आज आपण आपल्या आसपासचं समाजकारण आणि राजकारण अत्यंत गढूळ झालेलं बघतोय. ते वातावरण नीट करून महाराष्ट्र पुन्हा एकदा सुदृढ उभा करायचा तर प्रबोधनकारांचे विचार समजून घ्यावेच लागतील. त्यामुळे ते आज शंभर वर्षानंतर जास्त समयोचित ठरत आहेत.
– – –
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हा क्रांतिकारी विचारांचा धगधगता वणवा आहे. आजही त्याचं तेज महाराष्ट्र अनुभवतो आहे. या २० नोव्हेंबरला प्रबोधनकारांना हे जग सोडून बरोबर पन्नास वर्षं झाली. कालचे विचार आज शिळे होण्याच्या आताच्या काळात प्रबोधनकार मात्र पन्नास वर्षं ताजे आहेत. किंबहुना आता त्यांचे विचार जास्तच महत्त्वाचे ठरत आहेत. शंभर वर्षांपूर्वी प्रबोधनकारांनी लिहून ठेवलेले विचार आजचं वर्तमान समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आज महाराष्ट्र सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात भयंकर अवनतीचा साक्षीदार बनून हताश उभा आहे. एक समाज म्हणून आपली वाटचाल आधुनिकतेकडे सुरू असल्याचा समज खोटा ठरावा, अशा गोष्टी आसपास घडत आहेत. समाजात पडलेल्या परस्पर अविश्वासाच्या गाठी जास्तच घट्ट होत चालल्या आहेत.
या गाठी सोडवायला तर हव्यात. त्यासाठी या गाठी बांधल्या गेल्या तेव्हाचा काळ समजून घ्यायला हवा. प्रबोधनकारांचं, विशेषतः प्रबोधनमधलं लिखाण आपल्याला याचेच संदर्भ उपलब्ध करून देतं. आजही महाराष्ट्राला त्रास देणार्या गाठी बांधणारे कोण होते, त्यांची मानसिकता काय होती, याचा समग्र आंखो देखा हाल प्रबोधनकारांनी आपल्यासमोर मांडला आहे. त्या दृष्टीने प्रबोधनच्या शंभर वर्षांच्या निमित्ताने सुरू झालेलं हे सदर गेली तीन वर्षं प्रबोधनकारांच्या कर्तृत्वाची आणि विचारांची थोरवी मांडण्याचा प्रयत्न करतंय. यंदाच्या दिवाळीनंतर आपण आता या सदराचं नवं आवर्तन घेऊन येत आहोत.
आतापर्यंत या सदरात आपण प्रबोधनकारांचा संघर्षाची कहाणी बघितली. ती पनवेलपासून सुरू होते ते कधी कल्याण, कधी बारामती, कधी जळगाव, तर कधी थेट मध्य प्रदेशातल्या देवासपर्यंत पोचते. नाटक, पत्रकारिता, व्याख्यानं आणि पोटापाण्याच्या उद्योगांसाठीही महाराष्ट्रभर फिरून प्रबोधनकारांचा प्रवास लग्नानंतर १९१०ला दादरला येऊन स्थिरावला. पहिल्या महायुद्धाच्या काळात नाईलाजाने स्वीकारलेल्या सरकारी नोकरीने त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच स्थैर्य मिळवून दिलं. त्याच दरम्यान ते सामाजिक कार्यातही सक्रिय झाले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी विविध ब्राह्मणेतर समाजांची बदनामी केल्यानंतर प्रबोधनकारांनी त्याला मुंहतोड म्हणतात तसं उत्तर दिलं. तिथून त्यांचं आयुष्य बदलून गेलं. अन्यायग्रस्त बहुजन समाजाला दिशा देण्यासाठी त्यांनी कंबर कसली. इतिहासाचा नवा दृष्टिकोन मांडणारे अत्यंत अभ्यासपूर्ण असे ग्रंथही लिहिले.
याच दरम्यान त्यांना छत्रपती शाहू महाराजांचं मार्गदर्शन लाभलं. त्यातूनच सरकारी नोकरी सोडून प्रबोधन सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १६ ऑक्टोबर १९२१ला सुरू झालेल्या प्रबोधनने पहिल्या दोन वर्षांतच स्वत:चा ठसा उमटवला. प्रबोधनकारांच्या रोखठोक विचारांनी खळबळ तर माजवलीच, पण मराठी पत्रकारितेची दिशा बदलण्यात मोठं योगदान दिलं. प्रबोधनची पहिली दोन वर्षं स्वाध्यायाश्रमाच्या चळवळीचीही होती. त्यातून हुंडाविरोधाचं आंदोलन उभं राहिलं. पण स्वतःच्या मालकीचा छापखाना नसल्यामुळे प्रबोधनच्या वाढीत मर्यादा येत होत्या. प्रबोधनकार त्यासाठी प्रयत्नही करत होते. पण प्रत्येक वेळेस हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जात होता. त्यामुळे त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रस्तावानुसार सातार्यात जाऊन प्रबोधनचा छापखाना उभा करण्याची जोखीम घेतली. धनजीशेठ कूपर हे उद्योगपती यांनी त्यासाठी आर्थिक मदत करायला पुढे सरसावले. प्रबोधनकारांचा दादर सोडून सातार्यात जाण्यापर्यंतचा चरित्राचा भाग आपण पाहिला आहे.
प्रबोधनकारांचं चरित्र हे प्रामुख्याने त्यांच्या पत्रकारितेचा इतिहास आहे. प्रबोधनच्या १ मे १९२३च्या अंकात या काळापर्यंतचा त्यांच्या पत्रकारितेचा इतिहास अचानक वाचायला मिळतो. आज सदराच्या नव्या टप्प्यात हा आढावा नोंदवणं, महत्त्वाचं वाटतं. त्याचं असं झालं होतं, प्रबोधनकारांच्या नेतृत्वात चालणार्या स्वाध्यायाश्रमातून गोविंदाग्रज मंडळ सुरू झालं होतं. कवी गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी. नाटककार, कवी, विनोदी लेखक म्हणून गडकरींनी दिलेल्या अजरामर साहित्याने महाराष्ट्राला वेड लावलं होतं. पण वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांची आठवण म्हणून हे मंडळ काम करत होतं. त्यांनी काव्यवाचन, व्याख्यानं असे काही कार्यक्रमही आयोजित केले. शिवाय कवितांची काही पुस्तकंही काढली. त्यानंतर त्यांनी प्रबोधनकारांच्या पुस्तक म्हणून अप्रकाशित असणार्या काही लेखांचं `स्वाध्याय संदेश’ नावाचं पुस्तक छापलं.
हे पुस्तक वाचकप्रिय झालं होतं. त्यामुळे त्यावर `केसरी’च्या १३ मार्च १९२३च्या अंकात यावर परीक्षण आलं होतं. या परीक्षणातल्या मुद्द्यांचा समाचार घेणारं संपादकांच्या नावे लिहिलेलं वाचकांचं पत्र बडोद्यावरून प्रसिद्ध होणार्या `जागृती’ या साप्ताहिकाच्या २४ मार्चच्या अंकात आलं होतं. भगवंतराव पाळेकर हे संपादक असणारं ‘जागृती’ हे मराठी पत्रकारितेच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं नियतकालिक आहे. सत्यशोधकी विचारांचं हे साप्ताहिक जवळपास ३२ वर्षं सातत्याने संतुलित विचारांची मांडणी करत राहिलं. त्यात रामशंकर यांनी लिहिलेलं हे पत्रवजा टिपण प्रबोधनने १ मे १९२३च्या अंकात `केसरीकारांचे तर्कशास्त्र’ या मथळ्याने पुन्हा प्रसिद्ध केलंय. त्यात रामशंकर लिहितात, `शिवरायांस आठवावे’ हा निबंध आणि `हिंदवी स्वराज्याचा खून’ हे शेवटचे व्याख्यान वाचून केसरीला ब्रह्मांड आठवले नसते तर ते मोठे आश्चर्य झाले असते खास… केसरी कंपूचे स्वराज्य म्हणजे `ब्राह्मण भोजनातल्या खरकट्या पत्रावळी’ अशी स्पष्ट व्याख्या एक ना हजार वेळा ठाकरे यांनी बोलून लिहून दाखविल्यावर ते स्वराज्य जनतेच्याच उरावर बसणार, ही साधी अनुभविक गोष्ट सिद्ध करायला तर्कशास्त्र कशाला?’ यात उल्लेख असलेलं `हिंदवी स्वराज्याचं खून’ हे व्याख्यान छत्रपती प्रतापसिंह यांना स्वराज्य सिंहासनावरून पायउतार करण्याच्या कटकारस्थांना उघड करणारं आहे. तर `शिवरायांस आठवावे’ या लेखात त्या काळाच्या संदर्भात शिवरायांच्या स्वराज्याची महती सांगताना बहुजनांनी भिक्षुकशाही उपद्व्यापांना बळी पडू नये असा असा इशाराही दिला आहे.
प्रबोधनकारांनी राम गणेश गडकरींच्या शैलीचं अंधानुकरण केल्याचा आरोप कसा खोडसाळ आहे, हे रामशंकर यांच्या पत्राच्या उत्तरार्धात सांगितलं आहे. गडकरी प्रसिद्ध होण्याच्या आधीपासून प्रबोधनकार लिहित आहेत, हे सांगताना रामशंकर यांनी प्रबोधनकारांच्या पत्रकारितेचा इतिहासच मांडला आहे. त्यानुसार १८९८मध्ये म्हणजे प्रबोधनकारांच्या १८व्या वर्षी त्यांचा पहिला लेख `वर्तमानपत्रांची व छत्र्यांची उत्पत्ती’ हा ह. ना. आपटे यांच्या `करमणूक’ या लोकप्रिय साप्ताहिकात प्रसिद्ध झाला होता. त्याचं हरिभाऊ आपटे यांनी कौतुक करून लिहिण्यासाठी उत्तेजन दिलं होतं. १९०० साली राणी व्हिक्टोरियाचं निधन तसंच मुंबईतल्या वेगवेगळ्या चळवळींविषयी प्रबोधनकारांनी दामोदर सावळाराम यंदे शेट यांच्या प्रसिद्ध `इंदुप्रकाश’ आणि `सयाजी विजय’ या नियतकालिकांत प्रबोधनकारांचे लेख प्रसिद्ध झाले. १९०७ ते १९०९ यादरम्यान `इंदुप्रकाश’मध्येच प्रबोधनकारांनी छोटे लेख, मनोरंजक माहितीपर गोष्टी आणि छोट्या कादंबर्याही लिहिल्या. `कामगार समाचार’ या नियतकालिकात त्यांची सुदर्शन या टोपणनावाने लिहिलेली `अगाध किती विधिकरणी’ ही क्रमशः प्रसिद्ध झालेली कादंबरी खूपच लोकप्रिय झाली होती. सुदर्शन या नावानेच प्रबोधनकारांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या नाटकांची बाजू घेऊन केलेला वादही या दरम्यान गाजला होता.
हा सगळा इतिहास मांडून रामशंकर सांगतात, `सन १९०४ ते १९०९ सालापर्यंत गडकर्यांचे नावसुद्धा कोणाला माहीत नव्हते. इतकेच नव्हे तर गडकरी कैलासवासी होईपर्यंत त्यांच्या उत्कृष्ट वाङ्मयाचा परिचय केसरीला तरी झाला होता का नाही, देव जाणे! सन १९०९ साली चित्पावन वाद निघाला होता व त्यावेळी ठाकरे यांनी अस्तन्या सारून `केसरी’ला दिलेली ठोकर सावरता सावरता `केसरी’ कसा बेजार झाला आणि `इंदुप्रकाश’मधून सुटणारे तीव्र बाण आंवरता आंवरता श्री. पाध्यांची कशी तिरपीट उडाली, हा इतिहास प्रत्यक्ष डोळ्यांसमोर असता ठाकर्यांवर भाषाशैलीत गडकर्यांच्या अंधानुकरणाचे खापर फोडून `केसरी’ने नामानिराळे होणे, हा मतिमंदतेचा पुरावा आहे.’ याच लेखात प्रबोधनकारांच्या लिखाणावर केरळकोकिळकार कृष्णाजी आठल्येंचा प्रभाव असल्याचा दावाही प्रबोधनकारांच्या विधानांचा आधार घेत केला आहे.
`साप्ताहिक जागृती’च्या एका वाचकाने लिहिलेला हा मजकूर विश्वासार्ह मानवा की नाही, असा प्रश्न उभा राहतो खरा. पण त्या शंकेचं निरसन स्वतः प्रबोधनकारांनी या टिपणाच्या खाली टिप लिहून केलं आहे. त्यात ते त्यांच्या रोखठोक शैलीत लिहितात, `श्री. रामशंकर यांनी प्रसिद्ध केलेला मजकूर कितीही खरा असला, तरी त्यांनी या कामी बरीच घाई केली, असे आमचे मत आहे. असल्या गोष्टी ठाकर्यांच्या मृत्यूनंतरच प्रसिद्ध होणे अधिक शोभले असते. – संपादक, प्रबोधन.’