ हे मोदींचे भक्त आहेत असे उद्गार काढल्यानंतर तर मोदींचा भ्रम आणखी वाढला असावा. आपण जैविक पद्धतीने जन्मलोच नाही, आपल्याला परमेश्वराने खास काम करायला पाठवले आहे (म्हणजे आपण ईश्वरी अवतार आहोत), असं सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली. सगळा देश अदानीच्या झोळीत टाकण्याचं कार्य करायला यांना कोणत्या ईश्वराने पाठवलं आहे, याचा तपास एकदा करावा लागेल आणि त्या ईश्वराचाच बंदोबस्त करावा लागेल खरंतर.
आता तर आपण अविनाशी आहोत, आपण आणखी कितीही वर्षं भारतावर राज्य करू, असाही भ्रम त्यांना झाला आहे.
त्यांची एकंदर नाजुक मानसिक स्थिती पाहता या निवडणुकीनंतर भाजपची मंडळी शहाणी असतील तर त्यांना मार्गदर्शक मंडळात ढकलून मोकळी होतील आणि त्यांना विश्रांती देतील, उपचारांची व्यवस्था करतील. कारण, यापुढे भाजप सत्तेत आलाच आणि मोदीच सर्वोच्च पदावर विराजमान झाले तरी त्यांची जादू आणि धास्ती कायमची संपलेली आहे…
…मोदी सत्तापदावर बसलेच तर त्यांचा इतका खडतर काळ सुरू होईल की यापेक्षा सत्तेत आलो नसतो तर परवडले असते, अशी त्यांची अवस्था होईल…
आजवर त्यांना मुजरा करणारे हात तेव्हा गजरा बांधून बसलेले असतील.