मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करण्याची स्पर्धाच लागली आहे. जेव्हा भाजपची सत्ता नव्हती तेव्हाही ही संघीय मंडळी अप्रत्यक्षपणे गांधींचा अपमान करीत असत, पण दबक्या आवाजात… आपापसात कुजबूज मोहीम करीत असत. गांधींपेक्षा नथुराम मोठा, असा त्यांचा रोख असे. पण उघडपणे गांधीजींचा अपमान करण्याची हिंमत दाखवत नसत. आता त्यांची हिंमत चेपली आहे. सत्तेची ही किमया आहे. आम्हाला कोण काय करणार असे अनेक गर्वेंद्र प्रकट होऊ लागले आहेत. आता आम्ही उच्चारवाने बोलू अशी त्यांची दर्पोक्ती आहे.
‘व्हॉट्सअप’ विद्यापीठांतून त्यांना पदविका, पदव्या मिळत आहेत. त्याचबरोबर चित्रपटाद्वारे, व्याख्यानांद्वारे, परिसंवादांद्वारे ही संघीय मंडळी व त्यांचे दलाल गांधींबद्दल बरळत आहेत. गांधींविषयी आदर असणारे गांधीवादी, लेखक, पुढारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक रस्त्यावर उतरणार नाहीत अशी या संघीयांची खात्रीच असल्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे गांधींना राष्ट्रपिता म्हणायचे आणि त्यांची अवहेलना, अपमान रोखायचा नाही अशी डबल इंजीन सरकारची नीती असल्यामुळे अशा द्वेषजीवींना चेव आला आहे. त्यांची हिंमत वाढली आहे.
महात्मा गांधीजींचा आदर राखण्याची जबाबदारी केंद्र सरकार व राज्य सरकार यांची आहे. तत्वज्ञानविषयक मतभेद असूनही आदर राखण्याची उच्च कोटीतील लोकशाहीवाद्यांची परंपरा हा देश पाळत आला आहे. पण आता भाजपचा नवा भारत घडत आहे. नवी संस्कृती उदयास येत आहे. ही संस्कृती की विकृती? देशद्रोही ठरवणारी नवी संस्कृती स्थिरावताना दिसत आहे. विरोधकांना नमविण्यासाठी, जेरीस आणण्यासाठी वेगवेगळी आयुधे वापरली जाताना दिसतात. प्रश्न आहे- आपली लोकशाही धोक्याच्या वळणावर आहे का?
गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत ही संघीय मंडळी, उच्चवर्णीय टवाळखोर मंडळी आक्रमक झाली आहेत. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण सुरू झाले आहे. नथुरामाचे मंदिर, पुतळे, स्मृतिदिन या सगळ्याचा धुमधडाका सुरू झाला आहे. नथुरामचा उल्लेख हुतात्मा, पंडित, देशभक्त म्हणून करू लागले आहेत. हिंदू महासभेच्या नेत्या पूजा पांडे यांनी कार्यालयात कार्यकर्त्यांना बोलावून गांधींच्या छायाचित्रावर गोळीबार केला. गांधींच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. नथुरामचा जयजयकार करण्यात धन्यता मानली. आता ही मंडळी उघडपणे गांधीजींचा द्वेष करू लागली आहेत. नथुरामचा फाशीदिन हा हुतात्मा दिवस म्हणून साजरा करू लागले आहेत. भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंग नथुरामाचे उदात्तीकरण करण्याच्या क्रियेत अग्रेसर आहेत.
२०२४च्या लोकसभेत भाजपचे सरकार आले तर नथुरामचे छायाचित्र लोकसभेत लावा असा आग्रह ही मंडळी नक्कीच धरणार! त्यांच्यासाठी सेंट्रल व्हिस्टा ही नवी संसद इमारत उपलब्ध आहेच. भाजपचे नेते, खासदार व केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे नथुरामचा उल्लेख भारतमातेचा सुपुत्र असा करतात. नथुराम भारतमातेचा सुपुत्र मग गांधी कोण? दोन स्वयंसेविकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणार्या गांधीजींचे चारित्र्यहनन हा संघीयांचा कुचेष्टेचा आवडता विषय. या मंडळींना चर्चेचे वावडे. पण कुचेष्टा आवडीने करावयाची. म. गांधी व पं. नेहरूंचे चारित्र्यहनन करताना त्यांना खूप स्फूर्ती येते.
गांधींवर असा हल्ला करताना त्यांचे विचार संपविण्यासाठी पद्धतशीर पावले उचलली जात आहेत. गांधींसमोर नेहमीच सामान्य माणूस राहिला आहे. आर्थिक, सामाजिक धोरणाचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस असावा ही गांधींची विचारधारा व कृती. उलट अदानी, अंबानी, बिर्ला, महिंद्रा असे जे मोठे उद्योजक देशामध्ये आहेत, त्यांची गेल्या नऊ वर्षात भरभराट झाली. सामान्य माणसाला जीवन जगणेही अशक्य झाले आहे. भाजप सरकारने गांधीजींच्या आर्थिक, सामाजिक विचाराला पूर्णपणे नाकारले आहे. गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत गरीब, श्रीमंत, अतीश्रीमंत यांच्यातील दरी कमालीची वाढली आहे. गांधींनी ‘माणूस’ जागा केला. उलट संघीय कोणाला जगवीत आहेत? जागवित आहेत?
आजच्या संदर्भात गांधींच्या विचाराचा वसा आणि वारसा कोणता हे आपण जाणीवपूर्वक पाहिले पाहिजे. विचारांचा वारसा प्रतिमापूजनापुरताच मर्यादित ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न संघीय करीत आहेत. देशाच्या दृष्टीने हे खूप घातक असल्यामुळे भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखण्यात देशाचे हित आहे. आता सारेच ‘म. गांधी की जय’ अशा घोषणा देत आहेत. गरीब व श्रीमंत दोन्ही गटांत प्रतिमांचे पूजन होत आहे. विचारांचे दफन होत आहे. प्रतिमा पुजावी, परंतु तेथेच थांबू नये.