मी आजवर एकाही गाढवाला गाढवपणा करताना पाहिलेलं नाही. मग त्याचं नाव गाढव असं कोणत्या गाढवाने ठेवलं असेल आणि का?
– अभय कामत, भांडुप
अशा गाढवासारख्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या गाढवाने दिलं असेल? (असा प्रश्न काही गाढवांना पडू शकेल. म्हणून मी याचे उत्तर देत नाही.) माणसांसमोर माणसांचे अनेक प्रश्न असताना, काही माणसांना गाढवांचे प्रश्न पडतात, तरी त्या माणसांना गाढव का म्हणत नाहीत?… सध्या या प्रश्नाचे उत्तर शोधतोय… ते सापडलं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलंच समजा.)
आयुष्यात संकटं, दु:खं, यातना नसत्या तर जगात किती माणसांना देवाची आठवण आली असती?
– सायमन रॉड्रिग्ज, नालासोपारा
संकटात, दुःखात किंवा यातना झाल्यावरच देवाची आठवण येते ही अंधश्रद्धा आहे… एक देव नाय पावला तर दुसर्या देवाला हात जोडणारे विसरून विसरून किती देवांना विसरतील? समजा लोक ३३ कोटी देवांना विसरलेच तरी… देवाला नवस करून काही ना काही तरी मागणारे, देवाच्या नावाने पोट भरणारे… देवाला नाकारून नास्तिक म्हणून मिरवणारे… देवाच्या नावाने राजकारण करणारे… देवाच्या नावाने दानधर्म करून काळा पैसा सफेद करणारे… देवाची इच्छा म्हणून देवाच्या नावाने बिल फाडणारे..अशी ‘देव माणसं’ नवीन ६६ कोटी देव निर्माण करतील. पण देवाला विसरू देणार नाहीत..
तुम्हाला पुन्हा लग्न करायची संधी मिळाली आणि जोरदार सोहळा करण्याइतके पैसे तुमच्याकडे असतील, तर त्या सोहळ्यात नाचण्यासाठी कोणत्या सेलिब्रिटींना बोलावाल?
– विनय पाचुंद्रे, जळगाव
कितीही पैसा आला, अगदी पुन्हा लग्न करण्याची संधी मिळाली तरी तुम्ही तरी पुन्हा लग्न कराल काय? (लग्नाचा लाडू एकदा खाऊन मन विटतं…) तरीही पुन्हा लग्न केलंच तर, ज्यांना फुकटात मोबाईलवर नाचताना बघतो, त्यांना करोडो रुपये देऊन कशाला नाचायला बोलावेन? त्याच पैशात मी पिक्चर बनवून, त्याचं प्रमोशन करून, तो पिक्चर लोकांच्या माथी मारून मीच सेलिब्रिटी बनेन आणि दुसर्या करोडपतींच्या मुलांच्या लग्नात सुपारी घेऊन नाचायला जाईन… (पैशाकडे पैसा असा ओढला जातो तो हे माहीत आहे मला… फक्त तुम्ही म्हणताय तशी संधी कधी मिळतेय, याची वाट बघतोय.)
येत्या बोर्डाच्या परीक्षेत इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल?
– श्रेयस जाधव, नाशिक
माझं काम सोडून विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल मार्गदर्शन करायला मी नेता-अभिनेता नाही (फक्त अभिनेता आहे.) शिवाय मी दहावी पास आहे. त्याचं (ओरिजिनल) सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल मार्गदर्शन करायला मी लायक नाही असं मला वाटतं.
माझे सगळे सगेसोयरे सरसकट माझ्या मुळावर उठले आहेत. मी काय करू?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड
तुमच्या मुळावर उठलेल्यांना फशी पाडणारे कोणीतरी ‘फसवणीस’ आहेत, अशी तोंड ‘पाटील’की करू नका. एसआयटी बीसायटीसारखी चौकशी बोकांडी बसली, तर तुमच्या बोलवत्या ‘नाथा’ची पाळमुळं बाहेर पडतील (अशावेळी सरसकट आपलीच लागते… वाट… कोणी सगेसोयरे मदतीला येत नाहीत… असं वाडवडील सांगतात तेच तुम्हाला सांगतोय.)
अशोकमामांना नुकताच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला. तुमची प्रतिक्रिया काय?
– सविता शेट्ये, कांजूरमार्ग
बरं झालं त्यांना एखादा रत्न पुरस्कार ‘दिला’ नाही. पुरस्काराचंही भूषण वाढवणार्या खर्या खुर्या ‘नटाने’ महाराष्ट्र भूषण पुरस्कार ‘मिळवला आहे, त्यांना ‘मिळाला’ नाहीये. त्याबद्दल अशोक सराफ ‘सरांचे’ अभिनंदन. (‘मामा’ म्हणत नाही, कारण उगाच एखाद्या ‘पुतण्याला’ राग यायचा.)
सध्या महाराष्ट्रात घडलेल्या घटना पाहता बिहारनेच महाराष्ट्राकडून काही शिकावे असे तुम्हाला वाटते का?
– वैजनाथ फणसे, माळशिरस
पण बिहारचा इतिहास शिकण्याचा नाही कॉपी करण्याचा आहे. सध्याच्या घटना बघता, शिकण्याचा इतिहास असणारा महाराष्ट्रच बिहारची कॉपी करतोय असं वाटतंय. आणि जो कॉपी करतो त्याला शिकण्यात इंटरेस्ट नसतो. इतिहासाकडून किंवा महापुरुषांकडून काहीही न शिकणारे, माझ्यासारख्याच्या वाटण्याला वाटाण्याच्या अक्षता लावतील… याबद्दल तुम्हाला काय वाटतं?