कोरोना रोखण्यात दिल्लीपेक्षा मुंबई वरचढ ठरली आहे. रुग्णांची सरासरी वाढ, दुपटीचा कालावधी अशा सर्वच प्रकारांत मुंबईची स्थिती दिल्लीपेक्षा उत्तम आहे. यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी धारावी झोपडपट्टीचे उदाहरण हिंदुस्थानसह जगासाठी उदाहरण ठरले आहे.
दिवाळी दरम्यान दरवर्षी आढळून येणारे सामुदायिक उत्सवाचे वातावरण यंदा नव्हते. त्याचबरोबर छट पूजेच्या उत्सवांच्या निमित्ताने समुद्रकिनारी होणाऱ्या विधींवर देखील बंदी घालण्यात आली. पालिकेद्वारे कोविड विषयक मदतीसाठी हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या बाबतीत मुंबई ही अधिक गतिमान असल्याचे दिसून येत आहे.
सील झोन इत्यादीबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस यांनी संयुक्तपणे ड्रोण व सीसी-टीव्ही सारख्या बाबींच्या सहाय्याने लोकांना केवळ सुचित केले नाही तर, या अनुषंगाने आवश्यक त्या बाबींची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची खात्री वेळोवेळी केली. नुकतीच राबविण्यात आलेली ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीमही महत्वपूर्ण ठरली.
हा फरक ठरला निर्णायक
- दिल्लीमध्ये दिल्ली मेट्रोसह सिटी बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली. तर त्याचवेळी मुंबईमध्ये मात्र लोकल ट्रेन, शाळा, मॉल्स यावर बंधने आहेत.
- मुंबईमध्ये ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांवर भर देण्यात येतोय, तर दिल्ली मध्ये ‘रॅपिड अॅन्टीजन टेस्ट’ यावर भर देण्यात येत आहे. तथापि, दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या मुंबईच्या तिप्पट असल्याचे दिसून येत आहे. ‘आरटीपीसीआर’ चाचण्या या ‘रॅपिड अॅन्टीजन टेस्ट’च्या तुलनेत अधिक विश्वासार्ह मानल्या जातात. हे जगासाठी ‘रोल मॉडेल’ ठरले आहे. मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या ही साधारणपणे 11 हजार इतकी आहे, तर त्याचवेळी दिल्लीतील सक्रीय रुग्णांची संख्या ही 42 हजार इतकी आहे. दरम्यान, हिवाळ्यादरम्यान दरवर्षी प्रदूषण पातळी वाढत असल्यामुळे कोविड संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे एका डॉक्टरांनी नमूद केले आहे.
सौजन्य : दैनिक सामना