बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी, दिघे साहेबांचा आदर्श जपण्यासाठी मी वेगळा मार्ग निवडला. बंड नव्हे तर उठाव केला, असा बहाणा करून गद्दारी करणार्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदार व १३ खासदार घेऊन भाजपाच्या दावणीला बांधून घेतले, याला दोन वर्षे होत आली. प्रथम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व नंतर निवडणूक आयोग यांना हाताशी धरले. प्रथम अदृश्य शक्ती म्हणत नंतर-नंतर उघडपणे पुढे आलेले मोदी, शाह व फडणवीस या त्रिकुटाने मिंधेंची उघडपणे पाठराखण करीत शिंदेंचा स्वाभिमानाचा बुरखा टराटरा फाडून टाकला. एकनाथ शिंदे हे भाजपाचे मिंधे असून ते भाजपाच्या हातातले कळसूत्री बाहुले आहेत, हे सिद्ध केले.
महाराष्ट्र हे स्वाभिमानी राज्य आहे. आजवर हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला होता. दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र कधीच झुकला नव्हता. गेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे यांनी दिल्लीची जी मिंधेगिरी केली त्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने वारंवार खाली गेली आहे. मुख्यमंत्रीपदाचा सोन्याचा पिंजरा देऊन या पोपटाचे पंख कलम करून टाकले गेले व त्याला स्वाभिमानापासून वंचित करून लाचार व मिंधे करून ठेवले. दिल्लीची वारी केल्याशिवाय व शहांची विनवणी, मिनतवारी केल्याशिवाय एकही निर्णय घेता येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण करून टाकली. महाराष्ट्रात तर देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या गळ्यात जोखड बांधून ठेवले. वारंवार माईक खेचून घेणे, तोंडावर हात ठेऊन प्रॉम्प्टिंग करणे, मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नांना आपणच उत्तरे देऊन आपणच सुपर मुख्यमंत्री असून शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांतून हेतूपुरस्सरपणे सिद्ध करीत राहिले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या औटघटकेच्या दिलाशाचा फायदा मिंधे गटाने पुरेपूर उठवला आहे. हे मंत्रिमंडळ असंवैधानिक असल्याचा निर्वाळा दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला, दूरगामी परिणाम करणारे धोरणात्मक व आर्थिक उधळपट्टी करणारे निर्णय घेतले. निवडणूक आयोगाने गैरमार्गाने दिलेले पक्षाचे नाव व चिन्हाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात निर्णयाच्या प्रतीक्षेत प्रलंबित असून लोकसभा अध्यक्षांचा पक्षपाती निर्णयही प्रलंबित आहे. हे दोन्ही निर्णय मिंधे गटाच्या विरोधात गेल्यास मिंधे गट भुईसपाट होऊ शकतो.
एकनाथ शिंदे यांनी जो पक्षद्रोह करून गद्दारी केली त्याचे फळ ‘पोएटीक जस्टीस’ या न्यायाने त्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. पदोपदी होणारा अपमान दिल्लीच्या तख्तापुढे झुकणेच नाही, तर साक्षात लोटांगणं घालूनही काहीच मनासारखे होत नाही. ‘बेगर्स हॅव नो चॉईस’ अर्थात याचकाला जे पदरी पडते त्यावरच समाधान मानून गप्प बसावे लागते. तो हट्टी वा आग्रही भूमिका घेण्यासाठी असलेला ताठ कणा कधीच गमावून बसलेला असतो. त्याने स्वार्थापोटी गळ्यात पट्टा बांधून घेतलेला असतो. त्यामुळे शौचाला जातानाही मालकाची परवानगी लागत असते. अशीच काहीशी अवस्था एकनाथ शिंदे अॅण्ड गद्दार टोळीची झाली आहे.
पूर्वी मातोश्रीवर सन्मानाने पदं, तिकिटं मिळत होती. इतकेच नव्हे तर या एकनाथ शिंदेंना मातोश्रीने अमर्याद अधिकार दिले होते. शब्दाला मान होता. आज मिंधेंची परिस्थिती विपरीत झाली आहे. प्रत्येक वेळी दिल्लीतल्या बापासमान मानलेल्या हायकमानच्या मिनतवार्या कराव्या लागतात, निर्णय घेण्यापूर्वी त्यांची संमती घ्यावी लागते, मर्जी संपादन करावी लागत आहे. भाजपाने कपटनीतीचा भाग म्हणून शिवसेना फोडण्यासाठी कुर्हाडीच्या दांड्याप्रमाणे या मिंध्यांचा वापर केला. कारण त्यांना महाराष्ट्र व विशेषत: मुंबईवर कब्जा करायचा होता. यात अडसर होता तो उद्धव बाळासाहेब ठाकरे या सूर्यपुत्राचा व त्यांच्या अभेद्य शिवसेनेचा. या मनसुब्यासाठी अतृप्त व अतिशय महत्वाकांक्षी व ईडीग्रस्त असलेल्या एकनाथचा हुकमी एक्का त्यांच्या गळाला लागला. उपमुख्यमंत्रीपदासाठी हपापलेल्या शिंदेंना मोदी-शाहनी झटका दिला व ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्रीपदाचे घबाड हाती लागले. ज्या मातोश्रीच्या पायर्या आयुष्यभर झिजवल्या त्याच मातोश्रीवर बेलगाम आरोप करू लागले मग ते. निवडणूक आयोगाशी संगनमत करून शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्हही लाटलं. सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्तरावर हे सरकार बेकायदेशीर, अवैध व असंवैधानिक ठरवूनही हे गद्दार लोक सत्तेला चिकटून राहिले. इतकेच नव्हे तर स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून निष्ठावंतांवर चौकशांचा व आरोपांचा ससेमिरा लावला. ज्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे व निव्वळ एकनाथ शिंदेंचा पुत्र म्हणून श्रीकांत यांना गेली २२ वर्षे तन-मन-धनाने मदत केली, एका रिक्षाचालकाला कॅबिनेट मंत्री बनवले, डॉक्टरकीची परीक्षा देत असलेल्या पोरसवदा पुत्राला, ज्याने आयुष्यात कुठलीच निवडणूक लढवली नव्हती त्याला, १० वर्षे थेट खासदार बनवले. एकदाच नव्हे तर दोन दोनदा! अशा शिंदेंनी अरविंद वाळेकर, वामन म्हात्रे, राजेंद्र चौधरी, सुनील कलवा, बाळा श्रीखंडे, चंद्रकांत बोडारेंसारख्या असंख्य लोकांना ब्लॅकमेल करून आपल्या गटात सामील होण्यास मजबूर केले. कल्याणच्या बंड्या साळवी, आशा रसाळ, हर्षवर्धन पालांडे यांना अतोनात त्रास दिला. बंड्या साळवीवर तर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सवातील देखाव्यांवर बंदी आणली. नवी मुंबईचे एम. के. मढवी व उल्हासनगरचे सुरेश पाटील यांना तडीपार करायला लावले. मढवी तरी काही महिन्यांत सुटले, मात्र आमचा सुरेश पाटील गेली दीड वर्षे तडीपार असून कुटुंब व नातेवाईकांपासून दूर भुसावळला तडीपारी भोगत आहे. औरंगजेबासारखी ही पाशवी सूडबुद्धी या शिंदे यांच्यात ठासून भरली आहे.
आपले पूर्वीचे आनंद आश्रमातील पाणक्या व हरकाम्याचे दिवस आठवून त्यांनी आपल्या मर्यादेत रहायला हवे होते. परंतु सत्तेचा माज व त्याची नशा ही माणसाला कशी हैवान बनवते, याचे उदाहरण म्हणून हे नाव भविष्यात ओळखले जाईल. आजही विद्यार्थी ‘गद्दार’ शब्दाला पर्यायी शब्द म्हणून एकनाथ शिंदेंचाच उल्लेख करतात.
त्यांची अवस्था अधिकार नसलेला मुख्यमंत्री व पक्षप्रमुख अशी झाली आहे. त्यांची बार्गेनिंग पॉवर नष्ट करण्यासाठी भाजपने ७० हजार कोटीचा सिंचन घोटाळाफेम अजित पवारांना महायुतीत घेतले व शिंदेंना प्रभावहीन केले. लोकसभा निवडणुकीत २२ जागा घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी दर्पोक्ति करणार्या मिंधे गटाला दिल्लीश्वरापुढे नाकदुर्या काढायला लावून १३ जागांची भीक दिली. त्यातही सात जागी उमेदवार बदलून शिंदेंचे नाक कापले. माझा एक जरी आमदार पडला तर मी गावी जाऊन शेती करेन, असे म्हणणार्या या मिंध्यांना आपल्यासाठी पक्षत्याग करून आलेल्या खासदारांना तिकीट मिळवून देता येत नसेल तर ते निवडून कसे आणणार? ही अवस्था खासदारकीची तर विधानसभा निवडणुकीत किती बिकट अवस्था होईल? शिंदे यांनी स्वार्थासाठी आपले राजकीय करियर बरबाद केले, अशी भावना त्यांच्यासोबत गेलेले आमदार खासदार व्यक्त करीत आहेत.
जे शिंदे स्वत:ला पक्षप्रमुख व महाराष्ट्रासारख्या ४८ खासदार व २८८ आमदार असलेल्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणवतात, ते आपल्या सख्ख्या मुलाला उमेदवारी जाहीर करू शकले नव्हते. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची कल्याण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित करण्याचे श्रेय घेतले. मात्र त्याचवेळी आम्ही श्रीकांत शिंदेंसाठी काम करणार नाही, अशी घोषणा कल्याणच्या भाजपाने केली आहे. श्रीकांत शिंदेंच्या अत्याचारामुळेच आपल्या आमदाराचा तोल ढासळला व तुरुंगवासाबरोबर त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसला, याची खदखद भाजपात आहे. त्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या पराभवाचा चंग भाजपाने बांधला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपली योग्यता तपासून पाहण्याची गरज आहे.
मातोश्रीवर जाऊन हक्काने स्वत:साठी व मुलासाठी उमेदवारी घेऊन येणारा गद्दारनाथ किती हतबल, लाचार व मिंधा झाला आहे, हे महाराष्ट्रच नव्हे तर जग पाहत आहे. इतका लाचार व कणाहीन मुख्यमंत्री जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. शिंदे व त्यांच्या चोरलेल्या पक्षाला अखेरची घरघर लागली असून त्यांचा हिंदुत्ववादी, स्वाभिमानी, राष्ट्रवादी पक्ष व विशेष करून अर्थमंत्री अजित पवारांच्या विरोधाचा बुरखा टराटरा फाटला असून मुखवट्यामागचा विद्रूप चेहरा जगासमोर आला आहे.