किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’च्या थिएटरमधल्या रिलीजला माफक प्रतिसाद मिळाला. सिनेमाची अनेकांना दखल घ्यायला लागण्याइतका व्यवसाय त्याने केला. मात्र, नेटफ्लिक्सवर मात्र तो चांगलाच हिट झालाय! ‘फेसबुक’वर आताच्या घडीला सर्वाधिक रिव्ह्यूज याच सिनेमाचे दिसतायत. विशेषत: महिलांकडून या चित्रपटाचं भरपूर कौतुक होतंय. गंमत म्हणजे, आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही गटांतल्या स्त्रियांना ‘लापता लेडीज’ आवडतोय! काही नाठाळ मात्र त्यातल्या ‘किंचितशा’ स्त्रीवादी प्रचारकीपणाला सुद्धा नाक मुरडल्याशिवाय राहात नाहीएत.
– – –
एक आल्हाददायक चित्रपट, ‘डिलाइटफुल वॉच’ म्हणून सर्वच स्तरातल्या स्त्रिया ‘लापता लेडीज’चं कौतुक करताना दिसतायत. हा चित्रपट साधीशीच गोष्ट पण स्वच्छ, सुंदर रीतीने सांगत असल्याचं बहुतेकांकडून नमूद केलं जातंय. त्यातलं सहजपणे गोष्टीत गुंतवून संदेश देणं अनेकांना आवडून गेलंय, तर काहींना आजच्या सेक्स आणि हिंसाचाराचा भडिमार असलेल्या ओटीटी वेबसीरीजच्या मार्यात अकस्मात हाताला लागलेली एक निर्भेळ आनंद देणारी कलाकृती म्हणून ‘लापता लेडीज’ आवडलाय.
माझ्यापुरतं बोलायचं तर किरण राव यांचा नवा सिनेमा आलाय असं कळलं तेव्हाच त्याचं नाव-गाव काय आहे याची वास्तपुस्त न करता लागलीच तो पहावासा वाटला होता. याचं कारण होता मनात रुतून बसलेला ‘धोबीघाट’, तेरा वर्षांपूर्वी किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. बराच काळ गेल्याने त्या चित्रपटातल्या काही व्यक्तिरेखा, काही प्रसंग असे विखुरलेले तपशीलच आता आठवत असले तरी ठळकपणे लक्षात राहिलंय ते हे की, हा चित्रपट ‘जे’ सांगत होता आणि ‘ज्या पद्धतीनं’ ते सांगत होता, ते दोन्हीही खूप आगळं होतं.
पण पुढची तेरा वर्षं किरण रावनी दुसरा चित्रपटच दिग्दर्शित केला नाही? का बरं? मधल्या काळात अधुनमधुन त्यांचं नाव कानावर पडत राहिलं, पण ते पती आमिर खान सोबतच्या त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या घडामोडींमुळे, त्यांच्या एखाद्या वक्तव्यातून निर्माण झालेल्या वादळामुळे आणि ‘पाणी फाऊंडेशन’सारख्या सामाजिक कामाच्या निमित्ताने होतं.
तेरा वर्षांच्या अंतरानंतर त्यांनी ‘लापता लेडीज’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केलाय. चित्रपटाची निर्मिती ‘आमिर खान प्रोडक्शन’चीच असल्यामुळे अर्थातच विशिष्ट अशा दर्जाची अपेक्षा तर होतीच. आणि ती अपेक्षा ‘लापता लेडीज’ सहज पूर्ण करतो. चित्रपट भारतीय स्त्रियांविषयी आहे. कशी आहे भारतीय स्त्री? लोकल ट्रेनच्या डब्यावर आजही ‘महिलाएं’ असं लिहिलेलं असतं तिथे चित्र असतं- डोक्यावरून पदर घेतलेल्या, कुंकू लावलेल्या स्त्रीचं. भारतीय स्त्रीने हे ‘असंच’ असावं याबाबत काहीजण कितीही आग्रही असले तरी शहरात अशा स्त्रिया क्वचितच दिसतात. उलट इथं दिसतात क्रॉप टॉप्स, मिनीज, जीन्स, कोऑर्ड सेट्स, पंजाबी ड्रेसेस आणि साडीही! पण ग्रामीण भागांत, विशेषत: उत्तर भारतात आजही ‘घुंघट’ नजरेला पडतो. काय करतो हा घुंघट? निव्वळ चेहरा झाकतो की तिला तिची ओळख, अस्तित्वही नाकारतो…? याच प्रश्नांची उत्तरं मांडतो ‘लापता लेडीज’.
नुकतंच लग्न झालेल्या, ‘घुंघट’ ओढलेल्या दोन नवर्या ट्रेनमधील प्रवासात अदलाबदलीमुळे स्वगृही न पोहोचता भलतीकडेच जातात. तिथून त्यांच्या वाट्याला काय येतं… ते सांगणारा चित्रपट म्हणजे ‘लापता लेडीज’! ही एवढी आऊटलाइन चित्रपटाच्या ओळखीतच सांगितली गेली होती. चित्रपटातल्या कलाकारांमध्ये तसे कुणीच नावाजलेले स्टार वा अभिनेते नव्हते. अपवाद फक्त रवी किशन आणि छाया कदम यांचा.
चित्रपट सुरुवातीपासूनच गुंतवून ठेवतो. देशातील ‘निर्मल प्रदेश’ नामक काल्पनिक राज्यात २००१च्या सुमारास हे कथानक उलगडत जातं. गावखेड्यातली माणसं, त्यांचं जगणं, अपरिहार्यतेतनं त्याचा भाग बनलेल्या, त्यांनी विनातक्रार स्वीकारलेल्या भल्याबुर्या गोष्टी, विसंगती-विरोधाभास सहजपणे समोर येत जातात. विकासाचे ढोल पिटणार्यांना त्या खटकूही शकतात. कॅमेरा हे जगणं, त्याचे तपशील टिपत राहतो. कधी संवादातून तर कधी संवादाविनाही अनेक ठिकाणी कथानकापलीकडचं जे सांगायचं ते सांगून जातो. उत्तर भारतात नव्या नवरीने घुंघट घेणं अगदीच रूढ. त्याला कोण आक्षेप घेईल! घुंघट आणि इतरही बरंच काही ‘निमूट स्वीकारत’ जाण्याचा संस्कारच तर मुलींवर होतो. एखादी सुरुवातीला अडखळलीच तर तिला ‘घुंघट घेतल्यावर समोर नाही, खाली पहायचं असतं’ असं बजावलं जातं! ‘घुंघटा’आड चेहरा हरवून बसलेल्या अशा दोन नवर्या अदलाबदलीने एकाच वेळी हरवल्या तर..? त्यांचीच गोष्ट हा सिनेमा सांगतो.
यातली नुकतं कुठे जेमतेम सोळावं सरल्यासारखी भासणारी, लग्नाच्या साडीतली, ‘घुंघट’ ओढलेली, भोळीभाबडी बालिकावधू- ‘फूल’. तिच्या चेहर्यातला गोडवा कुणालाही लगेच आवडून जावा असाच. गोंधळापायी हरवलेली, नवर्याच्या घरचा अतापता, साधं गावाचं नावही नेमकं आठवत नसलेली ही ‘फूल’ आता घरा-कुटुंबाच्या, चार भिंतींच्या पलीकडच्या, उघड्यावरच्या जगात सुरक्षित कशी राहील? आणि सुरक्षित राहिली तरी, असं नवर्याशिवाय घराबाहेर राहिल्यावर तिचा पुन्हा ‘स्वीकार’ होईल?… या प्रश्नांनी तिचाच नव्हे, आपलाही जीव धास्तावतो. पण कथानक वेगळ्याच अंगाने पुढे जातं. ‘घुंघटा’मुळेच हरवलेल्या दुसर्या नवरीची तर्हा मात्र दुसर्या टोकाची असते. चित्रपटात या दोन नवर्यांखेरीजच्या इतर स्त्रीव्यक्तिरेखाही ग्रामीण स्त्रीचं एकंदर जगणं आपल्यासमोर ठेवतात.
‘तुम्हाला आमचा ‘घुंघटच’ बरा खटकतो’ अशी टीका होण्याची शक्यता ध्यानात घेऊन, कटाक्षाने मध्येच ‘बुरखा’ही इथे किमान डोकावून जातो! पण एकंदरच ‘भल्या घरच्या’ तमाम बायांपेक्षा पूर्णपणे वेगळी, साडीचा पदर जागीच खोचून, रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा-नाश्त्याचा स्टॉल चालवणारी एकटी आणि खमकी ‘मंजुमाई’च जास्तीची जागा घेते. भारतीय स्त्री ही अशीही आहेच की! जगणं असह्य करणार्या व्यसनी नवर्याला व मुलाला हाकलून देऊन बिनदिक्कत एकटीच्या बळावर जगणार्या मंजुमाईला, बाईला पुरुषी ‘सहार्या-सोबती’ची गरज नसते हे पुरतं कळून चुकलेलं, पण तरीही ‘घरी पोहोचणं’ तिलाही आनंद देतंच! छाया कदमांची ‘मंजुमाई’ आपल्या व्यक्तिमत्वाच्या, अंतरंगाच्या सर्व छटांनिशी सामोरी येते.
कथानकाचे आणखी तपशील सांगून चित्रपट पाहण्यातली मजा संपवणार नाही. पण इतकं जरूर सांगावंसं वाटतं की आपल्या सहजसुंदर अभिनयाने खर्याखुर्या माणसांसारख्या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार आपल्याला या तशा साध्याशाच कथानकात गुंतवून ठेवतात. जाता-जाता आपल्या समाजातील, व्यवस्थेतील, वास्तवातील विसंगतींवर बोट ठेवलं जातं. पण ते सारं कथानकाच्या ओघात. उत्तर भारतात पोलिसांची जी टिपिकल इमेज आहे, तसाच भ्रष्ट, पैसेखाऊ पोलिस (रवी किशन) इथे आपल्याला भेटतो. नोटांची पुडकी स्वीकारल्याशिवाय त्याचं काम पुढे सरकतच नाही. पण नेहमीच्या बॉलिवुडी थाटात त्याला पुरता ‘व्हिलन’ नाही करून टाकलेला. त्याच्यातही एक सहृदयी माणूस आहे, ज्याला ‘गाणार्या बाई’तल्या ‘आई’ला होणारा त्रासही दिसतो! रवी किशन यांनी या व्यक्तिरेखेत आपल्या अदाकारीने असे काही रंग भरलेत की हा माणूस उत्तर भारतात ‘स्टार’ का आहे ते कळून जातं. विशेषत: शेवटच्या प्रसंगात ते निव्वळ हसून विनासंवादाचं असं काही सुंदर सांगून जातात की ते प्रत्यक्ष अनुभवावंच.
पुरुषसत्ताक जगातले सगळेच पुरुष इथे ‘काळ्या’ रंगात नाही रंगवलेले. त्याच जगात एखाद्या सज्जन कुटुंबात वेगळ्या संस्कारांत वाढलेले पुरुषही असू शकतात. ते पुरुषी वर्चस्वातून आलेल्या रूढी बाजूला ठेवून जगणारेही असू शकतात. बाईला तिथे फार नाही तर थोडा मोकळा श्वास जरुर घेता येतो… ‘स्वप्न पाहिल्याची माफी मागू नये’ अशा संवादापाशी येत चित्रपट संपतो. स्वप्नंच काय, साध्यासुध्या इच्छा-आकांक्षाही पावलोपावली मागे सारत, घराकुटुंबाला प्राधान्य देणार्या भारतीय स्त्रियांना म्हणूनच ‘लापता लेडीज’ आवडत असावा बहुतेक. सहज पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणार्या, शिक्षण-नोकरीसाठी एकट्या थेट परदेशीही रवाना होणार्या आजच्या शहरी, सुखवस्तू कुटुंबांतील तरुणींना कदाचित हे ‘अस्तित्व संपवणारं’ जग परिचयाचं नसेल. पण निव्वळ उत्तर भारतातील ग्रामीण भागातच नव्हे तर, महाराष्ट्रासारख्या कथित प्रगत राज्यातही दहावी-बारावीनंतर कुठलाही पर्याय न देता, इच्छा असो वा नसो, आजही मुलींची लग्नं लावून दिली जातात. बीएड केलेल्या, नर्सिंगचं शिक्षण घेतलेल्या, बीकॉम-एमकॉम झालेल्या तरुणींचं आयुष्य घराच्या चार भिंतीत रांधा-वाढा करण्यात, घरा-शेतातली कामं करण्यात जातं.
घुंघट किंवा डोक्यावरचा पदर हे तर निव्वळ प्रतीक आहे. लग्न झालं की त्या बाईचा निव्वळ चेहराच नव्हे तर तिचं अस्तित्वच जणु काही हरवतं. तिला स्वत:ला काही इच्छा-आकांक्षा, आवडीनिवडी असू शकतात याला त्या जगात कुठे जागाच नसते. कधी काळी चुकून काही ‘बनण्याचा’ विचार तिच्या मनात आलाच असेल तर तो लग्न-संसाररूपी जगण्याखाली पूर्णपणे गाडला जातो.
गरीब घरातल्या सोळा-सतराच्या मुलींची लग्नं जरा बर्या घरच्या तिशीतल्या बिजवरांशी, दारुड्यांशीही लागतात. आदिवासी पट्ट्यातल्या मुली थोड्याथोडक्या पैशांच्या मोबदल्यात लांबच्या कुठल्या पूर्णपणे अनोळखी घरात नवरी बनून जातात. विनामोबदला सदोदित राबणारे ‘दोन हात’ हवे असतात म्हणून! चित्रपट, वेबसीरिज, मालिका यांच्या आजच्या अफाट कल्लोळात स्त्रीविषयक किंवा स्त्रियांसाठीची म्हणून खूप घाऊक निर्मिती होत असते. पण ‘लापता लेडीज’ ज्या संवेदनशीलतेनं ग्रामीण तरुणीचं, स्त्रीचं भावविश्व व तिच्या जगण्यातलं वास्तव टिपतो, तसं क्वचितच नजरेला पडतं. तो फार मोठं, जगावेगळं, नवीन किंवा क्रांतिकारी काही सांगत-दाखवत नाही. उलट आपल्याला माहित असलेलंच सारं तो प्रभावीपणे आपल्यासमोर ठेवतो.
अधुनमधून येणारं चित्रपटाचं संगीतही यात योग्य ती भर घालतं. उत्तम सिनेमा हृदयस्पर्शी असतो, रंजन करतो आणि त्यासोबतच विचार करायलाही भाग पाडतो. ‘लापता लेडीज’ तसाच आहे. ज्यांच्या जगण्यात, किमान या जगण्याविषयीच्या दृष्टिकोनात तो बदलाची सुरुवात करून देऊ शकतो, त्यांच्यापर्यंत तो अवश्य पोहोचावा.