स्वतःच्या शेतात लागवड केलेल्या ऊसापासून गूळनिर्मिती हा शेतकर्यांसाठी चांगला व्यवसाय पर्याय आहे. स्वतःचं गुर्हाळ सुरू करण्यासाठी मोठ्या जागेची अथवा फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता नाही हे सुहास पाटील या शेतकर्याने दाखवून दिलं आहे. साखर कारखान्याबाहेर किंवा दुसर्यांच्या गुर्हाळाबाहेर रांगेत उभं राहून गप्पांचं गुर्हाळ टाकण्यापेक्षा, हे स्वत:चं गुर्हाळ कधीही बेस!
– – –
ग्रामीण भागात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय ही उत्पन्नाची दोन प्रमुख साधने आहेत. याच्याच पुढची पायरी म्हणजे शेतमालाचे बायप्रॉडक्ट बनवून विकणे. केवळ शेती करण्यापेक्षा बाय प्रॉडक्ट बनवून विकणे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरते. आपल्याकडे अनेक शेतकरी आता शेती अधिक व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळत आहेत, यापैकी एक नाव म्हणजे सुहास पाटील. जुन्या साहित्यांचा वापर करून कमी भांडवलात आणि फक्त दोन माणसांत गुर्हाळ चालवता येतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि हा प्रयोग अनेक शेतकरी मुलांना शिकवला आहे. ‘खरा गूळ’ या नावाने ते सेंद्रिय गूळ आणि गुळाचे अनेक पदार्थ विकतात. गाव सोडणार नाही आणि नोकरी धरणार नाही हा मंत्र आयुष्यभर जपत त्यांनी गुळाचा गोडवा कसा जपला हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला.
सुहास पाटील म्हणाले, ‘दत्तगुरूंचे स्थान श्री क्षेत्र औदुंबर हे आमचं गाव. आम्ही दोन भाऊ आणि दोन बहिणी, माझा जन्म १९७२ सालचा. शाळेत मी शेवटच्या बाकावर बसायचो, वाचनाचा मला कंटाळा, वाचण्यापेक्षा एखादी गोष्ट समजली की करून बघण्याकडे माझा कल अधिक. रानात फिरणे, तिथला झाडपाला, झाडझडोरा मला आवडायचा. दहावीपर्यंत गावी मग बारावीपर्यंत आष्टा येथे, त्यानंतर तासगावला बी.कॉम केलं. त्यावेळी पदवी परीक्षा झाल्यावर लगेच नोकरी मिळायची. माझी उंची चांगली सहा फूट, पर्सनॅलिटी चांगली, त्यामुळे पोलीस भरतीत लगेच निवड होईल, असं आजूबाजूच्या सगळ्यांचं मत होतं. पण पोलिसाच्या नोकरीत बदली खूप, कामाच्या वेळा अनिश्चित त्यामुळे मला त्या नोकरीचं आकर्षण नव्हतं; बँकेच्या नोकर्याही चिक्कार होत्या, पण नोकरी हा प्रकार माझ्यासाठी नाही हे मला फार लहानपणीच कळून चुकलं होतं. गड्या आपुला गाव बरा, हे शहाणपण शहरात न राहता उमगलेल्या भाग्यवान लोकांतील मी एक.
कॉलेजात असताना पुण्यातल्या दुकानात कपडे घ्यायला जाणं, कधी सिनेमासाठी शहरात जाणं हे करायचो, शहरी माणसांत मिसळून जायचो. पण गावची मोकळी हवा, कसदार अन्न याची सर शहराला नाही, असं तेव्हाही वाटायचं. गाव सोडायचं नाही आणि नोकरी धरायची नाही, हे पक्कं असल्याने माझ्याकडे दोन पर्याय होते, शेती किंवा धंदा. माझे वडील पूर्णवेळ शेतकरी होते, त्यात त्यांचे प्रयोग सुरू असायचे. त्यामुळे शेती पूर्णपणे माझ्या हातात नव्हती. त्याचवेळी, म्हणजे १९९३ची गोष्ट- माझ्या मुंबईच्या एका मित्राचं गावी लग्न होतं, त्याने फोटो कसे काढायचे ते सांगितलं आणि लग्नाचे फोटो काढण्यासाठी माझ्या हातात कॅमेरा सोपवला. मी मला जमेल तसे फोटो काढले, नशिबाने ते चांगले आले. तो अनुभव मला आवडला, आपण फोटोग्राफर व्हायचं असं ठरवलं. लागलीच तेव्हाचा सगळ्यात चांगला झूम लेन्स असलेला चाळीस हजारांचा कॅमेरा खरेदी केला आणि गावातच स्टुडिओ टाकायचं ठरवलं. घरची परिस्थिती सधन होती. पोरगा काहीतरी करतोय म्हटल्यावर घरच्यांनी विरोध केला नाही, तर पाठिंबाच दिला. महागडा कॅमेरा आणला खरा, पण त्यात रोल कसा घालायचा ते मला कळत नव्हतं. एवढ्या किमतीच्या वस्तूसोबत आणल्या आणल्या प्रयोग करायला धाडस होत नव्हतं. गाडी काढून भिलवडीचा स्टुडिओ गाठला. तिथला फोटोग्राफर ऑर्डरसाठी बाहेर गेला होता, संध्याकाळी सात वाजता तो आला, कॅमेरा, कॅमेर्याची बॅग असा तामझाम पाहून तो आवाक झाला. मला कॅमेरात रोल घालता येत नाहीये, त्यासाठी मदत हवी आहे, असं कळल्यावर, ‘लेका आरं चाळ्ळीस हजाराचा कॅमेरा घेऊन फिरायलाय अन रोल घालाया येईना व्हय तुला!’ त्याने एका सेकंदात कॅमेरा उघडून रोल घालून दिला. एकदा रोल घालायला शिकल्यावर पुढचं काम मला येत होतं, त्यावेळी फोटोग्राफर आणि स्टुडिओच कमी होते. फोटो डेव्हलप करायला शहरातल्या फोटो लॅबमध्ये जावं लागायचं. त्यामुळे लग्नाचे फोटो पहिल्या मुलाच्या बारशाला, वाढदिवसाचे मुंजीला, अशी कासवाच्या गतीने डिलीव्हरी व्हायची. मी मात्र वेगात काम सुरू केलं. आज लग्नाचे फोटो काढले की संध्याकाळी सांगलीला फोटो लॅबमध्ये जाऊन फोटो डेव्हलप करायचे, दुसर्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजा संपेस्तोवर फोटो लग्नघरी हजर करायचो, फोटोची क्वालिटीही उत्तम असायची. त्यामुळे लग्न, मुंज, बारस, डोहाळजेवण, वाढदिवस, लग्नासाठी दाखवण्यासाठी विवाहोत्सुक मुलामुलींचे फोटो असे सगळ्या प्रकारचे फोटो मी काढायला लागलो. माझं कॅलेंडर पूर्ण पॅक असूनही डिलिव्हरी ठरल्या टायमाला करायचो.
तेव्हा वर्षभर समारंभ नसत, सगळ्यांनाच फोटोग्राफर परवडायचा नाही. त्यामुळे पावसाळा, पितृपक्ष आणि काही दिवस माझ्याकडे मोकळा वेळ असायचा. त्यातून मी प्रेस फोटोग्राफीकडे वळलो. आजूबाजूच्या गावात होणारे कार्यक्रम, समारंभ यांच्या बातम्या वर्तमानपत्रात यायच्या. त्या कार्यक्रमाचे फोटो काढून प्रिंट करून वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये देणे हे माझं काम होतं. या निमित्ताने मी खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना ऐकू शकलो. त्यांचे अनुभव ऐकता ऐकता मला नक्की काय करायचं आहे हे मला समजू लागलं. तोवर लग्नही झालं होतं, गावातच राहण्याचा विचार पक्का होता. पण फोटोग्राफीशिवाय अजून काय करता येईल, याचा शोध घेत होतो.
गावखेड्यात शेतीविषयक आणि शेतीपूरक कार्यक्रम अधिक व्हायचे, फूड इंडस्ट्रीमधे करण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत, हे कळून माझी दिशा ठरत होती. एकदा देशी गाईंवर आधारित कार्यक्रम होता. गाईच्या दुधापासून तयार केले जाणारे तूप आणि त्याचे आरोग्यदायी लाभ हे मी त्या कार्यक्रमात ऐकलं. गाईचं तूप हा विषय मला एकदम पटलाच, मला पाच मिनिटाचा कार्यक्रम लागतो, मी लय अभ्यास करत बसत नाही. तिथून जवळच जतमध्ये माझी सासरवाडी होती, सासर्यांच्या पाहुण्यांचा गोठा होता. जावईबापूंना गाय हवी आहे म्हटल्यावर मी पसंत केलेली एक खिल्लारी गाय त्यांनी माझ्या स्वाधीन केली, संध्याकाळी घरी परत आलो ते गाय घेऊनच. आधी आईवडिलांनी आणि नंतर बायको व सासरची मंडळी असा सगळ्यांनी व्यवसाय उभारणीत मला नेहमी पाठिंबा दिला आहे. गाय घरी आल्यावर, तिची उत्तम काळजी घेणे, दुधापासून उत्तम प्रतीचं तूप बनवण्यासाठी वेगवेगळ्या तापमानात दुधावर प्रयोग करून बघणे, तयार तुपाची तपासणी यात मी व्यग्र होतो. हळूहळू सात गायी गोठ्यात आल्या. खिल्लार गाय दिवसाला एक दीड लिटर दूध देते. खिल्लारची वासरे शर्यतीत अधिक वापरले जातात. तूप बनवण्याच्या दृष्टीने खिल्लार गायी फार फायदेशीर नव्हत्या, कारण पस्तीस लिटर दुधापासून एक किलो तूप तयार होत असे. देशी गाईच्या अधिक दूध देणार्या जातीचा शोध घेतला असता कळलं की गीर गायी दिवसाला दहा ते बारा लिटर दूध देतात. गीर गाय मला योग्य वाटली. आता गीर आणि खिल्लार मिळून ११ गायी झाल्या.
दुधाची आवक वाढल्यावर मला तूप अधिक प्रमाणात बनवता आलं. आमचं औदुंबर गाव म्हणजे दत्त स्थान. इथे होमहवन पूजाअर्चा सुरू असतात. हवन करण्यासाठी शुद्ध तुपाची आहुती दिली जाते. भेसळयुक्त तुपाची आहुती दिल्यास, हवन सामुग्रीसोबत होणार्या ज्वलनामुळे धूर निर्माण होतो, डोळ्यांना आणि श्वास घेण्यास त्रास होतो. धूरमय हवनगृहामुळे वातावरणाचं पावित्र्य उणावतं. मी बनवलेलं तूप हवनासाठी वापरलं तेव्हा धूर कमी होऊन पूजेला बसणार्या लोकांचा त्रास कमी झाला. तुपाचा गंध, रवाळ रूप या तुपाने वातावरण शुद्धी होते, याची प्रचिती आली. मीही या गोष्टीचा प्रचार केला. थोड्याच कालावधीत आमच्याकडील तुपाची मागणी वाढली. मी पाचशे रुपये किलो या दराने विकत होतो. इतर ठिकाणी विकल्या जाणार्या तुपाचा भाव तेव्हा ७० रुपये किलो होता, आम्ही विकत असलेलं तूप लोकांना महाग वाटायचं, पण तरीही मी तुपाच्या किमतीवर ठाम होतो. वैद्यकशास्त्रात उत्तम प्रतीच्या घृताला औषधी मानले जाते. जुना चर्मरोग, भरून न आलेल्या जखमा, चिवट रोगात उपचार म्हणून तुपातून औषध दिले जाते. त्या औषधांचा अपेक्षित परिणाम होण्यासाठी तूपही शुद्ध हवे.
तूप जितकं जुनं तितके त्याचे औषधी गुणधर्म वाढतात, असं म्हणतात त्यामुळे माझ्याकडे एक वर्ष ते अठरा वर्षे जुन्या तुपाचा साठा आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधव देशी गाईच्या तुपाची निर्मिती प्रक्रिया माझ्याकडून शिकून गेले आहेत. या तूपनिर्मितीत माझी पत्नी अश्विनी हिचा मोलाचा वाटा आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून उत्कृष्ट तूप कढवण्यात तिचा हातखंडा आहे. चांगल्या तुपासाठी, चांगलं दूध आणि चांगल्या दुधासाठी गायीचा चारा चांगला हवा. घरच्या शेतीतून ऊस निघत होता, त्याचा चारा गायींना व्हायचा.
तुपाबरोबर आता मी शेतीतही लक्ष घालू लागलो, बाबांनी एकेक करत शेतीची जबाबदारी आम्हा भावांवर टाकली आणि ते निवृत्त झाले.
शेती ही सेंद्रिय पद्धतीनेच केली जावी असं माझं पहिल्यापासून मत. आजकाल लोक करीयर राहणीमान यावरच इतकं लक्ष देतात की आपल्या ताटात येणार्या अन्नाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही. रासायनिक खतांचा वापर न करता आमच्या गाईचे शेणखत वापरून मी सेंद्रिय पद्धतीने ऊस पिकवू लागलो. आमच्या भागात जमीन ऊस लागवडीसाठी योग्य आहे, त्यामुळे इथे ऊस भरपूर पिकतो. ऊस तयार झाल्यावर तो साखर कारखाना, बाजार किंवा गुर्हाळात पाठवला जातो. साखर कारखान्यात ऊस पाठवला तर पैसे कमी आणि उशिरा मिळतात, त्या तुलनेत गुर्हाळात (गूळ जिथे बनवला जातो त्या जागेला गुर्हाळ असं म्हणतात) ऊसापासून गूळ बनवून विकल्यास पैसे जास्त मिळतात. उसाच्या शेतापासून गुर्हाळ ३० किमीवर होतं. शेतातील सर्व ऊस एकाच वेळी तोडून गुर्हाळात न्यावा लागे. तिथेही आपल्या आधी नंबर लागलेले असायचे, कधी गुर्हाळ बंद, कधी गुळव्या (गूळ बनवणार्या मुख्य व्यक्तीस गुळव्या म्हणतात) नाही, माल उचलून द्यायला माणसं नाही अशा नाना कारणांनी गूळ तयार होणं रखडून राहायचं.
पाऊस पडायच्या आधी गूळ बनला तरच तो विकला जाऊ शकतो, एकदा पाऊस पडला की ऊसापासून गूळ तयार होणे आणि गुळाची विक्री दोन्ही थांबतात. तयार ऊस अधिक काळ साठवून ठेवला की तो सुकत जातो, पोकळ होतं जात्ाो, त्याचा गोडवा कमी होतो. काही ठिकाणी असा कमी गोड ऊसात साखर आणि रंग टाकून त्याचा ‘गोड’ गूळ बनवला जातो, ते माझ्या मनाला पटायचं नाही. मेहनत करून सेंद्रिय पद्धतीने आलेल्या सोन्यासारख्या पिकाचं शेवटी चार्यात रूपांतर व्हायचं, नाही तर अक्षरशः फेकून द्यावा लागायचा. फार फार मन:स्ताप सहन करावा लागायचा. बरं जो काही गूळ तयार व्हायचा तो मला हव्या त्या मापाच्या ढेपेत, हव्या त्या गुणवत्तेचा मिळायचा नाही. मला स्वतःला सेंद्रिय पद्धतीने ऊस पिकवण्यापासून त्याचा सेंद्रिय गूळ तयार करण्याचं ज्ञान होतं, पण गुर्हाळ टाकणं काही सोपं काम नाही. २०-२५ माणसे, मोठी जागा, यंत्रं लागतात. पुन्हा एवढी यंत्रणा उभारल्यावर ते यंत्र सुरू ठेवण्यासाठी सतत गूळनिर्मिती करत राहिलं पाहिजे, हे सगळं कसं जमायचं?
माझ्या मनात होतं की कमीत कमी भांडवल, मनुष्यबळ आणि कच्च्या मालाच्या साहाय्याने उत्कृष्ट गूळनिर्मिती करता आली पाहिजे. याचाच शोध घेत मी तांबव्याला इम्रान तांबोळी सरांच्या गुर्हाळात पोहोचलो. साधारणपणे दोन हजार लिटर उसाचा रस मावेल, एवढी मोठी काहिल (कढई) असते, पण इम्रान सरांकडे दोनशे लिटरची काहिल होती त्यात ते गूळ बनवीत असत. माझ्याकडे दूध गरम करायला लागणारी खवा भट्टी होती, त्यात गूळ तयार होऊ शकतो का, असं मी त्यांना विचारलं. सर म्हणाले, आपण तुमच्याकडे असलेल्या उपलब्ध साधनांनी प्रयोग करून बघू या. उसाचा फड असल्याने माझ्याकडे रस घाणा होताच, खवा भट्टी आणि मोठमोठी उलथनी यांचा वापर करून ऐंशी लिटर क्षमतेचे गुर्हाळ तयार करून आम्ही गूळ बनवला. जिथे दहा बारा माणसं कामाला लागतात, ते काम फक्त दोन माणसांत करता येणं शक्य आहे हे आम्हाला दिसलं. ‘दोन माणसांचं गुर्हाळ’ या नावानं आमचा हा प्रयोग पंचक्रोशीत फेमस झाला. उत्कृष्ट अव्वल दर्जाचा गूळ तयार झाला, चविष्ट आणि कुठलीही रासायनिक केमिकल न वापरता काकवी, गूळ पावडर तयार झाले. तिथून मला आत्मविश्वास आला. उत्तम तूप आम्ही बनवत होतोच; त्या जोडीला, उत्तम गूळ, काकवी, पावडर बनवायला सुरुवात केली.
या गुळाला ‘खरा गूळ’ हे नाव का दिलं, याबद्दल सांगताना पाटील साहेब म्हणाले, ‘त्याचं असं आहे बघा, उसासाठी मी ८६०३२ हे वाण सुरुवातीपासूनच वापरतो, त्याला घरच्या गाईंचं गोमूत्र, शेण, ताक खत म्हणून वापरतो, कुठल्याही प्रकारची कीटकनाशक न वापरता पीक घेतो. पारंपारिक पद्धतीने उसाचा रस, भेंडीचा चिकट द्रव, चुना, खाद्यतेल याच सामुग्रीचा वापर करून, योग्य तापमान आणि योग्य पद्धत वापरून गूळ तयार करतो… हा खरा सेंद्रिय गूळ. काही लोक अधिक फायद्यासाठी गूळ बनावताना उसाच्या रसात साखर कारखान्यात तयार होणारी कच्ची साखर मिसळून गूळ तयार करतात. मधुमेह असणार्या कोणी जेवणात साखरेऐवजी हा गूळ वापरला तर त्याने काहीच फायदा होणार नाही. आजकाल सेंद्रिय (ऑरगॅनिक) या नावाने आज बाजारात तुम्हाला गुळाचे पन्नास ब्रँड दिसतील, ते सगळेच सेंद्रिय असतील याची काहीच खात्री देता येत नाही, पण जाहिरातीसाठी सेंद्रिय हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जातो. या गुळाला सेंद्रिय म्हटल्यावर, मग माझ्या खर्या सेंद्रिय गुळाला काय म्हणायचं? मग म्हटलं, खरा आहे तर खराच म्हणू या. तिथून नाव पडलं ‘खरा गूळ’. म्हटलं, खातात त्यांनाही कळू दे आणि तयार करणार्यांनाही कळू दे की ‘खरा गूळ’ म्हणजे काय!
सुरुवातीला ८० लिटर रसापासून गूळ बनवायला लागलो, आज तीनशे लिटर रसापासून गूळ बनवतो. आमचं गुर्हाळ पाच महिने सुरू असतं. माल संपेल तसा तसा आम्ही ताजा गूळ बनवून विकतो. सुरुवातीला खरा गूळ म्हणजे काय हे मी प्रत्येक गिर्हाईकाला समजावून सांगायचो. अगदी किलोभर गुळाची ढेप पोहोचवायला सांगलीपर्यंत स्वतः जायचो. त्यातून नफा किती होणार हा प्रश्न नव्हता. मार्केटपेक्षा चांगली आणि वेगळी गोष्ट जेव्हा तुम्ही तयार करता, तेव्हा फक्त प्रॉडक्ट तयार करून थांबून चालत नाही, तर त्या प्रॉडक्टची मार्केट प्लेसही तुम्हालाच तयार करावी लागते. खरा गूळ मार्केटच्या कसोट्यांवर खरा उतरू लागला, तशी मागणी वाढली, गुळासोबतच आम्ही काकवी, गूळ पावडर, गूळ कँडी, मसाला गूळ तयार करू लागलो.
पूर्वी एकत्र कुटुंबात १५-२० किलोची गुळाची ढेप मागवली जायची, आता एवढी ढेप उचलणारी माणसंही राहिली नाही. शहरात अवघ्या दोन माणसांचं कुटुंब असतं, त्यातली महिला नोकरी करणारी, गुळाची मोठी ढेप संपत नाही, ती फोडायची कशी साठवायची कशी, असा सगळाच प्रश्न असतो. म्हणून आम्ही अगदी लहान, दिसायला सुबक अशा पाव किलो, अर्धा किलो आणि एक किलो ढेप बनवतो, आर्थिकदृष्ट्याही हे फायदेशीर ठरते. गूळ चिकट असल्याने काही लोक तो वापरण्यास तयार नसतात. अशांसाठी गुळाची पावडर हा पर्याय उपलब्ध आहे, खराब होण्याची अथवा हात चिकट होण्याची भीती नाही. हवी तेवढी गूळ पावडर चहासाठी, चपातीसाठी अथवा गोडधोड बनवताना वापरता येते, कामाच्या ठिकाणीही गूळ पावडरचा छोटा डबा घेऊन जाता येतं. त्यामुळे हे प्रॉडक्ट तेजीत आहे. लहान मुलांना गोड खाण्याची सवय असते.
चॉकलेट कँडी नाही म्हटलं तर मुले ऐकणार नाहीत, तेव्हा आम्ही बनवलेली गूळ कँडी ही साखरेच्या कँडीला चांगला पर्याय आहे. याचा आकार आम्ही कँडीसारखाच ठेवल्याने लहान मुलांना, आपण आपल्याला हव्या असलेल्या कँडीपेक्षा काहीतरी वेगळं खात आहोत असं वाटतं नाही.
हा सगळा माल रिटेलमध्येच खपतो, शहरात गुळाचा वापर आता वाढू लागला आहे, त्यामुळे या सगळ्या प्रॉडक्टची मागणी वाढली आहे. काकवी मात्र अपवाद आहे. काकवी म्हणजे उसाच्या रसाचं गुळात रूपांतर होण्यापूर्वीचं रूप. काकवी अत्यंत चविष्ट, गुणकारी असते. आमच्या या प्रॉडक्टला खेड्यात खूप मागणी आहे. शहरात आताच्या पिढीच्या आईवडिलांनाच काकवी माहिती नसते, जेव्हा त्यांना याबद्दल कळतं, तेव्हा त्यातल्या काही जणांना वाटतं की हा आम्ही नव्याने शोधून काढलेला प्रकार आहे. आपल्याला आपलं अन्न कसं तयार होतं, कुठे तयार होतं हे माहिती असलं पाहिजे, म्हणून आमच्या गुर्हाळात आम्ही गूळ पर्यटन लहान प्रमाणात सुरू केलं आहे. पालक मुलांसोबत इथे येतात, गूळ कसा बनतो ते पाहतात, कसा वापरायचा, किती वापरायचा याची माहिती घेतात, उसाचा रस, काकवी, खरा गूळ, कँडी, गूळ पावडर याचा आस्वाद घेतात आणि खरा गूळ कसा ओळखायचा ते शिकून जातात.
एकदा एखादी गोष्ट पारखून घेण्याची सवय लागली की इतरही ठिकाणी ही भावी पिढी या सवयीचा वापर करेल असा माझा विश्वास आहे. पण प्रत्येकाला आमच्यापर्यंत पोहोचणे शक्य नाही आणि खरा गूळ घेऊन प्रत्येक ठिकाणी पोहोचवणं मलाही शक्य नाही. त्यातून एक कल्पना सुचली, महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी खरा गूळ कसा बनवावा याची कार्यशाळा घ्यायची, त्यांना प्रशिक्षित करायचं, आणि त्यांच्या भागात नॅनो गुर्हाळ सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करायचं. एका कार्यशाळेत पाच विद्यार्थी असतात.
चांगली वस्तू बनवणारा आणि घेणारा अशा दोन्ही बाजू समतोल असतील, तरच बाजारात चांगल्या वस्तू येतील आणि ग्राहकास त्या मिळतील, अन्यथा कितीही दाम मोजला तरी हातात क्वालिटी माल येण्याची शाश्वती नाही. आणि खाण्यात क्वालिटी नसेल तर डॉक्टरकडे फेरी होणारच. मला तर वाटतं जसं आरोग्यविषयक सल्ल्यासाठी विश्वासू फॅमिली डॉक्टर असतो, तसेच कसदार धान्य पुरवणारा ‘फॅमिली फार्मर’ हवा.’
स्वतःच्या शेतात लागवड केलेल्या ऊसापासून गूळनिर्मिती हा शेतकर्यांसाठी चांगला व्यवसाय पर्याय आहे. स्वतःचं गुर्हाळ सुरू करण्यासाठी मोठ्या जागेची अथवा फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता नाही हे सुहास पाटील या शेतकर्याने दाखवून दिलं आहे. पाच सहा लाखाच्या भांडवलात छोटेखानी गुर्हाळ सुरू होतं. बरीचशी सामग्री सेकण्ड हँड घेता येते, एक टन ऊसापासून सव्वाशे किलो दर्जेदार गूळ तयार होतो. उसाच्या शेतकर्याला गुर्हाळ हा उत्तम जोडधंदा आहे. एका शेतकर्यास शक्य नसेल तर दोन तीन शेतकरी एकत्र येऊन गुर्हाळ टाकू शकतात आणि वेगवेगळे ब्रँड तयार करून गूळ आणि गुळाचे पदार्थ विकू शकतात. साखर कारखान्याबाहेर किंवा दुसर्यांच्या गुर्हाळाबाहेर रांगेत उभं राहून गप्पांचं गुर्हाळ टाकण्यापेक्षा, हे स्वत:चं गुर्हाळ कधीही बेस!