युरोप, आफ्रिकन, ‘फिफा’ विश्वचषकाच्या उत्सवात रमणारी तसंच रोनाल्डो, मेसी, नेयमार, एम्बाप्पे यांना डोक्यावर घेणारी भारतीय फुटबॉल मानसिकता सुनील छेत्रीला न्याय देऊ शकली नाही. निवृत्ती काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या छेत्रीची वाटचाल आणि भारतीय फुटबॉल संस्कृतीशी न जुळलेल्या भावनिक नाळेचा हा विश्लेषणात्मक बंध.
– – –
‘‘आमच्यावर रागवा, हवं तर शिव्याही द्या; पण आमचा खेळ पाहायला मैदानावर या!’’ असा आर्जवी हाक भारताचा कर्णधार सुनील छेत्रीनं सहा वर्षांपूर्वी मुंबईत दिलेली. असं करण्याची परिस्थिती त्याच्यावर का ओढवली, हे समजून घेताना भारतातली क्रीडा मानसिकताही समजून घेणं आवश्यक ठरतं.
भारतीय नागरिक क्रिकेटमध्ये रमतात, त्याला राज्याच्या सीमारेषा नाहीत. पण बाकीच्या क्रीडा प्रकारांच्या बाबतीत हे रमणं हे राज्याच्या सीमा बदलल्या की बदलतात.
फुटबॉलच्या बाबतीत सांगायचं, तर कोलकातासहित पूर्वेच्या काही राज्यांमध्ये हे प्रेम ओसंडून वाहताना दिसतं. काही राज्यांमध्ये सीमा ओलांडून आसपासच्या काही देशांमधील फुटबॉलपटू खेळताना दिसतात. हेच फुटबॉल वेड केरळ, गोवा, महाराष्ट्राच्या कोल्हापूरमध्ये आढळतं. पण जेव्हा प्रत्येक चार वर्षांनी ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा उत्सव जागतिक पातळीवर रंगतो, तेव्हा याच उत्साहाचा वैâफ देशात विविध पद्धतीनं पाहायला मिळतो. तो कधी लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो,
रॉबर्ट लेवांडोवक्सी, किलियन एम्बाप्पे, नेयमार, रोमेलू लुकाकू, मोहम्मद सालाहवरील निस्सीम भक्तीत. गोव्याच्या समुद्रकिनार्यांवर, भुवनेश्वरला वाळूशिल्पात, तर कधी रात्र-रात्र जागून सामने पाहण्यात, तर कधी त्यावर चर्चा करण्यात देशातील फुटबॉलचाहते मश्गूल असतात. तशी भारतातली तरुण पिढी मँचेस्टर युनायटेड, रेयाल माद्रिद, बार्सिलोना, इत्यादी काही फुटबॉल क्लब आणि त्यांच्याकडून खेळणार्या याच जागतिक तारांकित फुटबॉलपटूंच्या नोंदीही तोंडपाठ ठेवतात. अगदी आजच्या क्रीडापिढीला अनुरूप ‘फँटसी लीग’मध्येही गुंततात आणि गुंतवतात…
पण हे प्रेम सुनील छेत्रीच्या वाट्याला कधीच आलं नाही. १९५० आणि १९६०च्या दशकांमध्ये प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहिम यांनी भारतीय फुटबॉलला सुवर्णकाळ दाखवला. त्या काळात चुन्नी गोस्वामी, पीके बॅनर्जी आणि तुलसीदास बलराम ही भारतीय फुटबॉलमधील त्रिमूर्ती बरीच गाजली. त्यामुळेच भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदकं कमावता आली. इतकंच कशाला ऑलिम्पिकमध्ये भारतानं पराक्रम गाजवला, तर विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न शूजचा अभाव, आर्थिक अडचणी, ९० मिनिटांचा सामना खेळण्याची असमर्थता, आदी अनेक कारणास्तव अधुरं राहिलं. या सुवर्णकाळानंतर भारतातील दोन तेजस्वी फुटबॉलपटूंनी दखल घेण्यास भाग पाडलं. त्यापैकी एक म्हणजे बायच्युंग भुतिया, जो निवृत्तीनंतर संघटनात्मक कारकीर्द उपभोगतोय, तर दुसरा म्हणजे सुनील छेत्री. ज्यानं नुकतीच निवृत्तीची घोषणा केलीय.
छेत्रीला सावत्रपण वाट्याला आलं, हे सिद्ध करण्यासाठी ही आकडेवारी पाहणं महत्त्वाचं ठरतं. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील गोल करणार्या फुटबॉलपटूंच्या यादीत पोर्तृगालचा रोनाल्डो (१२८ गोल) अग्रस्थानी आहे, तर अली दाई (१०८ गोल) दुसर्या आणि मेसी (१०६ गोल) तिसर्या स्थानावर आहे. पण यादीतल्या चौथ्या क्रमांकावर ९४ गोल खात्यावर असलेल्या भारताच्या छेत्रीच्या नोंदी काही मोजक्याच देशी फुटबॉलरसिकांचं लक्ष वेधतात. युरोप आणि आफ्रिकन फुटबॉल संस्कृतीचा इतिहास त्यांच्या तोंडपाठ असतो. युरो चषक आणि आफ्रिकन कप ऑफ नेशन्समध्ये ते रमतात; पण भारतीय फुटबॉलचाहत्यांना आपला सोनेरी भूतकाळ, वर्तमानकाळातले सुवर्णक्षण माहीत नसतात, क्लबच्या लीग पाहण्यासाठी आणि चर्चेत ते रमतात; पण ‘आय-लीग’, इंडियन सुपर लीग (आयएसएल) सारख्या लीगबाबत ते अजाण असतात. छेत्रीला याचंच शल्य वाटलं होतं.
अंधेरी क्रीडा संकुलातील फुटबॉल एरिनामध्ये चायनीज तैपेईविरुद्धच्या सामन्यात भारतानं ५-० असा दणदणीत विजय मिळवला. छेत्रीनं हॅट्ट्रिकही नोंदवली. पण हा सामना पाहायला जेमतेम अडीच हजार प्रेक्षक मैदानावर होते. त्यामुळे सामना संपल्यावर छेत्रीनं समाजमाध्यमांवर चाहत्यांनी मैदानावर येण्यासाठी जोगवा मागितला होता. अगदी भारताचा तारांकित क्रिकेटपटू विराट कोहलीनंही छेत्रीला आणि देशातील फुटबॉलला पाठबाळ करणारं भाष्य समाजमाध्यमांवर केलं. या आवाहनाचा सकारात्मक परिणाम पुढच्या सामन्यावर झाला आणि प्रेक्षागृह गर्दीनं फुललं. छेत्रीचा कोहलीशी ऋणानुबंध जुळला, तो याच घटनेपासून. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वीही छेत्री सख्खा मित्र कोहलीशी चर्चा करायला विसरला नाही. नेमक्या याच दिवशी कोहलीनंही देशासाठी काहीतरी संस्मरणीय यश मिळवून दिल्यावर निवृत्ती पत्करू शकेन, अशा प्रकारचे संकेत दिले. हा योगायोग म्हणावा की आणखी काही?
छेत्रीचं कौशल्य म्हणजे हमखास गोल करून देणारा आक्रमक आणि कुशल कर्णधार. हे त्याचे गुण भारताकडून आणि ‘आयएसएल’मधील बेंगळूरु क्लबकडून दिसून आले. दोन वर्षांपूर्वी ‘फिफा’नं छेत्रीच्या कारकीर्दीवर आधारित ‘फॅन्टॅस्टिक कॅप्टन’ हा माहितीपट तयार केला. त्यामुळे हीच त्याला उपाधी मिळाली. छेत्रीचा जन्म तेलंगण राज्यातील सिकंदराबादचा. वडील केबी छेत्री सेनादलातील अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते, ज्यांनी भारतीय सेनादलाच्या फुटबॉल संघाचं प्रतिनिधित्वही केलं. तर आई सुशीला आणि तिच्या जुळ्या भगिनी नेपाळच्या राष्ट्रीय महिला संघाकडून खेळलेल्या. त्यामुळे दार्जिलिंगला घालवलेल्या बालपणात त्याला फुटबॉलचं वातावरण घरातूनच मिळालं. शालेय दिवसांत खोडकर आणि मागच्या बाकावरील विद्यार्थी ही त्याची ओळख होती. पण आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू होण्याच्या स्वप्नानं त्याला तेव्हापासूनच झपाटलं होतं.
सुनीलच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला २०००मध्ये. परंतु त्यानं राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केलं, ते २००५मध्ये, पाकिस्तानविरुद्ध. सिटी क्लब दिल्ली, मोहन बागानकडून याआधीच लक्ष वेधणारा छेत्री अल्पावधीत भारतीय संघाचा अविभाज्य भाग झाला. नेहरू चषक, सॅफ अजिंक्यपद, एएफसी चॅलेंज चषक, आदी स्पर्धांमधून छेत्रीची गुणवत्ता दिसून आली. २०११मध्ये त्याच्याकडे नेतृत्वाची धुराही सोपवण्यात आली. त्याच्या कामगिरीतलं सातत्य एवढं अचाट होतं की, गोल करण्याच्या त्याच्या कर्तबगारीच्या बळावर तो जागतिक फुटबॉलपटूंशी स्पर्धा करू लागला. छेत्री इंग्रजी, हिंदी, नेपाळी, बंगाली आणि कन्नड अशा पाच भाषा बोलतो, तसंच तेलुगू, मराठी आणि कोकणी भाषा त्याला समजतात. या भाषाज्ञानामुळे तो फुटबॉलमधल्या सहकार्यांशी सहजगत्या संवाद साधतो. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार त्यानं विक्रमी सात वेळा पटकावला. अर्जुन पुरस्कार आणि पद्माश्री पुरस्कारापाठोपाठ २०२१मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरला.
छेत्री भारताकडून सर्वाधिक १५० आंतरराष्ट्रीय सामने खेळला. हा सामना गुवाहाटीत अफगाणिस्तानविरुद्ध मार्चमध्ये झाला. त्या सामन्यातही छेत्रीनं गोल झळकावला, पण दुर्दैवानं भारतानं तो सामना १-२ असा गमावला. आता वयाच्या चाळिशीकडे झुकलेला छेत्री फुटबॉलभूमी कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर ६ जूनला कुवेतविरुद्ध १९ वर्षांच्या कारकीर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालाय. पण कारकीर्दीचं विश्लेषण केल्यास छेत्रीला अपेक्षित मोठेपण प्राप्त झालं नाही. इथे क्रिकेटनं फुटबॉलला झाकोळलं, असा आरोप करण्याची मुळीच आवश्यकता नाही. कारण गेल्या दोन-अडीच दशकांत बुद्धिबळात विश्वनाथन आनंद, प्रज्ञानंद, गुकेश, टेनिसमध्ये लिएण्डर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा, बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, अॅथलेटिक्समध्ये नीरज चोप्रा अशी असंख्य नावं घरोघरी पोहोचली आणि आपापल्या खेळांची संस्कृती त्यांनी रुजवली तसंच परिपक्वही केली. पण हे प्रेम भारतीय फुटबॉलपटूंच्या वाट्याला आलं नाही. कारण फुटबॉलचा हितशत्रू हा फुटबॉलच ठरला.
भारतीय फुटबॉल संघ सध्या ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीत १२१व्या क्रमांकावर आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही आपण फुटबॉल संघ पाठवला नव्हता. कारण आशियाई पातळीवर १४व्या क्रमांकावरील संघाकडून पदकाच्या अपेक्षा करणं व्यर्थ असल्याचं देशातील क्रीडाधुरिणांचं मत होतं. म्हणजेच देशात फुटबॉलची फरफट सुरू आहे, हे वास्तव आहे. फुटबॉलचाहत्यांना ‘आभाळागत माया तुमची आम्हावरी राहू दे…’ अशी साद घालणारा हा अवलिया छेत्री निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना नवे तारे तेजानं झळकताना आढळत नाहीत, ही खरी गंभीर खंत आहे. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे जसे महानायक क्रिकेटचा वारसा चालवणारे ठरले, तसे छेत्रीनंतर कोण? याचं उत्तर ठोसपणे सापडत नाही. पण हा ध्रुवतारा उत्तर शोधण्यासाठी छेत्री भविष्यात नक्कीच मैदानी प्रयत्न करेल, अशी आशा धरूया. कारण त्याच्या आतापर्यंतच्या वागण्यातून त्यानं आपण फुटबॉलचा सदिच्छादूत असल्याचं सिद्ध केलंय.