गणेशोत्सवाचा झगमगाटी इव्हेंट झाला नव्हता, लोक नवसांच्या पूर्ततेसाठी रांगा लावत नव्हते, त्या काळात श्री गणराय हे भाविकांना आपल्या घरातल्या एखाद्या वडील माणसाप्रमाणे वाटणारं दैवत होतं. घरगुती गणेशोत्सवात, विशेषत: कोकणात अजून तो निरागस गोडवा जपला गेला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हे लोकजागराचं साधन होतं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणार्या आराशींमध्ये त्या त्या काळातल्या स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचं दर्शन घडायचं, काही गणेशोत्सवांमध्ये हलत्या देखाव्यांच्या माध्यमातून ट्रिक सीन पाहायला मिळायचे. त्यात गणपतीबाप्पाही एक व्यक्तिरेखा बनून जायचे. क्रिकेट खेळणारी गणेशमूर्ती, बाळकृष्णाच्या रूपातली गणेशमूर्ती, शाहिरी थाटाची गणेशमूर्ती अशा मूर्ती पाहायला मिळायच्या… त्यातून गणरायांचा अवमानही व्हायचा नाही आणि कोणाच्या हळव्या भावनाही दुखावायच्या नाहीत… त्या काळात, १९६१मध्ये, गणेशाकारातील लवचिकता वापरून बाळासाहेबांनी रविवारची जत्रामध्ये राजकीय गणेशमूर्तींचे प्रदर्शनच भरवले आहे… एकेक मूर्ती नीट निरखून पाहाल तर गणरायांबरोबरच बाळासाहेबांच्या अफाट प्रतिभेलाही वंदन कराल…