ऑक्टोबर १९२२ ते १९२३ हे `प्रबोधन` पाक्षिकाचं दुसरं वर्ष प्रबोधनकारांसाठी स्थैर्याचं वर्षं होतं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात भयंकर संघर्ष सुरू झालेला दिसतो. त्या संघर्षाची मुळं या दुसर्या वर्षांतल्या लिखाणात शोधता येतात.
– – –
पाक्षिक `प्रबोधन`च्या दुसर्या वर्षीचा पहिला अंक १६ ऑक्टोबर १९२२ रोजी प्रकाशित झाला. दर पंधरा दिवसाला एक याप्रमाणे वर्षात २४ अंक आले. शेवटचा अंक १ ऑक्टोबर १९२३चा होता. `प्रबोधन`चे वर्षात ठरलेले सगळेच्या सगळे अंक प्रकाशित होण्याचं हे लागोपाठ दुसरं पण शेवटचं वर्षं. पुढे मार्च १९३० ला `प्रबोधन`चा शेवटचा अंक प्रकाशित झाला. पण एका वर्षात ठरलेले अंक पुढे नियमित कधीच प्रकाशित झाले नाहीत. एका अर्थाने हे `प्रबोधन`च्या स्थैर्याचं शेवटचं वर्षं होतं.
प्रबोधनकारांची ओळख असलेलं हुंडाबंदीचं आंदोलन याच वर्षात लढलं गेलं. `प्रबोधन` या आंदोलनाची प्रेरणा होता आणि मुखपत्रही होतं, हे आपण सविस्तर पाहिलं आहेच. या विषयाने `प्रबोधन`च्या दुसर्या वर्षाच्या अंकांमधला मोठा भाग व्यापला आहे. प्रबोधनकारांवर कारखानीस बंधूंनी केलेला हल्लाही याच वर्षातला. त्याचा वृत्तांतही आपण या सदरात वाचला आहे. `ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची चिकित्सा’ या अत्यंत महत्त्वाच्या अग्रलेख मालिकेचा परिचयही आपण करून घेतला आहे. मुंबईत येणार्या दाक्षिणात्यांच्या झुंडी आणि त्यामुळे मराठी माणसांवर होणारा अन्याय याविरुद्ध पहिला निषेध `प्रबोधन`मधूनच नोंदवला गेला. तो शिवसेनेने पुढे मांडलेल्या स्थानीय लोकाधिकारवादाचा ओनामा होता, हेही आपण पाहिलं.
इतिहास हा प्रबोधनकारांचा आवडीचा विषय. महाराष्ट्राच्या इतिहासाची नव्याने मांडणी करणारे इतिहासकार ही प्रबोधनकारांची ओळख आधीपासूनच होती. इतिहासाच्या जुन्या ब्राह्मणी मांडणीचं खंडन आणि नव्या बहुजनी मांडणीचं मंडन हे सूत्र `प्रबोधन`च्या दुसर्या वर्षीही ठळकपणे दिसतं. मराठी सारस्वतकार वि. ल. भावे यांनी केलेली कायस्थांच्या इंतिहासाची बदनामी खोडून काढण्यासाठी प्रबोधनकारांनी `विश्वामित्री इतिहास संशोधन` ही चार लेखांची माला लिहिली. त्यात त्यांनी ब्राह्मणी इतिहासकारांच्या मांडणीला अक्षरशः सोलून काढलं आहे. पेशव्यांच्या जातीय कारस्थानांची झलक दाखवली आहे. त्यामुळे `केसरी`ने त्याची दखल घेऊन सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्या संदर्भात तिसर्या अंकातलं `केसरीदादांची कळकळ` हे छोटंसं स्फुटही लक्षवेधी आहे. त्यात प्रबोधनकार लिहितात, `आज जर महाराष्ट्रांत जातिमत्सर वाढलेला असेल, तर त्याच्या जबाबदारीचा सगळा बोजा केसरी व त्यांचे जातभाई यांच्याच डोक्यावर आहे. प्रथम आघात करणारे तेच. प्रत्याघात नको म्हणण्यापेक्षा आघाताच्याच नरडीला नख देण्याचे धारिष्ट केसरीने दाखवावे.`
इतिहासाविषयीचे वेगवेगळ्या लेखकांचे लेखही या वर्षात नियमित प्रकाशित झालेले आढळतात. एकीकडे राजवाडे संप्रदायाचा टोकाचा विरोध करतानाच ते इतिहासाचार्य राजवाडेंचे वाचनीय उतारेही प्रकाशित करतात. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची प्रबोधनकारांची नि:स्पृहता इथे अधोरेखित होते. बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू आणि रंगो बापूजी या मराठ्यांच्या इतिहासातल्या कायस्थ वीरांची थोरवी प्रबोधनकारांनी सातत्याने गायली आहे. ते एका ठिकाणी योगी अरविंद घोषांनी बाजीप्रभू देशपांडेंवर लिहिलेल्या इंग्रजी कवितेचा परिचय करून देतात. इतिहासाचं साधन म्हणून दुर्लक्षित असणारी पत्रं प्रकाशित करतात. त्या संदर्भातला `इतिहासाची पुनरावृत्ती` हा अग्रलेख महत्त्वाचा ठरतो. छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजी यांच्याविषयीच्या सविस्तर इतिहासलेखनाची वैचारिक मांडणी या अग्रलेखातून झालेली आढळते.
`दुनिया झुकती है` या शीर्षकाच्या अग्रलेखात ते गोव्याच्या फ्रान्सिस झेवियर्स यांच्या तेव्हा ३७० वर्षं जुन्या प्रेताचं दर्शन घेण्यासाठी झालेल्या गर्दीवर सडकून टीका करतात. त्यात ते म्हणतात, `ज्या धर्माने मनाचा दुबळेपणा व चिकित्सेचा बोथटपणा वाढतो, तो धर्मच नव्हे. ब्राह्मणाच्या पायाचे घाणेरडे पाणी तीर्थ म्हणून पिणे हे जितके निंद्य, त्यापेक्षा प्रेताच्या पायाचे चुंबन घेणे हे शतपट चिळसवाणे व निंद्य होय.` हिंदूंवर इतरधर्मीयांकडून होणार्या अत्याचारांचा पाढा वाचणारे आणि लढाऊ हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे `हिन्दुधर्म नामर्द का?` आणि `धर्मच जबरदस्त पाहिजे` हे दोन पाठोपाठच्या अंकांमधले अग्रलेख मुळातून वाचायला हवेत. प्रतापगडावर अफझलखानाच्या थडग्याला पुजताना भवानीमातेच्या देवळाला अपाय करण्याचे प्रयत्न झाल्याच्या बातम्यांच्या आधारे लिहिलेला `प्रतापगडच्या भवानीवर संकट` हा स्फुटलेखही त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.
कायस्थ आणि मराठा यांच्यातल्या एका आंतरजातीय लग्नाच्या निमित्ताने त्यांनी जातिभेद या विषयावर सोळाव्या अंकात लिहिलेली स्फुटं विचार करायला लावणारी आहेत. हे मिश्रविवाहच जातिभेदावर तोडगा आहे, असा दावा यात केला आहे. त्यात ते लिहितात, `संस्कृतीचा संगम झाल्याशिवाय राष्ट्रीय, सामाजिक व नैतिक गुलामगिरीचा नायनाट होत नसतो, हे तत्व कोणाच्याच गळी उतरत नसल्यामुळे, सध्या प्रत्येक जातीच्या टीचभर कोंडाळ्यातल्या कोंडाळ्यात लागणारे विवाह सुप्रजननशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत विघातक आहेत.` वारकर्यांमधले वेदांती कीर्तनकार विनायक महाराज साखरे यांनी एका ब्राह्मणांच्या परिषदेत ब्राह्मणेतरांना कुत्री म्हटलं होतं. त्यावर प्रबोधनकारांनी `साखर्या भटाची वानी, अक्षि निरमल गंग्येचं पानी` हा विलक्षण उपहासाने ओतप्रोत भरलेला स्फुटलेखही अभ्यासकांनी मुळातून वाचायला हवा असा आहे.
राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी `गोविंदाग्रज शाहीराची कामगिरी` हा अग्रलेख लिहिला आहे. लोकहितवादींच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रबोधनकारांनी `नवमतवादाग्रणी लोकहितवादी` या शीर्षकाचे लिहिलेले दोन अग्रलेख आजच्या लोकहितवादींच्या दोनशेव्या जन्मवर्षीही आवर्जून वाचावेत असे आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने लिहिलेला `शिवछत्रपतींचा लोकसंग्रह` हा लेखही वाचनीय आहे. छत्रपती शिवरायांची थोरवी सांगतानाच त्यांच्या चरित्राची चिकित्सा करण्याची गरजही प्रबोधनकार आवर्जून सांगतात. त्याचबरोबर `अद्भुतचि कार्य करणे` हाही शिवचरित्रातून मिळणार्या प्रेरणांविषयीचा त्यांनी लिहिलेला लेखही महत्त्वाचा आहे. प्रबोधनकारांनी पुढच्या काळात तरुणांना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारे लेख लिहिले आहेत. त्याची सुरुवात `मन गुलाम म्हणून मानव गुलाम` आणि `आत्मविकास आणि संक्रमण` या अग्रलेखांमधून झालेली दिसते. दसरा, दिवाळी, होळी या सणांच्या निमित्ताने आक्रमक विचारांची मांडणी करणारे लेख अग्रलेख हे `प्रबोधन`चं कायमच वैशिष्ट्य ठरलं. त्याला हेही वर्ष अपवाद नाही.
`जपान राष्ट्राचे प्रबोधन`या चार अग्रलेखांच्या मालिकेतून `प्रबोधन`ने पहिल्या महायुद्धाच्या नंतर जपानने केलेल्या विकासाचा आदर्श मांडला आहे. `सार्वजनिक धंद्याचे आणि व्यवसायांचे अमेरिकन आचार नीतिशास्त्र` हाही एक वेगळाच विषय प्रबोधनकारांनी अग्रलेखात हाताळला आहे. जगातले महत्त्वाचे विचार `प्रबोधन`च्या वाचकांपर्यंत नेण्याचा त्यांचा आग्रह कायम होताच. काँग्रेसच्या तिरंगी झेंड्याला तसंच होमरूल लीगने प्रसारित केलेल्या झेंड्याला विरोध करत छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा भगवा झेंडाच राष्ट्रीय निशाण हवा, अशी मांडणीही त्यांनी एका लेखात केलीय. महात्मा गांधींच्या नेतृत्वात चालणार्या खिलाफत चळवळीला आणि असहकार आंदोलनाला त्यांनी विरोध केला होता. कारण नुकत्याच शिकू लागलेल्या बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांनी सरकारी शिक्षणावर आणि नुकतीच संधी मिळालेल्या बहुजन नोकरदारांनी सरकारी नोकरीवर बहिष्कार घालणं त्यांना मान्य नव्हतं.
`पुराणकारांचे आधुनिक सांप्रदायी` या स्फुटलेखात प्रबोधनकारांनी ट्रिक सीन्सच्या मदतीने पुराणातल्या बंडलबाज गोष्टी मोठ्या पडद्यावर दाखवणार्या भारतीय सिनेमावाल्यांवर जोरदार टीका केली आहे. सिनेमांविषयीचा वेगळाच दृष्टिकोन मांडणार्या या स्फुटात ते लिहितात, `ज्ञानाला पारखा झालेला स्त्रीवर्ग व इतर मागासलेले समाज पौराणिक धर्माविषयी कोठे थोडा चिकित्सक संशयी व पृच्छावादी बनतो न बनतो, तोच पौराणिक शिमग्याची हालती चालती प्रदर्शने दाखविणारे सिनेमावाले महात्मे पुढे सरसावले आहेत. धार्मिक फिल्म सबबीवर त्यांनी बहुतेक सर्व पुराणांचा उकीरडा उपसण्याची पवित्र कामगिरी मोठ्या अहमहमिकेने हाती घेतली आहे.` आजच्या मायथॉलॉजिकल म्हणवणार्या टीव्ही मालिकांना आणि चित्रपटांना याच दृष्टिकोनातून पाहण्याची गरज दाखवणारा देणारा हा छोटा लेख आहे.
दादरमध्ये झालेल्या एका वक्तृत्व स्पर्धेतल्या तरुणींच्या भाषणांचे लेख `प्रबोधन`ने छापले आहेत. शिवाय कुटुंब नियोजन या त्या काळात अनोळखी असणार्या विषयावरचे तीन लेखही छापले आहेत. पाश्चात्त्य देशातल्या सेक्शुऑलॉजी या विषयाचा अभ्यास करणार्या जीएमजी या टोपणनावाने लिहिणार्या एका मित्राकडून त्यांनी हा नवाच विषय वाचकांपुढे आणला आहे. संतती नियमनाचे महत्त्व त्या काळात सांगणार्या प्रबोधनकारांचं मोठेपण मान्य करायलाच हवं, पण त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात याचा अवलंब केल्याचं मात्र आढळत नाही. वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसनच्या एका मुलाखतीतले विचारही मराठीत अनुवाद करून वाचकांपर्यंत पोचवले आहेत. गो. रा. हिंगणेकर, कुमार यशोद, कृष्णाजी हरी दीक्षित, कृ. भा. बाबर, पी. जे. सबनीस, गो. म. चिपळूणकर, रामचंद्र चित्रे अशा लेखकांचे लेखही दुसर्या वर्षीच्या प्रबोधनमध्ये वाचता येतात. त्या काळातल्या अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचा परिचय करून देणारं `कलमबहाद्दरांस शेलापागोटे` हे सदर त्या वर्षाचा दुर्लक्षित साहित्यिक इतिहासच मांडतं. त्याशिवाय अनेक देशीविदेशी नियतकालिकांमधले, जुन्या पुस्तकांमधले वाचनीय उतारे वाचकांना समृद्ध करण्यासाठी `प्रबोधन`ने दुसर्या वर्षात दिले आहेत.
हे दुसरं वर्षं `प्रबोधन`ला वैभवाच्या शिखरावर नेणारं होतं. त्यामुळे यशाची नवी शिखरं पादाक्रांत करण्यासाठी प्रबोधनकार आतुर झाले होते. त्यासाठीची त्यांची धडपडही या अंकात दिसून येते. याच प्रयत्नांतून त्यांनी मुंबई सोडून सातार्याला `प्रबोधन`चं बिर्हाड हलवण्याचा निर्णय घेतला.