ग्रहस्थिती : गुरु, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, रवि बुध सिंह राशीत, शुक्र कर्क राशीत, मंगळ, बुध सिंहेत, प्लुटो मकर राशीत, केतू तूळ राशीत, शनि कुंभ राशीत, नेपच्युन मीन राशीत, मंगळ कन्या राशीत. विशेष दिवस : २२ सप्टेंबर गौरीपूजन, २३ सप्टेंबर गौरी विसर्जन आणि दुर्गाष्टमी, २५ सप्टेंबर परिवर्तिनी स्मार्त एकादशी, २६ सप्टेंबर भागवत एकादशी, २७ सप्टेंबर प्रदोष, २८ सप्टेंबर अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद.
मेष : घरातील वातावरण चांगले राहील. नातेवाईक, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. तरुणांना शुभ फळे देणारा काळ. मनासारख्या घटना घडतील. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात पुढे जाण्यास हरकत नाही. आर्थिक नियोजनात हयगय करू नका. उद्योजकांना सतावणार्या अडचणी मार्गी लागतील. विद्यार्थ्यांच्या हातून चांगले काम होईल, सन्मान होईल. नोकरीत उत्साहवर्धक वातावरण राहील. नवी जबाबदारी मिळू शकते, भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल.
वृषभ : जाहिरात, जनसंपर्क, पत्रकारितेत नव्या संधी चालून येतील. व्यवसायात जवळच्या मित्रमंडळींकडून मदत होईल. दांपत्यजीवनात आनंदाचे दिवस अनुभवता येतील. जुने आजार डोके वर काढतील. किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. नोकरीत वरिष्ठांचा सल्ला घेऊनच पुढचा निर्णय घ्या. सामाजिक जीवनात कुणावर मत लादू नका. व्यावसायिकांची आर्थिक बाजू भक्कम राहील.
मिथुन : नोकरीत मनासारख्या घटना घडतील. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. काहीजणांना नव्या नोकरीच्या संधी चालून येतील. छोट्या कारणामुळे घरात वादाचे प्रसंग निर्माण झाल्यास त्याकडे लक्ष देऊन नका. मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. मामा-मावशीकडून मदत मिळू शकते. व्यापार्यांना लाभदायक काळ आहे. अचानक धनलाभाच्या घटना घडतील. शेअर, सट्टा, लॉटरीत रमू नका. उधार देणे टाळा.
कर्क : अनेक दिवसांपासून रखडलेली सरकारी व बँकेची कामे मार्गी लागतील. नोकरीत सकारात्मकता ठेवा, फायदा होईल. वाद टाळा. व्यावसायिकांना आर्थिक बाजू भक्कम करण्यात यश मिळेल. मित्रमंडळींच्या भेटीमुळे मौजमजा कराल. बाहेरचे खाणे-पिणे नियंत्रित ठेवा, आजाराला निमंत्रण मिळू शकते. काही कारणाने अचानक प्रवास घडेल. सार्वजनिक जीवनात मोजकेच बोला आणि पुढे चला, हेच धोरण ठेवणे श्रेयस्कर.
सिंह : घरात, नोकरीत छोट्या कारणामुळे वादाची ठिणगी पडेल. मनस्थिती विस्कळीत करणारी परिस्थिती निर्माण होईल. ध्यानधारणा, योगासाठी वेळ खर्च कराल. आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. नोकरीत कामाचा व्याप वाढल्याने धावपळ होईल, त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. काळजी घ्या. मनोरंजनाच्या कार्यक्रमावर पैसे खर्च होतील. मित्र-मंडळींसाठी भरपूर वेळ खर्च होईल. देवधर्मासाठी भरपूर वेळ खर्च होईल.
कन्या : घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. खर्चाचे प्रमाण वाढेल. सरकारी कामे पूर्ण होण्यास विलंब झाल्याने मनाची चलबिचल वाढणार आहे. नोकरीत कामापुरते बोलून काम करत राहा. वरिष्ठ मंडळींच्या मताचा आदर करा. व्यावसायिकांचे थकीत येणे वसूल होईल, त्या पैशाचा विनियोग करताना काळजी घ्या. प्रवासात काळजी घ्या, घाई करू नका. मालमत्ता, व्यवसाय याबाबतचे महत्वाचे निर्णय आता घेऊ नका.
तूळ : मनासारखी कामे होणार असली तरी त्यात एखाद्या कारणाने विलंब होईल. देवधर्मासाठी वेळ द्याल. मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिकांना नव्या संधी येतील, पण विचारपूर्वक निर्णय घ्या. खेळाडूंसाठी चांगला काळ आहे. स्पर्धेत यश मिळेल, नावलौकिक वाढेल. नोकरीत वातावरण चांगले राहील, कामानिमित्ताने विदेशात जाण्याची संधी मिळेल. कोणताही निर्णय घेताना वेळ घेऊन विचार करा. त्यानंतरच तो पक्का करा.
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. मान-सन्मानाचे योग आहेत. आध्यात्मिक प्रगती होईल. लेखक, कलाकार, संगीतकार यांना नव्या संधी चालून येतील. नोकरीत वादांकडे फार लक्ष देऊ नका, आपले काम करत राहा. त्याचाच फायदा होईल. गुरुकृपा चांगली राहिल्याने व्यावसायिकांनाही चांगले अनुभव येतील आणि आर्थिक बाजू भक्कम करणार्या संधी चालून येतील. मित्रांबरोबर फिरायला, सहलीला बाहेरगावी जाल. घरासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी कराल.
धनु : व्यवसायात यश मिळेल, मात्र त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे. प्रेमप्रकरणात खटके उडतील. धार्मिक कार्यात वेळ खर्च होईल. नोकरीत सहनशक्ती वाढवा. मालमत्तेचा विषय पुढे ढकला. कर्जाच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करू नका. नवीन गुंतवणुकीसंदर्भात घाईत निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक पुढे चला. काहीजणांना चांगले आर्थिक लाभ मिळवून देणारा काळ.
मकर : कामे मार्गी लागल्याने मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरासाठी पैसे खर्च कराल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसायात चांगल्या घडामोडी घडल्याने बँक बॅलन्स वाढण्यास मदत होईल. नोकरीत मतभेद होतील. पण, त्याकडे फार लक्ष देऊ नका. बांधकाम व्यावसायिक, इस्टेट एजंटांना चांगले लाभ मिळतील. कलाकारांचा सन्मान होईल. विदेशात शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न सुरु असेल तर त्याला यश मिळेल. सरकारी नियमांचे पालन करा, नाहीतर त्रास होईल.
कुंभ : मन:स्वास्थ्य बिघडवणार्या घटनांकडे लक्ष देऊ नका. पत्नीबरोबर वाद होतील. साडेसातीमुळे सामाजिक जीवनात जपून राहा. व्यावसायिकांनी अतिउत्साहात कोणताही निर्णय घेऊ नये. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या प्रयत्नांत जपून पावले टाका. आर्थिक नुकसान टाळा. मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवा, एखादी तक्रार डोकेदुखी वाढवेल.
मीन : आर्थिक व्यवहारात शिस्त पाळा. भूलथापांना बळी पडून फसव्या प्रलोभनाच्या लोभात अडकू नका. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत जबाबदारी चोखपणे पार पाडा, आपले काम अन्य कुणावर टाकू नका. त्यामधून वाद होऊ शकतात. मार्वेâटिंग क्षेत्रात त्रास होऊ शकतो. बंधू वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अपघाताला निमंत्रण मिळू शकते.