वेगवेगळ्या धाटणीची नाटकं रंगमंचावर सादर करणं ही मराठी रंगभूमीची खासियत आहे. हीच परंपरा पुढे चालवत ‘अस्मय थिएटर्स’ ही नाट्यसंस्था ‘मास्टर माईंड’ हे रहस्यमय नाटक रंगभूमीवर घेऊन येत आहे. प्रकाश बोर्डवेकर लिखित या नाटकाची रंगावृत्ती सुरेश जयराम यांनी केली आहे. विजय केंकरे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक म्हणून केंकरे यांचे हे १०६वे नाटक आहे, ते म्हणाले, नावाप्रमाणेच हे नाटक रहस्यप्रधान आहे, पण हे खून झालाय आणि तो कुणी केलाय याचा मागोवा घेणारं हे नाटक नाही, तर या नाटकातील दोन पात्रे एका परिस्थितीत आहेत. आणि मास्टर माईंड त्या दोघातलाच कुणी आहे की बाहेरची व्यक्ती; या दोन व्यक्ती इंनोसंट आहेत का, हे या नाटकातील रहस्य आहे. या नाटकातील पात्रांची निवड कशी केली या प्रश्नावर ते म्हणाले, मला दोन माणसं अशी हवी होती कोणतीही छाप नसलेली असतील. ती पाण्यासारखी कोणत्याही भूमिकेत फिरत होतील. यातील कलाकार या नाटकाचा नेपथ्य देखील एका पात्राची भूमिका बजावतं. प्रेक्षक कथानकात जर गुंतला तर तो पुढे काय होईल, याचे आडाखे बांधत जातो. ओटोटी माध्यमामुळे थ्रिलर जॉनरची गोडी प्रेक्षकांना लागली आहे. ‘हँड्सअप’, ‘डबल गेम’, ‘कुणी तरी आहे तिथे’, ‘परफेक्ट मर्डर’ला पाच वर्ष झाली, तरी हे नाटक सुरू आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. शेवट काय आहे हे कळून देखील हे नाटक पाहायला प्रेक्षक येतात. म्हणूनच मी देखील पुन्हा या प्रकाराकडे पुन्हा वळलो. वर्तमानपत्रात नाटकांच्या जाहिरातीचे पान उघडलं की सगळीकडे फक्त विजय केंकरे हे नाव दिसतं असं कसं? यावर केंकरे नम्रतेने म्हणाले, मी वर्षाला दोन किंवा तीनच नाटके दिग्दर्शित करतो, पण माझी नाटके अनेक वर्षे चालतात. त्यामुळे जाहिरातीत दिसणार्या अनेक नाटकात माझं नाव दिसतं. तसेच अनेक नाट्यदिग्दर्शकांनी सिनेमा/ टेलिव्हिजन मालिका असं माध्यमांतर केलं. मी आणि संतोष पवार, चंद्रकांत कुलकर्णी असे दोन तीन दिग्दर्शकच रंगभूमीवर सातत्यानं काम करताना दिसतो. म्हणून अनेक लेखक आणि निर्माते माझ्याकडे नाटक घेऊन येत असावेत.
या नाटकात आस्ताद काळे व अदिती सारंगधर प्रमुख भूमिका साकारत आहेत. ही जोडी ‘प्रपोजल’ आणि ‘चर्चा तर होणारच’ यानंतर तिसर्यांदा नाटकात एकत्र दिसणार आहे. या नाटकातील भूमिकेबद्दल अदिती सारंगधर म्हणाल्या, मला स्वत:ला नाटक करायला आवडतं. यामुळे स्वत:ला पैलू पडण्याची संधी मिळते. या नाटकातील माझी भूमिका खूप साधी आहे, पण रहस्यप्रधान नाटकात हा साधेपणा सादर करणं कठीण आहे. कारण खूप साधी दिसणारी व्यक्ती प्रेक्षकांना खोटी वाटू शकते. ही कठीण भूमिका साकारताना आमचे दिग्दर्शक आम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने भूमिकेचा शोध घेण्याचं स्वातंत्र्य देतात आणि मार्गदर्शन करतात. म्हणूनच मी म्हणते की आमच्या नाटकाचे खरे मास्टर माईंड आमचे दिग्दर्शक विजय केंकरे आहेत.
आस्ताद काळे म्हणाले, ‘मास्टर माईंड’ या नाटकाची संहिता मला मिळाली तेव्हा नाटक करायला मिळतंय आणि तेही मुख्य भूमिका असलेलं याचा मला आनंद झाला. हे नाटक एक सायकॉलॉजिकल थ्रिलर असल्यामुळे मी नाटकाच्या गोष्टीबद्दल किंवा माझ्या भूमिकेबद्दल फार काही सांगू शकणार नाही, पण नाटक पाहताना प्रेक्षक त्यात गुंतून राहतील याची मी खात्री देतो. अदितीचा सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा स्वभाव मला भावतो. ती सहकलाकार म्हणून उत्तम आहेच, पण माणसाला माणूस म्हणून वागवणारी आहे. या नाटकात दोनच पात्र आहेत की तीन? ते कोण असेल, हे तुम्हाला नाटक पाहताना कळेल, अशी गुगली आस्ताद यांनी शेवटी जाता जाता टाकली.
प्रेक्षक जे रंगमंचावर घडताना पाहतोय त्या पाठीमागील खरं कारण काय आहे हे उलगडू न देणं हे खूप मोठं आव्हान सस्पेन्स थ्रिलर प्रकारात असतं. थरार, शोध, संशय, उत्कंठा, भास की आभास या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून हे नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवतं का हे पाहणं औस्तुक्याचं ठरेल. या नाटकाची प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून, प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य केले आहे. अशोक पत्की यांचे संगीत या नाटकाला लाभले आहे. वेशभूषेची जबाबदारी मंगल केंकरे यांनी सांभाळली आहे. अजय विचारे हे या नाटकाचे निर्माते आहेत; तर अभय भावे व शरद रावराणे हे या नाटकाचे सहनिर्माते आहेत. श्रीकांत तटकरे या नाटकाचे सूत्रधार आहेत. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.