पुढं पुढं माझ्या कथेची लांबी वाढू लागली. ‘मार्मिक’च्या छोट्या चोवीस पानांच्या अंकात माझ्या कथेसाठी चार-पाच पानं देणं कठीण होऊन बसलं. गमतीनं एकदा खांबेटेसर म्हणाले, ‘तुमची कथा मनूच्या माशाप्रमाणे मोठी होत चालली आहे. आता तुम्ही साप्ताहिकाऐवजी मासिकांकडे कथा पाठवीत जा. पुढं मग मी ‘मोहिनी’, ‘आवाज’चा लेखक झालो… पण एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून आजतागायत मी ‘मार्मिक’च्या वर्षारंभ आणि दिवाळी अंकासाठी लिहितोच. पंढरीनाथ सावंत, वसंत सोपारकर या मित्रांच्या प्रेमासाठी आणि ‘मार्मिक’नं लेखनाची सुरुवात करून दिली त्या ऋणाची आठवण ठेवून.
‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाचा जन्म साठ सालातला. नेमकी तारीख तेरा ऑगस्ट. अख्ख्या महाराष्ट्राला खदखदा हसवणार्या आचार्य अत्रे यांच्या वाढदिवशी ‘मार्मिक’नं ‘ट्यँहा ट्यँहा’ केलं आणि हसण्या-हसवण्याची परंपरा यापुढेही अविरत चालत राहणार असल्याची जणू नांदीच झाली. राजकीय/ सामाजिक विषयांवर बाळासाहेब आणि श्रीकांतजी यांच्या कुंचल्यातून उतरलेली महामिमिक्री आणि टोकदार व्यंगचित्रे आणि त्यासोबत चटकदार खुसखुशीत शैलीत लिहिलेले छोटेखानी लेख हे ‘मार्मिक’चं आगळं वेगळं रूप आणि स्वरूप मराठी माणसाला भावलं आणि अल्पावधीत ज्याच्या त्याच्या हातात ‘मार्मिक’चा ताजा अंक दिसू लागला.
एवढं सगळं अजूनदेखील ‘मार्मिक’च्या अस्तित्वासंबंधीची माझ्या रायगडाला जाग आली ती दीडएक वर्षाचा कालावधी उलटून गेल्यावरच. त्याचे एक कारण म्हणजे त्या काळातलं, महाराष्ट्राबाहेरचं माझं वास्तव्य आणि पोरसवदा वय. बासष्ट सालातल्या फेब्रुवारी महिन्यात कॉलेजला ‘बुट्टी’ मारून मी घरातल्या ज्येष्ठांसोबत, एका खास कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने मुंबापुरीला आलो. दोन-तीन दिवसांचाच मुक्काम होता. पण या छोट्या मुक्कामात माझ्या पुढील आयुष्यालाच उभारी देणारी एक घटना घडली. ती म्हणजे मुलुंड रेल्वे स्थानकाच्या फलाटावरच्या वृत्तपत्रांच्या स्टॉलवर मला घडलेलं ‘मार्मिक’च्या अंकाचं दर्शन. जवळ जवळ ५८ वर्षांचा दीर्घ काळ उलटून गेलाय. पण आजही मला पक्कं आठवतंय की, तो ‘मार्मिक’चा शिमगा-विशेषांक होता. शिमगा आणि राजकारण यांचा घनिष्ट संबंधच जणू अंकातील व्यंगचित्रांचा प्रमुख विषय होता. त्या काळातल्या विविध राजकीय पक्षांच्या पुढार्यांची चांगलीच खिल्ली उडवलेली पाहायला मिळाली होती आणि व्यंगचित्रांच्या सोबतीला होत्या नावाजलेल्या विनोदी कथा लेखकांच्या छोटेखानी मिश्किल कथा. या कथांचा दीड-दोन पानांचा छोटा आकार माझ्यासारख्या ‘पांढर्यावर काळे’ करण्यास धडपडणार्या नवोदितावर प्रभाव टाकण्यास पुरेसा होता. कारण त्या काळात कुवतीनुसार लिहिलेले माझे लेख जेमतेम दीडएक पानांनंतर पुढे जायलाच तयार नसायचे…
मुंबईहून माझ्या गावी (हुबळी) परतल्यानंतरच्या ‘मार्मिक’ अंकाच्या उपलब्धतेच्या दिशेनं चालवलेल्या माझ्या शोधचौकशीत असे निष्पन्न झाले की, गाववाले न्यूजपेपर एजंट गोखले मास्तर यांच्याकडे दर शनिवारी ‘मार्मिक’च्या ताज्या अंकाचं पुडकं दाखल होतं. बस्स. त्यानंतर माझं ठरूनच गेलं की, शनिवारचा दिवस उजाडला रे उजाडला की, गोखले मास्तरांच्या दुकानाच्या लाकडी पायर्या (तीन चारच तर होत्या!) चढून त्यांच्यासमोर पंचवीस पैशाचं नाणं ठेवायचं आणि अंक उचलायचा. सकाळी उतरून उभं राहून तिथल्या तिथं अंकाची पानं उलटत राहायची. माझा ‘मार्मिक’संबंधीचा हा उत्साह पाहून एकदा गोखले मास्तरांनी अंकाचं पुडकंच माझ्या हवाली केलं आणि म्हणाले, ‘तूच फोड हे पुडकं!’ थोडक्यात, त्या काळात ‘मार्मिक-एके-मार्मिक’ हाच पाढा माझ्या डोक्यात ‘फिट’ बसला होता!
अंकातील व्यंगचित्रांच्या तिरकस रेषा आणि खुसखुशीत लेख वाचता वाचता मलाही स्फूर्तीचे झटके येऊ लागले आणि तीन-चार महिन्यांतच माझा लेख ‘मार्मिक’च्या दादर येथील निवासस्थान कम कार्यालयाच्या पत्त्यावर पोहोचवण्याची जबाबदारी दोन्हीकडच्या पोस्टमास्तरांच्या रुंद खांद्यावर पडली आणि त्यांनी ती आनंदानं आणि नेहमीच्या उत्साहानं पार पाडली…
आणि अहो आश्चर्यच! तीन एक आठवड्यांच्या अवधीत माझा लेख १२ ऑगस्ट १९६२ च्या अंकातील पृष्ठ क्रमांक १७ आणि १८ वर प्रसिद्ध झालेला दिसला! तो लेख मी स्वत:तर कितीतरी वेळा वाचून पाहिला, इतरांना वाचायला दिला. काहींनी तर ‘काय ही कटकट’ छाप कुचेष्टा करीत वाचला. तर बर्याच जणांनी वाचल्याचं नाटक करून तो मला परत दिला.
आजही तो लेख लॅमिनेशनच्या सहाय्याने जसाच्या तसा माझ्या अभ्यासिकेच्या भिंतीवर लावलेला पाहायला मिळेल! त्यानंतर ‘मार्मिक’कडं लेख पाठवण्याचा मी धडाकाच सुरू केला. अर्थात गणित आणि संख्याशास्त्राचा किचकट अभ्यास सांभाळूनच. दरम्यान एक उत्साहवर्धक घटना घडली. ‘मार्मिक’च्या मजकुरांची संपूर्ण जबाबदारी संभाळणारे चतुरस्त्र लेखक द. पां. खांबेटे यांच मला पत्र आलं. ‘तुमचे लेख मला आवडतात. लेखांप्रमाणेच विनोदी कथाही तुम्ही लिहाव्यात असं मला वाटतं. मुंबईत कधी आलात तर भेटून जा.’ या मजकुरांचं ते पत्र म्हणजे माझ्यासारख्याला टॉनिकच होतं… याच सुमारास पदवीधराचं बिरुद कपाळावर रंगवून, नोकरीच्या शोधात मी मुंबईत दाखल झालो आणि आल्याआल्या पहिल्याप्रथम, आधीच स्थायिक झालेल्या माझ्या धाकट्या बंधूसोबत दादर (प.) स्टेशनसमोरच्या विजयनगर कॉलनीच्या सर्वात वरच्या मजल्यावर राहणार्या द. पां. खांबेटे यांच्या निवासस्थानाच्या दारासमोर धडकलो. त्या पहिल्या भेटीत त्यांनी कथा रचनेचं तंत्र थोडक्यात समजावलं आणि सगळं समजल्यागत मी मानही डोलावली… त्या भेटीच्या अखेरीस ‘बाळासाहेबांना भेटण्याची इच्छाही मी सांगितली. खांबेटे म्हणाले, ‘‘तुम्ही रविवारी पाच वाजल्यानंतर या. मीदेखील तिथं असेन.’’ पण तब्बल चार एक दिवसांची वाट पाहणं माझ्या जिवावरच आले. विजयनगरच्या पायर्या उतरून आम्ही दोघे रस्त्यावर आलो आणि तेथूनच थेट रानडे रोडच्या दिशेन निघालो. कार्यालयात न जाता थोडे पुढं चालत गेलो आणि पाहतो तो काय? खुद्द बाळासाहेब आणि त्यावेळचे व्यवस्थापक यशवंतजी देशपांडे समोरूनच येताना दिसले. सुरुवातीला आपण त्यांच्या गावचेच नाही असं भासवत आम्ही दोघं त्यांच्या मागून चालू लागलो आणि शेवटी न राहवून चक्क दोन पावलं पुढ जाऊन त्यांच्या पुढ्यातच उभे राहिलो. माझं नाव ऐकताच बाळासाहेबांच्या तोंडून उद्गार निघाले, ‘अच्छा, तुम्हीच का ते? यू लुक सो यंग…!’ (मी अवघ्या वीस-एकवीस वर्षांचा तर होतो. त्यामुळे यंगच तर होतो!) पण तेवढ्यावरच ती भेट आटोपली. बाळासाहेब म्हणाले, ‘आताच आमच्या सुहृदांना पोचवून आलोय! घरी जाऊन पहिल्यांदा आंघोळ करायची आहे. तुम्ही असं करा. रविवारी या…’
रविवारी सकाळी दहा-साडेदहाला कार्यालयात भेट झाली. त्या भेटीत ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचे प्रबोधनकार म्हणजेच दादासाहेब ठाकरे आणि श्रीकांतजी यांचंही दर्शन घडलं आणि सौ. वहिनींच्या हातचा ‘कोको’ही प्यायला मिळाला.
त्यानंतर लेख नेऊन देण्याच्या निमित्ताने खांबेटे यांच्या निवासस्थानी जात-येत राहिलो. पुढं पुढं तर त्यांचाच झालो. त्यांच्या घरी कितीतरी मोठमोठ्या व्यक्ती यायच्या. चरित्रकार धनंजय कीर, कथा-कादंबरीकार जयवंत दळवी, वीर सावरकरांचे अंगरक्षकपद भूषविणारे अप्पा कासार आणि माझ्यासारखे नुकतेच लिहायला लागलेले सर्वश्री नरेंद्र बल्लाळ, अनिल नाडकर्णी…
पुढं पुढं माझ्या कथेची लांबी वाढू लागली. ‘मार्मिक’च्या छोट्या चोवीस पानांच्या अंकात माझ्या कथेसाठी चार-पाच पानं देणं कठीण होऊन बसलं. गमतीनं एकदा खांबेटेसर म्हणाले, ‘तुमची कथा मनूच्या माशाप्रमाणे मोठी होत चालली आहे. आता तुम्ही साप्ताहिकाऐवजी मासिकांकडे कथा पाठवीत जा. पुढं मग मी ‘मोहिनी’, ‘आवाज’चा लेखक झालो…
पण एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून आजतागायत मी ‘मार्मिक’च्या वर्षारंभ आणि दिवाळी अंकासाठी लिहितोच. पंढरीनाथ सावंत, वसंत सोपारकर या मित्रांच्या प्रेमासाठी आणि ‘मार्मिक’नं लेखनाची सुरुवात करून दिली त्या ऋणाची आठवण ठेवून.
६२-६५ काळातल्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘मार्मिक’बद्दलच्या त्यातल्या व्यंगचित्रांतल्या आठवणीत त्या वेळचे ‘वस्त्रे अशी अब्रू घेतात’ हे हास्यचित्राचे सदर आजही आठवते. मूळ कल्पना बाळासाहेबांचे जवळचे मित्र आणि विनोदी कथा- एकांकिका लेखक पद्माकर डावरे यांची, येवले येथील प्रभाकर झळके यांच्या व्यंगचित्र रेखाटनाची सुरवात तर याच सदरापासून सुरू झाल्याचं खुद्द त्यांनीच लिहिल्याचं आठवतं. ‘मार्मिक’नं महाराष्ट्राला कितीतरी हास्यचित्रकार दिलेत. याबाबतचा ‘पुरावा’ १९८३ साली पार्ले येथे आयोजित केलेल्या ‘विनोदी साहित्य संमेलना’च्या दुसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मिळाला होता. त्या सत्रात हास्य चित्रकारांना रसिक, श्रोतृवर्गासमोर उभं राहून हास्यचित्र रेखाटायची संधी प्राप्त झाली होती. स्वत:चं रेखाटन सुरू करण्याआधी जवळ जवळ ९० टक्के हास्यचित्रकारांनी आपल्याला ‘मार्मिक’ आणि पर्यायाने बाळासाहेब यांनीच स्फूर्ती दिल्याचं मान्य केलं होतं.
आज दिवाळी अंकाच्या निमित्ताने अनेकांची हास्यचित्रं पाहण्याचा निखळ आनंद मिळतो आहे. पण एक खंत व्यक्त करावीशी वाटतेय. बर्याच जणांना बाळासाहेबांची चित्रं पाहूनच हास्यचित्रकार व्हावंसं वाटलं, पण त्यातल्या किती जणांनी राजकीय व्यंगचित्रे रेखाटण्यास घेतली? अलीकडेच निधन पावलेले विकास सबनीस यांचा अपवाद वगळता या आघाडीवर एरवी सामसूमच दिसते. खरं पाहू जाता बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेल्या कितीतरी दर्जेदार आणि मार्गदर्शक राजकीय व्यंगचित्रांचा संग्र ‘वाघनखे’ या नावानं या क्षेत्रात कामगिरी करू पाहणार्यांसाठी मार्गदर्शक ठरावा असाच आहे… भविष्यात असा कुणी राजकीय व्यंगचित्रकार उदयास यावा आणि त्यानं बाळासाहेब, आर. के. लक्ष्मण आदींचा वारसा पुढे चालवावा अशी अपेक्षा करणं अयोग्य ठरेल काय?
शेवटी, जवळजवळ साठएक वर्षांच्या माझ्या नर्मविनोदी शैलीतल्या लेखन प्रवासात पहिल्या वहिल्या कौतुकाची शाबासकी ‘मार्मिक’ आणि सर्व संबंधितांकडून देण्यात आलीय हे मला विसरता कसं बरे येईल? त्या वेळी चार्ज झालेली लेखन बॅटरी आजही सुस्थितीत चाललेली आहे… इत्यलम्.