• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भरगच्च क्रिकेट कॅलेंडरचे शिवधनुष्य!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 29, 2023
in खेळियाड
0

आता वर्षाचे ३६५ दिवस क्रिकेटचा बारामाही हंगाम बहरलेला असतो. त्यामुळे भरगच्च क्रिकेट कॅलेंडरचे शिवधनुष्य पेलणे आव्हानात्मक ठरते. सध्या जसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू आहे, तसेच विविध राज्यांच्या लीगही चालू आहेत. कॅलेंडरची योग्य रचनेची जशी सार्थ अपेक्षा केली जाते, हे जरी खरे असले तरी यातून नवी गुणवत्ता उदयास येते आहे, हे नाकारता येणार नाही.
– – –

एके काळी भारताचे क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांसह रणजी क्रिकेटही खेळायचे, असे आजच्या क्रिकेटपटूंना हिणवण्यासाठी कौतुकाने म्हटले जाते. अगदीच दोन-चार क्रिकेटपटूंना कौंटी क्रिकेटची रसदही मिळायची. कारण त्यावेळी आजच्यासारखे क्रिकेट कॅलेंडर भरगच्च नव्हते. आता वर्षाचे ३६५ दिवस क्रिकेटचा बारामाही हंगाम बहरलेला असतो. हे शिवधनुष्य जसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) पेलते आहे. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाप्रमाणे (बीसीसीआय) राष्ट्रीय संघटना आणि राज्य संघटनाही पेलत आहेत.
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १६वा हंगाम संपल्यानंतर महत्त्वाचे भारतीय क्रिकेटपटू जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या मोहिमेवर गेले. पण बाकीच्या क्रिकेटपटूंना थोडा दिलासा मिळाला. पण हीच संधी समजून देशातील अनेक राज्यांनी लीगचा घाट घातला. सध्या पावसाची तमा न बाळगता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या आयोजनाची जोखीम पत्करली आहे. कारण ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी आणि राजवर्धन हंगर्गेकर यांच्यासारखे तारे खेळले, तरच लीग यशस्वी होईल, याची त्यांना जाणीव आहे. या स्पर्धेचेच उदाहरण द्यायचे, तर अर्शिन कुलकर्णीने शतक आणि चार बळी मिळवले. परंतु १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांसाठी जावे लागल्याने त्याला लीगमधून माघार घ्यावी लागली. याशिवाय तमिळनाडू प्रीमियर लीग, ओडिशा क्रिकेट लीग, उत्तराखंड प्रीमियर लीग, आंध्रा प्रीमियर लीग, आदी अनेक लीग सध्या सुरू आहेत. या लीग आयोजनामागे राज्य संघटनांची दोन उद्दिष्टे महत्त्वाची असतात. एक म्हणजे राज्यातील गुणवत्ता जोपासणे आणि दुसरे म्हणजे आर्थिक कमाई करणे. अर्थात ‘आयसीसी’च्या नफ्यातील मोठा वाटा ‘बीसीसीआय’प्रमाणे अन्य राष्ट्रीय संघटनांना मिळतो. तसाच ‘बीसीसीआय’कडूनही राज्य संघटनांच्या तिजोरीत वार्षिक निधी जमा होतो. या चक्रामुळे क्रिकेटचे एकंदर अर्थकारण उत्तम आहे. परंतु तरीही ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ हे कुणाला मान्य असेल?
या सर्व घाईगडबडीत ट्वेन्टी-२० मुंबई लीगला मात्र तारखाच निश्चित करता आल्या नाहीत. अर्थात त्या ठरवल्या तरी रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, सर्फराज खान, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे हे तारांकित क्रिकेटपटू खेळण्यासाठी उपलब्ध असतील, याची खात्री देता येते का? जी खात्री ‘बीसीसीआय’ला ‘आयपीएल’चे आयोजन करताना असते. आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये ‘आयपीएल’ला प्रतिष्ठेचे स्थान देण्यात आले आहे. जागतिक क्रिकेटमधील पैसा मोठ्या प्रमाणात भारतात असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे देशोदेशीचे तारे ‘आयपीएल’ खेळतात. या कालखंडात अन्य स्पर्धा, दौरे, इत्यादी आयोजन करण्यास अन्य राष्ट्रीय संघटना फारशा धजावत नाहीत. कारण क्रिकेटपटू पैशाच्या लालसेपायी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करून लीग खेळण्याचा धोका त्यांना असतो. पण हीच तरतूद सर्वच स्तरावर झाल्यास क्रिकेट कॅलेंडर अधिक व्यवस्थित होणार नाही का?
भारतीय क्रिकेटचा विचार केल्यास कसोटीपटू घडावेत, या उद्देशाने रणजी करंडक, इराणी करंडक, दुलीप करंडक स्पर्धा होतात. ५० षटकांच्या एकदिवसीय प्रकाराच्या विजय हजारे करंडक आणि देवधर करंडक होतात, तर ट्वेन्टी-२० प्रकारातील सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा होते. या सर्वच स्पर्धांसह कॅलेंडर अधिक व्यापून टाकण्यापेक्षा दुलीप करंडक, इराणी करंडक, देवधर करंडक या स्पर्धा वजा केल्यास कॅलेंडरमध्ये जागा निर्माण होऊ शकेल. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट हंगामात खेळण्याची संधीच मिळत नाही. कारण सामने आणि ताण व्यवस्थापनासाठीची तुटपुंजी विश्रांती आणि दुखापती हे सत्र सांभाळतानाच त्यांची दमछाक होते.
भारतात जसा राज्यांच्या लीगचा बहर आलाय, तसाच विविध देशांतही लीग आणि दौर्‍यांचा हंगाम जोशात सुरू आहे. मेजर लीग क्रिकेट (अमेरिका), बांगलादेश क्रिकेट लीग, लंका प्रीमियर लीग, ग्लोबल टी-२० कॅनडा अशा काही लीगही सध्या सुरू आहेत. या लीगमध्येही भारतातले अनेक क्रिकेटपटू प्रशिक्षक, सहाय्यक मार्गदर्शक अशा भूमिका बजावत आहेत. त्यामुळे काळानुसार झालेल्या बदलांचा स्वीकार करून क्रिकेट कॅलेंडर समर्पक करणे, जेणेकरून किमान रणजी, विजय हजारे आणि मुश्ताक अली यांच्यासारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही खेळतील, अशी त्याची रचना करण्याची नितांत गरज आहे.

[email protected]

– – – – –

…पण नव्या खेळाडूंना संधी मिळतेय!

प्रत्येक राज्याच्या विविध वयोगटाच्या स्वत:च्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा आतापर्यंत असायच्या, त्यात आता लीगची भर पडली आहे. क्रिवेâट खूप होते आहे, हे मान्य. पण त्याला पर्याय नाही. कारण राज्यांचा संघ निवडण्यासाठी त्या उपयुक्त ठरतात. काही राज्य संघटनांना निवड चाचणी घेणे कठीण जाते, ते अन्य राज्यांशी सामने खेळतात. काही राज्यांचे आकारमान मोठे आहे. त्यामुळे त्यांना खेळाडू हेरण्यासाठी तितक्याच मोठ्या प्रमाणात स्पर्धांचे आयोजन करणेही आवश्यक ठरते. पूर्वीच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रणजी क्रिकेट सामने खेळण्यासाठी उपलब्ध असायचे. त्यामुळे या स्पर्धेचा दर्जाच वेगळा होता. पण क्रिकेट कॅलेंडर भरगच्च झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना रणजी खेळताच येत नाही. त्याचा दर्जावर परिणाम होतो. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांच्यासारखे खेळाडू रणजी खेळले, तर मुंबई संघाचा दर्जा नक्कीच उंचावतो. हेच कर्नाटक किंवा बंगालच्या बाबतीतही सांगता येईल. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडर सामन्यांनी व्यापले असल्यामुळे यावर ईलाज नाही. पण याचा सकारात्मक विचार केल्यास अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळते आहे. आता भारत-अ किंवा १९-वर्षांखालील संघांचेही अनेक सामने होतात. यातही स्थान मिळवता येते. कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे, असे म्हटले जाते. पण आता भारताचे कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० असे तीन स्वतंत्र संघ निवडले जातात. त्यामुळे गुणी खेळाडूला विकासासाठी योग्य वाटचाल करता येऊ शकते. मध्य प्रदेशने रणजी करंडक जिंकला, तेव्हा त्यांचे दोन खेळाडू राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकले. मुंबई, दिल्ली, तमिळनाडू यांच्यासारख्या प्रमुख संघांना नेहमीच महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव भासते. मात्र तरीही त्यांची कामगिरी तितकीच चांगली होते. काही दशकांपूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात संधी नव्हती. त्यामुळे अनेकांची क्रिकेट कारकीर्द संधीअभावी संपुष्टात आल्याची उदाहरणे सापडतात. पण आता क्रिकेटपटूंच्या कारकीर्द उत्तम घडत आहेत. रणजी खेळणाऱ्या खेळाडूला आता १५-१६ लाख रुपये सहज मिळतात. फक्त कामगिरी आणि तंदुरुस्ती जपणे हे आव्हान त्यांच्यापुढे असते.
– चंद्रकांत पंडित
(मध्य प्रदेश, कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक)

Previous Post

अस्सल गुळाची गोडी, ग्राहक जोडी!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.