ग्रहस्थिती : गुरू वृषभ राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ, बुध, राहू, नेपच्युन मीन राशीमध्ये, प्लूटो मकर राशीमध्ये, रवि, शुक्र हर्षल मेष राशीमध्ये, शनि कुंभ राशीत. विशेष दिवस : १९ मे मोहिनी एकादशी, २० मे सोमप्रदोष, २१ मे श्री नृसिंह जयंती, २३ मे बुद्धपौर्णिमा.
मेष : कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची, विशेषत: व्यावसायिक मंडळींनी काळजी घ्यावी. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास करताना काळजी घ्या. काहींना आर्थिक लाभ मिळेल, पण, उधळपट्टी टाळा. घरातील शुभकार्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळांrच्या गाठीभेटी होतील. जुन्या आठवणींना उजळा मिळेल. तरुणांचा उत्कर्ष घडवणारा काळ. मुलांच्या वागण्या-बोलण्यावर लक्ष ठेवा. घरात बोलताना काळजी घ्या, छोटी चूक वादंग घडवू शकते. नव्या ओळखींचा फायदा होईल. खेळाडूंना यश मिळवून देणारा काळ.
वृषभ : मनासारख्या गोष्टी घडल्याने कामाचा हुरूप वाढेल. आनंद द्विगुणित होईल. नोकरी, व्यवसायात यशाची दारे खुली होतील. नोकरदारांना यशदायक काळ राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ कौतुक करतील, वाढीव जबाबदारी मिळेल. व्यवसायात नव्या संकल्पनांना आकार देताना घाई करू नका. विचारपूर्वक पुढे जा, भविष्यात चांगले रिझल्ट मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, पत्नीची मोलाची साथ मिळेल. सरकारी कामे सावकाश मार्गी लावा. मालमत्तेच्या प्रश्नावरील चर्चा पुढे ढकला. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे. उच्चशिक्षणात खुशखबर कानी पडेल.
मिथुन : नोकरी शोधणार्यांच्या मनासारखी संधी चालून येईल. व्यवसायात यशदायक काळ अनुभवाल. फक्त निर्णय घेताना अतिघाई टाळा. कलाकारांना उत्तम यश व मान-सन्मान मिळेल. कुटुंबियांसोबत पर्यटनवारी होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. सामाजिक क्षेत्रात गौरव होईल. प्रेम प्रकरणात धीराने घ्या. कोणत्याही मुद्द्यावर लगेच प्रतिक्रिया देऊन गैरसमज वाढवू नका. मित्रांशी जेव्हढ्यास तेवढे राहा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या.
कर्क : व्यापारी, व्यावसायिकांना यश मिळेल, नवी खरेदी होईल. नोकरदारांना यश मिळेल. कलाकारांना सरकारी सन्मान मिळेल. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणी बोलताना, वागताना काळजी घ्या. वादांकडे दुर्लक्ष करा. अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतील. प्रवासात नव्या ओळखीच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. व्यवसायात काम मार्गी लावण्यासाठी चुकीचा मार्ग निवडणे टाळा. जुनाट आजार डोके वर काढतील. शेअर, लॉटरी, सट्टा यांच्या प्रेमात पडू नका. अन्यथा आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. लेखक, पत्रकार, कलाकार, गायकांना उत्तम काळ.
सिंह : मुलांकडून आनंददायक बातमी मिळाल्याने घरात उत्साह वाढेल. स्पर्धापरीक्षेतून यश मिळेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील, कामात घाई टाळा. मित्र-मंडळी, नातेवाईक, कुटुंबियांबरोबर बोलताना काळजी घ्या. वाद टाळा. तरुणांच्या आयुष्यात भाग्योदयाच्या घटना घडतील. संगीतकार, शिक्षक, शिल्पकार, संशोधकांना मान-सन्मानाचे योग आहेत. घरात ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. घरात एखादा छोटेखानी कार्यक्रम होईल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्याल.
कन्या : मनासारख्या घटना घडतील, पण, चित्ती समाधान असू द्या. नवीन घर घेण्याबाबतची चर्चा मार्गी लागेल. घरातल्या ज्येष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीत कोणत्याही गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. नित्यकर्मात ध्यानधारणेकडे विशेष लक्ष द्या. भाऊ-बहिणीच्या बाबतीत चिंता सतावेल. नोकरीत प्रमोशन, पगारवाढीच्या बातम्या कानावर पडतील. अचानक मोठा खर्च निर्माण होईल. भागीदारीत वाद टाळा. व्यवसायात स्पर्धकांवर मात करण्यासाठी बुद्धिकौशल्याचा वापर कामी येणार आहे. मौजमजेसाठी वेळ घालवू नका. पैशाची बचत करा. उधार-उसनवारी नकोच.
तूळ : मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. जुना आजार त्रास देईल. काळजी घ्या. खाण्यापिण्याची पथ्ये पाळताना हयगय केल्यास पोटाचे विकार ओढवून घ्या. पती-पत्नीत वाद टाळा, मौनात राहा. व्यवसायात उत्तम लाभ मिळतील. नोकरीच्या प्रयत्नात असल्यास चांगल्या संधी मिळू शकतात. घरात, बाहेर आपणच बरोबर ही भूमिका घेणे टाळा. नवा व्यवसाय करताना कागदपत्रे तपासूनच पुढचे पाऊल टाका. मेडिकल क्षेत्रात उत्तम काळ राहणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : कोणतेही काम काळजीपूर्वक करा. अचानक आनंद वाढवणार्या घटना घडल्याने घरात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत एखाद्या त्रासदायक प्रसंगाकडे फार लक्ष देऊ नका. व्यसनी मंडळींपासून दूरच राहा. तरुणांसाठी उत्कर्षकारक काळ. नव्या संकल्पनांचे व्यवसायात रूपांतर कराल. सामाजिक कामातून आनंद मिळेल. अनपेक्षितपणे थकीत येणे वसूल होईल. व्यवसायातले अडथळे कुशलतेने ओलांडा. प्रेमप्रकरणात काळजी घ्या. ज्येष्ठांशी गोड सुसंवाद ठेवून कामे मार्गी लावा.
धनु : उन्हाळ्यात आरोग्याची आणि समारंभात दुसर्यांशी बोलताना काळजी घ्या. तेथे जुन्या मित्रांच्या गाठीभेटींमधून आनंद वाढेल. व्यावसायिकांना यश मिळेल. नातेवाईकांच्या मदतीला धावून जावे लागेल, आर्थिक मदत करावी लागेल. आर्थिक व्यवहारात लक्ष द्या. तरुणांना यश मिळेल. विदेशात उच्चशिक्षणाला जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. अचानक धनलाभ होतील. वास्तूमधून चांगले लाभ होतील. घरात किरकोळ वादांकडे दुर्लक्ष करा. विवाहेच्छुकांचे लग्न जमेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मकर : आर्थिक बाजू भक्कम होईल. विचारपूर्वक निर्णय घेऊन पुढे जा. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. व्यवसायात घाईमुळे नुकसान होईल. सरकारी कामात कायद्याची चौकट मोडू नका. आईवडीलांची काळजी घ्या. कुणाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. नोकरीतल्या धावपळीचा आरोग्यावर परिणाम होईल. नोकरदारांना विदेशात जाण्याची संधी मिळेल. कोणालाही पैसे विचार करूनच द्या. बँक कर्ज मंजूर होईल. कोर्टातले दावे मार्गी लागतील. मुलांकडून चांगली बातमी कानी पडेल. तीर्थयात्रेमुळे समाधान लाभेल. कापणे, भाजणे असे किरकोळ त्रास होतील.
कुंभ : नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. प्रलंबित कामे मार्गी लागतील. व्यवसायात अचानक मोठ्या कामाची संधी चालून येईल. नियोजनपूर्वक पुढे चला, म्हणजे यशाचे शिखर गाठाल. कलाकारांच्या नावलौकिकात भर पडेल. घरात ज्येष्ठांच्या हो ला हो करा. अडकलेले काम गोडीत काढून घ्या. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. कोणावर अतिविश्वास टाकू नका. कामाच्या ठिकाणी मोजकेच बोला. दानधर्मातून आनंद मिळेल. सामाजिक कार्यात वेळ खर्च होईल.
मीन : प्रवासात काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांपुढे जपून बोला. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढून चिडचिड होईल. अचानक खर्च होतील. नियोजन करा. मित्रांशी बोलताना काळजी घ्या. चेष्टामस्करी टाळा. तरुणांच्या बाबतीत मनासारख्या घटना घडतील. मालमत्तेचे प्रश्न सुटतील. सरकारी कामे मार्गी लागतील. नवे वाहन घेण्याचा विचार मार्गी लागेल. मौजमजेसाठी पैसे खर्च कराल. पत्नीसाठी एखादी महागडी वस्तू खरेदी कराल, त्यामुळे घरातले वातावरण चांगले राहील.