□ अब्दुल सत्तारांची गुंडागर्दी, शिव्या हासडल्या; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ.
■ दिवा विझायला आला की ज्योत मोठी होते म्हणतात… मवालीपणाचंही तसंच असावं!
□ हिटलरच्या गोबेल्स नीतीप्रमाणे भाजप काम करतेय – शरद पवार.
■ असाही फासिस्टांशी त्यांच्या विचारधारेचा ‘पुराना नाता’ आहेच पवार साहेब!
□ राममंदिर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीमागे भाजप कनेक्शन.
■ मुसलमानांवर कशा ना कशाचा आळ आणल्याशिवाय निवडणूक जिंकायला आवश्यक ध्रुवीकरण होणार कसं?
□ गुजरातला प्रकल्प पाठवलेत त्याचे प्रायश्चित्त घ्या; ट्रान्स हार्बर लिंकवर टोल लावू नका – आदित्य ठाकरे.
■ असं सगळ्या गोष्टींचं प्रायश्चित्त घ्यायला निघाले, तर सगळी मालमत्ता दान करून नेसत्या कपड्यांनिशी हिमालयातच जायला हवेत हे कायमचे… संन्यास घेऊन!
□ महानंदची ३२ एकर जागा गुजरात लॉबीच्या घशात घालण्याचा डाव – संजय राऊत यांचा घणाघाती आरोप.
■ आपल्याच कार्यकाळात हे महाराष्ट्राची अस्मिता विकण्याचं महान कार्य झालं होतं, हे अभिमानाने सांगणारे कोकणचे कुपुत्र इथे सुखाने राहतायत, हे केवढं मोठं दुर्दैव!
□ मिंधे गटाच्या खासदार भावना गवळी यांना इन्कम टॅक्सची नोटीस.
■ ताईंना रक्षाबंधनाने तारलं नाही?
□ माझ्या अटकेसाठी भाजपचा ईडीवर दबाव – अरविंद केजरीवाल.
■ नाहीतर ईडी आहे कशासाठी?
□ अंगणवाडी सेविकांचा राज्य सरकारला अल्टिमेटम; आठवड्यात लेखी आश्वासन द्या, नाहीतर पुन्हा राज्यभर आंदोलन.
■ मुळात गरिबांच्या मुलांनी शिकायचंय कशाला? सगळेच शिकले तर समाजातली हलकी सलकी कामं करणार कोण? काय करायच्यात अंगणवाडी सेविका?… हे यामागचं गलिच्छ गुपित आहे.
□ वरळीत नौदल तळाजवळ गगनचुंबी इमारती; परवानगी कुणी दिली माहीत नाही.
■ कोणाच्या इमारती आहेत ते शोधा, मग परवानगी घ्यायची गरज आहे का त्यांना, ते कळून जाईल.
□ कोर्ट म्हणजे गंमत वाटली का? विशेष सत्र न्यायालयाने राणा दांपत्याला फटकारले.
■ त्यांना राजकारण आणि आयुष्य हीच गंमत वाटते, कोर्ट म्हणजे घसरगुंडी, झोपाळा किंवा जंगल जिम वाटत असेल!
□ कोरोना रुग्णांत वाढ; महाराष्ट्रात पुन्हा क्वारंटाईनची शक्यता
■ आता सत्तेत उद्धवजी नाहीत… गेल्या कोरोनाकाळातल्या गुजरात आणि उत्तर प्रदेशासारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. तुमचं आयुष्य तुमच्या हाती!
□ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मुंबई-गोवा हायवेचा धसका; रायगडातील कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने येणार.
■ या सगळ्यांना विमानबंदी केली पाहिजे, रस्त्याने फिरणंच कंपल्सरी केलं पाहिजे. त्याशिवाय लोकांचे हाल थांबणार नाहीत.
□ खोपोलीत रस्तोरस्ती कचर्याचे ढीग; पालिकेची स्वच्छता फक्त पोस्टरवर.
■ यांनीही सेल्फी पॉइंट्स बनवायला हरकत नाही कचर्यांच्या ढिगांचे.
□ मिरा-भाईंदरमधील बेकायदा बांधकामांची चौकशी होणार; सचिन बच्छाव यांचे कारनामे उघड होणार.
■ चौकशी करून काय करणार? नियमितच करणार ना?
□ मणिपूर जळत असताना पंतप्रधान मजा मारत आहेत; मोदींच्या लक्षद्वीप दौर्यावरून काँग्रेसचा हल्लाबोल.
■ काहीही काय, १८-१८ तास काम करतात ते. सतत डोक्यात हिताचे विचार… कोणाच्या ते विचारू नका… देशाच्या नक्कीच नाहीत!
□ जनक्षोभ उसळला; प. बंगालमध्ये ईडीच्या पथकावर जमावाचा जोरदार हल्ला.
■ ये तो सिर्फ झाँकी है, सीबीआय अभी बाकी है…
□ सत्तेचा माज; भाजप आमदाराने भर कार्यक्रमात पोलिसाच्या कानशिलात लगावली.
■ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची हिंमत तर दाखवली आहे… तपास किती करतात ते पाहायचं…
□ रोहित पवारांच्या ‘बारामती अॅग्रो’वर ईडीचे छापे.
■ काकांप्रमाणे वाकले असते तर ही वेळ आली नसती… पण असेच ताठ कण्याने वावरतील, तर काकांच्या किती तरी पट पुढे जातील.
□ मिंधे सरकारची दडपशाही; महाड, माणगावात मध्यरात्री शिवसैनिकांची धरपकड.
■ गद्दारांना कायम भीती वाटते ना सत्याची, निष्ठेची!
□ सरकारी मदतीची अपेक्षा सोडा – नाट्यसंमेलनात प्रशांत दामले यांचा कलाकारांना सल्ला.
■ ज्या नाट्यसंमेलनाच्या सगळ्या हेडलाइन राजकारण्यांच्याच भाषणांच्या येत आहेत, त्याच्या अध्यक्षांनी हे सांगणं मजेशीर आहे… आधी नाट्यसंमेलनं स्वबळावर भरवा आणि राजकारण्यांना समोरच्या रांगेत सामान्य प्रेक्षक म्हणून बसवा.
□ रेसकोर्सच्या मोकळ्या जागेवर एक वीटही रचू देणार नाही – आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला इशारा.
■ ते तयार भिंती आणून लावतील हो आदित्यजी! केवढे मोठे व्यवहार दडलेले असतात या सगळ्यात.
□ सिद्धीविनायक मंदिराबाहेरील अंध स्टॉलधारकावर पालिकेची सूडबुद्धीने कारवाई.
■ नवसाला पावणारा जागृत देव यावर काय करतो आहे?