आमच्या इनोव्हेटिव्ह लॉन्ड्री बास्केटची खासियत अशी आहे की सगळ्या गोष्टी इन-हाऊस केला जातात. म्हणजेच कपडे तुमच्यासमोर मशीनमध्ये धुतले जातात, ड्रायक्लीनिंग आमच्याच शॉपमध्ये होतं आणि इस्त्री देखील आमच्याच शॉपमध्ये केली जाते. शिवाय आम्ही किलोवर पैसे आकारणं सुरू केलं. कमीत कमी तीन किलो कपडे असतील तर आम्ही फ्री होम डिलिव्हरी देतो.
– – –
नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की मनात पहिला प्रश्न येतो, व्यवसाय चालला नाही तर काय? काही क्षेत्रं अशी आहेत की जी काळाच्या ओघात कधीही नष्ट होणार नाहीत. म्हणूनच अन्न, वस्त्र, आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांशी निगडित असलेल्या व्यवसायाला कधीच मरण नसतं. आजघडीला भारतात दोन लाख वीस हजार कोटी रुपयांचा लॉन्ड्री व्यवसाय आहे. पण यातला बराचसा भाग असंघटित आहे आणि ग्राहकांना पर्याय नसल्यामुळे ते जुन्या पद्धतीच्या लॉन्ड्रीत कपडे धुवायला टाकतात. हॉटेल इंडस्ट्री आणि हेल्थकेअर इंडस्ट्री हे प्रामुख्याने या व्यवसायाचे मोठे ग्राहक आहेत. काही वर्षांपूर्वी घरगुती ग्राहक हा या व्यवसायाचा कणा होता, पण काळानुरूप बदल न केल्यामुळे दिवसेंदिवस पारंपरिक लॉन्ड्री व्यवसायाला पोक येत आहे. या अस्तंगत होणार्या व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याचं रुपडं पालटवण्याचा विचार केलेल्या गणेश पवनकर आणि वैभव होळसंबरे यांची ही गोष्ट. त्यांनी एका शॉपपासून केलेली सुरुवात आज २५ शॉपच्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये रूपांतरित झाली आहे. हा प्रवास नेमका कसा झाला, या प्रवासात काय अडचणी आल्या आणि त्यातून मार्ग कसा काढला, या विषयावर ‘इनोव्हेटिव्ह लॉन्ड्री बास्केट’च्या फाउंडर्सपैकी एक असलेले वैभव यांना मी बोलतं केलं.
वैभव म्हणाले, माझा जन्म लातूर जिल्ह्यातील उदगीर गावात झाला, वडील शाळेत शिक्षक होते. आम्ही चार भावंडं. मी अभ्यासात ठीक-ठाकच होतो. स्वत:च्या इच्छा मुलांवर लादणारे पालक मला लाभले नाही, हे माझं सुदैव. आमच्या कुटुंबात कोणी व्यवसाय केल्याचं ऐकिवात नाही. बहुतांश नातेवाईक शेतकरी किंवा शिक्षक होते. लहानपणी मला विचारायचे, मोठा झाल्यावर तू कोण होणार, या प्रश्नाला उत्तर असायचं, शिक्षक, पोलीस किंवा कोणतीही नोकरी. गावात शहरासारखं एक्सपोजर नसल्यामुळे व्यवसाय म्हणजे किराणा मालाचं दुकान असा लहानपणी माझा समज होता.
दहावी पास झाल्यावर नांदेडला सायन्समध्ये प्रवेश घेतला. २०१२ साली बारावीला काही मार्कांनी इंजीनिअरिंगचा प्रवेश हुकला. आता काय करावं असा विचार करत होतो. त्याचवेळी एक मित्र फूड टेक्नॉलॉजीत बी.टेक. करण्यासाठी फॉर्म घेऊन आला होता. त्याच्यासोबत मी देखील फॉर्म भरला. त्याचा नंबर लागलाच नाही आणि मी मात्र उदगीरहून बॅग भरून पोहचलो तो थेट पुण्याच्या एमआयटी कॉलेजमधे. लोणी काळभोरमधला कॉलेज कॅम्पस खूप मोठा आहे. इथे मुंबई-पुण्यातून मुलं शिकायला येतात. त्या तुलनेत माझ्यासारखी, महाराष्ट्राच्या दुर्गम भागातली मुलं कमी होती. शहरी भागातील मुलांचं वागणं बोलणं आणि त्यांचे छंद थोडे हायफाय होते. मी मात्र वायफळ खर्च करायचा नाही, व्यसन लावून घ्यायचं नाही, या विचारांचा होतो. मैत्रिणी, पार्टी यापासून माझ्याप्रमाणेच दूर असलेला गणेश पवनकर हा समवयस्क मित्र मला कॉलेजमध्येच भेटला. थोड्याच काळात आमची छान गट्टी जमली. कॉलेज संपायला दोन वर्षे बाकी होती, पण शिक्षण घेतल्यावर काय करायचं, याबाबत आम्ही दोघे नेहमी चर्चा करत असू. या चर्चेतून तीन पर्याय पुढे आले, १) चार-पाच वर्ष तयारी करून एमपीएससीची परीक्षा द्या. २) कॅम्पसमधून कॅम्पस इंटरव्यूमधून मिळणार्या कंपनीत नोकरी करा. ३) स्वत:चा व्यवसाय सुरू करा (आमच्या कॉलेजमधील सुखवस्तू घरातील मुलांचा व्यवसायाकडे कल होता, पण बॅचमधील सगळी मुले आज नोकरीच करत आहेत.)
व्यवसाय करावा याबाबत आमच्या दोघांचं एकमत झालं, पण दोघांनाही व्यवसायाची पार्श्वभूमी नाही, हाताशी भांडवलही नाही; अशा परिस्थितीत कोणता व्यवसाय करावा आणि कसा करावा, या प्रश्नावर गाडी अडत असे. यावर उपाय म्हणून जिथून पैसे खर्च न करता ज्ञान मिळेल तिथून ते घ्यायचं ठरवलं. कॉलेज संपल्यानंतर किंवा सुट्टीत पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी होणारी फ्री ऑफ कॉस्ट मोटिवेशन लेक्चर्स, सेमिनार आम्ही अटेंड करायला लागलो. या सेमिनारमधून वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती आम्हाला मिळू लागली. त्या काळात डीएसके कंपनीचे डी. एस. कुलकर्णी, बांधकाम व्यावसायिक हनुमंत गायकवाड हे आमचे रोल मॉडेल होते. त्यांनी शून्यातून व्यवसाय कसा उभारला याच्या स्टोरीज आम्ही यूट्यूबवर पाहायचो आणि एक दिवस आपणही यांच्याच मार्गावर पाऊल टाकायचं, असा आमचा मानस होता. नवीन व्यवसाय शोधत असताना स्पायसेस (मसाले) आणि डेअरी प्रॉडक्ट (दुग्ध व्यवसाय) याचा विचार केला होता. पण सर्व्हे केल्यानंतर यातली कॉम्पिटिशन आणि मोठ्या भांडवलदारांची मोनोपोली लक्षात आली आणि हा विषय सोडून दिला.
२०१६ साली कॉलेजमधून डिग्री घेऊन बाहेर पडलो. कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ‘डॉलर’ या फ्लेवर इंडस्ट्रीमधील नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. परंतु नोकरी न करण्याचा विचार पक्का केल्यामुळे व्यवसायासाठी वडिलांकडून काही भांडवल मिळते का याची चाचपणी करण्यासाठी गावी परत गेलो. हाताशी आलेला मुलगा हातची नोकरी सोडून व्यवसाय करायचं म्हणतोय हे ऐकताच घरात गहजब उडाला. नोकरी कर, सेटल हो, तुला लग्नासाठी अनेक मुली सांगून येत आहेत, असं सांगून त्यांनी मला समजवायचा प्रयत्न केला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. माझा हट्ट पाहून घरच्यांनी सांगितलं की यापुढे तुला पॉकेटमनी एकही रुपया मिळणार नाही. तुझा पुण्यात राहण्याचा खर्च आणि व्यवसायाला लागणारं भांडवल हे तुझं तूच बघायचं. ही अट मान्य करून मी पुन्हा पुण्यात दाखल झालो.
मिनरल वॉटर विकणार्या कंपनीत मी पार्टटाइम नोकरी पकडली. तिथे मी पाण्यातील जडपणा आणि क्षारांचे प्रमाण यांची तपासणी करायचो. या पगारातून फार मिळकत होत नव्हती, पण पुण्यातील राहण्याचा खर्च निघत होता. शिवाय या कामाला दोन तीन तासच द्यावे लागत असल्यामुळे नवीन व्यवसाय काय करावा, याबद्दलची माहिती गोळा करणे आणि सर्वे करणे यासाठी वेळ मिळत होता. याच काळात आजूबाजूला स्टार्टअप कल्चर निर्माण होत होतं. ओला, उबर, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विगी असे नवनवीन युनिकॉर्न जन्माला येत होते आणि व्यवसाय करणं ही केवळ भांडवलदारांची मोनोपोली न राहता कोणताही वीस-पंचवीस वर्षांचा तरूण केवळ कल्पनेच्या जोरावर मोठ्यात मोठी व्यावसायिक भरारी मारू शकतो हे दिसत होतं. त्याने आमचा दोघांचाही उत्साह वाढत होता. पण, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जे भांडवल लागतं ते आमच्याकडे नव्हतं. ट्रेडिंग करायचं म्हटलं तर स्वत:चं ब्रँड नेम होऊ शकत नाही, मग सर्विस सेक्टरमध्ये एखादा व्यवसाय करावा, जेणेकरून त्यात भांडवली कमी लागेल आणि आपल्या नावाचा प्रचार आणि प्रसार आपण करू शकतो, या दृष्टीने नवीन व्यवसायाचा शोध सुरू केला. सोलर व्यवसायात नवीन संधी आहे असं समजून सोलरच्या बॅटरीज सोलार पॅनल्स याचा अभ्यास सुरू केला; पण तिथेही भांडवल जास्त लागणार होतं. पुण्यातील सोसायट्यांत ऑनलाइन भाजीविक्रीचाही विचार केला, पण शेतातून भाजीपाला आणणे, त्यांचे वर्गीकरण करून लोकांपर्यंत पोहोचवणे हे तितकं सोपं नव्हतं. भाजीपाला हा नाशवंत माल असल्यामुळे ठराविक वेळेत मालाचा उठाव झाला नाही तर फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल असं लक्षात आलं. त्यामुळे हाही विचार सोडून दिला. एक चांगलं होतं की आम्ही दोघेही चर्चा करून चांगल्या वाटणार्या प्रत्येक व्यवसायातील खाचाखोचा समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. आपली कल्पना भारी आहे असं समजून लगेच मित्रांकडून उधारी घेऊन किंवा बँकेकडून लोन घेऊन कोणताही व्यवसाय आम्हाला करायचा नव्हता.
माझी ताई स्मिता आणि भावजी सचिन आलट गोव्याला राहतात. मी नवीन व्यवसायाच्या शोधात आहे हे ताईला माहीत होतं. एक दिवस तिचा मला फोन आला. ती म्हणाली, आमच्या भागात अनेक हॉटेल्स आहेत. तिथे राहणारे पर्यटक रोज आमच्या शेजारी लॉन्ड्रीत कपडे धुवायला टाकायला येतात. मला वाटतं या व्यवसायाचा तू विचार करावास. मला कल्पना आवडली. अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपैकी एक गरज असलेल्या वस्त्र धुण्याचा व्यवसाय निरंतर चालेल. काळानुरूप आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय केला तर त्याला मरण नाही, असा विचार करून मी या व्यवसायाचा रिसर्च करायला सुरुवात केली. जसजसं या व्यवसायातील पोटेन्शिअल मला कळू लागले तसतसा मी याचा अधिक अभ्यास करू लागलो. जवळजवळ सात-आठ महिने मी पुण्यातील वेगवेगळ्या लॉन्ड्रींच्या बाहेर उभे राहून दिवसातून किती ग्राहक कपडे ड्रायक्लीनसाठी किंवा इस्त्रीला द्यायला येतात याचा सर्वे करत होतो. जुन्या पद्धतीच्या लॉन्ड्रीमधील अनेक लूपहोल्स मला कळत गेले. उदा. कपडे हरवण्याचे प्रमाण तिथे अधिक आहे. धोबी घाटावर किंवा हाताने कपडे धुतले जात असल्यामुळे ते फाटण्याचा प्रमाणही जास्त होतं आणि कोणताही लॉन्ड्रीवाला स्वत: कपडे धुवत नसल्यामुळे ग्राहकाला त्यांचे कपडे धुऊन परत मिळेपर्यंत चार दिवसाचा कालावधी लागतो. बर्याच लॉन्ड्री दुकानांचं फर्निचर जुनाट पद्धतीचं होतं. आयटी क्षेत्रातली तरूण मंडळी आपले महागडे कपडे अशा दुकानात धुवायला टाकायला कां कूं करत असत. आपण हा व्यवसाय सुरू केला तर हा त्रास ग्राहकांना होऊ नये, यासाठी काय बदल करावे लागतील याचा अभ्यास सुरू केला. कपडे धुणे, वाळवणे, इस्त्री करणे हे तसं बोअरिंग काम असतं. अगदी हॉस्टेलवरचे विद्यार्थी असोत अथवा आयटी एम्प्लॉइज, किंवा पर्यटक या सगळ्यांना कपडे धुणे त्रासदायक वाटतंच. बरं, रोज कपडे धुण्यासाठी बाहेर दिले, तर त्याचा खर्च खूप, ते खराब आणि गहाळ होण्याची शक्यताही अधिक. या सगळ्या अभ्यासातून एक आगळीवेगळी इनोव्हेटिव्ह कल्पना सुचली, प्रत्येक कपड्याचे पैसे घेण्याऐवजी आपण कपडे किलोवर धुतले तर? दर किलो कपड्यांमागे ठराविक रक्कम आकारली तर? व्यावसायिक गणित मांडल्यावर ही कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकतो असं वाटलं. नियमित कपडे धुवायला देणार्या लोकांशी बोलून त्यांचं महिन्याचं धोबी इस्त्री बजेट जाणून घेतलं. व्यावसायिक आणि ग्राहक दोघांच्या फायद्याच्या दृष्टीने आमची कल्पना चांगली वाटली. प्रचलित कपडे धुणे आणि इस्त्री करण्याला हा सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देण्याचं आम्ही ठरवले.
या व्यवसायाचा संपूर्ण अभ्यास केल्यावर गणेशने घरून तीन लाख रुपये आणि मी मित्रांकडून व्याजाने तीन लाख रुपये असे सहा लाख रुपये भांडवल जमा करून २०१८ साली जूनमध्ये पहिली शाखा पुण्यातील खराडी परिसरात उघडली. ‘इनोव्हेटिव्ह लॉन्ड्री बास्केट’ हे नाव रजिस्टर केलं. शॉप सुरू करण्यासाठी खराडी परिसर निवडण्याचं कारण म्हणजे या परिसरात मल्टिनॅशनल कंपन्यांत जॉब करणारे तरूणतरुणी मोठ्या संख्येने राहतात. आमच्या ग्राहकाभिमुख लॉन्ड्रीला हा कमावता ग्राहकवर्ग उत्तम प्रतिसाद देईल असा विश्वास वाटत होता. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. कारण व्यवसाय कसा करावा हे आम्ही पुस्तकातून वाचलं होतं किंवा सेमिनारमधून ऐकलं होतं; पण जेव्हा स्वत: तुम्ही सुरुवात करता, तेव्हा धंद्यातील प्रॅक्टिकल गोष्टी कळत जातात आणि रोज नवनवीन अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यातून मार्ग काढत काढत दोघेही शिकत होतो. ऑपरेशन, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग या कामात आम्ही अगदी नवखे होतो. माहितीपत्रके आकर्षकरित्या कशी छापावी आणि आपला टार्गेट कस्टमरपर्यंत ती कशी पोहोचवावी, याचीही माहिती नव्हती. आमच्या लॉन्ड्रीची माहितीपत्रकं वर्तमानपत्रासोबत सोसायटीतील रहिवाशांपर्यंत पोहोचवली, त्यातून खूप चांगला रिस्पॉन्स मिळत गेला. प्रोफेशनल पद्धतीने कपड्यांचं वॉशिंग, ड्रायक्लीनिंग कसे करायचे हे माहीत नव्हतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक चुका झाल्या. काही वेळा ग्राहक नाराज झाले. व्यावसायिक पद्धतीने काम कसं करायचं याचंही ज्ञान आम्हाला काम करतानाच मिळालं.
हळूहळू धंद्यात जम बसत असतानाच २०२० साली कोविडने धंदा पूर्ण बसवला, पण आधीच्या दीड वर्षांत व्यावसायिक अक्कलहुशारी आली होती. कोविडच्या दोन्ही लाटा ओसरल्यावर पुन्हा व्यवसायाला गती आली. आम्ही घरगुती ग्राहकांसोबतच मल्टिनॅशनल कंपन्यांकडे देखील काम मागायला पोहचलो. आमच्या दोघांचं कमी वय पाहून सुरुवातीला बार्कलेज कंपनी अधिकार्यांनी आम्हाला उडवून लावलं, पण चार महिने धीराने पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला संधी मिळाली. चांगली सर्व्हिस देऊन हा ग्राहक आम्ही कायमस्वरुपी आमच्याकडे राहील याची काळजी घेत आहोत. बार्कलेजसारख्या कंपनीचे काम मिळाल्यावर इतर कंपन्या आमच्यावर विश्वास ठेवून येत गेल्या. हॉस्टेल स्टुडंट्स, पेईंग गेस्ट म्हणून राहणारे यांच्यासोबत सोसायट्यांमधूनही कामे येऊ लागली.
आमच्या इनोव्हेटिव्ह लॉन्ड्री बास्केटची खासियत अशी आहे की सगळ्या गोष्टी इन-हाऊस केला जातात. म्हणजेच कपडे तुमच्यासमोर मशीनमध्ये धुतले जातात, ड्रायक्लीनिंग आमच्याच शॉपमध्ये होतं आणि इस्त्री देखील आमच्याच शॉपमध्ये केली जाते. शिवाय आम्ही किलोवर पैसे आकारणं सुरू केलं. कमीत कमी तीन किलो कपडे असतील तर आम्ही फ्री होम डिलिव्हरी देतो. कपडे धुण्याचे दर ५९ रुपये प्रति किलो तर धुवून इस्त्री करून प्रति किलो ८९ रुपये आम्ही घेतो. आमच्या लॉन्ड्रीचे वाजवी दर आणि उत्कृष्ट सर्व्हिस या गोष्टीचा फायदा शॉपच्या परिसरातील मल्टिनॅशनल कंपनीत काम करणारे अनेक तरुण आणि तरुणी घेत आहेत. त्यांचा तीन हजार चार हजाराचा शर्ट आणि इतर महागडे कपडे खराब न होता उत्तम प्रकारे धुवून आणि इस्त्री करून मिळतात ही त्यांच्यासाठी चांगली सर्विस आहे. आमच्याकडे कपडे गहाळ होण्याचे प्रमाण शून्य आहे. कपडे धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी जड असेल तर कपडे लवकर खराब होतात. त्यामुळेच आमच्या प्रत्येक आउटलेटमध्ये पाण्याचा हार्डनेस तपासण्याचं तंत्रज्ञान आहे. आधीच्या नोकरीचा हा फायदा झाला. आमच्या वॉशिंग मशीन संपूर्ण ऑटोमॅटिक असल्यामुळे चांगलं वॉशिंग आणि १०० टक्के ड्राईंग देखील मशीनमध्येच होतं. कपडे बाहेर वाळत टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ग्राहक कपडे घेऊन आला की कपड्याच्या बॅगवर एक बारकोड लावला जातो आणि कागदी बिलासोबतच ग्राहकाच्या व्हॉटसअपवर ई-रिसीट पाठवली जाते. शर्टची कॉलर, खिसे अशा ठिकाणी घामाचे वा इतर डाग असू शकतात, म्हणूनच कपडे मशीनमध्ये टाकण्याआधी ते सॉफ्ट ब्रशने मॅन्युअली प्री वॉश केले जातात. अत्याधुनिक मशीनमध्ये कपडे धुताना आम्ही इकोफ्रेंडली वॉशिंग लिक्विड, पावडर आणि केमिकल वापरतो, जेणेकरून कपड्यांना हानी पोहचणार नाही. कपडे मशीनमध्ये धुताना वॉशिंग (धुणे), रिन्स (खंगाळणे), स्पिन (पिळणे) या क्रिया करायला ३७ मिनिटे आणि ड्राईंगसाठी वीस मिनिटे लागतात. पांघरूण, गोधडी, ब्लँकेट अशा जड कपड्यांसाठी ४० डिग्री सेल्सिअस तापमानाचं गरम पाणी वापरलं जातं आणि कपडे धुण्याचा कालावधी ५३ मिनिटे असतो. ग्राहकांच्या सेवेसाठी सकाळी ९ ते रात्री ९ अशी बारा तास लॉन्ड्री उघडी असते.
आजच्या पिढीला घरबसल्या एका क्लिकवर वस्तू, सेवा मागवण्याची इतकी सवय झालेली आहे की आमच्या लॉन्ड्रीचा पर्याय या जनरेशनसमोर आला, तेव्हा त्यांनी आमचं स्वागतच केलं. तरुणांसोबतच मध्यमवयीन आणि वयस्कर माणसांनाही जुन्या पद्धतीच्या लॉन्ड्री व्यवसायाचे कडू-गोड अनुभव आले आहेत. त्यांनाही आमची आकर्षक, स्वच्छ, किफायतशीर, वक्तशीर सर्विस भावते.
आमच्या व्यवसायामध्ये लेबर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण आमची व्यावसायिकता आणि आपुलकी पाहून आमच्याकडे कामाला आलेला कामगार आजपर्यंत सोडून गेलेला नाही. कोविडच्या काळात दुकान बंद असतानाही आम्ही सर्व कामगारांना पूर्ण पैसे दिले. शॉपमध्येच कामगारांसाठी किचन आणि बाथरूमची व्यवस्था असल्यामुळे स्वत:चं घर नसलेल्या कामगारांचा घरभाड्याचा खर्च वाचतो.
व्यवसायात जम बसला तेव्हा दुसरी शाखा सुरू करण्याचा विचार आम्ही करत होतो. पण सर्वच गोष्टी स्वत:च करू म्हणून व्यवसायात टिकता येत नाही. आपण बुद्धीने आणि कष्टाने वाढवलेल्या या व्यवसायाचा महाराष्ट्रातील तरूण-तरुणींना फायदा व्हावा यासाठी आम्ही फ्रँचायझी मॉडेल बनवलं. आपली कल्पना नकलून कुणीतरी वेगळ्या नावाने ब्रॅण्डिंग करेल ही भीतीही मनात होतीच. आमच्याकडे फ्रँचायझी मॉडेलसाठी भेट दिलेल्या दोनजणांनी वेगळ्या नावाने हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धंद्यातील खाचाखोचा माहीत नसल्यामुळे आणि टिकून राहण्याची क्षमता नसल्यामुळे दुर्दैवाने त्यांना तीन महिन्यांत दुकान बंद करावे लागले. फ्रँचायझी मॉडेलमधील पार्टनर्सना आम्ही स्टोअर्स सेटअप, डिझाईन, व्हॉट्सअप मार्केटिंग, सॉफ्टवेअर आणि ब्रॅण्डिंग याचा सपोर्ट देतो.
टेक्नॉलॉजीमध्ये बिलिंग सॉफ्टवेअर, हायवेअर सिस्टीम यांचाही समावेश आहे. प्रत्येक आउटलेटला एक डेडिकेटेड बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर असतो, जो त्या शॉपच्या परिसरातल्या ग्राहकांचे डेटा अनालिसिस करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करत असतो. व्यवसायवृद्धीसाठी बिझनेस कोचचे मार्गदर्शन आणि व्यवसायातून पैसे मिळाल्यावर ते पैसे कुठे गुंतवावेत, यासाठी फायनान्स कन्सल्टंटचे मार्गदर्शन फ्रँचायझीना देतो. आजवर सुरू केलेले सर्व शॉप ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादात सुरू आहेत. पुढेही अशाच इनोव्हेटिव्ह आयडिया प्रत्यक्षात आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.’
एक नूर आदमी दस नूर कपडा, हे विधान आज अधिक पटतं. आज घड्याळाच्या काट्यांशी स्पर्धा करत धावणार्या तरुणांना अपटुडेट राहायचं आहे, किंबहुना तसं राहणं हा त्यांच्या कामाचा भाग होत चालला आहे. पण कपड्यांचा नूर राखणं हे तसं कंटाळवाणं आणि वेळखाऊ असतं. अशावेळी जर पेहेरावाची स्वच्छता करून, परीटघडीचा कपडा दारात, योग्य दरात येत असेल, तर कुणाला नाही आवडणार? माणसाच्या रोजच्या गरजांशी निगडित व्यवसाय नेहमीच यशस्वी ठरतात. त्यासाठी नवीन व्यवसायच करायला हवा असं नाही, बंद पडत चाललेल्या व्यवसायाला पुनरुज्जीवित करून, त्यात आधुनिक नवीन तंत्रज्ञान आणून केलेला व्यवसाय आपल्याबरोबर आणखी काहीजणांना रोजगार उत्पन्न करून देऊ शकतो. कधीही व्यवसाय न केलेल्या कुटुंबातील, बीटेक झालेल्या दोन मराठी नवउद्योजकांनी हे दाखवून दिलं आहे. त्यांच्याकडून इनोव्हेटिव्ह प्रेरणा घ्यायला हवी.