केरळ राज्यातल्या कोचीमध्ये राहणारा एम. ईश्वरन हा ४० वर्षांचा युवक. पेशाने तो इंजिनीअर. पण वडिलांचा लाकडाचा व्यवसाय होता, त्यामुळे तोच व्यवसाय तो पूर्णवेळ पाहत असे. वडिलांच्या बरोबरीने तो काम करत होता, त्यामुळे त्यात चांगली वाढ झाली होती. ईश्वरन टेक्नोसॅव्ही असल्यामुळे त्याला माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू असणार्या नवीन प्रयोगाची चांगल्या प्रकारे माहित असे. विशेष म्हणजे, सायबरसुरक्षेच्या बाबत देखील तो खूपच सतर्क होता. या इथे होणारे फसवणुकीचे प्रकार त्याला नीट माहित होते. त्यामुळे व्यवसायात प्रत्येक व्यवहार करताना तो खूपच सावध असे. ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळीज घ्यायची याची माहिती त्याने ऑफिसमध्ये काम करणार्या सर्वच कर्मचार्यांना दिली होती.
आपण सायबर क्षेत्रात खूपच अलर्ट असतो असा कायम विचार करणार्या ईश्वरनचेच युपीआयचे अकाउंट एक दिवस अचानकपणे फ्रीझ झाले, त्याची ही गोष्ट.
अकाऊंट फ्रीझ झाले तेव्हा ईश्वरनचा त्यावर विश्वासच बसेना. अचानक झालेला हा अनपेक्षित प्रकार पाहून तो हबकला होता, हे सगळे कसे झाले याचा शोध घेण्यासाठी त्याने थेट बँक गाठली. पण त्याला हे कशामुळे घडले याची माहिती मिळाली नाही, यासंदर्भात पोलिसांच्याकडे तुम्हाला माहिती मिळेल असे बँकेत त्याला सांगण्यात आले, त्यामुळे त्याने थेट सायबर पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी त्याची तक्रार ऐकून घेतली आणि नंतर जी माहिती दिली, ती त्यालाही खूपच चकित करणारी होती. ते म्हणाले, तुमच्या खात्यामध्ये आलेले पैसे हे प्री पेड टास्कमधून झालेल्या व्यवहारातून आले आहेत. त्यामुळे त्या गैरप्रकारामधील संशयित म्हणून तुमचे खाते फ्रीझ झालेले आहे.
अहो, पण मला हे प्रकरण काय असतं तेच माहिती नाही, माझा त्या प्रकाराशी काहीच संबध नाही, असं ईश्वरन कळवळून म्हणाला तेव्हा पोलिसांनी त्याला शांत करत हा सगळा प्रकार कसा घडला याची कहाणी सांगायला सुरवात केली… ही गोष्ट होती मोहित शर्मा या तरुणाची. तो फावल्या वेळात काम करून अधिकचे पैसे कसे मिळवता येतील, या संधीच्या शोधात असताना त्याला ऑनलाइन कोणीतरी कळवले की तू सिनेमाचे ऑनलाइन परीक्षण लिहून पैसे कमावू शकतोस. याला म्हणतात प्री पेड टास्क. त्यामध्ये तुम्ही एका दिवसात जितकी परीक्षणे लिहिणार तितकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, असं त्याला सांगण्यात आलं होतं. दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पैसे मिळवायचे असतील तर तुम्हीही त्यासाठी काही रक्कम भरायची असते, ही त्यातली अट असते. मोहितने पुढचा मागचा विचार न करता अधिकची रक्कम कमावण्याच्या मोहात काही रक्कम या टास्कमध्ये भरली होती. प्री पेड टास्कच्या संदर्भात टेलिग्राम या सोशल मीडियावर प्रशिक्षण देणार्या एका व्यक्तीने एक दिवस मोहितला फोन केला आणि मी तुला २५ हजार रुपयांची रक्कम देतो, मी सांगेन त्या बँक खात्यात ती भर, असं सांगून चांगल्या नफ्याचं आमिष दाखवलं. पैशाच्या लालसेपायी मोहितने ती रक्कम सांगितल्या गेलेल्या खात्यात भरली. हे खाते बसंत नावाच्या व्यक्तीचे आहे. बसंत हा सुतार काम करत असे. एकदा विजय नावाच्या व्यक्तीने बसंतकडून काही किरकोळ काम करून घेतले होते. त्यामुळे बसंत आणि विजय या दोघांत काही आर्थिक व्यवहार झाले होते. तेव्हा बसंतने आपल्या खात्यातून विजयला देय असणारी रक्कम ट्रान्सफर केली होती.
ईश्वरन म्हणाला, अहो, पण मी ना या बसंतला ओळखत, ना विजयला आणि मोहित कोण ते मला माहितीही नाही? या सगळ्या कथेचा माझं बँक खातं फ्रीझ होण्याशी संबंध काय?
पोलीस म्हणाले, यातल्या एकाचा तुझ्याशी संबंध आहे. विजयने ईश्वरनकडून लाकूड खरेदी केली होती. तेव्हा त्याला पैसे देताना तेच खातं वापरलं होतं, ज्यातून त्याने अगोदर बसंतशी व्यवहार केला होता.
आता कहानी में ट्विस्ट असा आला की प्री पेड टास्कच्या फ्रॉडमध्ये फसलेल्या मोहितच्या लक्षात आलं की तिथे आपल्याला काहीच मिळत नाही, याउलट आपलीच लाखो रुपयांची फसवणूक होते आहे. त्याने या सगळ्या प्रकरणाची थेट सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासणी सुरू केल्यावर मोहितने बसंतच्या खात्यात रक्कम भरल्याचे त्यांना आढळले होते. त्यांनी बसंतचंही खातं गोठवलं, त्या खात्याशी व्यवहार केलेल्या विजयचंही खातं गोठवलं आणि विजयशी व्यवहार केलेला असल्याने ईश्वरनचं खातंही गोठवलं. या प्रकारामध्ये विजय हा आरोपी झाला होता आणि त्याने ज्यांच्याबरोबर व्यवहार केले होते ते सगळे संशयित झाले होते, त्यामुळे त्यांचे खाते देखील गोठवण्यात आले होते.
अधिक पैसे मिळवण्याच्या मोहात प्री पेड टास्कमध्ये फसलेल्या मोहितने या सगळ्या प्रकाराची नोंद नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टींग पोर्टलवर केली होती. त्यामुळे त्याच्या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन ज्या बँक खात्यामध्ये प्री पेड टास्कमधून आलेले पैसे ट्रान्सफर झाले होते, ती सर्व खाती गोठवण्यात आली होती. ईश्वरनने नवे घर बांधले होते, त्याच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. पण या सगळ्या प्रकारात त्याचे बँक खाते गोठवण्यात आल्यामुळे त्याला पैसे काढता येत नव्हते. अखेरीस त्याने याबाबत वकिलाचा सल्ला घेऊन त्यामध्ये मार्ग काढला आणि या मधून सुटका करून घेतली.
आपण सायबर सुरक्षेच्या बाबत खूप सतर्क आहोत, असे त्याला ईश्वरनला वाटायचे, तो सजगही होताच, पण, तरीही काहीच संबंध नसताना त्याच्यावर हे संकट ओढवलं होतं.
हल्ली दुकानदार, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करतात. दुकानदारांकडून वस्तू घेतल्यानंतर अनेकजण त्यांना विचारतात पैसे आले का, त्यावर ते हो म्हणतात. पण हे पैसे कोणत्या खात्यामधून आलेले आहेत हे त्यांना माहिती नसते. प्रत्येक ग्राहकाशी व्यक्तिगत ओळख नसते. एखाद्या आर्थिक फ्रॉडमधून आलेले पैसे दुसर्या कोणा व्यक्तीकडून आपल्या खात्यात जमा केले गेले, तर त्याचा नाहक त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे असे व्यवहार करताना योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
हे लक्षात ठेवा…
– अनावश्यक डिजिटल व्यवहार करणे टाळा.
– परराज्यातील व्यक्तीबरोबर व्यवहार करताना विशेष काळजी घ्या.
– ऑनलाइन, अॅप या माध्यमातून पैशाचे व्यवहार करताना ग्राहकाची ओळख पटवा. व्यक्ती कोण आहे, हे माहिती करून घ्या.
– पैसे देणारा ग्राहक आणि ज्या बँक खात्यामधून पैसे येत आहेत, यांचा काय संबंध आहे, हे तपासणे आवश्यक आहे.
ग्राहकाचे नाव आणि बँक खाते यावरील नाव असेल तर ते खाते कोणाचे आहे, याची माहिती घेणे आवश्यक आहे. बँकेच्या प्रत्येक व्यवहाराच्या बाबत सावध राहणे गरजेचे आहे.
प्री पेड टास्क म्हणजे काय?
तुम्हाला पार्ट टाइम काम करून अधिक पैसे मिळवता येतील, असे आमिष यात दाखवलं जातं. त्यामध्ये विश्लेषण करणे, परीक्षण लिहिणे, अशा प्रकारांचा समावेश असतो. तुम्हाला अधिकचे पैसे मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पैसे भरणे आवश्यक आहे, अशी अट त्यामध्ये टाकण्यात येते. जास्तीचे पैसे मिळवण्याच्या आमिषाने अनेकजण त्याला बळी पडतात.