मागच्या आठवड्यात काही कारणाने दूध शिल्लक राहिले. फार नाही तरी एखादं लिटर होतं. आता या राहिलेल्या दुधाचं काय करावं, असा विचार करताना जाणवलं की सध्याच्या हवेतल्या बदलानुरूप श्रीखंड केलं तरी चालेल. एवढे दिवस थंडी होती तर टाळत होतो नं हे प्रकार! मुख्य म्हणजे ओमला मनापासून आवडतंच की! झालं मग इतर कामांबरोबर त्या दुधाला विरजण लावले दह्याचे… आणि सुरू झाली श्रीखंडाची तयारी.
फार काही करावं लागत नाही तसं पाहिलं तर. चांगलं म्हशीचं दाट दूध घ्यावं, तापवलेलं दूध कोमट झालं की सायीसकट विरजण लावावं त्याला. हे विरजण लावणं म्हणजे दुधात नुसतं दही मिसळणं नसतं बरं का!! कोरड्या भांड्यात, माती किंवा चिनीमातीचं असेल तर उत्तमच, दूध असेल त्या प्रमाणात कमी जास्त, चांगलं लागलेलं पण ताजं दही भांड्याला आतून पूर्ण लावून घ्यायचं. मग त्या भांड्यात कोमट दूध हळुवारपणे ओतायचं. वरून पुन्हा दह्याचे विरजण घालून एका दिशेने तीन वेढे द्यायचे चमच्याने व नंतर ते भांडे धक्का लागणार नाही अश्या उबदार जागी ठेवायचे. साधारण पाच सहा तासात दही लागायला सुरुवात होते व नंतर तासा-दोन तासात ते छान बनलेले असते. सरसकट म्हणाल तर सकाळी विरजण लावले तर संध्याकाळी नक्कीच लागलेले असते दही. मग ते दही एका स्वच्छ मलमलच्या दुहेरी कापडात बांधून पाण्याचा निचरा होईल अश्या जागी टांगून ठेवायचे. रात्रभरातून पाणी निघून जाते व तयार होतो चक्का.
बाजारात तयार चक्का मिळत असला तरी घरच्या चक्क्याचा ताजेपणा व मुलायम पोत काही औरच!! दह्याच्या आंबटपणावर चक्क्याची चव अवलंबून असते, मात्र पाण्याच्या अंशाबरोबर आंबटपणाही जातोच. चक्क्याच्या सारख्या प्रमाणात, वाटीने किंवा वजनाने मोजून साखर मिसळून ठेवायची त्यात. साधारण एखाद्या तासात ती विरघळते पूर्ण. साखर व चक्का एवढे एकजीव होतात की कधीकाळी ते वेगवेगळे होते यावर विश्वास बसू नये!!
हे झालं मूळ श्रीखंड तयार. आता पुढे त्याला कसं सजवायचं, नटवायचं हा निराळा मुद्दा!! केशर व वेलदोड्याची पूड, बदाम पिस्त्यांची पखरण हे तर पारंपरिक सोबती श्रीखंडाचे, पण आंब्याचा, अननसाचा वगैरे रस घालूनही त्या त्या स्वादाचे श्रीखंड बनते. अगदी बदल म्हणून व्हॅनिला इसेन्स टाकलेले श्रीखंडही छान लागते. विदर्भात पाकातले पण करतात श्रीखंड. चक्का नेहमीसारखाच बनवून मग तो तेवढ्याच साखरेच्या पक्क्या पाकात मिसळायचा. हे श्रीखंड जास्त टिकतं व उष्ण हवेतही एकदम जास्त फसफसत नाही. बाजारात तयार मिळणार्या अतिगोड श्रीखंडापेक्षा घरचे शुद्ध व सात्विक श्रीखंड जिभेबरोबरच मनालाही समाधान देते हे नक्की!!
मूळ गोड असलेल्या दुधाला विरजल्यावर थोडा का होईना, आंबटपणा येतोच, मात्र प्रयत्नपूर्वक म्हणजे स्वत:ला थोडे टांगून घेण्याचे क्लेश देऊन दही तो आंबटपणा बाजूला सारते. आणि एकदा का साखर मिसळली की मग तर काय मस्त माधुर्य येतं सगळ्याच कणाकणांना त्या! मिळालेली व स्वत:च्या मूळ चवीकडे पुन्हा नेणारी ही गोडी एकदा लाभली की काही केल्या सोडत नाही हे श्रीखंड!! पाणी व आंबटपणा यासारखे निरूपयोगी घटक मागे सारत सत्वाला सांभाळत स्वत्वापर्यंतचा हा प्रवास खूप काही शिकवून जातो, नाही का?
असं म्हणतात की प्रत्येक जीव हा त्या शिवाचाच अंश आहे. लहान मुलांच्या लोभस निरागसतेमध्ये तो परमेश्वरी अंश जाणवतोही. मग येणार्या परिस्थितीनुसार व अनुभवांनुसार माणूस घडत जातो. आयुष्याचे टक्केटोणपे खाऊन बाह्यरूप तसेच वर्तणूक बदलते. अर्थात त्यात गैरही नाही काही. मात्र अनुभवांतून मिळवलेले शहाणपण जपणे जसे गरजेचे असते नं, तसेच मनाची तरलता जपणेही आवश्यक ठरते. कटूता, किल्मिषं सगळं त्या आंबटपणा व पाण्यासारखं बाजूला टाकता आलं तरच पुन्हा मूळ स्वरूपाकडे वळू शकतो आपण. मग आपल्या आयुष्यात साखरेचं स्थान कोणाचं बरं? सत्संगतीच, गुरूशक्तीचं त्या मधुर नामाचं आणि अर्थातच परमपित्या परमेश्वराचं!! एकदा का ह्या सगळ्याशी मनोमन अनुसंधान साधले व ते टिकवले की ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ या न्यायानुसार आपोआप असली नसलेली कुकर्मं मागे जातात. आपल्याच नव्या सकारात्मक व अनुसंधानित रूपाचे साधर्म्य त्या मूळ रूपाशी जास्त जाणवतं व तेच पुढचा मार्ग दाखवतं.
गिरीषचंद्र घोषांची गोष्ट आठवतेय इथे. ठाकुर श्री रामकृष्ण परमहंसांचे हे एक परमभक्त. बंगाली रंगभूमीवरचे त्यावेळचे सम्राट. नको नको ते सगळे नाद केलेला हा माणूस श्री ठाकुरांच्या परीसस्पर्शाने पूर्णत: बदलला. आयुष्याला दिशा मिळाली व सोनं झालं. गिरीषबाबू सांगतात, जे मन विषयवासनांनी बरबटलेलं होतं त्यातुनच प्रभुप्रेमाचा निर्मळ झरा पाझरू लागला. अखंड नामाची गोडी अशी लागली की बाकी गोष्टी नकळत मागे सरल्या. त्यांचं चरित्र वाचतांना नकळत त्या असीम कृपेपुढे नतमस्तक होतो आपण. तुम्हाआम्हालाही ही परिस्थितीनुरुप घडलेली कृत्यं, त्यातून निपजलेली कटुता किंवा नकारात्मकता मागे सारायचे बळ मिळो. आयुष्यात नामाची गोडी सर्वांना लाभो. एकदा मिळालेली ही सद्बुद्धी टिकवण्यासाठी अखंड अनुसंधान राहो व शेवटचा दिवस गोडच होवो. त्या मधुर श्रीखंडासारखाच!