सोशल मीडियावर ट्रोलांशी बोलावे की त्यांना कोलावे?
– मोरेश्वर पाटील, घणसोली
जमलं तर त्यांना सोलावे… नाहीतर त्यांच्या बोलण्यावर डोलावे.
हिंदी सिनेमातल्या नायिका खलनायकांना भगवान के लिए मुझे छोड दो असं म्हणतात, मुझ पे तरस खाओ, असं म्हणतात; हा भगवान कोण आहे? आणि बिचार्या तरसांचा काय दोष?
– राहुल पोंक्षे, पिंपळे निलख
केवळ खलनायकाचे नायिकेवर अतिप्रसंग करणारे तेवढेच सीन बघू नका. चित्रपटाचा शेवटही बघा. खलनायकाचा शेवट कसा होतो ते कळलं तर असे प्रश्न मनातही येणार नाहीत.
तीन बोक्यांनी लोण्याचा गोळा चोरून आणलेला तर आहे, तिघांचाही त्याच्यावर डोळाही आहे. पण, शेवटी कोणता बोका लोण्यावर ताव मारू शकेल?
– लीलाधर पानसे, पेण
जो बोका बाकीच्या दोन बोक्यांच्या घागरी बुडवेल तोच लोण्यावर ताव मारू शकेल (असं लोकांना वाटत असेल. पण जो बोका बुडेल, तो बुडवणार्या दोन्ही बोक्यांना आपल्याबरोबर बुडवेल, याची तिन्ही बोक्यांना खात्री आहे. म्हणूनच तिन्ही बोके तरत आहेत… अस राजकीय विश्लेषकांना वाटतं. मला नाही बाबा!)
लग्नानंतर जो बायकोचं ऐकतो त्या पुरुषाला बायकोचा बैल असं सर्रास म्हटलं जातं. लग्नानंतरही जो आईचं ऐकतो, त्याला काय म्हणायचं?
– मोहिनी केरकर, वसई
सॉरी मोहिनी ताई… तो शब्द जर माझ्या बायकोला कळला तर मला उठता बसता ऐकावा लागेल.
मला कोणाच्याही भावना न दुखावणारं लेखन करण्याची इच्छा आहे. मी काय लिहू?
– रवींद्र साठ्ये, पुणे
बालगीत लिहा… नाहीतर सगळ्यात सोप्पं आणि सेफ म्हणजे ज्यांच्या भावना दुखावतात त्यांच्या देवाची चालीसा लिहा.
स्त्रीशिक्षणाच्या वाटा खुल्या करण्यासाठी दगडफेक, शेणमारा सहन केलेल्या सावित्रीबाई फुले यांना आजची सुशिक्षित स्त्री व्रतांच्या पोथ्या वाचण्यासाठी ते शिक्षण वापरताना पाहून काय वाटत असेल?
– रेणुका फडणीस, चोपडा
त्या सावित्रीप्रमाणे आपल्या नावाने कोणी पोथ्या लिहिल्या नाहीत म्हणून (त्यातल्या त्यात) समाधान मानत असतील सावित्रीमाई.
हल्ली राज्यात, दिल्लीत ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असं ठणकावून सांगतायत मोठमोठे लोक; तुम्ही घरातून बाहेर पडताना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असं सांगता की नाही गर्जना करून?
– प्रसन्न रानडे, रत्नागिरी
असा एकदाच गर्जून सांगितलं तर बायकोने उलटी गर्जना केली की हिंमत असेल तर एकटेच या. दोघातिघांना बरोबर घेऊन येऊ नका. त्यानंतर पुन्हा बोलायची हिम्मत झाली नाही. कारण आपल्याला तोंडावर पडलो तरी वर तोंड करून बोलायची सवय नाही.
लोकांच्या जीवनामध्ये जी वादळे येतात ती अगोदर कोठे लपून बसलेली असतात?
– अभय होंबळकर, येडूर, जि. बेळगाव
वादळे आपल्या अंगातच लपलेली असतात. जेव्हा जेव्हा अंगातली मस्ती ओव्हर फ्लो होते तेव्हा तेव्हा वादळे निर्माण होतात (स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्याच वादळ बघायच वाकून, ही पण एक मस्तीच झाली. आवरा स्वतःला अभय वादळकर, सॉरी होंबळकर)!!
संतोषराव, नऊ वर्षांपूर्वी तुमच्या खात्यात जे पंधरा लाख रूपये जमा झाले होते, त्या पैशांचे तुम्ही काय केलेत?
– संजय क्षीरसागर, प्रभात नगर, पिंपळे गुरव
ईडीवाल्यांनी जप्त केले. त्यांना पैशाचा सोर्स सांगितला. पण त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते म्हणाले, आमचे नाही आले तर फक्त तुमचेच कसे आले?
आता आपलं वय झालं हे कसं ओळखायचं?
– कृष्णा हेंद्रे, कागल
आपल्याच बायकोवर प्रेम करावसं वाटतं तेव्हा समजायचं की आपलं वय झालं (खरं म्हणजे तो नाईलाज असतो, कारण प्रेम करावे असे दुसरे पर्याय अस्पष्ट दिसायला लागलेले असतात).
महाराष्ट्रातला शिवाजी गायकवाड कर्नाटकमार्गे चेन्नईला गेला आणि रजनीकांत बनला… महाराष्ट्रात राहिला असता तर?
– सागर गंगावणे, पवना नगर
गायकवाड म्हणजे आपला की त्यांचा?… किंवा शिवाजी हे नाव त्यांच्यात ठेवत नाहीत आपल्यात ठेवतात… अशा पब्लिकच्या लफड्यात तो बिचारा घंटी वाजवत बसला असता… बसची (तरीही तो रजनीकांत झालाच असता, तर तो आमचाच आहे, तुमचा नाही, या लफड्यात अडकला असता)!!