‘आयपीएल’मध्ये प्रभावी खेळाडूचा (इम्पॅक्ट प्लेयर) नियम असावा की नसावा, या मुद्द्यावरून क्रिकेटमध्ये मत-मतांतराचा धुरळा उडाला आहे. अनेक क्रीडाप्रकारांमध्ये वेळोवेळी झालेल्या बदलांमुळे खेळाच्या विकासाची वाट समृद्ध झाल्याचे इतिहास दाखले देतो. त्याचप्रमाणे काही बदल हे मारकही ठरले आहेत. काही क्रीडाप्रकारांच्या सद्यस्थितीचा बदलांच्या अनुषंगाने घेतलेला आढावा.
– – –
बदल हा जीवनाचा स्थायीभाव. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा जरी असल्या तरी काळ बदलला, तसा त्यातही काही बदल होत गेले. तेच क्रीडा क्षेत्राचे. अनेक क्रीडाप्रकारांमध्ये वेळोवेळी झालेल्या बदलांमुळे खेळाच्या विकासाची वाट समृद्ध झाली. या बदलांमुळे अनेक क्रीडाप्रकारांच्या लोकप्रियतेत आणि अर्थकारणात मोठी भर पडली. तर काही बदल पचनी न पडल्याचीही उदाहरणे आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचा १७वा हंगाम आता मध्यावर येऊन ठेपला असताना प्रभावी खेळाडूच्या (इम्पॅक्ट प्लेयर) अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
महिन्याभरापूर्वी प्रो कबड्डी लीगची दशकपूर्ती झाली. इतकी वर्षे यशस्वी ठरलेले हे सूत्र आता नित्यनेमाचे झाल्याने कबड्डीत काहीतरी नवे अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अल्टिमेट खो-खो लीगचा सलग दुसरा हंगाम अपयशी ठरला. बदललेले नियम खो-खोला पचनी पडले नाहीत, हे पहिल्याच हंगामाने सिद्ध केले. पण यातून कोणताही नवा धडा घेता दुसरा हंगाम उरकण्यात आला.
बुद्धिबळात पारंपरिक म्हणजेच क्लासिकल पद्धतीनंतर आलेल्या रॅपिड (जलद) आणि ब्लिट्झ (अतिजलद) पद्धतीमुळे बुद्धीचा कस लागणार्या या क्रीडाप्रकाराची लोकप्रियता आणखी वाढली. एकंदरीतच बदल हे मोठ्या प्रमाणात अनुकूल ठरले आहेत, हे मात्र कुणीच नाकारणार नाही.
प्रभावी खेळाडूमुळे अष्टपैलू प्रभावहीन?
सुरुवात क्रिकेटपासूनच करू या. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने ‘आयपीएल’मध्ये प्रभावी खेळाडूचा नियम हा कसा घातक ठरतो आहे, यावर ताशेरे ओढले. ‘‘क्रिकेट हा ११ खेळाडूंचा संघ आहे. मग हा १२वा खेळाडू कशाला हवा? त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंसाठी हे मारक ठरते आहे. कोणताही संघ डाव अडचणीत आल्यावर तळाच्या स्थानांवर विशेषज्ञ फलंदाज खेळवण्यास पसंती देतो. परिणामी शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारख्या अष्टपैलू खेळाडूंना आपले दुहेरी महत्त्व सिद्धच करता आलेले नाही.’’ रोहितच्या मताला अनुमोदन देत माजी वेगवान गोलंदाज झहीर खाननेही प्रभावी खेळाडूच्या नियमावर तोफ डागली. प्रभावी खेळाडूचा नियम परिपूर्ण अष्टपैलू खेळाडूंसाठी हानीकारक ठरत आहे, अशी टीका झहीरने केली. याचप्रमाणे दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेही प्रभावी खेळाडूचा नियम कसा अष्टपैलू खेळाडूंच्या विकासाला खीळ घालतो आहे, ते सांगून या नियमाच्या भवितव्याचा निर्णय आता क्रिकेटरसिकांनीच घ्यावा, असे आवाहन पाँटिंगने केले आहे.
प्रभावी खेळाडूच्या नियमाविषयी आता वातावरण तापल्यानंतर त्यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा, ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) घेईलच. पण एकंदरीतच क्रिकेटच्या बदलत्या स्थित्यंतराचे अवलोकन केल्यास अनेक बदल हे क्रिकेटने योग्य वेळी केल्यामुळेच खेळाची प्रगती झाली आहे, हे नाकारता येणार नाही.
कसोटी या क्रिकेटच्या पारंपरिक प्रकाराच्या अनेक आख्यायिका अस्तित्वात आहेत. कसोटी क्रिकेटचे पर्व प्रारंभ झाल्यानंतर पहिली ५० वर्षे इंग्लंडमध्ये तीन दिवसांची कसोटी खेळली जायची, तर ऑस्ट्रेलियात अमर्यादित स्वरूपाची. १९३०पासून इंग्लंडमध्ये अॅशेस कसोटी सामने चार दिवसांचे झाले, तर अन्य देश तीन दिवसांची कसोटी खेळायचे. १९४८पासून अॅेशेस कसोटी सामने पाच दिवसांचे झाले, पण तरीही १९४९च्या उत्तरार्धापर्यंत इंग्लंड संघ तीन दिवसांचे कसोटी सामनेसुद्धा खेळला. १९३३-३४मध्ये भारतात झालेली पहिली कसोटी चार दिवसांची होती. १९५२पासून काही देश पाच दिवसांचे कसोटी सामने खेळू लागले. पण तरीही पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका हे देश तीन, चार, पाच, सहा किंवा अमर्यादित स्वरूपाचे कसोटी सामने खेळत होते. अखेरीस १९५७मध्ये कसोटी क्रिकेट पाच दिवसांची असावी, असे प्रमाणीकरण करण्यात आले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवाढीचाच परिणाम म्हणून १९८०च्या दशकात कसोटी क्रिकेटमधील विश्रांतीचा दिवस कमी करण्यात आला. तोवर तिसर्या आणि चौथ्या दिवसाच्या खेळाच्या मधील एक दिवस दोन्ही संघांना विश्रांती असायची. इंग्लंडसारख्या देशात तर हा दिवस प्रामुख्याने रविवारीच असायचा.
१९७१मध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या गौरवशाली पर्वाला प्रारंभ झाला. सुरुवातीला ६० षटकांचे असलेले हे क्रिकेट नंतर ५० षटकांचे झाले. एकदिवसीय विश्वचषकाच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठले. १९९२च्या विश्वचषकापासून रंगीत कपडे, पांढरा चेंडू आणि विकसित तंत्रज्ञान क्रिकेटने स्वीकारले. पण त्यानंतर याहून कमी वेळात वेगाने सामना निकाली ठरणारे ट्वेन्टी-२० क्रिकेटचे सूत्र जनमानसात आणखी रुजले. क्रिकेटमधील शिखर संघटना असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि क्रिकेटच्या नियमांचे पालकत्व सांभाळणार्या मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) केलेले अनेक नियम हे वेळोवेळी अमलात आणले गेले. तत्पूर्वी, त्यांची प्रायोगिक स्वरूपात चाचणी घेण्यात आली.
प्रभावी खेळाडूचा नियम हा कदाचित चुकीचा असेलही; पण म्हणून टोकाची टीका करण्याची मुळीच आवश्यकता नाही.
फुटबॉलमध्ये महत्त्वाच्या आक्रमकाला (स्ट्रायकर) दुसर्या सत्रात मैदानावर आणल्याची किंवा त्याला दुसर्या सत्रात विश्रांती देत बदली खेळाडू मैदानावर आणल्याचीही बरीच उदाहरणे आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी कोणते वळण घेते, ते पाहू या.
प्रो कबड्डी ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’च्या वाटेवर?
तुम्हाला ‘दृष्यम’ चित्रपटाचे कथानक नक्की आठवत असेल. अजाणतेपणाने आपल्या कुटुंबाकडून घडलेला गुन्हा एक अल्पशिक्षित केबल व्यावसायिक कसा पचवतो, हे त्याचे सूत्र. नायक विजय साळगावकर हा चित्रपट पाहण्याच्या छंदातूनच प्रेरणा घेऊन एक नवा तंत्रशुद्ध बनाव रचतो. पोलीस अधिकारी आपल्या मुलाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी या कुटुंबाला वेठीस धरते; परंतु जंगजंग पछाडूनही तिला या हत्येचा छडा लागत नाही. एक उत्तम दृष्यमय अनुभूती कायद्यावर कशी धूसरता आणून पळवाट काढू शकते, हीच या चित्रपटाची गोष्ट.
नुकत्याच मोठ्या वाजतगाजत झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या १७व्या हंगामाने अशाच प्रकारे दृश्यमय अनुभूती क्रीडारसिकांना दिली. सामन्यातील थरार, त्याचे निकाल, खेळाडूंचा खेळ हे सारे काही उत्कंठा वाढवणारे. ‘टीआरपी’च्या यादीतही प्रो कबड्डीने लक्षवेधी भरारी घेतली. कबड्डीपटू, प्रशिक्षक, सामनाधिकारी यांच्यासाठी ती चांगला रोजगार देणारी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. पण ‘प्रो कबड्डी’चे सामने आता पहिल्यासारखे आनंददायी वाटत नाहीत, अशी खंत दर्दी कबड्डीरसिक व्यक्त करतात. हे लुटूपुटूचे सामने पाहून कबड्डी ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’च्या वाटेवर तर जात नाही ना, हा प्रश्न मात्र नक्की पडतो.
१० वर्षे झाली, आता नवे काय? याचा विचार भारतीय हौशी कबड्डी महासंघ आणि मशाल स्पोर्ट्स यांनी करण्याची वेळ आली आहे. प्रो कबड्डीत आणखी नव्या प्रयोगांची आवश्यकता आहे, हे तर नक्कीच. याशिवाय कबड्डीला आणखी एक पाऊल पुढे नेण्यासाठी मुंबईकर कबड्डी अभ्यासक शशिकांत राऊत यांच्या ट्वेन्टी-२० कबड्डीच्या प्रयोगाची चाचपणी करायला काय हरकत आहे?
आशियाई क्रीडा स्पर्धा आणि प्रो कबड्डी वगळता कबड्डी मोठ्या स्तरावर क्वचितच पाहायला मिळते. पुरुषांचा विश्वचषक होऊन आठ वर्षे झाली आहेत, तर महिलांचा विश्वचषक होऊन एक तप लोटले आहे. महिलांच्या प्रो कबड्डीची घोषणासुद्धा हवेतच विरली आहे. किमान भारत-इराण यांच्यात कबड्डी मालिका खेळवली, तरी त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल. पण १० वर्षांपूर्वी प्रो कबड्डीचा अविष्कार मैदानावर आणल्यानंतर पुढे त्याची रसाळ गोमटी फळे खाण्यातच कबड्डीतली मंडळी मश्गूल आहेत. पुढे काय? आता कोणता नवा प्रयोग करायचा, जो खेळ पुढे नेण्यासाठी पूरक ठरेल? हा प्रश्न कुणालाच पडत नाही का?
यासंदर्भात अर्जुन पुरस्कार विजेते माजी कबड्डीपटू आणि प्रशिक्षक राजू उर्फ श्रीराम भावसार म्हणतात की, ‘क्रिकेटशी तुलना केली तर कबड्डी हा खेळ अजूनही बाल्यावस्थेत आहे. इतर लोकप्रिय खेळांचा विचार केल्यास उदाहरणार्थ फुटबॉलकडे पाहिल्यास त्यांनी अशा प्रकारे खेळात बरेच किंवा मोठे बदल केलेले नाहीत. क्रिकेटने ते केले, कारण लोकप्रियता आणि टीव्ही/मोबाइलवर पाहणारे प्रेक्षक वाढवायचे आहेत. खरी कसदार कबड्डी अजूनही लोकांपर्यंत आलेलीच नाही. सध्या जी खेळली जाते आहे, ती धावपळीची कबड्डी आहे. प्रो कबड्डीपासून सुरू झालेल्या कबड्डीच्या पर्वात खेळ गतिमान झाला. पण त्यातील कौशल्य कमी झाले. यात आणखी नव्या प्रयोगाची आवश्यकता नाही. यातील अव्वल पकडीचा नियम पकडपटूंचा कस पाहणारा आहे. खेळ हा नैसर्गिक असावा. त्याला संपूर्णता गणितात बसवता येत नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे. महाराष्ट्राची कबड्डी उंचावतेय. दक्षिणेचे संघही उत्तम कामगिरी करीत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या समृद्ध आणि कौशल्याचा कस लागणारी कबड्डी पुन्हा येईल, अशी आशा राखूया.’
बुद्धिबळातील नवे वारे प्रोत्साहक
बुद्धिबळ हा तसा भारतातही इतिहासकाळापासून रुजलेला खेळ. चार दशकांपूर्वीपर्यंत पारंपरिक बुद्धिबळ सामने चालायचे. पण १९८५मध्ये गॅरी कास्पारोव्ह विश्वविजेता झाल्यापासून बुद्धिबळाच्या लोकप्रियतेसाठी काही परिणामकारक पावले उचलली गेली. त्यावेळी टीव्हीवर बुद्धिबळाचे हे प्रदीर्घ सामने दाखवण्यात अडचण येत होती. त्यामुळे गरज ही शोधाची जननी असते, याच ब्रीदवाक्याप्रमाणे रॅपिड, ब्लिट्झ आणि बुलेट हे बुद्धिबळातील नवे प्रकार रुजले. कालांतराने ऑनलाइन युगात तर या वेगवान प्रकारांना आणखी खतपाणी मिळाले. गेल्या काही वर्षांत बुद्धिबळपटू बॉबी फिशरने संशोधित केलेली ‘फिशर-रँडम’ हा बुद्धिबळ प्रकारही जगभरात तरुणाईला आवडू लागला आहे. या प्रकारात तुम्हाला संगणक प्रारंभीची स्थिती उपलब्ध करतो. यात हत्ती, राजा, आदी सोंगट्यांच्या जागा बदललेल्या असतात. हा प्रकार भारतात जरी फारसा लोकप्रिय नसला, तरी परदेशात बुद्धिबळपटूंना आवडतो आहे. बुद्धिबळातील या विविध वेगवान प्रकारांमध्येही विश्वविजेता मिळतो, अशी माहिती द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांनी सांगितली.
खो-खो लीग : फसलेला प्रयोग!
गेल्या वर्षीपासून अल्टिमेट खो-खो लीग सुरू झाली, तेव्हा खो-खो या महाराष्ट्राच्या क्रीडा प्रकाराच्या आशा उंचावल्या. या लीगमुळे खो-खोपटूंची चांगले मानधन, तारांकित हॉटेल्स, विमानप्रवास ही स्वप्ने पूर्ण होऊ लागली. पण लीगच्या प्रक्षेपणाकरिता खो-खो क्रीडा प्रकारात केलेले बदल हे सर्वसामान्य क्रीडाचाहत्यांना रुचले नाहीत. ‘‘अल्टिमेट खो-खो लीगमुळे खो-खोमध्ये पैसा आला. तसेच हा खेळ आधी मध्यमवर्गीयांचा होता, तो निम्न-मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचला. या दोन सकारात्मक बाबी. पण खो-खो खेळाचा मूळ गाभाच अल्टिमेट खो-खो लीगने संपवून टाकला, हे वेदनादायी आहे. क्रिकेट, कबड्डी याचे लीगकरण करताना खेळाच्या मुख्य नियमांना हात न लावता बदल केले आहेत. खो-खो लीगमध्ये मात्र सरधोपटपणे नियम बदलले जात आहेत. आठजणांमधील खो-खो सहा जणांमध्ये आणला. त्यामुळे खेळाडूंना उसंत मिळत नाही. ते फक्त पळत राहतात. संरक्षणाचे जे कौशल्य होते, हेही या बदलामुळे संपून गेले आहे. फक्त गुण वाढलेले दिसावेत, म्हणून खेळाडू बाद झाल्यावर एक गुणाऐवजी दोन गुण देण्याची पद्धत खो-खोमध्ये येण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. हॉकी, फुटबॉल खेळांत गोलशून्य बरोबरीतही सामना सुटतो, मग त्यांनी कधी गोलसंख्या वाढवण्यासाठी हा प्रयोग केला नाही. हा खेळ म्हणजे खो-खो नसून, केवळ मनोरंजनासाठीची पकडापकडी आहे. काही सामन्यांमध्ये वझीर नसता तरी सामना तितकाच रंगला असता, याची प्रचिती येते,’’ अशा शब्दांत खो-खो संघटक मंदार देशमुख यांनी टीका केली.