फिजिओथेरपीचं क्षेत्र विस्तारायला म्हणजे सामान्य जनतेपर्यंत जायला आता सुरुवात झाली आहे. गेल्या दहा एक वर्षांत फिजिओथेरपी किती आवश्यक आणि महत्त्वाची आहे, हे लोकांना कळू लागले आहे. आरोग्यव्यवस्थेतील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी (स्पेशलिस्ट्स) रुग्णांना फिजिओथेरपी घेण्यासाठी फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांना भेटण्यास, त्यांची ट्रीटमेंट घेण्यास सांगू लागले आहेत. आणि त्याचे रुग्णांना खूप उत्तम परिणाम अनुभवायला मिळत आहेत.
२० वर्षेआधी असे वाटे की फिजिओथेरपिस्ट्स म्हणजे केवळ क्रिकेट टीमसाठीच असतात. वृत्तपत्रात क्रीडाविषयक वृत्तांतात फिजिओथेरपिस्ट मंडळींच्या नावाचा उल्लेख असे. एखाद्या क्रिकेटपटूला दुखापत झाल्यास त्याच्यावर इलाज करण्याच्या अनुषंगाने फिजिओचा आवर्जून उल्लेख होई.
आज या क्षेत्राचा शिरकाव केवळ क्रिकेट वा तत्सम खेळांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही, तर सर्वदूर पसरलेला आहे. आज विविध शारीरिक आजार, स्नायूंविषयक तक्रारी, मणक्याला दुखापत होऊन झालेले आजार, अर्धांगवायू या आणि अशा विविध आजारांसाठी फिजिओथेरपी विशेष महत्त्वाची ठरत आहे. संबंधित स्पेशलिस्ट डॉक्टर्स फिजिओथेरेपी घेण्यास सांगून रुग्णांना ठणठणीत बरे करण्यास प्रयत्नशील आहेत.
गेल्या चौदा वर्षांपासून फिजिओथेरपी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि अनेक रुग्णांना आपल्या थेरपीने ठणठणीत करण्यात योगदान देणार्या डॉ. विशाखा या ठाण्यातून व्यवसाय करतात. त्यांची कारकीर्द कल्याण, ठाणे या दोन्ही शहरांत राहिलेली आहे. त्यांनी आजपर्यंत हजारो पेशंट्सवर इलाज केला आहे.
त्यांचे फिजिओथेरपीचे शिक्षण परळच्या सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजात झाले आहे. हे महाविद्यालय केईएम हॉस्पिटलचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांचे या महाविद्यालयात प्रवेश मिळणे हे स्वप्न असते. कारण इथे शिकतानाच प्रचंड अनुभव मिळतो, शिवाय अतिशय अनुभवी प्राध्यापकवर्ग वाट्याला येतो. त्यांचे अनुभवातून आलेले ज्ञान विद्यार्थ्यांना आयुष्यभर मार्गदर्शक ठरते. इथे विद्यार्थ्यांना विविध आणि दुर्मिळ आजारांचे रुग्ण पाहायला मिळतात, त्यांच्यावर ट्रिटमेंट करण्याची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढतच जाते. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर इथून बाहेर निघणारा विद्यार्थी, या क्षेत्रात अधिकाधिक शिकण्याची तीव्र इच्छा असेल तर सोबत खूप काही घेऊन जाऊ शकतो, जात असतो.
डॉ. विशाखा यांचे वडील प्रकाश जगन्नाथ महाजन यांचा डोंबिवलीत प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता आणि आई प्रतिभा महाजन डोंबिवलीतील सुप्रसिद्ध डीएनसी स्कूल येथे शिक्षिका होत्या. विशाखा यांचा जन्म मध्य प्रदेशातील खरगोन, इंदूर येथील आहे. शालेय शिक्षण डोंबिवलीत झाले असून त्यांनी २००२ साली मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला.
आपल्या पेशातून लोकांना मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत, त्यांचे दु:ख कमी झाले पाहिजे, असे त्यांचे विचार होते. त्यामुळेच त्यांना वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण घेण्यात रस होता. त्यांची आतेबहीण डॉ. गायत्री राजे या रेडिओलोजिस्ट असून, त्यांनीच विशाखा यांना फिजिओथेरपीचे शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. केईएम हॉस्पिटलमुळे खूप शिकायला मिळते. प्रत्यक्ष अनुभव मिळतो. विविध आजार असलेले रुग्ण, दुर्मीळ आजार असणारे रुग्ण, अनेकानेक व्याधींनी ग्रस्त असलेले रुग्ण पाहायला मिळतात, त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्याची संधी मिळते. शिवाय तेथील अनुभवी प्राध्यापकांकडून मार्गदर्शन मिळते, ज्याची फिजिओथेरपीच्या सबंध कारकीर्दीत खूप मदत होते. अशा वातावरणामुळे, जात्याच कष्टाळू, मेहनती आणि जिज्ञासू असलेल्या विशाखा यांना वैद्यकीय ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी वाव मिळाला.
त्यांनी केईएम हॉस्पिटलमधील ऑर्थो वॉर्डमध्ये अनेक रुग्ण पाहिले, त्यांच्यावर ट्रीटमेंट केली. शिवाय वर्गात थिअरीज शिकवल्या जातच होत्या, आणि त्याच थिअरीज इथे प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पडताळून पाहता येत होत्या. जिज्ञासा असेल तर शिकण्यातही मजा येते, ते ओझे वाटत नाही, शिकण्याचा तणाव न घेता विशाखा यांनी शिक्षणाचा आनंद घेतला.
फिजिओथेरपी म्हणजे केवळ व्यायाम करणे, वा करवून घेणे नाही, तर ते एक शास्त्र आहे, त्यासाठी अभ्यासक्रम आहे. त्याकरता साडेचार वर्षांचा डिग्री कोर्स आणि सहा महिन्यांची इंटर्नशिप करावी लागते, तेव्हा कुठे नावापुढे कायदेशीर पद्धतीने डॉक्टर लावता येते. यात शिकण्यासाठी अॅनाटोमी, फिजिऑलॉजी, बायोकेमिस्ट्री, फिजिओथेरपी, इलेक्ट्रोथेरपी हे विषय असतात.
जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये शिकताना अनुभवाला आलेल्या तेथील प्राध्यापक मंडळींच्या अनेक आठवणी डॉ. विशाखा सांगतात. जवळजवळ सारेच प्राध्यापक फार मनापासून शिकवायचे, एक उत्तम डॉक्टर कसा घडवता येईल, याकडे ते लक्ष देत, ट्रीटमेंट करताना रुग्णाची डिग्निटी जपणे, व्यायाम घेण्याआधी त्याची परवानगी घेणे, अशा बारीकसारीक बाबीसुद्धा प्रशिक्षणाचा भाग म्हणून शिकवल्या जातात. डॉ. भारती, डॉ. जयमाला शेट्ये, डॉ. मधुरा, डॉ. भावना, डॉ. लक्ष्मीप्रभा, डॉ. राजश्री, डॉ. मारिया, डॉ. दीप्ती या सर्व प्राध्यापिकांबाबत डॉ. विशाखा कृतज्ञता व्यक्त करतात. या डॉक्टर्समुळेच त्या आज त्य्ाांची प्रॅक्टिस अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत, असे त्या सांगतात.
डॉ. विशाखा केईएम हॉस्पिटल येथे सुरुवातीला रुग्णांवर ट्रीटमेंट करताना रुग्णांची दु:खे, वेदना, यातना पाहून हताश होत असत. त्यांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांबद्दल वाईट वाटे, मात्र अशा भावना अनियंत्रित ठेवल्या तर आपण रुग्णांवर इलाज करू शकणार नाही, याची समज आल्यामुळे त्या रुग्णांच्या वेदनांपासून स्वत:ला अलिप्त ठेवू लागल्या आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट करू लागल्या.
डॉ. विशाखा यांनी २००७-०८ साली आपले फिजिओथेरपीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लगेच सिंबायोसीस कॉलेज पुणे येथून इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस हा कोर्ससुद्धा केला.
त्या शिक्षण संपवून मल्टिपल सेलेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेत फिजिओथेरपिस्ट म्हणून रुजू झाल्या. तिथे त्या अनेक रुग्णांवर ट्रीटमेंट करू लागल्या. बेडवर पडून असलेल्या रुग्णांना, चालू न शकणार्या रुग्णांना त्या घरी जाऊन ट्रिटमेंट देऊ लागल्या. उमेदीच्या काळातच त्यांनी कल्याण ते मुंबई येथील अनेक रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन ट्रीटमेंट दिली आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि लोकसंपर्क वाढला.
तसेच डॉ. विशाखा यांनी तब्बल १४ महिने मस्कत, मिनिस्ट्री ऑफ ओमान येथे फिजिओथेरपिस्ट म्हणून काम केले आहे. तिथला त्यांचा अनुभवही फार सुंदर राहिला आहे. डॉ. विशाखा यांच्याकडे कल्याण, डोंबिवली व ठाणे येथील डॉक्टर्स, ऑर्थोपेडिक सर्जन्स, न्यूरोलॉजिस्ट्स, जनरल फिजिशियन्स, जनरल प्रॅक्टिशनर्स न्यूरोलॉजिस्ट्स त्यांच्या रुग्णांना रेफर करत असतात. आणि यात कोणताही आर्थिक व्यवहार नसतो. फक्त या स्पेशालिस्ट असलेल्या डॉक्टरांना डॉ. विशाखा यांच्या थेरपीवर, त्यांच्या सचोटीने काम करण्याच्या पद्धतीबद्दल विश्वास असतो व त्यांचा रुग्ण त्यांना ठणठणीत बरा करायचा असतो, म्हणून ते त्यांचे रुग्ण आवर्जून डॉ. विशाखा यांच्याकडे पाठवत असतात.
प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम केले, आपण रुग्णांना उत्तरदायी राहिले की रुग्ण दूरवरून आपल्याकडे येतात, सीनिअर डॉक्टर्स पाठवतात, असे डॉ. विशाखा सांगतात. १४ वर्षांच्या फिजिओथेरपीच्या कारकिर्दीत त्यांच्याकडे असे अनेक रुग्ण आले आहेत, जे येताना व्हीलचेअरवर आणले गेले होते, मात्र काही दिवसांच्या, महिन्यांच्या काळात ते स्वत:च्या पायावर केवळ उभेच राहिले नाही तर चालू फिरूही लागले. मात्र याचे श्रेय त्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देतात, कारण ट्रीटमेंटमध्ये सातत्य ठेवणे फार गरजेचे असते, जे बहुतेक रुग्ण ठेवत नाहीत अन् दुरुस्त होण्याजोग्या अडचणी वाढवून ठेवतात.
सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ऑर्थोपेडिक इश्यूज, अर्धांगवायू, स्पाइन ट्रीटमेंट, बायपास सर्जरी या आजारांत वा उपचारांत फिजिओथेरपीची गरज असते. त्याचबरोबर मनगटाची दुखणी, प्लंबर, गादी सरकणे, गादी फाटणे, यासाठीसुद्धा फिजिओथेरपी ट्रीटमेंटची गरज लागते, जी डॉ. विशाखा देतात.
हल्ली बैठ्या कामांमुळे, मोबाईलच्या सततच्या वापरामुळे, कॉम्प्युटरसमोर बसून काम केल्यामुळे, दिवसभर वाहन चालवल्यामुळे मानेची, मणक्याची दुखणी वाढली आहेत, याला ऑक्युपेशनल हॅझार्ड म्हणतात, या कामाच्या पद्धतीमुळे, मोबाईलच्या वापरामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवल्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी डॉ. विशाखा ऑनलाइन आणि प्रत्यक्ष थेरपी सेशन्स घेत असतात. किंबहुना अशा समस्या येऊच नये, यासाठी जागरुकता वाढवण्याचे कामही त्या विविध माध्यमातून सातत्याने करत आहेत.
डॉ. विशाखा या रुग्णांना ठीक करण्यासाठी आपले सारे ज्ञान, मेहनत वापरतात. त्यात त्या कच खात नाहीत, त्या कष्टाळू आहेत, आळशी नाहीत, समोर उभ्या राहून रुग्णाचा एकेक व्यायाम घेतात. कामात चालढकल करणे, काम टाळणे, काम केवळ असिस्टंटवर सोपवणे हा त्यांचा स्वभाव नाही. जे काम करायचे ते उत्तम करायचे, अन्यथा करायचेच नाही, असा त्यांचा स्वभाव आहे, त्यांचे रुग्ण बरे होण्यात त्यांच्या या स्वभावाचाही मोठा वाटा आहे, असे त्यांचे रुग्ण सांगतात. डॉ. विशाखा सांगतात की मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेतल्याचा एक सर्वात महत्त्वाचा उपयोग असा झाला, तेथे दाखल होणार्या बहुतांश रुग्णांचा आर्थिक स्तर वरचा नसतो, त्यांना नियमित खर्चही पेलवणारे नसतात. फिजिओथेरपीसाठी लागणारी साधने काहीशी महाग मिळतात, जी रुग्णांच्या नातेवाईकांना परवडतीलच असे नाही, त्यामुळे उपलब्ध संसाधनांमध्येच, कमी खर्चिक साधनांद्वारे रुग्णावर ट्रीटमेंट कशी केली जाईल, हे शिकायला मिळते. पुढे असे गरीब वा निम्नवर्गीय घरातील रुग्ण आले तरी त्या सार्या ट्रेनिंगमुळे कमी खर्चिक साधनांद्वारे ट्रीटमेंट करणे शक्य होते, जे रुग्णांच्या नातेवाईकांच्या खिशाला परवडणारेही असते.
इथून पुढे फिजिओथेरपीने दिलेले उत्तम परिणाम पाहता, फिजिओ ट्रीटमेंटची मागणी वाढतच राहील, असे दिसते, असे डॉ. विशाखा सांगतात. डॉ. विशाखा यांनी आजपर्यंत आपल्या १४ वर्षांच्या कारकीर्दीत दहा हजार रुग्णांपेक्षा अधिक रुग्णांना ट्रीटमेंट करून बरे केले आहे आणि त्यापैकी अनेकांना खर्या अर्थाने त्यांच्या ‘पायावर उभे केले’ आहे.