ग्रहस्थिती : बुध वृषभ राशीत, मंगळ, शुक्र कर्केत, केतू तुळेत, हर्षल-राहू-गुरू मेष राशीत, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीत, शनि कुंभेत. विशेष दिवस : ९ जुलै भानुसप्तमी, कालाष्टमी, १३ जुलै कामिका एकादशी.
मेष : महत्वाचे निर्णय घेणे टाळा. आर्थिक फटका बसू शकतो. कलाकार, खेळाडू, लेखक, संगीत सर्जकांसाठी काळ चांगला राहील. नोकरीत काळजी घ्या, वरिष्ठांबरोबर जपून बोला, वाद टाळा. व्यावसायिकांचा व्याप वाढून प्रकृतीवर ताण येऊ शकतो. कुटुंबात, विशेषत: पती-पत्नीमध्ये वाद घडू शकतात. आर्थिक बाजू चांगली राहील. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. विद्यार्थीवर्गासाठी चांगला काळ. उच्चशिक्षणात मनासारख्या घटना घडतील.
वृषभ : नोकरीत नव्या जबाबदारीमुळे वेळापत्रक विस्कळीत होऊन आरोग्यावर परिणाम होईल. विवाहेच्छुकांचे लग्न जमेल. न्यायालयातले दावे मार्गी लागतील. आर्थिक लाभाची संधी मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल, चिडचिड होईल. सामाजिक कार्यासाठी वेळ देताना भान ठेवा. नोकरी, व्यवसायात वेळेचे व्यवस्थापन करा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. घरात शुभवार्ता कानी पडेल. नवी वास्तू घेण्याचा विचार मार्गी लागेल. सार्वजनिक ठिकाणी जपून बोला.
मिथुन : तरुणांना यश मिळेल. नोकरीच्या संधी चालून येतील. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. नव्या ऑर्डर मिळतील, आर्थिक बाजू भक्कम होईल. जुने येणे वसूल होईल. उधार देणे टाळा. बंधू वर्गाबरोबर जमवून घ्या. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थीवर्गासाठी चांगला काळ. खेळाडूंना यश मिळेल. कुटुंबात वातावरण उत्तम राहील. वर्षा सहलीचे आयोजन कराल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल.
कर्क : नोकरी-व्यवसायात हाय टेन्शनचे वातावरण राहील. ध्यान-धारणा, मन:शांती यात मन रमवा. सरकारी कामे पूर्ण होतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. बौद्धिक कौशल्याच्या जोरावर काम मिळवा. नव्या संकल्पना राबवण्याआधी थोडे थांबून पुढे जा. नुकसान टळेल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. मामा-मावशीकडून लाभ होईल.
सिंह : मनासारख्या घटना घडतील. नोकरीत प्रमोशन, व्यवसायात वृद्धी, अशा मोठ्या भाग्योदयाच्या घटना अनुभवायास मिळतील. शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने विदेशात जाण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. महिलांशी बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत पैशाचे व्यवहार पाहणार्यांनी काळजी घ्यावी. संगीत, कला, चित्रकला यांतील मंडळींसाठी उत्तम काळ आहे. अति उत्साह नको. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. धार्मिक कार्याला वेळ द्याल.
कन्या : भाऊ-बहिणीच्या प्रकृतीच्या बाबतीत हयगय करू नका. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. काहीजणांना नव्या नोकरीच्या संधी येतील. प्रमोशन, पगारवाढीबरोबरच कामासाठी बाहेरगावी अथवा विदेशात जाण्याच्या संधी मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांचे सत्कार होतील. मेडिकल, कृषी क्षेत्रात उत्तम काळ. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या, फसवणूक टाळा. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे.
तूळ : तरुणांना लाभ मिळवून देणारा काळ आहे. सततचे वाद टाळा. शांत राहून काम करा. व्यवसायात यश मिळेल. काहीजणांना नव्या ओळखींमधून चांगले लाभ मिळतील. शुभघटनांचा अनुभव मिळेल. सरकारी कामे नियमात राहून करा. प्रवासात विशेष काळजी घ्या. नोकरीत कामाचे कौतुक होईल. नात्यात दुरावा येईल असे बोलू नका. महिलांना धनलाभ मिळेल.
वृश्चिक : वास्तू, वाहनाच्या खरेदीत काळजी घ्या. भागीदारीत कटकटीचे प्रसंग घडू शकतात. थकीत येणे वसूल होईल. पैशाचा वापर जपून करा. मौजमजेवर खर्च टाळा. हितशत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवा. ज्येष्ठांना पोटाचे त्रास होतील. संशोधन क्षेत्रात यश मिळेल. खेळाडूंना स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत शब्दाने शब्द वाढवू नका. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल. जमिनीचे व्यवहार करणार्यांना लॉटरी लागेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनु : तरुणांना विदेशात शिक्षणाच्या संधी चालून येतील. अतिउत्साहाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका. व्यावसायिकांवर धनवर्षा होईल. नवीन ओळखींमधून मोठे काम मार्गी लागेल. घरगुती समारंभात नातेवाईक, मित्रमंडळी यांची गाठभेट होईल. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. लॉटरी, सट्टा, शेअर, यात गुंतवणूक टाळा. ध्यानधारणा, अध्यात्मामुळे मन प्रसन्न राहील.
मकर : भागीदारीत वाद होतील. सरकारी कामे लांबणीवर पडतील, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य खराब होईल. घरातील ज्येष्ठांच्या आजारपणावर पैसे खर्च होतील. महिलांबरोबर जपून वागा. आध्यत्मिक ठिकाणांना भेटी द्याल. प्रवासात चीजवस्तू सांभाळा. नोकरीत हट्ट करू नका. व्यवसायात जपूनच पावले टाका. पावसाळ्यात मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उधार-उसनवारी टाळा.
कुंभ : संमिश्र घटनांचा अनुभव देणारा काळ आहे. तरुणांना यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी अंग झटून काम करा. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. व्यावसायिकांची आर्थिक बाजू भक्कम होईल. पावसात आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. कापणे, भाजणे अशा घटना घडू शकतात. आर्थिक बाजू पाहूनच पैसे खर्च करा. अतिउत्साह नको. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. अन्यथा पोटाचे आजार जडतील.
मीन : घरात मोठा खर्च होईल. पर्यावरण क्षेत्रात चांगला अनुभव येईल. लेखक, पत्रकार, संगीत सर्जकांना उत्तम काळ आहे. शुभघटनांचा अनुभव येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. मुलांसाठी सर्वोत्तम काळ. शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. कर्जाचे काम रेंगाळू शकते. धार्मिक ठिकाणांना भेटी द्याल. दाम्पत्यजीवनात आनंददायक काळ राहील.