‘तू स्त्री असल्याचा तुला अभिमान असायला हवा. अगं एक स्त्री म्हणून आपण किती काय काय करत असतो? कित्येक सिनेमांमध्येही स्त्रीला असा अभिमान वाटण्याचा संदेश दिलेला आहे. अभिमान वाटायला हवा म्हणजे हवाच,’ असे जरा दम देऊनच एक मैत्रीण मला म्हणाली, तेव्हा खरे तर मला स्त्री असल्याचा अभिमान वाटून घ्यायचा होता, पण तो कसा घेतात याची काही कल्पनाच नव्हती; म्हणजे तो अभिमान वाटण्यासाठी नक्की काय करायला हवे असा प्रश्न मला पडला.
आजकाल मला असेच होते, कशाचा तरी अभिमान वाटून घ्यायचा असतो पण काही विषयच सापडत नाही. म्हणजे लोकांना किती किती आणि कसल्या कसल्या गोष्टीचे अभिमान असतात. स्त्री किंवा पुरुष असल्याचा अभिमान, अमुक एका गावातील असण्याचा अभिमान, अमुक एका जातीचे किंवा धर्माचे असल्याचा अभिमान वगैरे वगैरे. म्हणजे मला प्रश्न पडतो की समजा मी स्त्री नसून पुरूष असते तर मला अभिमान वाटायला नकोय का? किंवा मी मुंबईची नसून डुक्करवाडी गावची असते तर मला अभिमान वाटला नसता का?
कशाचा अभिमान वाटेल याचा काही सुमारच राहिलेला नाही.
आता चंद्रयान-३ चीच गोष्ट घ्या. भारतातील तमाम जनता चंद्रयान-३ चंद्रावर उतरण्याची आतुरतेने वाट पहात होती. सहा वाजून तीन मिनिटांनी तो क्षण बघायचा म्हणून त्याच्या कित्येक तास अगोदर चंद्र, त्याची आजची स्थिती यावर तज्ज्ञ लोकांची मते ऐकण्यासाठी टीव्हीसमोर सगळे बसलेले होते. रस्त्यारस्त्यावर, ऑफिसमध्ये सगळीकडे स्क्रीनवरून प्रक्षेपण चालू होते. तो अभिमानाचा क्षण आला आणि सगळे टाळ्या वाजवू लागले. तितक्यात शेजारच्या बिल्डिंगमधून आरडाओरडा झाल्याचा आवाज आला म्हणून आम्ही धावतच तिकडे गेलो. बघितले तर एक काका सुरक्षारक्षकाला जोरजोरात ओरडत होते. काय झाले म्हणून विचारल्यावर लक्षात आले की चंद्रयान-३ चे प्रक्षेपण मोबाईलवर बघण्यात सुरक्षारक्षक इतका गुंग होता की चोर इमारतीत शिरला तरी त्याचे लक्ष नव्हते. त्याला रागावून हताश होऊन काका सीसीटीव्ही फुटेज बघायला निघून गेले. तर सुरक्षारक्षक मागून म्हणाला,’ बघा ना मॅडम, काकांना देशाचा काही अभिमानच नाही. तिकडे चंद्रयान-३ चंद्रावर पोचलंय आणि यांना त्याचा काही अभिमानच नाही. यांना अजूनही घरात चोर शिरल्याचीच काळजी आहे. अशाने काय भलं होणार आपल्या देशाचं?’
चंद्रयान ३चा अभिमान बाळगणे ही खरे तर चांगलीच गोष्ट. पण, असा अभिमान बाळगला की आपण काहीही करायला मोकळे झालो ही भावना मला कमाल वाटते. म्हणजे एकदा देशावर प्रेम आहे आणि देशाचा अभिमान वाटतो असे म्हटले की आपण कुठेही कचरा टाकायला, भ्रष्टाचार करायला, खोटे बोलायला, कुठल्याही जातीधर्माला नावे ठेवायला, अगदी काहीही करायला मोकळे होतो.
जून महिन्यात आमच्या गावी गेले तर तिथे मोठमोठे फलक लागलेले होते. ‘३५ टक्के गुणांनी पहिल्या झटक्यात दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल बाळूभय्यांचे अभिनंदन. बाळूभय्या आम्हांला तुमचा अभिमान आहे.’ कदाचित हा अभिमान बाळगणे बरोबरच असावे. बाळूभय्याच्या संपूर्ण खानदानात एकतर कोणी दहावी शिकलेले नव्हते किंवा झाले असतील तर आता थोडक्यासाठी कशाला नाराज करावे म्हणून बोर्डाने त्यांना पास केले असावे. अशा खानदानातून आल्यावर भय्याने पहिल्या फेरीतच दहावी उत्तीर्ण होणे म्हणजे अभिमानाची गोष्ट नाहीतर काय?
आज ३५ टक्के गुणांचा आपल्याला अभिमान वाटतो आहे, उद्या चप्पलला अंगठा शिवल्याचा, कारल्याची भाजी खाल्ल्याचा, फोनवर सलग दहा तास पत्ते खेळल्याचा, आमचा कुत्रा सौंदर्यस्पर्धेत पहिला आल्याचा, दूध उतू न गेल्याचा, वेधशाळेने हवामानाचा अंदाज अचूक वर्तवल्याचा, रिक्षावाल्याने जवळचे भाडे बिनदिक्कत घेतल्याचा, या महिन्यात केस कमी गळल्याचा, दिवसातून कॉल सेंटरचा एकही फोन न आल्याचा, कायमचूर्ण न घेताच पोट साफ झाल्याचा, कोर्टाने केसचा निकाल वेळीच लावल्याचा, वेब सिरीजमध्ये एकही शिवी न वापरल्याचा, सरकारी काम करण्यासाठी पैसे न खाल्ल्याचा असा कुठल्याही गोष्टीचा अभिमान आपण बाळगू शकतो.
वृत्तपत्रात मागे एकदा जाहिरात वाचली होती, ‘विक्रीकर विभागाने अमुक अमुक संचालकाच्या घरावर धाड घातली त्याबद्दल त्या संचालकांचे अभिनंदन. विक्रीकर विभागाने तुम्हाला धाड घालण्याइतपत श्रीमंत समजले याचा आम्हांला अभिमान वाटतो. ‘
हल्ली हे एक नवीन आहे. कुठल्याही गोष्टीचा अभिमान हे कृती करणार्या व्यक्तीने बाळगण्यापेक्षा त्याचे अनुयायी आणि नातेवाईकच जास्त बाळगून असतात.
आमच्या गावच्या मन्याला मुलगा झाला तेव्हा आजीबाई सगळ्यांना सांगत होत्या की ‘मन्याच्या अख्ख्या खानदानाला त्याचा अभिमान वाटत असेल.’ या पद्धतीने लालूप्रसाद यादव यांच्या पूर्वजांनी तर पुन्हा जिवंत होऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करायला हवी होती.
शेजारच्या वंदूचे लग्न ठरले. तिला थेट अमेरिकेचे सासर मिळाले. केवढी अभिमानाची गोष्ट. तिच्या आईचे हात तर जणू आभाळाला टेकले आहेत. आधी बायका लग्न ठरल्यावर मुलींना म्हणायच्या, ‘नशीब काढलेस हो.’ आता वंदूची आई म्हणत होती, ‘आय एम प्राऊड ऑफ यू वंदू.’ आता खरे तर वंदू अगदी बेंडशीळ गावात जरी लग्न होऊन गेली असती तरी तिचे बाबा नाचलेच असते असे हे पात्र आहे. पण, अशा पात्राचे नशीब उघडले आणि तिला अमेरिकेचे स्थळ मिळाले. आईला आता कोण अभिमान वाटतोय. आज आईला वंदू अमेरिकेला चालल्याचा अभिमान वाटतोय, उद्या तिला मुलं झाल्याचाही वाटेल. अभिमानाचे काय सांगावे, कशाचाही वाटूच शकतो.
कशाचाही अभिमान बाळगण्याची ही परंपरा पूर्वापार असेल तर आपल्या पूर्वजांनी कशाकशाचा अभिमान बाळगला असेल याची कल्पना मी बर्याचदा करते. म्हणजे राजेमहाराजांनी आपल्या जिरेटोपाचा, सिंहासनाचा, किती राण्या आहेत याचा की किती सशांची शिकार केली याचा अभिमान बाळगला असता?
‘राणीसाहेब, आज तुम्ही बनवलेल्या शेंगदाण्याच्या चटणीत तिखट चांगलेच झणझणीत होते,’ असे महाराज म्हणाल्याचा राणीसाहेबांनी अभिमान बाळगला असता का?
एकदा आपले राजेमहाराजे म्हटले, आपले पूर्वज म्हटले की त्यांच्याबद्दल अभिमान वाटलाच पाहिजे ही देखील तशी प्रथाच आहे. म्हणजे असे की श्रीकृष्णाच्या काळात माझे पूर्वज त्यांना तांबूल बनवून देत असत असे मी ऐकले आहे. हा तांबूल खाऊनच श्रीकृष्णाने गीता सांगितली असा अभिमान बाळगायला वाव आहे.
एक मित्र मला सांगत होता, ‘शून्याचा शोध लावणारे आर्यभट हे माझ्या आईच्या मामाकडून पूर्वज लागतात. त्यामुळेच आमच्या खानदानात सगळे शून्यासारखे भोपळे निपजले असा आईला अभिमान आहे.’
एका मित्राला अत्यंत कमी वेळात तंबाखू मळता येते आणि चिकार वेळ सिगारेट तोंडात धरून बसता येते. तो म्हणे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आता अभिमानाने नाव नोंदवणार आहे.
‘माझ्या मुलाला बाई अजिबात मराठी बोलायला आवडत नाही, आम्ही सगळीकडे फक्त इंग्रजी भाषाच वापरतो,’ असे कित्येक आयांना अभिमानाने म्हणताना ऐकले की चक्रावायला होते. कशाकशाचा म्हणून आपण अभिमान बाळगणार आहोत? आपल्या शिवराळ भाषेचा, आपल्या पूर्वजांनी न करून ठेवलेल्या कामाचा, पूर्वजांनी चिकार पैसे कमावून ठेवल्याचा आणि आपण काहीही करत नसल्याचा, तलवारीने केक कापण्याचा की आकडे टाकून वीज मिळवत असण्याचा?
ज्या भूमीसाठी स्वातंत्र्यसैनिक लढले त्यांना आठवून त्यांच्या नावाने भांडण्याचा अभिमान आपल्याला वाटतो की करचुकवेगिरी करत असल्याचा वाटतो?
मला तर वाटते, एकवेळ शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, महात्मा गांधी यांनी केलेल्या कार्याचा अभिमान नाही बाळगला तरीही चालेल, पण आपल्या देशातून परक्या देशात नोकरीला चालल्याचा अभिमान मात्र वाटायलाच हवा. आपण सहिष्णू नाही वागले तरी चालेल, पण आपली परंपरा कशी महान आहे याचा अभिमान बाळगायलाच हवा. कारण एकदा अभिमानाची बाधा झाली की मग मात्र त्या बुरख्यामागे आपण काहीही केले तरी क्षम्य असते.
माझे आजोबा एकदा बाजारात गेले की मोठी डाली भरून आंबे आणायचे, आमच्या घरी कित्येक मण तांदूळ पिकायचा, एकावेळी शंभर माणसांच्या पंगती घरात उठत असत, दूध तूप तर आम्ही असे गावात वाटून टाकत असू, अमुक राजकारणी आमच्या पणजोबांच्या हाताखाली तयार झाला आहे असले अभिमान आजची पिढी बाळगून त्यातून काय मिळते?
या अभिमानाच्या बाधेने आपल्याला पछाडले की आज आपण काहीही केले नाही तरी चालते. पूर्वपुण्याईच्या किंवा देशाच्या अभिमानावर आपला आज पुढे जात राहतो. एकदा एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगला की आपला त्या गोष्टीशी संबंध असो वा नसो, त्या गोष्टीच्या मोठेपणाबद्दल अधिकारवाणीने बोलण्याची सोय होऊन जाते आणि मग या अभिमानाच्या तकलादू बळावर पुढच्या पिढ्या उभ्या राहतात.