ग्रहस्थिती : गुरु, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, बुध वृश्चिक राशीत, प्लुटो मकरेत, शनि कुंभेत, नेपच्युन मीन राशीमध्ये, रवि, मंगळ, केतू तूळ राशीत, शुक्र कन्या राशीत, हर्षल मेष राशीमध्ये. विशेष दिवस : ९ डिसेंबर भागवत एकादशी, १० डिसेंबर प्रदोष, १२ डिसेंबर दर्श अमावस्या, आरंभ सकाळी ६.२० वा. १३ डिसेंबर समाप्ती पहाटे ५.०१ वा. १३ डिसेंबर देवदिवाळी.
मेष : कुटुंबाबरोबर वादविवाद टाळा गुरुकृपेचा चांगला अनुभव येऊ शकतो. भाग्यकारक घटना घडतील. अचानक आर्थिक आवक वाढू शकते. आरोग्याच्या लहान प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका. नव्या वास्तूसंदर्भात पुढे जाण्यास हरकत नाही. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना यश मिळवून देणारा काळ आहे. कलाकारांना नव्या संधी मिळतील. अभियांत्रिकी क्षेत्रात नवे अनुभव येतील. व्यावसायिकांनी आर्थिक बाजू सांभाळताना काळजी घ्यावी. नोकरीत उगाच ‘अरे ला का रे’ नको.
वृषभ : तरुणांना घवघवीत यश मिळेल. नावलौकिकात भर पडेल. सामाजिक क्षेत्रात चांगला अनुभव येईल. कुटुंबाबरोबर देवधर्मासाठी वेळ खर्च होईल. मानसिक समाधान मिळेल. मुलाकडून आनंददायी बातमी समजेल. ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे. व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते, त्यामुळे वेळेचे गणित बिघडू शकते. पत्रकार, लेखक मंडळींचा मानसन्मान होऊ शकतो.
मिथुन : नव्या व्यक्तीचे परिचय होतील, त्यातून व्यवसायाची नवी कल्पना आकाराला येईल. आर्थिक फायदा होईल. नोकरीत चांगला अनुभव येईल. कामानिमित्ताने विदेशात जाण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना चांगला लाभ मिळेल. नोकरीत काळजीपूर्वक पावले टाका, विचार करून निर्णय घ्या. सरकारी काम अडकून राहिले असेल तर ते मार्गी लागेल. सार्वजनिक जीवनात आचारसंहिता पाळा. नसत्या कटकटी मागे लावून घेऊ नका. खाण्यापिण्याचा अतिरेक नको.
कर्क : खर्च वाढल्याने चिडचिड होऊ शकते. पत्नीची चांगली साथ मिळेल. अडकून राहिलेले काम मार्गी लागेल. तरुणांना यशदायक काळ आहे. व्यावसायिकांना कामगारवर्गाकडून त्रास होऊ शकतो. नोकरीत प्रयत्न वाढवा. नव्या गुंतवणुकीसाठी काळ उत्तम. मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या. घाईत काम करणे टाळा. उच्चशिक्षणासाठी विदेशात प्रयत्नांना यश मिळेल. घरी वातावरण आनंदी राहील. पर्यटनासाठी जाताना सावधगिरी बाळगा. महिलांबरोबर वागताना काळजी घ्या.
सिंह : मालमत्तेसंदर्भात विचार करून निर्णय घ्या. घरातील ज्येष्ठांना मान द्या, म्हणजे प्रश्न अलगद सुटतील. देवदर्शनानिमित्ताने दूरचा प्रवास घडेल. प्रवासात काळजी घ्या. नोकरीत धावपळ करावी लागू शकते, त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. बढती, बदलीचे योग आहेत. काही घटनांमुळे मन विचलित झाले तरी ध्यानधारणा, योगा यात मन रमवा. व्यावसायिकांनी स्पष्टवक्तेपणा टाळावा. मन विचलित करणारे प्रसंग घडले तरी गुरूकृपेमुळे सहीसलामत बाहेर पडाल.
कन्या : व्यावसायिकांची चांगली आर्थिक कमाई होईल. नव्या कल्पना डोक्यात येतील. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या पथ्याकडे लक्ष द्या. नोकरीत कुरबुरींकडे लक्ष देऊ नका. मुलांकडून चांगली बातमी कानावर पडेल, घरातील वातावरण आनंदी राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. थकीत येणे वसूल होईल. मनासारख्या घटना घडतील. काहीजणांना शेअर, लॉटरीतून धनलाभ मिळेल. सार्वजनिक ठिकाणी वाद महागात पडेल.
तूळ : सुखद घटना घडल्याने घरातील वातावरण आनंददायक राहील. मुलांकडून नेत्रदीपक कामगिरी घडेल. प्रेमप्रकरणात मिठाचा खडा पडू शकतो. तरुणांचे अडलेले प्रश्न मार्गी लागतील. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. कामाचा कंटाळा येईल. मौजमजेवर पैसे खर्च होतील. महागड्या वस्तूची खरेदी होईल. नोकरीत मोजकेच बोला. वरिष्ठांपुढे फक्त ‘हो’ला ‘हो’ करण्याची भूमिका घ्या. प्रतिक्रिया देणे टाळा. व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. घरातले, बाहेरचे कोणतेही काम करताना मन शांत ठेवा, ध्यानधारणा करा.
वृश्चिक : मित्रमंडळी, नातेवाईकांबरोबर नाते बिघडू देऊ नका. नोकरीत वरिष्ठांचा रोष ओढवून घेऊ नका. सार्वजनिक ठिकाणी वागताना-बोलताना नमते घ्या. व्यावसायिकांनी कोणत्याही कागदपत्रावर सही करताना काळजी घ्यावी. मोठ्या व्यक्तीच्या ओळखीतून भविष्यात मोठा लाभ मिळेल. शिक्षक, संशोधकांच्या कानावर चांगली बातमी पडेल. धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. नोकरी शोधणार्यांना संधी चालून येईल. व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ मिळतील.
धनु : अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे झटपट मार्गी लागतील, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन काम करण्यासाठीचे बळ वाढेल. तरुणांना नवा मार्ग सापडेल. व्यावसायिकांची प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील, फक्त निर्णय घेताना घाई नको. शेअर, लॉटरीमधून काहीजणांना लाभ मिळेल, पण, त्याच्या आहारी जाणे टाळा. नोकरदारांचा उत्कर्ष घडवून आणणारा काळ राहील. काहींना बढती मिळेल. वरिष्ठ कामावर खूष होतील. रियल इस्टेट व्यवसायात लाभदायक काळ आहे. उधार उसनवारी नकोच.
मकर : उद्योजकांना अपेक्षित यश मिळेल. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. मित्रमंडळींबरोबर चेष्टामस्करी नको. नोकरीत सबुरीने घ्या. डोक्यावर बर्फ ठेवा, म्हणजे काम मार्गी लागेल. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा. स्पर्धेला तोंड द्यावे लागू शकते. घरातील मंडळींबरोबर देवदर्शनासाठी जाल. दानधर्म कराल. धारदार वस्तू हाताळताना काळजी घ्या. प्रवासात खिसापाकीट सांभाळा.
कुंभ : कोणताही मोठा आर्थिक निर्णय थोड्या काळासाठी पुढे ढकला. आर्थिक बाजू भक्कम राहील. मौजचैन टाळा. व्यावसायिकांना नव्या संधी चालून येतील. फक्त घाईने निर्णय नको. शेअर, लॉटरीमधून काहीजणांना लाभ मिळेल. त्याच्या आहारी जाणे टाळा. नोकरदारांना बढती मिळेल. वरिष्ठ कामावर खूष होतील. रियल इस्टेटमध्ये लाभदायक काळ आहे. कलाकार, संगीतकार, खेळाडूंसाठी चांगला काळ आहे. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मीन : व्यावसायिकांना प्रश्न कौशल्याने सोडवावे लागतील. घरात मंगलकार्य घडेल. नोकरदारांना चांगला अनुभव देणारा काळ. वरिष्ठ कामावर खूष होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. नवीन वाहन घेण्याच्या विचारांना गती मिळेल. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. कोणताही निर्णय घेताना त्यात घाई करू नका. सामाजिक कार्यासाठी भरपूर वेळ खर्च होईल. विदेशात काही प्रकल्प सुरु करण्याचा विचार असेल तर त्याला गती मिळताना दिसेल.