मार्मिकने गेल्या आठवड्यात या सदरात ‘भाजप चारशे पार नव्हे तर तडीपार होणार’ अशी ग्वाही दिल्यानंतर अनेकांना ती अतिशयोक्ती वाटली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या नियतकालिकात अशीच मांडणी होणार, अशी भारतीय जनता पक्षाच्या भजनी लागलेल्यांची समजूत होती. परंतु, मार्मिक हा काही काहीही फेकाफेकी करणारा प्रचारकी गोदी मीडिया नाही. आता राज्यनिहाय आकडेवारीसकट आपण तीच मांडणी तपासून पाहू आणि मग तुम्हीच ठरवा, भाजप चारशे पार होणार की तडीपार ते!
आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची (एआय) आई काढणारे बुद्धिमान लोक ईव्हीएमचा बाप नसतील कशावरून? पण ईव्हीएम हॅक होत नाही, ते सुरक्षित आहे, असं मानलं, तर भाजपाची तडीपारी ठरलेलीच आहे. इलेक्टोरल बॉन्डचे हाडूक गळ्यात अडकल्यानंतर पाठोपाठ सर्वोच्च न्यायलयाने नोटबंदीवरून देखील चपराक दिल्याने आणि रामलल्लाचा आशीर्वाद फारच कमी पडल्याने भाजपाचे चारशेपार मिशन सध्या तरी अशक्यप्राय आहे. निवडणूक आयोगाने अकारण लांबवलेल्या निवडणुकीच्या तिसर्या चौथ्या टप्प्यात काही कट कारस्थान (आठवा, गेल्या निवडणुकांच्या काळात झालेला पुलवामा हल्ला) झाले नाही तर भाजपा सपशेल पराभूत होऊ शकतो. बरेचदा मोठे मोठे दावे ठोकल्याशिवाय लोकभ्रम निर्माण करता येत नाही आणि मिळणारे फुटकळ यशही मिळवता येत नाही, म्हणून हा चारशेपारचा जुमला भाजपाने आणला आहे.
भारतीय जनता पक्षाला मागील (२०१९) निवडणुकीत ३०३ जागा मिळाल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत त्यांनी पाकिस्तानचे तुकडे पाडले असते किंवा चीनला लडाखमध्ये लोळवले असते, तर कदाचित त्यांची लाट उसळून चारशे पार झालेही असते. आजच्या वातावरणात ते अशक्य आहे. आजवरच्या इतिहासात हा पराक्रम फक्त एकदाच, तोही काँग्रेस पक्षालाच करता आला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्घृण हत्येनंतर प्रत्येक भारतीयाने शोकसंतप्त होऊन मतपेटीतून काँग्रेसला बळ दिलं होतं. तशीच लाट उसळवण्याचा प्रयत्न २०१९ला शहीद जवानांच्या नावावर मतं मागून करण्यात आल्याने भाजप जेमतेम ३०० पार झाली. आज मोदी विरोधी पक्षांना जखमी करून, जायबंदी करून, नेत्यांना तुरुंगांत डांबून चारशेपार जाऊ पाहात आहेत. या थिल्लरपणाला जनता प्रतिसाद देणार नाही. वास्तवात भाजपा बहुमताचे आकडे देखील गाठणार नाही, अशी परिस्थिती दिसते आहे.
मुळात मोदींनी इव्हेंटबाजी आणि अस्मिताबाज मुद्द्यांवर वरवरच्या मुलाम्यासारखे धडाकेबाज भासणारे निर्णय घेण्यापलीकडे कोणतीच देदीप्यमान कामगिरी केलेली नाही. अनेक कामांच्या संदर्भात त्यांनी लाल किल्ल्यावरून स्वत:च खोटे आकडे जाहीर केलेले आहेत. न खाऊँगा ना खाने दूँगा अशा वल्गना करणार्या मोदींचा तो तथाकथित स्वच्छ कारभाराचा बुरखाही आता टराटरा फाटला आहे.
व्यक्ती पक्षापेक्षा वा संघटनेपेक्षा मोठी झाली तर तीच त्या पक्षाची अडचण बनून बसते. एकेकाळी मोठी ताकद असलेले मोदी हीच आज भाजपाची मोठी अडचण झाली आहे. ग्रामपंचायत ते लोकसभा अशा सर्व निवडणुकीत उमेदवाराचे महत्व शून्य करून जनतेवर एकच एक गोष्ट बिंबवली गेली की उमेदवाराकडे बघूच नका, फक्त मोदींना बघा, तेच सगळे काही ठिक करतील. मोदी हेच गॅरंटी आहेत. आता स्वतःच उमेदवाराकडे बघू नका म्हणून सांगितल्यावर गल्लीत सांडपाणी साचू लागले तरी लोक मोदींना ट्वीट करू लागले. मोदींकडे बघा म्हणजे समस्या विसरा, असे होत नाही. कधी सर्जिकल स्ट्राईककडे बघा, कधी चंद्रयान बघा, कधी राममंदिर बघा असे भाजपा सांगत राहते; पण जनता शंभरपार पेट्रोलसारखी महागाई, न वाढणारे पगार, बेरोजगारी, हजारापर्यंत गॅस सिलिंडर, नुकतेच वाढलेले विजेचे दर (ही अडाणींच्या ऑस्ट्रेलियन कोळशाची कृपा) यांच्याकडे पाहतेच ना! हर घर मोदीच्या नार्यातून हर जगह बरबादी निष्पन्न होते आहे, हे वास्तव आता जनतेला समजू लागले आहे. भाजपकडे आज मोदींशिवाय लढायचा दुसरा पत्ताच उपलब्ध नाही, हे या पक्षाचे ठसठशीत अपयश आहे. एका व्यक्तीवर सगळेच अवलंबून ठेवल्याने खासदारकीचे सर्व उमेदवार ही फक्त बिनचेहर्याची नावे ठरू लागली आहेत (केंद्रीय मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना काही ओळख नव्हती, तर खासदारांना विचारतो कोण?).
एक गंमतीशीर घटना पाहा.
कानपूरचा रेल्वे फलाट एरवीही लोकांनी भरलेला असतो. पण २७ मार्चला इथल्या एका फलाटावर जास्तच गर्दी होती. दिल्लीहून येणार्या शताब्दी एक्स्प्रेसमधून एका व्यक्तीचे आगमन होणार होते आणि त्याचे स्वागत करण्यासाठी हारतुरे घेऊन कार्यकर्ते जमले होते. ट्रेनमधून एक जाकिट झब्बा घातलेली व्यक्ती खाली उतरली. त्या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून खांद्यावर उचलून घेतले. राज्यसभेचे खासदार बाबुराम निषाद हे काही काळ संभ्रमित झाले, कारण त्यांच्या स्वागताला एकदम इतके लोक कसे आणि हा जल्लोष कशासाठी हे त्यांना लक्षात येत नव्हते. इतक्यात त्यांच्यातील एकाने ‘रमेश अवस्थी झिंदाबाद’ अशी घोषणा दिली. तेव्हा बाबूराम यांना उलगडा झाला व त्यांनी मी रमेश अवस्थी नसून मी बाबूराम निषाद आहे असं सांगितलं. ज्यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिली ते रमेश अवस्थी तेव्हा फलाटावर वेगळ्याच जागी उभे होते, तिकडे त्यांनी या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. म्हणजे भाजपाने मोदींचे महत्व इतके अवास्तव वाढवून ठेवले आहे की मतदारसंघात खासदार कोण आहे हे त्यांच्याच कार्यकर्त्यांना माहिती नसते, मग जनतेला विचारतो कोण? अवस्थी मूळचे पत्रकार, पण त्यांचा जमिनीवर संपर्क फारसा नाही. सध्याचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यावर ऐनवेळेस या अवस्थींना घोड्यावर बसवण्यात आलं आहे.
लोकशाहीत खासदार हा लोकांमधून यावा लागतो आणि तो स्थानिक जनतेचे प्रतिनिधित्व करणारा असावा लागतो, पण हे तत्व एकेकाळी काँग्रेसच्या हायकमांडवर टीका करणार्या भाजपाला मान्य नाही. इथे सगळेच दिल्लीतून ठरते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने दोन वेळा मिळालेल्या बहुमताच्या घमेंडीत कायमस्वरूपी मुंबईकर असलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी यांना मथुरेतून तिसर्यांदा उमेदवारी दिली आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाकडे स्थानिक उमेदवार नाही? टीव्हीवरच्या रामायणातील राम, अरुण गोविल हे मेरठमधून लोकसभेचे उमेदवार आहेत ते याच अति आत्मविश्वासाच्या बळावर.
पंतप्रधान मोदींना जनतेने दोन वेळा भरभरून ताकद दिली. ते आले होते बेरोजगारीचा, महागाईचा, घसरत्या रुपयाचा बिमोड करायला, पाकिस्तानला धडा शिकवायला, चीनला लोळवायला; पण प्रत्यक्षात कुठे शिवसेना फोड, कोठे राष्ट्रवादी फोड, कोठे गोव्यातले लहान पक्ष गिळ, कोठे सरकारे पाड, कोठे ममता दीदींची टिंगल कर, कोठे जनतेने निवडून दिलेले मुख्यमंत्री जेलमध्ये धाड, स्वतःला विश्वगुरू म्हण, समुद्रात डुबकी मारून फोटोशूट कर अशा आत्मकेंद्री आणि सत्तालंपट उद्योगांमध्येच ते कायम रमलेले दिसतात. एकीकडे छगन भुजबळ, नारायण राणे, अजित पवार, सुनील तटकरे, मिंधे गट, हेमंत बिस्वा सर्मा, अशोक चव्हाण असे एक ना अनेक कथित भ्रष्टाचार शिरोमणी स्वतःच दत्तक घेतल्यावर जनतेची दिवसरात्र सेवा करणार्या अरविंद केजरीवाल यांना मात्र जेलमध्ये पाठवायचे हे दुटप्पी ढोंग जनतेला समजत नाही का? इलेक्टोरल बॉन्डमधून तर भाजपा स्वतःच भ्रष्टाचाराचा महाशिरोमणी ठरला आहे. तरी भाजपाचा पोपट नाचवणारा माऊथपीस इतरांवर आरोप करतो ते हास्यास्पद ठरते. आमच्या पक्षात सगळेच येऊ शकतात असे अर्थमंत्री निर्मला सितारामन भ्रष्टाचारावर विचारलेल्या प्रश्नावर म्हणत तर मग जनतेने मोदींवर विश्वास का ठेवावा? भाजपकडे दहा वर्षांत संपूर्ण बहुमत होते. करातून आलेला अमाप पैसा होता. तरी देशात विकास झालेला दिसत नाही. बहुतेक प्रकल्प अगदी रस्ते, पुल, मेट्रो, विमानतळ अगदी अटल सेतू देखील दहा वर्ष आधी मनमोहन सिंग यानी सुरू केलेले अथवा नियोजित केलेले आहेत.
अशा परिस्थितीत घटक पक्षांची मदत घेऊन एनडीएला चारशेपार न्यायचे ध्येय जे आहे, त्यातील भाजपा स्वतः ४४०च्या आसपास जागा लढून ३७०पार जाणार म्हणतो आहे. यातील २० जागा हा पक्ष तामिळनाडूत लढतो आहे व १६ जागा केरळ राज्यात लढतो आहे. या दोन राज्यांत भाजपची एकदेखील जागा येण्याची शक्यता नाही. म्हणजेच भाजपा ४४०ऐवजी खरंतर ४०४ जागांवरच लढणार आहे. आंध्र प्रदेशात भाजपाने तेलगू देसम पक्षाशी युती करत लोकसभेच्या सहा जागा पदरात पाडून घेतल्या, तरी तिथे आता काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेस देखील शर्यतीत आहेत. इथेही भाजपाला विजय मिळायची फारशी शक्यता नाहीच. म्हणजे भाजपाचे खरे आव्हान ४०४ वरून ३९८ जागांवर आले आहे आणि त्यामधून ३७० जागा जिंकण्याच्या बाता केल्या जात आहेत.
भाजपा तेलंगणा (१४/१७),महाराष्ट्र (२७/४८), पश्चिम बंगाल (४२), बिहार(१७/४०), झारखंड (११/१४), कर्नाटक (२५/२८), पंजाब (१३), ओडीसा (२१), जम्मू काश्मीर (६), हिमाचल प्रदेश (४), दिल्ली (७), राजस्थान (२५) आणि आसाम (१४) अशा २२६ जागांवर उमेदवार उभा करणार आहे. येथील राजस्थानच्या काही जागा वगळून भाजपाला प्रत्येक जागेवर अटीतटीची लढत आहे. या जागा सहजसोप्या नाहीत, कारण यातील कित्येक मतदारसंघात भाजपाचा स्वतःचा एक कार्यकर्ता देखील नाही. या सर्व जागा तसेच दक्षिण भारत अवघड आहे हे भाजपाने स्वतःच मान्य केले आहे. तसे नसते तर आजवरचा संघाचा हट्ट सोडून भाजपाला एकमेव का होईना, मुसलमान उमेदवार द्यावा लागला नसता. केरळमधील मल्लपुरमचे भाजपा उमेदवार अब्दुल सलाम यांना उमेदवारी देण्याची वेळ मोदींवर आली आहे. इतर पक्षांनी देशात १८ टक्के लोकसंख्या असलेल्या मुसलमानांना तिकीटे दिल्यावर त्यांची राजकीय सुंता झाली म्हणणारे, केरळ स्टोरीसारख्या विघटनवादी खोटारड्या चित्रपटाचा छुपा प्रचार करणारे, केरळमध्ये शेंडी हळूच सैल करून सत्तेच्या तुपात भिजवत आहेत, हीच खरी केरळ स्टोरी आहे.
देशात भाजपा विरोधात प्रचंड लाट असताना ती थोपवण्याची ताकद असणारी गुजरात (२६), मध्य प्रदेश (२९), अरुणाचल प्रदेश (२), उत्तराखंड (५) आणि उत्तर प्रदेश (८०) ही राज्ये भाजपसोबत आहेत. या राज्यातील १४२ जागांवर भाजपा अत्यंत मजबूत स्थितीत आहे. भाजपाची संपूर्ण रणनीती या सर्व जागा एकहाती जिंकण्याचीच आहेत. एकदा या १४२ जागांवर भाजपा एकतर्फी जिंकून आला की मग बहुमतापर्यंतची चढाई कितीही कठीण असली तरी ती साध्य होईल, हे भाजपाचे यशाचे गणित आखलले आहे. म्हणजे इंडिया आघाडीची खरी कसोटी ही या राज्यांतील निदान २५ जागा जिंकून दाखवण्यात आहे. इंडिया आघाडीने या राज्यांतील फक्त २५ जागा जिंकल्या तरी आघाडी भाजपाचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होईल. पण हे सहजसाध्य नाही. अवकाशात सूर्यप्रकाश देखील गिळणारे प्रचंड गुरुत्वाकर्षणाची शक्ती असलेले कृष्णविवर जसे असते तसेच ही राज्ये भाजपाने प्रचंड ताकदीने बनवलेली राजकीय कृष्णविवरे आहेत. या राज्यातील विरोधक गेल्या दहा वर्षांत या कृष्णविवरात पालापाचोळ्यासारखे खेचले गेले आहेत. एकतर गळाला लावा नाहीतर गळ्यात फास टाका, अशा पद्धतीने या राज्यांतील विरोधक नामशेष केल्यावर भाजपाची राक्षसी ताकद सर्व १४२ जागा जिंकून आणण्यात समर्थ आहे. या राज्यांच्या धर्तीवर सबंध देशाचे देखील राजकीय कृष्णविवर करण्याचे प्रयत्न होत आहेत.
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव, राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना संपूर्ण इंडिया आघाडीची ताकद लाभली असली तरी राष्ट्रीय लोकदल भाजपासोबत गेल्याने भाजपाची ताकद वाढली आहेच. मायावतींचा बसपा नक्की कोणाची मते खाणार यावर उत्तर प्रदेशाचे गणित ठरते, पण ते देखील यंदा भाजपाला जड नाही जाणार असाच अंदाज आहे. उत्तर प्रदेशात मोदींसोबत योगींचा प्रभाव देखील भरपूर आहे. त्यामुळेच इथल्या ८० जागांचा चक्रव्यूह भेदणे सोपे नाही. गुजरात तर अंधभक्तांचे अंधराज्य आहे, जिथे भाजपाची स्वेच्छेची गुलामी घेऊन बहुसंख्य जनता जगते आहे. स्वाभिमानी मतदार या गुलामीपसंद मतदारांसमोर फार अल्प आहे. शिवाय गुजरातमध्ये जणू नंदनवन आहे या भ्रमात हे राज्य कुपमंडुक वृत्तीने दरवेळेस मतदान करते. देशातील लोकशाही धोक्यात आली तरी या राज्यातील जनतेला त्याचे सोयरसुतक नाही. देशाची तिजोरी हातात आहे तोपर्यंत यांना सारेच आलबेल. मध्य प्रदेशात गुजरातइतकी एकतर्फी लढत नसली तरी तिथे आज भाजपाची ताकद मोठी आहे, हे विधानसभेच्या निकालाने दाखवून दिले आहे.
थोडक्यात ४४० पैकी ३६ जागी भाजपा नाममात्र आहे, २२६ जागी भाजपाची लढत त्याच्याहून जास्त ताकदवान अथवा तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यासोबत आहे तर १४२ जागांवर भाजपा निर्विवाद आघाडीवर आहे. इतर ३६ जागा या लहान राज्ये, केंद्रशासित प्रदेश अशा विस्कळीत आहेत. तिथे देखील जर भाजपाला झुकते माप दिले, तर मग भाजपा हा १७८ जागांवरच आघाडी घेऊ शकतो जो आकडा बहुमतापासून शंभरने लांब आहे. अटीतटीच्या २२६ जागांपैकी दोनेकशे जागा जिंकल्या तरच भाजपा ३७० पार व एनडीए ४०० पार जाईल.
हे शक्य आहे का?त्यासाठी भाजपाला चंद्र सूर्य प्रचारात उतरवावे लागतील, सोन्यानाण्याचा पाऊस पाडावा लागेल आणि पंतप्रधान मोदींकडे अवकाशातून दिव्यास्त्रे यावी लागतील. इतके होऊन देखील ते शक्य आहे का? मग विरोधी पक्षांना प्रचार सोडून जेलमध्ये पाठवावे लागेल. बँकेतले पैसे गोठवावे लागतील, विरोधकांनी शक्यतो लढाई सोडून हिमालयात जावे हे पहावे लागेल. तरी देखील भाजपा चारशेपार जाणे शक्य आहे का? तर त्याचे उत्तर हे नाही असेच द्यावे लागते. कारण मुळात ही लढाई भाजपा विरुद्ध विरोधी पक्ष अशी राजकीय नसून लोकशाही मानणारी जनता आणि लोकशाही न मानणारे धर्मांध नफरतीचे गुलाम अशी, देशातील सुज्ञ नागरिक व अंधभक्त अशी अटीतटीची सामाजिक लढाई होत आहे. महाभारतात जसा एक शकुनी होता, ज्याच्या व्यक्तिगत आकांक्षेसाठी त्याने भावाभावांत भांडणे लावली तसाच आजदेखील भारतीय बांधवांमध्ये भांडणे लावणारा एक शकुनी भारतीय राजकारणात दहा वर्षे पाताळयंत्री कारस्थाने करतो आहे. पण दुर्दैवाने तो कृष्णाच्या अवताराचे ढोंग घेऊन वावरत असल्याने भावंडाना त्याला ओळखणे जड जाते आहे. ईव्हीएम, गोदी मीडिया, निवडणूक आयोग, इलेक्टोरल बॉन्ड, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, विरोधी पक्षातील भ्रष्ट संस्थानिक यांच्या कुबड्या ज्याला घ्याव्या लागतात तो कृष्ण नव्हे, तो विष्णूचा अवतार नव्हे, तो आहे हिंदुत्व नासवणारा व देशाचे कृष्णविवर करणारा शकुनी. देशातील जनतेने लोकशाहीचा उजेड लख्ख राहावा, याचा पण केला आहेच; फक्त तो आज निष्पक्ष वातावरण नसल्याने अव्यक्त आहे, तो मतपेटीतूनच व्यक्त होईल.