‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे!’ अशा शब्दांत साने गुरुजींनी मुलांच्या रंजनाबद्दल अनमोल विचार मांडले होते. पण काळाच्या ओघात रंजनासाठी भलत्याच माध्यमांना अग्रक्रम देण्यात येतोय. मुलाबाळांच्या हातातल्या मोबाईलच्या बोटांवरल्या स्पर्शाला एक माध्यम म्हणून बघितलं जातंय. त्याचं अतिक्रमण हा चिंतनाचा, मानसिक आरोग्याचा विषय झालाय. मोबाइलवरले खेळ हे मुलांचे पहिले आकर्षण ठरले आहे. सत्य, शिव आणि सौंदर्य याचा संगम असणारी कला ही तशी दुर्लक्षित राहिली आहे. आजच्या वेगवान दुनियेत मुलांसाठी त्यांच्या हक्काच्या मनोरंजन आणि आवश्यक संस्कारासाठी कुणालाही जराही वेळच नाही. ही घरोघरातील वस्तुस्थिती सुन्न करून सोडते. त्यात मराठी बालनाटकेही अपवाद नाहीत. अशाही परिस्थितीत जे काही सातत्याने, निष्ठेने प्रयत्न सुरू आहेत, त्यांना म्हणावा तेवढा पाठिंबा दुर्दैवाने मिळत नाही. असो.
गेली तीसएक वर्षे बालरंगभूमीवर रंजन-अंजनाचा वसा चालविणारे निर्माते, दिग्दर्शक, नाटककार ऋषिकेश घोसाळकर यांनी यंदाच्या वर्षात ‘मंकी इन द हाऊस’ या इंग्रजी नावाचे मराठी बालनाट्य वाजतगाजत रंगभूमीवर आणले आहे. या नाटकाच्या निर्मितीच्या वेळेचे एक वेगळेपण. बालनाटके ही मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत रंगभूमीवर प्रगटतात. कारण शाळेला सुट्टी असते. त्यामागे एक निश्चित असा व्यावसायिक दृष्टिकोनही असतो. हे बालनाट्य मात्र चक्क सुट्टी संपल्यावर, शाळा उघडल्यावर मुद्दामच आणलं गेलंय. आता दप्तरं, पुस्तकांची खरेदी करायची, क्लासेसची जुळवाजुळव की नाटकाला जायचं? याचं उत्तर या प्रयोगातून मिळतंय किंवा यापुढेही मिळेल. हा एक व्यावसायिकवरला ‘प्रयोग’च. आता काहींकडून याला व्यावसायिक ‘अंधत्व’ असंही म्हटलं जाईल. पण याचा जो तिकीट विंडोवरला निष्कर्ष असेल, तो बालनाटकांच्या दृष्टीने दिशादर्शक ठरेल. रत्नाकर मतकरी यांच्या विक्रमी ‘अलबत्या गलबत्या’खेरीज दुसरं बालनाट्य आज तरी व्यावसायिक रंगभूमीवर सुरू नाही. त्यात ‘मंकी’ने उडी मारली आहे! माकडउडीच!!
आता या ‘मंकी’च्या बालनाट्यात आहे तरी काय? पडदा उघडतो आणि अलिशान बंगला प्रकाशात येतो. सुखवस्तू घर. जे सुशिक्षित तसच सुसंस्कृतही. आजी-आजोबांची सार्यांवर नजर. त्यांचा मुलगा डॉक्टर आशुतोष आणि सूनबाई डॉ. पूर्वा. हे दोघेही रुग्णालय-दवाखाना यात बिझी. मुलांसाठी, घरासाठी त्यांना वेळ नाही. आजोबाही तसे डॉक्टरच. पण जुन्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आयुर्वेदिक डॉक्टर! या घरात त्यांनी दोन नातवंडे आहेत. दोघेही शाळकरी. अभ्यासू. स्मार्टफोन, टीव्ही यात गुंतलेले. मुलगा वेद आणि मुलगी स्पृहा. ही दोघे वगळता बाकी सारी बडी मंडळी.
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातून माकडे भरवस्तीत शिरतात. धुमाकूळ घालतात. खाद्याच्या शोधात जंगलातून वस्तीत येतात. त्याबद्दलच्या अनेक तक्रारी वारंवार करण्यात येतात. त्यांना पकडून मारण्याचाही प्रयत्न काहीवेळा दुष्ट मंडळी करतात. या आणि अशा आशयाच्या बातम्या सतत वाचनात येतात. इथल्याही बंगल्यात एके दिवशी अचानक एक माकड घुसते आणि एकच गोंधळ उडतो. आजोबा आणि मुलांचा त्याला सांभाळण्याचा, त्याच्याशी मैत्री करण्याचा निर्णय होतो खरा, पण सर्वांपासून माकडाला लपवण्याची जणू ‘परीक्षा’च पुढे येते. त्यात ही ‘टीम’ काही दिवस यशस्वीही ठरते. या माकडाचे बारसे करण्यात येते. ‘रोमी’ असे नामकरण होते. तोही त्याला होकार देतो. ‘माकडा माकडा हुप, तुझ्या मिशीला पावशेर तूप’ याची आठवण येते. ‘रोमी’ घरातलाच एक सदस्य बनतो, पण ही लपवाछपवी आणि पळापळ अखेर उघड होते. या भोवतीच्या एकेक दे धम्माल प्रसंगांची मालिका नाटककार आणि दिग्दर्शकांनी कल्पकतेने उभी केलीय. कथानकाचा शेवट अर्थातच रंजनातून अंजनाकडे घेऊन जातो. नाट्य प्रत्यक्ष अनुभवणं उत्तम.
नाटककार आणि दिग्दर्शक एकच असल्याने एकूणच दोन अंकी नाटक बंदिस्त बनलंय. कलाकारांकडून नेमकेपणानं भूमिका साकार करून घेण्यात आल्यात. कलाकारांची सारी ‘टीम’ अनुभवी असल्याने नाट्य कुठेही निसटत नाही. आजोबांच्या भूमिकेत विनोदाची पक्की जाण असलेले संजय देशपांडे यांनी हक्काचे हशे वसूल केलेत. दिवंगत विनोदी अभिनेते किशोर नांदलस्कर यांच्या लवचिकतेची आठवण करून देणारी त्यांची देहबोली आहे. त्यांच्यासोबत प्रियांका कासले आजी म्हणून चांगली साथसोबत करतात. आजीआजोबांचे हे जोडपे शोभून दिसते. अनूप जाधव यांचा डॉ. आशुतोष हा टिपिकल उच्चारांमुळे लक्षात राहतो. विसरभोळेपणाही ‘मस्तच’. डॉ. पूर्वाच्या भूमिकेत हेमांगी सुर्वे यांनीही प्रसंगात चांगले रंग भरलेत. ‘विनोदी अभिनेत्री’ म्हणून त्यांचा नुकताच गौरव झाला होता. त्यांचे ट्यूनिंग उत्तम. मंदार मुसळे यांचाही पेशंट लक्षवेधी. चिंतन लांबे यांच्या ‘वेद’ या भूमिकेत सहजता आहे. स्पृहा बनलेल्या रमा भेरेसोबत चिंतन, अनुप, हर्ष यांच्याही भूमिका चांगल्या आहेत. आणि ‘टायटल रोल’ असलेला रोमी मंकी बनलेला राजेंद्र तुपे याने मर्कटलीलांमधून ‘मंकी’ मस्त पेश केलाय. माकडाचे अनेक बारकावे नेमकेपणाने टिपले आहेत. सर्वच कलाकारांची कामगिरी चोख आहे.
तालासुरात Dााणि वेगात प्रत्येक प्रसंग सजवण्यात आलाय. हिमांगी सुर्वे हिने यातील गाण्यांना आकर्षक, ताल दिलाय. नृत्ये चांगली झालीत. बालगोपालांसह पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. ‘छबीदार छबी मी तोर्यात उभी’ किंवा ‘तूने मारी एंन्ट्री यार रोमी दिल में बजी घंटी’ आणि ‘तू इस्पिक का एक्का तू ही मंकी दिलदार मेरा पक्का’ ही गाणी ज्या तालात पेश होतात ती सुरेखच. बालप्रेक्षकही त्या तालावर घुमू लागतात. ‘मंकी’ची रंगभूषा आणि वेशभूषा हीदेखील नोंद घेण्याजोगी आहे. मंकीचा मुखवटा न वापरता चेहर्यावर केलेला मेकअप सुरेखच. त्यामुळे मंकीच्या भावभावना नजरेत भरतात. प्रवीण भोसले यांनी गॅलरीसह उभा केलेला दिमाखदार दिवाणखाना सुरेख. ‘मंकी’ला लपवाछपवीसाठी अनेक जागा आहेत. हालचालींना पुरेशी मोकळीक आहे. बाबू शिगवण यांची प्रकाशयोजना उत्तम. संगीतकारांचीही कामगिरी बरी. तांत्रिक अंगे बालनाट्य रंगविण्यास पूरक ठरली आहेत.
रोमी मंकी हे या सादरीकरणातलं प्रमुख आकर्षणच. एका क्षणी हा रोमी गायब होतो आणि एकच शोधाशोध सुरू होते. बनवाबनवी करून त्याला घरात ठेवल्यामुळे कुणाला सांगायचीही सोय उरत नाही. अखेर अचानक प्रेक्षकांच्या खुर्चीवरून उड्या मारत रोमी प्रगटतो. तेव्हा बालप्रेक्षक हे नाट्यगृह अक्षरशः डोक्यावर घेतात. आणखी असाच एक प्रसंग आहे. त्यावेळी रोमी हा टक्कल असलेल्या आजोबांचं मालिश करतो. त्याही वेळी लहानमोठ्या सारेजणांची हसून हसून पुरेवाट होते. मध्यंतरात आणि प्रयोगानंतर रोमी मंकीला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फीसाठी जी काही गर्दी उसळते, ती म्हणजे या नाटकाला मिळालेली शंभर नंबरी दाद आहे.
एक निरीक्षण. मराठीप्रमाणे अमराठी रसिकही प्रयोगाला बर्यापैकी दिसतात. कदाचित नाटकाचे इंग्रजी टायटल असल्यामुळेही असेल, पण त्यांना भाषेची अडचण होत नाही, हे विशेष! एका बालरसिकाने मंकीशी हात मिळविताना म्हटले, ‘मंकी रोमी हुप हुप; तेरे शेंडी को लगा तूप!’ ही बोलकी प्रतिक्रिया खूप काही सांगून गेली. पहिल्या अंकातील दोन प्रसंग हे अजूनही वेगवान असावेत तर दुसर्या अंकातला शेवट हा धम्माल उडविणारा ठरतो. यात अनेक मोकळ्या जागा दिग्दर्शक, नाटककाराने तयार ठेवल्यात, त्या प्रयोगाच्या सादरीकरणातून भरत जातील अशी आशा करण्यास हरकत नाही. ‘मंकी’सोबतचा क्रिकेटचा सामनाही मस्तच झालाय!
वाघ, सिंह, अस्वलं, कुत्रे, माकडं, गाढव इथपासून ते पोपट, कावळे, चिमण्यांपर्यंत अनेक प्राणी व पक्षीही यापूर्वी रंगभूमीवर आणले गेले आहेत. खास करून बालनाट्यासाठीही त्यांचा वापर केला गेलाय. आज जंगलातले हे पशुपक्षी माणसांपासून दूर चालले आहेत. कारण जंगले गायब होत आहेत. त्यावर गगनचुंबी इमारतींचे साम्राज्य पसरले आहे. निसर्ग नष्ट करून त्यावरील अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढली आहेत. हिरवं रान वाचवण्यासाठी त्याच्या रक्षणासाठी आज चळवळी उभ्या राहिल्यात. मोकळ्या शुद्ध हवेसाठी पैसे मोजण्याची वेळ आलीय. कोट्यावधी रुपये यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च होतात खरे, पण तरीही ते तोकडेच पडतात. बालगोपालांचे आकर्षण असणारे पशुपक्षी हे अशा कथानकातून खुबीने रंगभूमीवर आणून अप्रत्यक्ष एक विचार, संस्कार, शिकवण देण्याचा हा प्रयत्न तसा कौतुकास्पदच.
‘बालकांसाठी स्वतंत्र रंगभूमी’ हा प्रयत्न आणि प्रयोग सर्वप्रथम सुधाताई करमरकर यांनी केला होता. विदेशातील बालरंगभूमी त्यांनी जवळून बघितली आणि त्या प्रभावित झाल्या. सुधाताईंनी खर्या अर्थाने बालरंगभूमीला व्यावसायिक रंगभूमीची दारे सताड उघडी केली. रत्नाकर मतकरी लिखित आणि सुधाताई दिग्दर्शित ‘मधुमंजिरी’ हे पहिले बालनाट्य म्हणून ओळखले जाते. ‘बालमनाच्या संस्कारासाठी बालनाट्य’ ही संकल्पना त्यांनी पूर्णपणे साकार केली. दर्जेदार बालनाट्ये रंगभूमीला दिली हे विसरून चालणार नाही. त्याच वाटेवरून शेकडो बालनाट्यांचा प्रवाह सुरू झाला. यात ‘मंकी’ या नव्या निर्मितीमुळे काही प्रमाणात का होईना रंजन-अंजनाचा वाटा उचलला जातोय हेही काही कमी नाही.
चाकोरीबद्ध जीवन जगणार्या एका मॉडर्न शहरी कुटुंबात जंगली माकडामुळे दे धम्माल उडते. आणि खेळकर, सळसळत, नाचतं खेळतं नाट्य बनतं. बालकांप्रमाणे त्यांचे पालकही हे नाट्य एन्जॉय करतात, हेच याचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल!
मंकी इन द हाऊस!
लेखक/ दिग्दर्शन – ऋषिकेश घोसाळकर
नेपथ्य – प्रवीण भोसले
संगीत – हर्षला सावंत
नृत्य – हिमांगी सुर्वे
प्रकाश – बाबू शिगवण
वेशभूषा – पप्पू धवन
रंगभूषा – देवा सरकटे, प्रतीक मिस्त्री
व्यवस्थापक – शाश्वती सावंत
सूत्रधार – गोट्या सावंत
निर्माता – ऋषिकेश घोसाळकर
निर्मिती – साईराज प्रोडक्शन