सरत्या वर्षाला निरोप देताना व्यंगचित्रकारांकडे काही ठरलेले पर्याय असतात. सरते वर्ष म्हातारे असते आणि नवे वर्ष म्हणजे लहान मुलगा आहे, अशी एक रचना लोकप्रिय आहे जागतिक स्तरावर. बाळासाहेबांनीही ‘मार्मिक’च्या अनेक मुखपृष्ठांवर सरते वर्ष मृत्युशय्येवर आहे आणि लहान बाळाच्या रूपात नवे वर्ष रांगत येते आहे, असं चित्रण आहे. इथे १९६३च्या या व्यंगचित्रात मात्र त्यांनी एकदम वेगळीच आणि हृद्य मांडणी केली आहे. दरवर्षी काही महनीय व्यक्तींचं निधन होतं, सगळ्यांना चटका लागतो त्याचा. अशा आपल्याला सोडून गेलेल्या माणसांची यादी वर्षअखेरीला अनेक वर्तमानपत्रे प्रसिद्ध करतात. बाळासाहेबांच्या कुंचल्याने त्यांना चित्रांकित केलं आहे. ज्यांचे फोटो तेव्हा उपलब्धच नसतील, त्यांच्या छायारूपी आकृती त्यांनी चित्रित केलेल्या आहेत. त्यांचा खास टच सगळ्यात खाली दिसतो… तिथे पृथ्वी रडत रडत मृत्यूला म्हणते आहे, तुला एवढी कसली खा खा सुटली आहे? बाळासाहेबांच्या कुंचल्याने बहुतेक वेळा विनोद आणि वीररसाचं दर्शन घडवलं होतं. त्यांच्यातल्या सहृदय माणसातल्या करूणेचं हे चित्रण दुर्मीळ आणि लोभस आहे.