पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या पंतप्रधानकीच्या कारकीर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या सन्मानार्थ मुंबईत एका गुप्त ठिकाणी भाजप नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांची एक गुप्त बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला मिळाली. मी त्याला त्या बैठकीला उपस्थित राहून प्रमुख वक्ते अमितजी शहाजी यांची खास मुलाखत टेप करून आणण्यास सांगितले. तीच आपल्यापुढे वाजवित आहे.
– नमस्कार अमितजी शहाजी. अलीकडेच नांदेडला आपली ऐतिहासिक सभा पाहिली, ऐकली आणि मन तृप्त झाले. पण नऊऐवजी मोदींच्या पंतप्रधानकीच्या दशकपूर्तीला तुम्ही हा समारंभ आयोजित केला असता तर ते अधिक उचित ठरले नसते का?
– नाही. पुढच्या वर्षी भाजपा कुठल्या अवस्थेत असेल हे आज सांगता येत नाही. ती सत्तेच्या मळ्यात असेल की गाळात हेही सांगू शकत नाही. दिवसेंदिवस पक्ष कमजोर होताना दिसत आहे. त्यामुळे आम्ही नवाला पसंती दिली आणि कार्य वर्षभर आधीच उरकले.
– पण तुमचे नांदेडचे भाषण छानच झाले. काय तुमची ती तडफ, बिनधास्तपणे मनाला वाटेल ते ठोकून देण्याची पद्धत, विरोधकांवर केलेला घणाघात सारेच विलक्षण होते. हे असेच कायम राहिले तर पुढचीही नऊच काय नव्याण्णव वर्षेही तुमचा पक्ष राज्य करू शकेल.
– खरं सांगू? मी नांदेडला जे भाषण केले ते उसने अवसान होते. प्रत्येक नेत्याला पराभवाचे ताट पुढे वाढून ठेवलेले दिसत असले तरी आपण पंचपक्वान्ने खाणार आहोत असे जनतेला दाखवावेच लागते. आणि त्याबाबत आमच्या पक्षात मी मोदीजींपेक्षा हुशार आहे.
– म्हणजे मोदीजींनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामाचा पाढा तुम्ही वाचलात, तो खोटा होता?
– तुम्हाला म्हणून सांगतो, तो पाढा म्हणजे एक आभासी कव्हर होते. आत खरी उजळणी न केलेल्या कामांच्या पाढ्यांची आणि चुकलेल्या गणितांची होती. लोकांना ती माहीत आहेत. त्यांनी येत्या निवडणुकीत हिशोब चुकता करू नये म्हणून मला ही रंगसफेदी करावी लागते. आम्ही प्रयत्न करू, पण त्याने फार काही साध्य होणार नाही. मुंबईत शिवसेनाच वरचढ आहे आणि महाआघाडी झाली तर भाजपचा निभाव लागणार नाही हे कटूसत्य आहे. म्हणूनच मला मोदीजींच्या योजनांचा फायदा, परदेशात त्यांची वाढलेली पत यांसारख्या फुटकळ कामगिरींचा पाढा वाचून मला कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मनोबल वाढवायचे होते. आता तुम्हीच सांगा, मोदीजींच्या नऊ वर्षांच्या कामगिरीचा तुम्हाला काय फायदा झाला? देशाला काय फायदा झाला?
– काहीच नाही.
– नोटबंदीमुळे काय फायदा झाला?
– तुमच्या लोकांचा झाला. सामान्य जनतेचा काहीच नाही झाला.
– पेट्रोल, गॅस सिलिंडर्स, रॉकेलचे भाव कमी झाले का? महागाई कमी झाली का?
– मुळीच नाही. उलट इंधनाचे भाव काँग्रेसच्या राज्यापेक्षा दुप्पट झाले.महागाई कितीतरी पटीने वाढली.
– सोने स्वस्त झाले का? भ्रष्टाचार कमी झाला का? गुन्हेगारी, बलात्कार, अत्याचार कमी झाले का? महामार्ग बांधले, पण अपघातांचे प्रमाण कमी झाले का?
– नाही.
– बँक घोटाळ्यांचे प्रमाण कमी झाले की वाढले?
– वाढले.
– बँका लुटून परदेशी पलायन करणार्यांची संख्या…?
– वाढली.
– शिक्षणात देशाने प्रगती केली का?
– नाही.
– अंमली पदार्थांचे उत्पादन कमी झाले का?
– नाही. उलट गुजरातमध्ये त्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होते.
– ब्रिजभूषणसारखा गुंड खासदार सत्तेच्या आणि पदाच्या बळावर महिला कुस्तीगीरांशी मस्तवालपणे वागू शकतो, तिथे महिलांना न्याय मिळेल असे वाटते का?
– मुळीच नाही.
कश्मीरात दहशतवाद्यांचे प्राबल्य कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय जवानांच्या बलिदानाच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत तेथील जनता भाजपला निवडून देईल?
– मुळीच नाही.
– आपण पाकिस्तानला धमकावतो, पण चीनविषयी सावधगिरी बाळगतो. चीनने तर आपली बरीचशी भूमी बिनधास्तपणे गिळंकृत केली आहे. जनतेच्या हे लक्षात आले नसेल का?
– असणारच.
– अगणित पैसा ओतून, प्रचंड सभा, मेळावे घेऊन अखेर कर्नाटक आमच्या हातून गेले. सत्तेसाठी दुसरे पक्ष फोडणे, त्यांच्या मंत्र्यांना, नेत्यांना खोक्यांची आमिषे दाखवणे, भ्रष्टाचारी भाजपात आले की त्यांना अभय देणे, न आलेल्या नेत्यांवर खोटेनाटे गुन्हे दाखल करून त्यांच्यामागे इडीचा ससेमिरा लावणे, त्यांना तुरुंगवास घडवणे या प्रकारांमुळे जनता आमच्या पक्षावर नाराज आहे ना?
– होय.
– शेतकर्यांची आंदोलने चिरडल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. त्याचे परिणाम येत्या काळात भाजपच्या अपयशात दिसतील का?
– होय.
– मोदीजींनी प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात पंधरा-पंधरा लाख रुपये पडतील असे आश्वासन नऊ वर्षांपूर्वी दिले होते. पण लोक म्हणतात, पंधरा रुपयेही पडले नाहीत. हे त्यांनी बरे केले का?
– अजिबात नाही.
– सत्तेची नशा आणि हवा डोक्यात गेली की तो माणूस राहात नाही. मीच बघा ना काय दशा करून घेतलीय मोदीजींच्या नादाला लागून. गोंडस आश्वासनांचा भुलभुलैय्या करून आजपर्यंत आम्ही शेकडो थापा मारल्या, पण यापुढे सगळेच कठीण आहे. आजपर्यंत हातून घडलेल्या वाईट कृत्यांबद्दल मी जनतेची माफी मागणार आहे.
– अहो, काय बोलता काय तुम्ही! तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे, त्यातून तुमची सुटका नाही. आता माझी इथून सुटका करा… येतो मी. गुड बाय…