ग्रहस्थिती : गुरू, हर्षल मेष राशीमध्ये, शनि कुंभ राशीत, राहू, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, शुक्र धनु राशीत, रवि, मंगळ, बुध, धनु, प्लूटो मकर राशीमध्ये. विशेष दिवस : १७ फेब्रुवारी दुर्गाष्टमी, १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, २० फेब्रुवारी जया एकादशी, २१ फेब्रुवारी प्रदोष, २२ फेब्रुवारी गुरूपुष्यामृत योग.
मेष : कामातला उत्साह वाढेल. व्यावसायिकांच्या आर्थिक उलाढालीत वाढ होईल. नवीन आर्थिक पर्याय खुले होतील. तरूणांना यश मिळेल. नोकरीच्या शोधात असणार्यांना मनासारखी संधी मिळेल. नातेवाईकांची मदत होईल. मोठा भाऊ, बहीण यांच्याशी मतभेद घडू शकतात. कुटुंबाच्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्या. प्रत्येक काम सकारात्मकपणे पुढे न्या. भविष्यात फायदा होईल. घरात शुभवार्ता कानी पडतील. त्यांचा आनंद पेढे वाटून साजरा होईल. सामाजिक कार्यात दानधर्म होईल. कलाकार, लेखक, पत्रकारांसाठी उत्तम काळ आहे.
वृषभ : मनासारख्या घटना घडतील. अडकलेली कामे पुढे सरकतील. व्यावसायिकांच्या डोक्यात नव्या कल्पना येतील, त्यांना आकार देताना आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. नोकरीत सांभाळून राहा. वरिष्ठ नाराज होतील, मानसिक त्रास होईल. घरात छोटेखानी कार्यक्रम होईल. मौजमजेपासून दूर राहा. प्रकृती जपा. घरात सासूसुनांमध्ये भांडण होऊ शकते. कुटुंबाबरोबर रमा. मन आनंदी ठेवा. फायदा होईल.
मिथुन : घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तरूणांना करियरमध्ये नव्या संधी सापडतील. नियोजनपूर्वक त्या पुढे न्या. येणी वसूल होतील. कुटुंबियांबरोबर पर्यटनाला जाल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. सार्वजनिक जीवनात काळजीपूर्वक वागा, अन्यथा कायदेशीर कटकटी मागे लागतील. मित्रमंडळींमध्ये आपलेच म्हणणे खरे करू नका. नोकरी-व्यवसायात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. कुणाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट व्यवसायात आमदनी वाढेल.
कर्क : व्यावसायिकांना यशदायक काळ राहील. विदेशात विस्ताराच्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. जुना आजार डोके वर काढेल. त्यावर वेळीच उपचार करा. घरात, नोकरीत वाद टाळा. तरूणांना यशदायक काळ. नवीन गुंतणूक चांगला फायदा देईल. निर्णय घेताना घाई करू नका. खेळाडूंना स्पर्धेत यश मिळेल. सोशल मीडियाच्या प्रेमात पडू नका. फसगत होईल. संरक्षण क्षेत्रात काम करणार्यांच्या हातून उल्लेखनीय कामगिरी होईल.
सिंह : नोकरीत अच्छे दिन येतील. प्रमोशन, पगारवाढ होईल. बदलीचे काम मार्गी लागेल. व्यावसायिकांना नव्या ऑर्डर मिळतील. सरकारी काम मार्गी लावताना नियम तोडून पुढे जाऊ नका. प्रेमप्रकरणात वाद उद्भवू शकतात. विद्यार्थ्यांना शिक्षणातील अडचणी दूर होतील. बुद्धिकौशल्याच्या साह्याने मानसिक बळ वाढवावे लागेल. योगा, ध्यान यासाठी वेळ देणे फायदेशीर ठरेल. नातेवाईकांसाठी भरपूर वेळ खर्च कराल. पत्नीबरोबर जुळवून घ्या. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी.
कन्या : तरूणांना नव्या संधी देणारा काळ. कलाकारांच्या गुणांना चांगला वाव मिळेल. अभिनेते, गायक, संगीतकार, वादक, शिल्पकार यांचा सन्मान होईल. बांधकाम व्यावसायिक, ब्रोकर, वित्तीय सल्लागार, यांच्यासाठी चांगले दिवस. नातेवाईक, मित्रांबरोबर वागताना बोलताना काळजी घ्या, त्यामधून गैरसमज होतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. वाहन चालवताना घाई करू नका. कामाच्या ठिकाणी व्यक्त होणे टाळा. मानसिक स्वास्थ्य बिघडेल. महिलांचा उत्साह वाढेल.
तूळ : नशिबाची चांगली साथ मिळेल. पत्नीसाठी महागडी वस्तू खरेदी कराल. नोकरी, व्यवसायात सहजपणे यश मिळेल. घरात किरकोळ वाद घडतील. व्यावसायिकांना मोठे यश मिळेल. निर्णय घेताना घाई करू नका. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊनच पुढे जा, म्हणजे त्रास होणार नाही. गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. चांगली बातमी कानावर पडेल. संशोधक, प्राध्यापकांसाठी सर्वोत्तम काळ. सामाजिक क्षेत्रात सत्कार होईल. मित्रमंडळींबरोबर अति करू नका.
वृश्चिक : लेखक, प्रकाशक, कलाकारांना यश मिळेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. प्रमोशन होईल. सरकारी कामात शिस्त पाळा. दांपत्यजीवनात आनंददायक दिवस. काहीजणांना संमिश्र घटनांचा अनुभव येईल. मनोरंजनावर वेळ आणि पैसे खर्च होतील. नवीन नियोजनासाठी चांगला काळ. आर्थिक बाजू भक्कम राहील. सार्वजनिक जीवनात अहंकार टाळा. देवदर्शनाला जाल. दानधर्म होईल. अभियांत्रिकी व्यवसायात नव्या संधींमधून उत्तम अर्थार्जन होईल. फक्त सगळीकडे कमी बोला आणि अधिक काम करा.
धनु : तरूणांना मोठे यश मिळवून देणारा काळ आहे. महत्वाची कामे झटपट पूर्ण होतील. व्यावसायिकांना कामाच्या ठिकाणी त्रास होईल. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. सॉफ्टवेअर क्षेत्रात यश मिळेल. घरासाठी वेळ द्यावा लागेल. अडकलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. उधार-उसनवारी टाळा. घरात मालमत्तेच्या संदर्भातील चर्चेत आपले म्हणणे रेटू नका. लेखक, संगीतकारांना मानसन्मान मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
मकर : वास्तू खरेदीचे योग जुळून येतील. व्यावसायिकांची जुनी आर्थिक येणी वसूल होतील. घरात वागताना बोलताना काळजी घ्या. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील, पण त्यासाठी घाई करू नका. सोशल मीडियावर काळजी घ्या. सौंदर्य प्रसाधने, सजावटकार या मंडळींची आर्थिक चलती होईल. आयटी क्षेत्रात उलाढाल वाढू शकते. पण, उधळपट्टी टाळा. नोकरीत कामानिमित्ताने अचानकपणे बाहेरगावी जाऊ शकते.
कुंभ : कायद्याची चौकट मोडून काही करू नका, खूप त्रास होईल. भागीदारीत किरकोळ वाद घडतील. सुरूवातीपासून समंजसपणाची भूमिका घ्या. घरात छोटेखानी समारंभात नातेवाईक, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. नोकरीत कामाचा ताण वाढून आरोग्याचे गणित बिघडेल. रस्त्यात अरेरावी करू नका, पोलीस चौकीची पायरी चढावी लागेल. सहलीला जाल, तिथे कोणतेही साहस अंगाशी येईल. छंदातून आनंद मिळेल. सरकारी कामे पूर्ण करताना घाई नको.
मीन : घरातील व्यक्तीकडून वायफळ खर्च टाळा. व्यावसायिकांना दगदगीचा काळ. मानसिक शांती टिकवून ठेवा. मुलांसोबत अधिकच वेळ व्यतीत कराल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल, त्यामुळे सकारात्मक ऊर्जेत वाढ होईल. नव्या ओळखीतून चांगले लाभ होतील. महिलांना आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरतील. खानपानात विशेष काळजी घ्या, त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. व्यावसायिक मंडळी कल्पनाशक्तीच्या जोरावर यश मिळवतील.