‘मोदी की गॅरंटी’, ‘विकसित भारत’ अशा घोषणांनी जनतेला गाजर दाखवून तिसर्या वेळी सत्तेत येऊ पाहणार्या ‘रालोआ’च्या प्रयत्नांना ‘इंडिया’ आघाडीमुळे आणि देशात कोणतीही लाट नसल्यामुळे खीळ बसणार, अशी चिन्हे आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने ४८.४ टक्के, तर संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए)ने ३८.५ टक्के मते मिळविली होती. आता एका सर्व्हेनुसार ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ (एनडीए) आणि ‘इंडिया’ला बरोबरीने (४७ टक्के) मिळतील व उर्वरित मते इतर पक्षांच्या पारड्यात जातील.
महाराष्ट्रात २०१९ लोकसभा निवडणुकीत सरासरी ६४.१ टक्के मतदान होऊन त्यात भाजपा २७.८४, शिवसेना २३.५, काँग्रेस १६.४१, राकाँप १५.६६, वंचित बहुजन आघाडी ६.९२, अपक्ष ३.७२, नोटा ०.९१ आणि एमआयएम ०.७३ अशी टक्केवारी होती. आता बदललेल्या परिस्थितीत बदल होईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ११.८ टक्के व शिंदे सेना ५.८ टक्के असे समीकरण आकार घेऊ शकेल. याचप्रमाणे राकाँप (शरद पवार) ७.८ टक्के व राकाँप (अजित पवार) यांना ३.९ टक्के मते मिळू शकतील.
महायुतीचे काय होणार?
या वेळेला शिवसेना व राकाँपमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे मताधिक्यावर थोडा फार परिणाम झाला तरी शिंदे सेना आणि अजित पवार गटाला पायाच नाही. शिंदे आणि अजित पवार केवळ भाजपावरच अवलंबून आहेत. दोघांकडे अजेंडा नाही. निवडणूक आयोगाने अर्थहीन निर्णय देऊन शिंदेंच्या नावे शिवसेना आणि अजित पवार यांच्या नावे राकाँपची नोंद केली असली तरी या फुटीर पक्षांना अस्तित्व नाही. शिवाय राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ व शरद पवारांचा प्रभाव यामुळे महाविकास आघाडीचा प्रभाव वाढून महायुतीला नक्कीच वेसण बसेल.
भाजपा कार्यकर्त्यांचा दबाव
निवडून येण्याची क्षमता या अटीवरच तिकिटे देण्यात यावीत असे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आधीच स्पष्ट केलं होतं, तर मतदारसंघातील जनतेच्या नाराजीचा मुद्दा आणि आमदारांचे संख्याबळ यावर आधारित उमेदवार उभे करावेत अशी बहुसंख्य भाजपा कार्यकर्त्यांची मागणी असल्यामुळे काही मतदारसंघांत उमेदवार बदलले गेले आहेत. उदा. भाजप कार्यकर्त्यांच्या दबावामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी द्यावी लागली. हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हिंगोलीमध्ये रोष निर्माण झाला होता. याचबरोबर ईडीच्या कारवाईचा दाखला देत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार भावना गवळी यांच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट द्यावे लागले. गवळी या वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा शिवसेनेच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.
शिवाय रामटेकमधून कृपाल तुमाने यांना बदलून राजू पारवे यांना तिकिट द्यावे लागले. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या जागी छगन भुजबळ (राकाँप-अजित पवार) यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय ठाणे, कल्याणसारख्या मतदारसंघाबाबतचे वाद अजून मिटले नाहीत. थोडक्यात सध्या तरी शिंदेंच्या हाती भाजपाने दिलेला गृहपाठ करण्यापलीकडे काही नाही. उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभांना मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद पाहता मूळ कार्यकर्त्यांच्या भूमिकेत बदल झालेला नाही आणि ते शिवसेना (उबाठा) बरोबरच आहेत हे फिरून एकवार सिद्ध होते.
अजित पवारांचे काय होणार?
अजित पवार यांचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रातील काही ठराविक मतदारसंघांत असून तोदेखील मूळ राकाँप (शरद पवार) यांच्याबरोबर राहून मंत्रीपदे भूषविल्यामुळे. वास्तविक पाहता सिंचन घोटाळा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्पेâ अवैधरित्या दिल्या गेलेल्या कर्जांपायी त्यांचे नाव गाजले होते. त्यांच्याबरोबर खासदार प्रफुल्ल पटेल हे हवाई वाहतूक मंत्री असताना झालेल्या विमानचालन घोटाळ्यामुळे चर्चेत होते. आता दोघांनाही क्लीन चिट मिळाली आहे.
बहुकोनी लढतींमुळे रंगत
विरोधी पक्षांची पूर्ण एकजूट न झाल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बहुकोनी लढतींमुळे मतविभाजन होऊन त्याचा परिणाम निकालावर होणार हे निश्चित. वास्तविक पाहता ‘इंडिया’च्या सभांना होणारी प्रचंड गर्दी पाहता, महायुतीच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यात महाराष्ट्रात मविआचीही हवा आहे. नोव्हेंबर २०२२मध्ये झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा रमेश लटके ६६,५३० मते (दिवंगत रमेश लटकेंनी २०१९मध्ये मिळविलेल्या मतांपेक्षा ३,७५७ ज्यादा) मते मिळवून विजयी झाल्या होत्या. १२,८०६ मते ‘नोटा’ होती, जी भाजपा कार्यकर्त्यांची होती असे म्हटले जाते.
याचबरोबर मार्च २०२३मध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत कसबा पेठेतून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी जवळजवळ तीन दशकांनंतर भाजपाच्या उमेदवाराला हरवून विजयश्री खेचून आणली, तर भाजपाने चिंचवडची जागा कशीबशी वाचवली. आता धंगेकर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. मनसेला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविणारे वसंत मोरे, भाजपाचे मुरलीधर मोहोळ आणि धंगेकर यांच्यात तिहेरी लढत प्रस्तावित आहे. मविआबरोबर बोलणी फिस्कटल्यामुळे नागपूर, कोल्हापूर व बारामती वगळता बर्याच मतदारसंघांत प्रकाश आंबेडकराच्या ‘वंचित बहुजन आघाडी’तर्फे उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय ‘वंचित’ने रामटेकमधून काँग्रेस बंडखोर किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रथेप्रमाणे मायावतींच्या बहुजन समाज पक्षानेही आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत.
बंडखोरांची डोकेदुखी
शिवाय अंतर्गत वादापायी काही मतदारसंघात बंडखोरांनीही अधिकृत उमेदवारांविरुद्ध षड्डू ठोकला आहे. यात अमरावतीहून लढणार्या भाजपा पुरस्कृत उमेदवार खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध उभे राहिलेले ‘प्रहार’ पुरस्कृत दिनेश बूब यांचा समावेश आहे. सध्या राणा, बळवंत वानखेडे (काँग्रेस), बूब (प्रहार) आणि प्राजक्ती पिल्लेवान (वंचित), अशी लढत होऊ घातली आहे. ‘प्रहार’चे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू सध्या महायुतीत आहेत. हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने (शिंदे गट), सत्यजीत पाटील (शिवसेना उबाठा), दादा गौडा पाटील (वंचित) अणि राजू शेट्टी (स्वाभिमानी पक्ष) अशी चौरंगी लढत होऊ घातली आहे. याचबरोबर बुलढाणा आणि हिंगोलीमध्येही बंडाचे निशाण उभारले गेले आहे.
वंचित बहुजन आघाडी २०१९
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांत ‘वंचित बहुजन आघाडी’ची मते निर्णायक ठरली होती, ते मतदारसंघ पुढीलप्रमाणे :- बुलढाणा- राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) ३,८८,६९० + बलराम शिरसीकर (वंचित बहुजन आघाडी) १,७२,६२७ = ५,६१,३१७ (विजयी) – प्रतापराव जाधव (अविभाजित शिवसेना) – ५,२१,९७७.
अकोला- बरकतुल्ला पटेल (कॉग्रेस) २,५४,३७० + प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) २,७८,८४८ = ५,३३,२१८. (विजयी)- संजय धोत्रे (भाजपा) ५,५४,५७९.
अमरावती- आनंद अडसूळ (अविभाजित शिवसेना) ४,७३,९९६ + गुणवंत दुपारे (वंचित) ६५,१३५ = ५,३९,१३१. (विजयी)- नवनीत राणा (राकाँपा पुरस्कृत अपक्ष)- ५,१०,९४७.
गडचिरोली- नामदेव उसेंडी (काँग्रेस) ४,४२,४४२ + रमेश गजबे (वंचित) १,११,४६८ = ५,५३,९१०. (विजयी)- अशोक नेते (भाजपा)- ५,१०,९४७.
चंद्रपूर- हंसराज अहीर (भाजपा) ५,१४,७४४ + राजेश महाडोले (वंचित) १,१२,०७९ = ६,२६,८२३. (विजयी)- सुरेश धानोरकर (काँग्रेस)- ५,५९,५०७.
नांदेड- अशोक चव्हाण (काँग्रेस) ४,४६,६५८ + यशपाल भिंगे (वंचित) १,६६,१९६ = ६,१२,८५४. (विजयी)- प्रताप चिखलीकर (भाजपा)- ४,८६,८०६.
परभणी- राजेश विटेकर (राकाँपा) ४,९६,७४२ + आलमगीर खान (वंचित) १,४९,९४६ = ६४६६८८. (विजयी)- संजय जाधव (अविभाजित शिवसेना)- ५,३८,९४१.
हातकणंगले- राजू शेट्टी (स्वाभिमानी पक्ष) ४,८९,७३७ + अस्लम सय्यद (वंचित) १,२३,४१९ = ६,१३,१५६. (विजयी)- धैर्यशील माने (अविभाजित शिवसेना)- ५,८५,७७६.
याशिवाय शिवसेना, मनसे असा प्रवास करून मराठा आरक्षणाच्या समर्थनात आमदारकीचा राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्यामुळे संभाजीनगर मतदारसंघात २०१९च्या लोकसभा निवडणुकीचे चित्र बदलले होते. मतविभाजन होऊन चंद्रकांत खैरे (अविभाजित शिवसेना) ३,८४,५५० + हर्षवर्धन जाधव (अपक्ष) २,८३,७९८ = ६,६८,३४८. (विजयी)- इम्तियाज जलील (एमआयएम)- ३,८९,०४२ असा निकाल लागला होता. आता फिरून एकवार हर्षवर्धन जाधव निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
२०१९चा लोकसभा निकाल
भाजपा : पश्चिम महाराष्ट्र- ५, विदर्भ- ५, मराठवाडा- ४, कोंकण (ठाण्यासह)- १, मुंबई- ३, खानदेश- ५ = २३.
शिवसेना : पश्चिम महाराष्ट्र- ३, विदर्भ- ३, मराठवाडा- ३, कोकण (ठाण्यासह)- ५, मुंबई- ३, खानदेश- १ = १८.
राकाँप : पश्चिम महाराष्ट्र- ३, विदर्भ- ०, मराठवाडा- ०, कोकण (ठाण्यासह)- १, मुंबई- ०, खानदेश- ० = ४.
काँग्रेस : पश्चिम महाराष्ट्र- ०, विदर्भ- १, मराठवाडा- ०, कोकण (ठाण्यासह)- ०, मुंबई- ०, खानदेश- ० = १.
एमआयएम : १ आणि अपक्ष : १.
(भाजपा- २३, शिवसेना- १८, राकाँप- ४, काँग्रेस- १, एमआयएम- १ (इम्तियाज जलील, संभाजीनगर), अपक्ष- १ (नवनीत कौर, अमरावती) = ४८).
२०२४च्या काही लढती
बुलढाणा : प्रताप जाधव (शिंदे सेना), नरेंद्र खेडेकर (शिवसेना, उबाठा), वसंत मगर (वंचित बहुजन आघाडी), वर्धा : रामदास तडस (भाजपा), अमर काळे (राकाँप- शरद पवार), राजेंद्र साळुंखे (वंचित), रामटेक : राजू पारवे (शिंदे सेना), श्यामकुमार बर्वे (काँग्रेस), किशोर गजभिये (काँग्रेस बंडखोर), नागपूर : नितीन गडकरी (भाजपा), विकास ठाकरे (काँग्रेस), भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे (भाजपा), प्रशांत पडोले (काँग्रेस), संजय केवाट (वंचित), गडचिरोली-चिमूर : अशोक नेते (भाजपा), नामदेव किरसान (काँग्रेस) आणि हितेश मडावी (वंचित).
चंद्रपूर-वाणी-अर्णी : सुधीर मुनगंटीवार (भाजपा), प्रतिभा सुरेश धानोरकर (काँग्रेस), राजेश बेले (वंचित), यवतमाळ-वाशिम : राजश्री हेमंत पाटील (शिंदे सेना), संजय देशमुख (शिवसेना-उबाठा), अभिजीत राठोड (वंचित), हिंगोली : बाबुराव कदम कोहळीकर (शिंदे सेना), नागेश आष्टीकर (शिवसेना-उबाठा), बी. डी. चव्हाण (वंचित), नांदेड : प्रतापराव चिखलीकर (भाजपा), वसंत चव्हाण (काँग्रेस), अविनाश बोसिकर (वंचित), परभणी : संजय जाधव (शिवसेना-उबाठा), महादेव जानकर (आरएसपी), पंजाबराव डख (वंचित).
संभाजीनगर : इम्तियाज जलील (एमआयएम), चंद्रकांत खैरे (शिवसेना-उबाठा), अफसर खान (वंचित) आणि हर्षवर्धन जाधव (अपक्ष), दिंडोरी : भारती पवार (भाजपा), भास्कर भगरे (राकाँप-शरद पवार), भिवंडी : कपिल पाटील (भाजपा), सुरेश म्हात्रे (राकाँप-शरद पवार), मुंबई ईशान्य : मिहीर कोटेचा (भाजपा), संजय पाटील (शिवसेना-उबाठा), मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिंदे सेना), अनिल देसाई (शिवसेना-उबाठा), रायगड : सुनील तटकरे (राकाँप-अजित पवार), अनंत गीते (शिवसेना-उबाठा), मावळ : श्रीरंग बारणे (शिंदे सेना), संजोग वाघेरे (शिवसेना-उबाठा), बारामती : सुप्रिया सुळे (राकाँप-शरद पवार, सुनेत्रा पवार (राकाँप-अजित पवार), शिरुर : शिवाजी अढळराव पाटील (शिंदे सेना), अमोल कोल्हे (राकाँप-शरद पवार).
अहमदनगर : सुजय विखे पाटील (भाजपा), निलेश लंके (राकाँप-शरद पवार), शिर्डी : सदाशिव लोखंडे (शिंदे सेना), भाऊसाहेब वाघचौरे (शिवसेना-उबाठा), बीड : पंकजा मुंडे (भाजपा), बजरंग सोनावणे (शिवसेना-उबाठा), धाराशीव : अर्चना पाटील (राकाँप-अजित पवार), ओमराजे पाटील (शिवसेना-उबाठा), लातूर : सुधाकर श्रृंगारे (भाजपा), शिवाजी कळगे (काँग्रेस), नरसिंहराव उदगीरकर (वंचित). सोलापूर : प्रणिती शिंदे (काँग्रेस), राम सातपुते (भाजपा), राहुल गायकवाड (वंचित), माढा : रणजितसिंह निंबाळकर (भाजपा), धैर्यशील पाटील (राकाँप-शरद पवार), रमेश बारसकर (वंचित), सांगली : संजयकाका पाटील (भाजपा), विशाल पाटील (काँग्रेस), चंद्रहार पाटील (शिवसेना-उबाठा), रत्नागिरी-सिंधुदुर्ग : विनायक राऊत (शिवसेना-उबाठा), नारायण राणे (भाजपा), काका जोशी (वंचित), कोल्हापूर : संजय मंडलिक (शिंदे सेना), शाहू शहाजी छत्रपती (काँग्रेस) आणि हातकणंगले : धैर्यशील माने (शिंदे सेना), सत्यजीत पाटील (शिवसेना-उबाठा), राजू शेट्टी (शेतकरी स्वाभिमानी पक्ष) व दादागौंडा पाटील (वंचित).