ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांच्या `देवाधर्माच्या नावानं’ या पुस्तकाच्या प्रकाशनाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकारांच्या आठवणी सांगितल्या होत्या. १७ सप्टेंबर १९९८ला वनमाळी हॉल, दादर इथे झालेल्या कार्यक्रमातलं हे भाषण हर्षल प्रधान संपादित `विचारांचं सोनं’ या पुस्तकात आला आहे. त्यातला हा संपादित अंश.
– – –
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
ज्ञानेशने हट्टाने मला सांगितलं की तुम्ही आलाच पाहिजे. म्हटलं बरं येतो. आणि आज या प्रकाशनाला मी इथे आलेलो आहे. दादा काय होते, कोण होते, हे असं एखाद्या सभेत सांगणं कठीण आहे; पण भयानक माणूस होता. दादांना घडवलं ते पुण्याने घडवलं. त्या वेळेला आमची एक गल्ली होती. बुधवार पेठेत. तिथे पेठाच जास्त. दादांची ती `डेक्कन स्पार्क’ नाटक कंपनी होती. त्यांनी ‘खरा ब्राह्मण’ नाटक काढलं आणि कोणते दिवस काय माहीत, होळी कुठची आणि काय कुठचं; आम्ही नेहमीच बोंबा मारणारे. शेण मारा काय चाललंय. दगडफेक चाललीय काय आणि काय काय विचारू नका. नंतर मेलेली गाढवं आणून टाकायची. प्रेतयात्रा काढायची. हे सगळं आम्ही बघत होतो. मला काही कळायचं नाही काय चाललंय ते; पण हे संस्कार होत होते बालवयापासून. आम्हीपण का असे घडलो; कारण आम्ही पुण्याचे आणि माझा जन्मही पुण्याचा. माझी सगळी भावंडं मुंबईला जन्मली; पण मी एकटा पुण्याला. वडिलांनी इकडे आणलं म्हणून वाचलो.
आता मलाच माझ्या वडिलांबद्दल बोलायला बोलवलंत की सांगा माझे वडील कसे होते. माझा अभ्यास चालायचा दादांबद्दल. किती कडवट माणूस! पुष्कळ वेळा मी बोलायचो पण, की दादा, हे कशाला करता? तर म्हणायचे, नाही, तुला माहीत नाही की या साल्यांना असंच घेतलं पाहिजे. यांना आडवं केलंच पाहिजे. सगळ्याशी तणातण, अन्यायाला लाथ मार, पहिलं त्यांचं वाक्य- अन्याय सहन करायचा नाही, तुम्हीही करू नका. बरं ते हिंदुत्वाच्या विरोधात होते का? हिंदू धर्माच्या विरोधात होते का? तर मुळीच नाही. पण त्यामध्ये काही ढोंगधतुरे आहेत, त्याविरोधात नक्की होते.
हे महाराज वगैरे हे काय आहे ते कोडं अजून कळलं नाही मला. गुरुपौर्णिमेला वर्तमानपत्राचं मागचं पान बघा. तारीख, वार, वेळ लिहितात. अमुक अमुक महाराजांचं दर्शन. द्या ठोकून. आयला, कोण हे? मी स्वतः जाऊन बघितलं आहे. फक्त जेवणावळी चांगल्या चालतात. बाहेर उपाशी मरत असले तरी चालतील; पण बुवाला जेवण मिळालं पाहिजे. मी तुम्हाला असं विचारतो, की तुमच्यापैकी कितीजण एखाद्या गुरूकडे जात असावे? आणि ज्या उद्देशाने जाता, ज्याकरिता जाता, ते काम खरंच सुसह्य झालं का? सुटलं का? दादा सत्य शोधत होते. प्रत्येक गोष्टीतलं सत्य काय आहे आणि असत्य काय आहे. त्यात ते निवाडा करत होते, की बाबा हे सत्य आहे, हे असत्य आहे. असत्याच्या मागे जाऊ नका.
हे गुरुपौर्णिमेवाले महाराज… अरे तुम्हाला काय गरज आहे? या जाहिराती कशाला? जर तुमच्याकडे शक्ती आहे ना तर लोक आपोआप येतील. जाहिरात कशाला? ९ ते १२ आणि ३ ते ४ मध्ये काय करतोस तू? हे कसले महाराज? दादांचं म्हणणं हे होतं यांना जोड्यानं मारा. ही शक्तीबिक्ती काय नाही. हे झूठ आहे. कुलदैवत आणि तुम्ही उभे केलेले देव यांच्यामधला फरक लक्षात घ्या. शक्ती आहे. मी स्वतः मानतो. पण आताची ही तुमची सगळी देवळं भटाब्राह्मणांनी भ्रष्ट केलेली आहेत.
परवा एका देवळात गेलो. काही लोकं होती आणि आम्ही तिथं उभे होतो. देवाकडे तशी जातपात नसते. म्हणजे असते पण आणि नसतेही. आम्ही आपले उभे. इतक्यात एक आला तोंडावर हात ठेवून. म्हटलं का बरं हा असा? तर त्याने प्यायली होती. आणि त्याचा वास तुम्हाला येऊ नये म्हणून त्याने तोंडावर हात ठेवला होता. आणि च्यायला, आल्यावर लगेच घुमायला लागला. म्हटलं याचकरता पहिली मारावी लागते, मग घुमायला होतं. यांनी धर्म भ्रष्ट केलाय आणि तुमच्या देवांचं तेज कमी केलंय.
दादांनी खूप बंड केले. खूप म्हणजे काय भयानक. खट्याळ दादा. प्रत्येक ठिकाणी जाऊन ती नांगी ठेचायची. मिरांडाची चाळ आहे इथे. प्लाझा सिनेमाच्या बाजूला. रोज रात्री बारा-साडेबारा वाजता एक व्यक्ती रोज रात्री साडेबारा वाजता ए.. ए. ए.. ये.. ये.. ये… मुलं जागी व्हायची. मोठे पण जागे व्हायचे. म्हटलं काय आहे हे? तर म्हणे त्याच्या अंगात येतं. रोज बारा वाजता. नसता ताप हो. बांग आणि याच्यात काय फरक नाही. बाप्पा बेंद्रे नावाचे दादांचे मित्र होते. इथे ‘श्री’ सिनेमा होता त्याच्या शेजारी राहायचे. दादांनी खूप खट्याळपणा केला आयुष्यामध्ये. नुसता त्याला तो विदूषकीपणा नव्हता, बंडखोरी. दादा म्हणाले, `बाप्पा, जरा बघू या का?’
तर म्हणे, `जाऊ दे ना, दादा…’
दादा म्हणे `नाही; बघू या हे काय अंगात येतं.’
तर ते गेले. दादांनी बघितलं, इकडेतिकडे बसले होते सगळे. दादा जाऊन बसले. तो माणूस. सगळं उघडं अंग त्याचं. बंब्या आपला आणि घुमत होता. हं.. हं.. हं.. दादा मागे बसले होते आणि हा पुढे. दादा बाप्पाला म्हणाले, बाप्पा, केळं घे तिथलं एक. सोलून दे इकडे. मग त्यांनी केळं सोलून ते दादांच्या हातात दिलं. दादांनी ते केळं त्याच्या खाली लावलं असं मागे. अहं.. अहं.. अहं. तर ते केळं लागलं त्याला गार गार एकदम. गार गार लागल्यावरती त्याला वाटलं की आपण तो जोर काढतोय त्यामध्ये आपण केलं वाटतं काहीतरी! आणि एवढं त्याच्या अंगात आलं असताना त्याने मागे हात लावला काय झालंय हे बघायला. दादांनी छडी घेतली आणि फटाफट दोन फटके मारले. `तुझ्या जर अंगात आलंय तर तुला काय करायचंय तू मागे काय केलंस? तू घुमत बसायचंस.’ हे आमचे दादा बाबा असे होते अगदी. काय डोक्यात यायचं आणि ते करून दाखवायचे हे विशेष.
तशीच आमची बयो होती म्हणजे दादांची आजी. दादांच्या जीवनगाथेमध्ये आहे हे. बयो म्हणजे फार मोठी होती. आणि माझे पणजोबा म्हणजे खरी दैवी शक्ती. आज आम्ही तुम्हाला इथे दिसतोय ना ते त्या पणजोबांमुळे. ती महान शक्ती आमच्या मागे उभी राहिली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. एकदा काय झालं की बयो पडली. तिने आपले पूर्वीच्या पद्धतीसारखी आंबेहळद आणि पटकी उगाळून लावली. लेप दिला झालं. दादा आले. ‘काय गं बयो, काय झालं?’ तर, ‘अरे दादा, ते बघ ना सगळे मद्रासी’. म्हणजे त्या वेळेपासून घुसताहेत, आता नाही. जुनी लागण आहे ही. सगळ्यांना आंघोळीला मोरीला सहा नळ, खांडके बिल्डिंगसारखे. कुठचाही नळ तुम्ही वापरा. तिथे ते तेलाने आंघोळ करायचे आणि पंचा नेसून निघून जायचे. ते बुळबुळीत तसंच खाली. त्याच्यावरनं ती बयो घसरली आणि तिचा पाय मुरगळला.
दादा गेले त्या मद्राशांकडे आणि म्हणाले, ‘माय ग्रॅण्डमदर अॅक्चुअली स्लिप्ड अॅण्ड शी हॅज गॉट स्प्रेन. कांट यू स्टॉप इट?’ तर म्हणे, ‘नो. हाऊ कॅन वी स्टॉप इट. दॅट इज अवर रिलिजस बाथ.’ म्हणे कबूल आहे. म्हणे धर्म, आत पाळा ना; बाथरूममध्ये कशाला? बुळबुळीत करण्याइतका? तर म्हणे, ‘नो नो वी कांट स्टॉप इट. दॅट इज अवर रिलिजन.’ नक्की नाही. म्हणे, ‘नो नो अॅट एनी कॉस्ट वी विल नॉट स्टॉप इट.’ दादा म्हणाले, ‘बघू साल्यांनो, तुम्हाला दाखवतो कशी तुमची रिलीजस बाथ आहे ती.’ दादा घरी गेले. बयोला म्हणे, ‘असं कर, कोळीण येते ना तिच्याकडून सडलेलं कुजलेलं असं खारं घे…’
दादा म्हणाले, ‘सडलेलं आणलंस का?’ तर म्हणे, `हो दादा आणलंय. ते घरामध्ये ठेववत नाहीए. त्याचं बघ काय करायचं ते.’ ‘बरं ठीक आहे.’ माझ्या आईला सांगितलं निखारा फुलव चांगला. कर एकदम धगधगीत. मग चांगलं अगदी पाट वगैरे घेऊन हातपाय धुतले. चहा वगैरे घेतला. नुसतं आपलं ते धोतर नेसून उघडेबंब. पंचा खांद्यावर टाकला आणि तो पाट त्या गॅलरीत टाकला. रांगोळी वगैरे टाकली. आता आण म्हणे तो विस्तव आणि ते खारं घेऊन ये. काही नाही, एक-एक, दोन-दोन खाराचे तुकडे ते विस्तवात टाकायचे आणि ओम् स्वाहा, ओम् स्वाहा, ओम स्वाहा, असं पुटपुटत होते. तो वार्याचा झोत, सगळी ती घाण त्या वासाने प्रत्येक मद्राशाच्या घरात शिरली. सगळा धूर सडका, कुजका. अय्यो अय्यो व्हाटीज धिस? सगळे उंदीर बाहेर आले च्यायला सगळे. ‘व्हॉट इज धिस मिस्टर ठाकरे? कांट यू स्टॉप इट?’
दादा म्हणले, `नो धिसीज् रिलिजस.’
`हाऊ मेनी डेज इट विल गो?’
`टिल टेन डेज, डिपेन्स… वी कॅनॉट स्टॅण्ड धिस, इट्ज रिलिजस.’
`प्लीज डू समथिंग.’
`यू स्टॉप युवर रिलिजस बाथ; आय विल स्टॉप माय रिलिजस थिंग.’
`ओके बाबा ओके. वी विल स्टॉप अवर रिलिजस बाथ.’
अशी दादांनी ती आंघोळ थांबवली. असे होते आमचे दादा. हे दादांचं चालायचं टिट फॉर टॅट. जशास तसं. उकरून नाही काढायचे; पण सहनही करायचे नाहीत. अशी कितीतरी उदाहरणं आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कितीतरी देता येतील.
(क्रमशः)