(उत्तररात्री नई कौमी मजलिसच्या बाहेर गस्तीवरले तीन पहारेकरी शेकोटी पेटवून बसलेले. त्यात एक दरोगा दोन शिपाई. त्यांच्यामागे तीन प्रकारचे कागद पडलेले. बाकी चहूबाजूला दूरपर्यंत शुकशुकाट.)
शिपाई १ : आज रातच्याला थंडी फार पडलीय ना?
शिपाई २ : ही नवी कौमी मजलीस बांधल्यापासून जरा कमी आहे, नाहीतर वाकडीच पडायची म्हण ना?
शिपाई १ : हे काय नवीन?
शिपाई २ : एक प्रकारची थंडीच ती! पण भयाण भयंकर थंडी म्हणजे वाकडी! ती पडली का माणूसबी वाकडाच चालणार!
शिपाई १ : ही तर लई नवी माहिती दिली तू!!!
शिपाई २ : सत्तर वर्षं पाह्यलेला माणूस आहे मी! उगाच का? फार वाईट दिवस होते ते!
शिपाई १ : मग त्यावेळी गस्त कसे घालायचे?
शिपाई २ : इथं जीव मुठीत घेऊन पब्लिक जगायची! रातच्याला बाहेर पडतंय कोण?
शिपाई १ : मग हे गस्त घालण्याचं काम कधीपासून सुरू झालं?
दरोगा : (कानातला मळ निघाल्याची खात्री करत) चौदहवीं को हिन्दोस्ताँ आज़ाद हुआ। उसके बाद ब्यादश्या नौरंगजेबने शेकोटी खोज निकाली! उसके बाद से ये काम स्टार्ट हुआ…
शिपाई २ : मतलब शेकोटी न होत तो मय्यत होत सबकी, असं समज!
दरोगा : गलत। चहापन्हा नौरंगजेब के सिवा जीना दुश्वार था, हम सबका।
शिपाई १ : (कौमी मजलिसच्या दिशेने हात जोडत लोटांगण घालतो.) ह्या परम कृपाळू चहेन्चहा नौरंगजेबांच्या नावे सजदाह घालावा वाटतो! इतकं कसं कुणी रयतेसाठी करतं? (बोलता बोलता त्याचा आवाज घोगरा होतो. डोळे पाणावतात. एकाएकी कसल्यातरी वासाने त्याच नाक गचावतं, तो त्याच आडव्या स्थितीत नाक वर करून वासाचा माग काढू बघतो.) क्या है ये?
दरोगा : (थंडपणे) अमन के अलामत की महक…
शिपाई १ : (उठून बसतो.) म्हणजे?
शिपाई २ : येड्या, शांतीच्या प्रतिकाचा खरपूस वास म्हणतात त्याला!
शिपाई १ : काहीच कळलं नाही!
शिपाई २ : (मोठ्याने हसतो.) कबुतरं भुजतोय मी! खायची का तुला?
शिपाई १ : (किंचाळतो) काय? (शेकोटीवर भाजत असलेली कबुतरं बघत) ही कधी मारली? कधी आणली? आणि ही शांतीची प्रतीकं कौमी मजलिस समोर भाजून राहिलात? कुणी बघितलं तर?
दरोगा : (थंडपणे) मैंने लाई हैं। यहाँ ठंड बहोत पडती हैं। और इस मौसम में कुछ अच्छा और चटपटा चाहिए था इसलिए…
शिपाई २ : आणि त्यात बोंबलण्यासारखं काही नाहीय! स्वत: चहापन्हा नौरंगजेब शिकारीचा शौक राखून आहेत. ते खास जम्मू आणि कांगला सुभ्यातून वा अमनवाले किसीभी गलीमोहल्लेसे जातिवंत कबुतरं मागवतात. आणि उपाशी ठेऊन झोपेत त्यांची शिकार करतात…
दरोगा : और कुछ खास यार-दोस्तोंको दावत पर बुलाते हैं! वो भी क़ौमी मजलिस में…
शिपाई १ : (धक्क्यातून सावरत) पण मजलिससारख्या `पवित्र’ जागेवर असा खून-खराबा…??
शिपाई २ : (आवाज चढवत) येड्या, वांगेसठीला भरीत करून नवं फेडत्या ना? तसलंच असतंय ते! याचंबी कांदा घालून भरीत भारी व्हतं!
दरोगा : क्या चहापन्हा नौरंगजेब पाक नहीं हैं? (जवळपास त्याच्या अंगावर जात) क्या उन्होंने खुदको जमुरियत से बढ़कर बताया है कभी?
शिपाई १ : (कपाळावरचा घाम आडव्या हाताने पुसत) नही, तसं नाही!
शिपाई २ : समजा तसंही असलं तरी तू काय करणारेस?
दरोगा : दरअसल उनकी मेहरबानीसे ये जमुरियत का तमाशा अब भी चल रहा है। लोग इकट्ठा आते हैं। उनका हरेक फैसला, हरेक काम पाक होता है।
शिपाई २ : (भाजलेलं कबुतर देऊ करत) घेतोस का? डबा आणला नसशीलच ना?
शिपाई १ : (हात झटकत) नको, नको! मला नाही आवडत ते! (शिपाई २ आणि दरोगा मोठ्याने हसतात, शिपाई २ ते भाजलेलं कबुतर दरोग्याला देतो. तो एक मोठ्या तरवारीने त्याचे तुकडे करू लागतो.) हळू ओ! आवाजाने कुणी उठंल ना?
दरोगा : (तुकडे करता करता) यहाँ कोई डरपोक नहीं हैं। आवाज से उठनेवाले। ये बहादुर ब्यादश्या नौरंगजेब का मुल्क हैं। उन्हें पता है, `आएगा तो नौरंगजेबही!’ चाहे लूटना हो या…
शिपाई १ : मग आपण पहार्याला का बसलोय?
शिपाई २ : (भाजलेल्या कबुतराला मीठ-मिर्ची लावत) येड्या हे तुला कळतं तर तू काझी होता ना? बघ, तो काझी चाँदइस्माईल मुफ्ती सगळ्या सेटलमेंट परस्पर करतोय. कधी म्हणून तक्रार नाही!
शिपाई १ : हा चाँद कोण?
शिपाई २ : (विषय बदलत) तो पलीकडला गठ्ठा घे! जाळ कमी झालाय!
शिपाई १ : (तिसर्या गंजावरून एक गठ्ठा उचलत) हे सगळे कागद जाळण्यासाठी आणलेत तर वेगळे का ठेवलेत?
दरोगा : (लुसलुशीत कबुतर खात) वो अलग अलग महकमेंसे लाए हैं! जो अड़चन पैदा करेंगे वो कागज़ात जला देने के वास्ते बोला गया हैं! और ये पुरानी नोटोंकी गड्डियां भी हैं, उसमें! (बोटाने एक ढीग दाखवतो. शिपाई २ कागदाचा गठ्ठा शिपाई १ च्या हातून घेऊन जाळू लागतो.)
शिपाई १ : अडचण करणारे म्हणजे? कुठला कागद भ्रष्टाचार उघड करून दाखवत असेल तर तो जाळायचा का?
शिपाई २ : (पटकन सावरून घेत, उरलेलं कबुतर संपवत) अरे, अडचण करत असेल म्हणजे उगा अडगळीत पडून उंदीर-घुशींना आमंत्रण देत असेल अशी कागदं जाळायचं मागेच ठरवलेलं ना? त्यातली कागदं ही! (आणखी कागदं शेकोटीत टाकतो.)
शिपाई १ : (मागून काही सावल्या हलताना पाहून, मोठ्याने) ओ, ते बघा! कुणीतरी पळतंय तिकडं! (मात्र शिपाई २ आणि दरोगापैकी कुणीही तिकडं बघत नाहीत.)
शिपाई २ : अरे कुणीतरी बाहेर आलं असेल आतून!
शिपाई १ : काही काय? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, कुणीतरी…
दरोगा : (निर्विकारपणे लेगपीस संपवत) शीशमहल की कांच देखकर तुम्हें लगा होगा शायद…
शिपाई १ : शीशमहल? कुठंय?
शिपाई २ : पुढल्या टर्मला ब्यादश्या सलामत बांधतील की!
शिपाई १ : (भीतीयुक्त शंकेनं) पण ते मध्ये घुसलेले… त्यांनी काही केलं तर?
दरोगा : (हात झटकत) कुछ नहीं कर सकता कोई। शेरदिल भुलतान नौरंगजेब जैसा बहादुर होते हुए किसकी हिंमत होगी हमला करनेकी?
शिपाई १ : (काहीतरी आठवतं) `भुलवाना’ हल्ला ब्यादश्या सलामत नौरंगजेब तख्तावर आल्यानंतरच झालेला ना?
शिपाई २ : त्यानंतर मोठ्याने `भॉ’ करून वायव्य सरहद्दीवर नाच केला होता की? त्या धास्तीने आजवर कुणी भिववलं नाही पुन्हा!
शिपाई १ : काय सांगता? मग वायव्येला `भॉ’ केलं तसं उत्तरेला बघून मोठ्याने `श्शी’ का करत नाहीत? झिपिंग पळेल की! राहुट्या सोडून!
दरोगा : (कबुतराचा दुसरा तुकडा उचलत) उसे तू यूँ भगा देंगे, चहापन्हा! बस उन्हें एकबार रोना आ जाय। ब्यादश्या सलामत जब बिलबिलाते हुए रोते हैं न? तो भोत गंदे दिखाई देते हैं। उनका मुँह देखकर ही ओ भागेगा शायद।
शिपाई १ : (काही सुचल्यागत) पण तो जम्हूरियतचा तमाशा सुरू केलाय, त्यात पराभूत शाह्यांचे सरदार बोलावून का घेतात ते नेहमी?
दरोगा : मुगल सल्तनत के ब्यादश्या अलग अलग शौक के लिए जाने जाते हैं। वैसा शेरदिल ब्यादश्या का ये वाला शौक है।
शिपाई १ : हा पण त्यांना जे उत्तर सीमेवर `बिलबिलाते रोना’ गरजेचं असतं, ते ह्या जम्हूरियतच्या तमाशात रडावं लागतं! तेही चार एक महिन्यांनी!
शिपाई २ : वेड्या, हे पण जमावं लागतं! ये इत्ती बड़ी सल्तनत का ब्यादश्या जम्हूरियत का तमाशा रखता है, पब्लिक लाइव ये मैटर देखती है। कुछ पुरानी हुकूमत के बंदे सवाल के नामपर अकेले चहापन्हावर चालून येतात नि मग ब्यादश्या रडतात. तो पब्लिक तो इमोशनल होती है ना? उससे उन्हें मास सपोर्ट मिलता है!
शिपाई १ : मग त्या पुरानी हुकूमतच्या लोकांना मधूनच कौमी मजलिसबाहेर का काढतात? सीधे हवालात में बंद कर देना चाहिए ना उन्हें?
दरोगा : आखिर ये भी तो एक तमाशाही है! कब खेलना है, कब नाचना है। सब ब्यादश्या खुद तय करते हैं!
शिपाई १ : (काही सुचल्यागत) पण त्या सावल्या आत जाताना दिसल्या, त्या बघून येऊ का?
शिपाई २ : (त्याचा हात पकडत) बस काही गरज नाही! कुणी उघडा असेल तर ब्यादश्याला भेटून नागडा होईल आणि नागडा असेल तर चामडी उतरवून घेईल! ये नई क़ौमी मजलिस है! यहां `गारंटी’ के साथ लुटा जाता हैं।
शिपाई १ : पण ह्या तमाशात पुढं काय होईल?
शिपाई २ : `आई मला घरावर उळं भाजू दे!’चा नवा अंक!!!