ग्रहस्थिती : गुरू वृषभ राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ, बुध, राहू, नेपच्युन मीन राशीमध्ये, प्लूटो मकर राशीमध्ये, रवि, शुक्र, हर्षल मेष राशीमध्ये, शनि कुंभ राशीत. विशेष दिवस : ११ मे विनायकी चतुर्थी, १५ मे दुर्गा बुधाष्टमी, श्री शंकर महाराज पुण्यतिथी.
मेष : विचारांना गती देताना घाई करू नका. आश्वासन विचारपूर्वक द्या. नोकरीत मनाविरुद्ध घटना घडल्याने चिडचिड होईल. व्यावसायिकांनी अति आत्मविश्वासाने कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. व्यवहारात आततायीपणा नको. मुलांच्या वागण्याबोलण्याकडे लक्ष द्या, अन्यथा डोकेदुखी वाढेल. सार्वजनिक ठिकाणी कायदा मोडू नका, नियमात राहूनच काम करा. शेअर, जुनी गुंतवणूक यामधून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ : व्यावसायिक कर्तृत्वाच्या जोरावर यश मिळवतील. मनासारख्या घटना घडून उत्साह वाढेल. नोकरीनिमित्त प्रवास करावा लागेल. काळजी घ्या. ज्येष्ठांचा सल्ला कामी येईल. तरुणांचा भाग्योदय होईल. घरात किरकोळ वादांकडे लक्ष देऊ नका. घाईने निर्णय करू नका. अचानक धनलाभाचे योग आहेत. पैशाची उधळपट्टी होईल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. मुलांकडून चांगली कामगिरी होईल, घरात आनंदाचे वातावरण राहील. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. घरच्यांसोबत देवदर्शनाला जाल. बोलताना काळजी घ्या. सामाजिक कार्यात रमाल.
मिथुन : किरकोळ प्रश्न तिथल्या तिथे सोडवा. नोकरीत वाहवा होईल. व्यावसायिकांनी उतावळेपणा टाळावा. वडीलधार्यांमुळे जुने काम मार्गी लागेल. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात अचानक विदेशात जावे लागेल. त्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवा. किरकोळ कारणावरून ज्येष्ठांशी वाद टाळा. विद्यार्थ्यांना खेळांत चांगले यश मिळेल. व्यवसायात नवी कल्पना सुचली तरी घाईत निर्णय घेऊ नका. भागीदारीत वाद तुटेपर्यंत ताणू नका. सोशल मीडियावर काळजी घ्या.
कर्क : उच्चशिक्षणात, शिक्षण क्षेत्रात यशदायक काळ. व्यवसायात स्पर्धेचा सामना करू चांगले यश मिळवाल. नोकरीत किरकोळ अपमानांकडे लक्ष देऊ नका. छंदासाठी वेळ खर्च कराल. मनमानी टाळा. उधार उसनवारी देणे टाळा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. घरात शुभकार्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. जुनी वास्तू खरेदी करताना कागदपत्रे पडताळून तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्या. आरोग्य सांभाळा. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागू शकते. बंधुवर्गाबरोबर जमवून घ्या.
सिंह : रागावर नियंत्रण ठेवा. वास्तवाचे भान ठेवून निर्णय घ्या. मित्रांशी बोलताना मोठेपणाच्या गोष्टी टाळा. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. नोकरीत कामाचे कौतुक होईल. पगारवाढ-प्रमोशन होईल. अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतील. खर्चात वाढ होईल. व्यवसायात चांगली फलप्राप्ती होईल. कुटुंबासोबत सहलीला जाल. पती-पत्नीत वाद होतील. व्यवसायातून होणारे आर्थिक लाभ योग्य प्रकारे गुंतवा. संशोधकांना नवीन ठिकाणी कामाची संधी मिळेल. कलाकार, लेखक, गायकांसाठी उत्तम सन्मानाचा काळ.
कन्या : काही दिवसांपूर्वी झालेल्या नव्या ओळखी फायदेशीर ठरतील. त्यातून व्यवसायातील अडलेले काम मार्गी लागेल. मित्रमंडळींकडून चांगली मदत होईल. नोकरीत कामाचे कौतुक होईल, वरिष्ठ खूष होतील आणि अधिकची जबाबदारी दिली जाईल. स्पष्ट बोलण्याची सवय अंगाशी येऊ शकते. बँकेची अडलेली कामे मार्गी लागतील. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नका. सोशल मीडियावर काळजी घ्या. दहा वेळा विचार करून महत्त्वाचे निर्णय घ्या. सामाजिक कामात वेळ खर्च होईल. महिलांसाठी शुभघटनांचा अनुभव देणारा कालखंड. मुलांचे उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागू शकतात.
तूळ : विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांतून लाभ मिळेल. नियोजनपूर्वक काम केल्याचा फायदा होईल. तरुणांच्या मनासारखी कामे होतील. घरातल्या आनंदात भर पडेल. काही मंडळींना अचानक धनलाभ होईल. पैसे आले म्हणून त्याला वाट करून देऊ नका. पत्नीसाठी मोठी खरेदी होऊ शकते. नवे घर घेण्याचा विचार मार्गी लागेल. घाईत पाऊल उचलू नका. नोकरीत उत्तम स्थिती राहील. मुलांकडे लक्ष ठेवा. व्यवसायात समतोल साधून काम करा. दानधर्म कराल. शेती अवजारांची विक्रेते, मेडिकल क्षेत्र यात चांगले लाभ मिळतील. संगीत क्षेत्रात सन्मान होईल.
वृश्चिक : मनासारखे काम न झाल्याने नाराज राहू नका. कष्ट करत राहा, चांगले फळ निश्चितपणे मिळेल. नोकरी-व्यवसायातील वादात फार अडकून राहू नका. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. घरात एखादा मोठा निर्णय घेताना गोंधळू नका. सावधपणे पावले टाका. व्यवसायात कामाच्या मानाने फळ मिळणार नाही. पण मन शांत ठेवा. ध्यानधारणेमुळे आठवडा उत्तम जाईल. लेखक, प्रकाशक, मुद्रक यांच्यासाठी चांगला काळ आहे. कलाकार, क्रीडापटू यांचे सन्मान होतील. वाहनदुरुस्तीचा खर्च येईल. मित्रांशी वाद टाळा. मुलांना यश मिळवून देणारा काळ.
धनु : चिंतन, ध्यान यामधून चांगली मन:शांती मिळेल. कुटुंबातील वादांकडे लक्ष देऊ नका. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम करण्याकडे लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. कायदेशीर कटकटी मागे लागू शकतात. नोकरीत घाई करू नका, चुका टाळा. कलाकारांना मनासारखे काम मिळेल, खिसा भरलेला राहील. लेखकांना सन्मान मिळेल. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको. बाहेरचे खाणे-पिणे नको. पोटाच्या विकारांना निमंत्रण मिळेल. नव्या नोकरीच्या प्रयत्नांना यश मिळेल. तरुणांचा उत्साह वाढेल.
मकर : व्यवसायात ठामपणे निर्णय घ्या. आर्थिक बाजू भक्कम राहील. पती-पत्नीत किरकोळ वाद घडतील. व्यवसायात प्रत्येक व्यवहार बारकाईने तपासा. बोलताना अति आत्मविश्वास नको. तरुणांना शिक्षणाच्या वाटा खुल्या होतील. वातावरणबदलामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. प्रलंबित काम डोकेदुखी वाढवेल. नातेवाईकांसाठी भरपूर वेळ द्यावा लागेल. प्रवासात अनोळखी व्यक्तीशी बोलताना सावधानता बाळगा. शास्त्रज्ञ, शेतकरी, आरोग्य क्षेत्रात उत्तम काळ. समाजकार्यात नवा प्रोजेक्ट राबवाल. त्याचे कौतुक होईल.
कुंभ : नव्या संधी चालून येतील. करियरला आकार द्याल. घरी उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत आपण भले, आपले काम भले या तत्वाने काम करा. नोकरीत कामात चुका टाळा. व्यवसायात कर्तृत्वाच्या जोरावर मोठे यश मिळवाल. काहीजणांना अचानक धनलाभ होईल. लॉटरी, शेअरमधून चांगला लाभ होईल. कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च कराल. विदेशात व्यवसाय वाढवताना थोडे थांबून निर्णय घ्या. बँक कर्जाची प्रकरणे मंजूर होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामे लांबणीवर पडतील.
मीन : आपली क्षमता तपासूनच पुढचे पाऊल उचला, म्हणजे यश मिळेल, हुरूप वाढेल. मुलांसाठी उत्तम काळ. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत बदली होईल. मित्रांबरोबर चेष्टामस्करी टाळा, त्यामधून मोठे वाद होतील. घरात मालमत्तेच्या प्रश्नावरून वाद घडू शकतात. डोके शांत ठेवून या विषयावर चर्चा करा. प्रवासात खिसा पाकीट सांभाळा. आर्थिक बाजू भक्कम राहील. खर्च योग्य पद्धतीने करा. आरोग्य क्षेत्रात चांगला काळ. तरुणांचे मनोबल वाढेल. लेखकांना पुरस्कार मिळेल.