ऐतिहासिक दिवस! २३ ऑगस्ट २०२३!! या दिवशी भारताच्या वैज्ञानिकांनी/शास्त्रज्ञांनी इस्रोच्या तळावरुन झेपावलेल्या चांद्रयान-३चे चंद्रावर अवतरण होत आहे तर याच दिवशी ‘चंद्र, सूर्य, भरती, ओहोटी आणि विजय वैद्य कुणासाठी थांबत नाही’, अशी गर्जना करणार्या ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजयकुमार दत्तात्रय उर्फ विजय वैद्य यांचा मोठा सन्मान होतो आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीचा घणाघाती प्रहार करणार्या ‘मराठा’कार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या नावाने देण्यात येणारा बहुप्रतिष्ठीत असा मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ विजय वैद्य यांना महाराष्ट्राचे राज्यपाल नामदार रमेश बैस यांच्या शुभहस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या भव्य सभागृहात याच दिवशी प्रदान करण्यात येत आहे. हिंदू पंचांगानुसार अधिक मास पूर्ण होऊन लागलेल्या शालिवाहन शके १९४५च्या श्रावण शुद्ध सप्तमी म्हणजेच सीतला सप्तमीचा हा दिवस आहे. विजय वैद्य यांनी इंग्रजी दिनदर्शिकेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२३ रोजी वयाची ८१ वर्षे पूर्ण करुन ८२व्या वर्षात पदार्पण केले आहे. याचाच अर्थ मुंबई मराठी पत्रकार संघ आचार्य अत्रे पुरस्काराने विजय वैद्य यांचे जणू सहस्त्रचंद्र दर्शन घडवीत आहे.
विजय वैद्य यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते मिळणारा हा दुसरा पुरस्कार आहे. यापूर्वी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीतर्फे राज्यपाल महामहीम विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते राजभवनातील सभागृहात कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
जव्हार या आदिवासी दुर्गम भागात दत्तात्रय आणि काकी वैद्य यांच्या पोटी जन्माला आलेली तीनही मुले चंद्रशेखर, रवींद्र आणि विजय हे मराठी पत्रकारितेला ललामभूत ठरलेले ज्येष्ठ पत्रकार/राजकीय विश्लेषक. रवींद्र वैद्य हे पत्रकारितेबरोबरच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात तसेच गोवा मुक्ती संग्रामात अहमहमिकेने सहभागी झालेले लढवय्ये समाजवादी नेते. त्यांनी नुकतीच २६ मे २०२३ रोजी वयाच्या ९०व्या वर्षी इहलोकीची यात्रा संपविली. चंद्रशेखर हेही ज्वालाग्राही पत्रकारिता करणारे आणि विजय वैद्य हे ठाकरी बाण्याचे लढाऊ पत्रकार. ठाकरी बाण्याचे याचा अर्थ केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि बाळ केशव उर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा परीसस्पर्श लाभलेले आणि पत्रकारिता तसेच समाजसेवा सोन्यासारखी केलेले. सोनं भट्टीतून तावून सुलाखून बाहेर पडते, तद्वतच विजय वैद्य यांची पत्रकारिता आणि समाजसेवा असंख्य संकटांचे, संघर्षाचे, अन्यायाचे घाव सोसून तावून सुलाखून तयार झाली आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि या लढ्याचा ज्वलंत इतिहास संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात शंभराहून अधिक स्लाईड शोंच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन जनतेला, विशेषतः नव्या पिढीला दाखविण्याचे शिवधनुष्य विजय वैद्य यांनी लीलया पेलले. जव्हारहून मुंबईत येताना आणि बोरीवली येथे स्थायिक होण्यापूर्वी विजय वैद्य यांनी अक्षरश: भगवान दत्तात्रेयाप्रमाणे त्रिस्थळी यात्रा केली. तसेही ते दत्तात्रेय पुत्रच आहेत. लहान मुलांना पळवून नेण्याचे प्रकार सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर घडत होते. विजय वैद्य यांनी जंगजंग पछाडून त्याचा छडा लावण्याचा विडाच उचलला आणि अखेर केंद्र सरकारला कायदा बनवावा लागला. प्रेमविवाहाच्या बेडीत अडकलेल्यांनी आपल्या चंद्रासम अर्धांगिनीला सोडून देण्याचे प्रकार घडले. अशापैकी अनेकांना एकत्र आणून पुनश्च हरी ओम म्हणायला लावून त्यांच्या संसाराचा गाडा रुळावर आणण्याचे कामसुद्धा विजय वैद्य यांनी केले.
बाळासाहेब ठाकरे यांनी ११ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना स्थापन केली. परंतु ही संघटना स्थापन होणार अशी बातमी विजय वैद्य यांनी त्यापूर्वीच निळूभाऊ खाडिलकर यांना सांगून ‘नवाकाळ’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केली. दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे हेही अचंबित झाले. त्यांनी आपल्या खास शैलीत वैद्य यांना विचारले, काय रे विजय? ही बातमी तुला कोणी दिली? वैद्य म्हणाले, साहेब, तुम्हीच दिलीत. चेंबूरच्या वसंत व्याख्यानमालेत तुम्हीच याची घोषणा केली होती. ही व्याख्यानमाला विजय वैद्य यांनीच आयोजित केली होती.
चेंबूर, सांताक्रूझ करता करता वैशाली आणि विजय वैद्य यांचा संसार महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थेच्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात ११/८५४ नंबरच्या इमारतीत चाळीस वर्षांपूर्वी सुरू झाला. हीच त्यांची आज खर्या अर्थाने कर्मभूमी झाली आहे. या जय महाराष्ट्र नगर उर्फ टाटा पॉवरच्या भागात चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी मागाठाणे मित्र मंडळ स्थापन केले. या मंडळातर्फे प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय उभे केले. एकता विनायक मित्रमंडळाच्या विद्यमाने उपनगरचा राजा हा मुंबई उपनगरातील सर्वात मोठा गणेशोत्सव सुरु केला. मुंबईतील सुविख्यात शिल्पकार विजय खातू यांनी सुमारे पंचवीस फूट उंच श्रींची मूर्ती याच ठिकाणी बनविण्याचा प्रघात सुरू केला. दुर्दैवाने विजय खातू आज आपल्यात नसले तरी त्यांची कन्या रेश्मा स्वत: जातीने या ठिकाणी येऊन बाबांची परंपरा पुढे चालवीत आहे. विजय वैद्य यांनी चाळीस वर्षांपूर्वी याच जय महाराष्ट्र नगरात गृहनिर्माण मंडळाच्या दोन इमारतींच्या मोकळ्या जाग्ोत वसंत व्याख्यानमालासुद्धा सुरू केली. या व्याख्यानमालेतून त्यांनी असंख्य सामाजिक कार्यकर्ते घडविले आहेत. जय महाराष्ट्र नगर भूषण आणि शारदा पुरस्काराने अनेकांना सन्मानित केले. अनेकांच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप मारुन विजय वैद्य यांनी अनेक नररत्ने समाजाला प्रदान केली. बोरीवलीचा संपूर्ण इतिहास खडानखडा माहित असलेला आणि स्वत:च्याच मस्तीत वावरणारा अवलिया म्हणजे विजयकुमार दत्तात्रय वैद्य!
ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे सतत तीन वर्षे अध्यक्षपद भूषवून त्यांनी जशी हॅट्ट्रिक केली तद्वतच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदाची हॅट्ट्रिकसुद्धा त्यांच्या नावावर नोंदविण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचलेल्या वैद्य यांनी प्रत्येक संस्था संघटनेत वाचनालय/ग्रंथालय याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. ठाणे जिल्हा पत्रकार संघात तर अर्धी चड्डी आणि बनियनवर रात्र रात्र जागून ग्रंथालयात पुस्तके लावण्याचे काम केले. ठाणे जिल्हा पत्रकार संघातर्फे चार जिल्ह्यांतील पत्रकारांचे दोन दिवसांचे ऐतिहासिक शिबीर अंबरनाथ येथे भरविण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले होते.
अटलबिहारी वाजपेयी हे परराष्ट्र मंत्री असताना माधवराव गडकरी हे एकमेव मराठी पत्रकार त्यांच्यासमवेत चीन दौर्यावर गेले होते. तेथून त्यांना थेट अंबरनाथ येथे ठाणे जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी आणण्याचे काम विजय वैद्य यांनी केले. जव्हारला आठ वर्षाचे असताना आचार्य अत्रे लिखित ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकात त्यांनी चंदूची भूमिका केली होती. ठाण्यात मो. ह. विद्यालयात शिकत असताना अत्रे यांना जवळून पाहण्याचा योग त्यांना आला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात ठाण्याच्या तलावपाळीजवळील शिवाजी मैदानात आचार्य अत्रे यांची घणाघाती भाषणे ऐकण्याची संधी अनेक वेळा मिळाली. आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकाचे ते चाहते बनले. त्यामुळे आचार्य अत्रे यांच्या नावाने देण्यात येणार्या या पुरस्काराचे विजय वैद्य यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.
विजय वैद्य यांच्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार देण्याचे ठरवून मुंबई मराठी पत्रकार संघाने वैद्य यांचा आणि पर्यायाने या पुरस्काराचाही बहुमानच केला आहे. या निमित्ताने राज्यपाल महोदयांना एक नम्र आणि कळकळीची विनंती आहे की, विधानपरिषदेत राज्यपाल-नियुक्त जागा रिक्त आहेत. त्यात एक विजय वैद्य यांची नियुक्ती विधानपरिषदेवर करुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरव वाढवावा. विजय वैद्य यांना शतकी खेळी खेळण्याचे भाग्य लाभो आणि अधिकाधिक पुरस्कार प्राप्त होत आपल्या शिरपेचात मानाचे तुरे खोवण्यात येवोत, हीच जगन्नियंत्याकडे प्रार्थना!