रसिक प्रेक्षकांच्या धकाधकीच्या जीवनात मनोरंजनाचा पाऊस पडायला ‘सर्कीट हाऊस’ पुन्हा रंगभूमीवर आलंय. रॉयल थिएटर + भूमिका थिएटर्स प्रकशित आणि श्री कला प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकाचे लेखक गौतम जोगळेकर असून याचं दिग्दर्शन मराठी रंगभूमीवरील सर्वात यशस्वी दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या केलं आहे.
राजकीय नेत्यांचे शासकीय सल्लासमलतीचे केंद्र तसेच विश्रांती गृह ‘सर्कीट हाऊस’ म्हणून ओळखले जाते. या नाटकाच्या शीर्षकाचा संबध त्या ‘सर्कीट हाऊसच्या रूढार्थाने प्रचलित असलेल्या या अर्थाशी नाही. राजकारणातील चढाओढ, भ्रष्टाचार अशा गंभीर विषयावर भाष्य न करता फक्त मनोरंजन हा हेतू ठेवून हे नाटक लिहिलं गेलं आहे.
विजय केंकरे म्हणाले, हे नाटक २०१४ साली माझ्याकडे आलं तेव्हा ते फार्सिकल आहे म्हणून मी स्वीकारलं. कारण आपल्याकडे विनोदी नाटकं संख्येने खूप होतात, त्या तुलनेत फार्सिकल नाटकं रंगभूमीवर कमी आली आहेत. कोणतंही नवीन नाटक दिग्दर्शित करताना मी तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतो. पहिली म्हणजे, नाटक वाचताना मला कंटाळा आला नाही पाहिजे. दुसरं, समाजाला ५० वर्षं मागे घेऊन जाईल इतकं ते जुनाट नको आणि तिसरं म्हणजे ते नाटक साचेबंद किंवा बेतलेलं नसावं. नाटकाला गोष्ट असणं मला गरजेचं नाही वाटत, नाटकात कॅरेक्टर्स असायला हवीत. आधीच्या संचात भूषण कडूने साकारलेली मंत्र्याच्या पीएची व्यक्तिरेखा आता गणेश पंडित साकारत आहेत. त्यावर ते म्हणाले, गणेशचा निरागस चेहरा, हालचालीतील बावळटपणा या भूमिकेसाठी साजेसा होता.
या `सर्कीट हाऊस’मध्ये मराठी रंगभूमीवर विजेच्या चपळाईने वावरणारे आणि प्रसंगनिष्ठ विनोदावर विलक्षण हुकुमत असलेले संजय नार्वेकर काम करत आहेत. ते म्हणाले, हे नाटक राजकारणावर मिश्किल टिप्पणी करणारं आहे. आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडणार्या राजकारणाचा फायदा आमच्या नाटकाला होतोय. प्रेक्षकांना नाटकातील प्रसंगांचं आजच्या राजकीय घडामोडींशी साधर्म्य जाणवतं, तेव्हा प्रेक्षकांचा मोठा हशा उसळतो. या नाटकाला पहिल्या प्रयोगापासून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. कोविडमुळे बंद झालेलं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर कधी आणताय, अशी आग्रही मागणी अनेक प्रेक्षक करत होते.
नार्वेकर, पंडित यांच्यासोबत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील अंकुर वाढवे, माधुरी जोशी, प्रमोद कदम, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, सावित्री मेघातुल, सुषमा भोसले आदी कलाकार या नाटकात आहेत. नेपथ्य राजन भिसे यांचे असून प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे. संगीत नितीन कायरकर यांनी दिलं आहे, तर यातील नृत्ये सोनिया परचुरे यांनी बसवलेली आहेत.