(कुठल्याशा मैदानात शालेय मुलींची स्पर्धा भरलेली. बाजूच्या जॉगिंग ट्रॅकवरून दोन म्हातारे शब्दश: पळतायत. पळता पळता दमून एका झाडाखालच्या बाकड्यावर बसतात.)
झोटिंग : स्पर्धा छान चालल्यात ना?
गिधाड : पण मी काय म्हणतो, मुलींच्या कशाला घ्याव्यात असल्या स्पर्धा?
झोटिंग : अरे शारीरिक विकासासाठी अशा स्पर्धा चांगल्यात की!
गिधाड : काय गरज आहे याची? त्यापेक्षा घरकाम केलं की होतंय! आधी कुठं होतं असलं काही?
झोटिंग : अरे, मुलींनी शिकावं, प्रगती करावी असं वाटत नाही का तुला?
गिधाड : बाहेर मुलींवर अत्याचार किती होताय बघतोय ना?
झोटिंग : म्हणून मुलींनी शिकू नये का? अत्याचार रोखण्यासाठी दुसर्या काही उपाययोजना करता येतील की!
गिधाड : माझ्या डोक्यात आहेत भारी आयडिया!
झोटिंग : सांग की!
गिधाड : अलीकडं लहान मुलींवर अत्याचार होतात ना?
झोटिंग : हो!
गिधाड : आता ह्या मैदानात बघ, ह्या मुलींनी शॉर्ट पॅन्ट, टी-शर्ट घातलेत.
झोटिंग : स्पर्धा आहे रे! तिथं तसा पोशाख गरजेचा आहे!
गिधाड : मी उपाय सांगतोय ना? थांब थोडा वेळ! ऐकून घे! आता पलीकडून ती फोनवर बोलत ती मुलगी चाललीय.
झोटिंग : घरच्यांशी बोलत चालली असेल रे ती!
गिधाड : अरे तिचे दोन्ही हात उघडे आहेत त्याकडे बघ की! मी उपाय सांगतोय ना?
झोटिंग : हां, बोल! मी नाही बोलणार मधी!
गिधाड : अशा सगळ्या मुलींना ड्रेसकोड सक्ती करायची…
झोटिंग : म्हणजे?
गिधाड : त्यांना अंगभर कपडे घालायला लावायचे…
झोटिंग : काय सांगतो? त्याच्याने अत्याचार थांबतील?
गिधाड : माझ्याकडे फुलप्रूफ प्लॅनय! ऐक तू! इराणमधी तर चेहरा सोडला तर पूर्ण अंग झाकायला लागतं. तिथं कुठं होतात महिलांवर अत्याचार?
झोटिंग : खरं की काय?
गिधाड : प्रश्न आहे का? व्हॉट्सअपवर येतंय की अलीकडं सगळं…
झोटिंग : पण फक्त अंगभर कपडे घालून होईल? त्यापेक्षा मुलांवर काही संस्कार वगैरे?
गिधाड : त्याचा पण प्लॅन आहे बघ.
झोटिंग : सांग की पटकन!
गिधाड : आधी तर मुलामुलींच्या शाळा वेगवेगळ्या करायच्या…
झोटिंग : का रे?
गिधाड : ही शाळा-कॉलेजात लफडी जास्त होतात आजकाल त्यामुळं…
झोटिंग : तेवढ्याने थांबंल?
गिधाड : ऐक तर पुढं! जिथं शक्य नसेल तिथं मुलामुलींत पडदा लावायचा…
झोटिंग : आणि संस्कार…?
गिधाड : मुलांच्या पुस्तकांत प्रेमकविता, तसले धडे असतील ते वगळायचे. आणि ते विज्ञानात असतंय ना, प्रजनन वगैरेवर काही?
झोटिंग : हो! मुलं शिकली पाहिजे की…
गिधाड : आधीच्या पिढीला कोणी शिकवलं का असं काही? झालीच ना त्यांना पोरं? ही अशी अश्लील पुस्तकं- धडे बाद करायचे!
झोटिंग : पण कामाच्या ठिकाणी पण हा धोका आहेच की!
गिधाड : त्यासाठी पण…
झोटिंग : बोल की काय आयडिया आहे?
गिधाड : जे बायांचे कामं आहेत, तिथंच त्यांना कामं द्यायची. त्यातपण दहा-वीस महिला/मुली जात असतील तर त्यांना पाठवायचं…
झोटिंग : आणि हे त्यांना पर्यटन स्थळं फिरावी वाटली तर…?
गिधाड : लहान असताना वडिलांबरोबर, भावाबरोबर, त्यानंतर नवर्याबरोबरचं बाहेर जावं त्यांनी!
झोटिंग : याच्याने अत्याचार थांबतील?
गिधाड : शंभर टक्के!
झोटिंग : थोडक्यात तू दोर आणून खुंटा रोवून महिलांना बांधणंच बाकी ठेवलंय की.
गिधाड : काहीही काय? महिला सुरक्षित ठेवण्याच्या भारी आयडिया दिल्या मी तुला…
झोटिंग : त्यापेक्षा असं केलं तर?
गिधाड : काय?
झोटिंग : तुझ्यासारखी महिलांना पशुवत मानणारी खुळी पब्लिक शोधायची…
गिधाड : माझ्यासारखी?
झोटिंग : हो, हो! तुझ्यासह, तुझ्यासारखी! ज्यांना महिला, मुली मुक्तपणे वावरलेल्या आवडत नाही, ज्यांना महिला ‘वस्तू वा दौलत’ वगैरे वाटते. अशांना मानसोपचारतज्ज्ञाकडे नेऊन चांगले उपचार करवावे…
गिधाड : म्हणजे माझ्यावर उपचार करणारे तू?
झोटिंग : मग? तुला हे ठाऊक नाही? महिलांवर होणार्या अत्याचारांत ओळखीच्या लोकांकडून होणारे अत्याचार किती आहेत ते? आणि जागा वा मुली/महिलांचा पोशाख यांनी अत्याचार होणं अथवा न होणं यावर काहीही परिणाम होत नाही ते? खरं तर महिला अत्याचारांत तुझ्यासारख्यांची असलेली संशयखोर वृत्ती त्यात काहींची विकृती आणि काहींची सडकी डोकी यांचा जास्त दोष आहे. जिथं शक्य आहे तिथं टाळक्यांवर उपचार करावेत वा उचलून ही टाळकी जेलमध्ये डांबावी. नाहीतर महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला वेळ लागायची नाही.