जोकोव्हिचने ग्रँडस्लॅम पटलावर पाऊल ठेवलं तेव्हा रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे दिग्गज वर्चस्व गाजवत होते. त्यांची सद्दी मोडणं भल्याभल्यांना शक्य झालं नाही. अद्भुत सातत्य, भात्यात असणारं फटक्यांचं वैविध्य, तासनतास खेळण्यासाठी लवचिक शरीर, जिंकण्याची भूक आणि चिवटपणा याच्या बळावर जोकोव्हिच दोघात तिसरा झाला. जोडगोळीचं त्रिकुट कधी झालं ते समजलंच नाही.
– – –
एखाद्या माणसाला जिंकायची सवय लागते. जिंकणं त्याला आवडू लागतं. जिंकणं त्याची सवय होते. हळूहळू तो माणूस जिंकणारं यंत्रच होऊन जातो. इतकं की त्याचं मानवीपण मागेच पडतं. त्याच्या जिंकण्याची बातमी होत नाही, पराभवाची होते. जिंकणं गुणसूत्रात रोवून घेणार्या त्या कार्यकर्त्याचं नाव आहे नोव्हाक जोकोव्हिच.
कोकणची आठवण होईल अशा पॅरिसमधल्या लाल मातीवर जोकोव्हिचने कारकीर्दीतलं २३वं ग्रँडस्लॅम जेतेपद उंचावलं. हजारो खेळाडू अनेक वर्ष खेळतात. अनेक वर्ष राबूनही एखादं ग्रँडस्लॅमही त्यांच्या नशिबी येत नाही. जोकोव्हिच साधारण १५ वर्ष खेळतोय आणि त्याच्या नावावर २३ ग्रँडस्लॅम जेतेपदं आहेत.
टेनिसपासून सुरक्षित अंतर राखणार्या मंडळींसाठी हे सोपं करुन सांगायचं तर एखाद्या क्षेत्रातली चार मोठी शिखरं म्हणजे ग्रँडस्लॅम. एखादं सर करतानाही दमछाक होते, घाम निघतो. पुण्यात मानाचे गणपती असतात, तसं टेनिसविश्वात मानाच्या चार ग्रँडस्लॅम असतात. त्या स्पर्धांसाठी पात्र होणंही खडतर असतं. जेतेपद आणखी दूरची गोष्ट.
जोकोव्हिचने ग्रँडस्लॅम पटलावर पाऊल ठेवलं तेव्हा रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे दिग्गज वर्चस्व गाजवत होते. त्यांची सद्दी मोडणं भल्याभल्यांना शक्य झालं नाही. अद्भुत सातत्य, भात्यात असणारं फटक्यांचं वैविध्य, तासनतास खेळण्यासाठी लवचिक शरीर, जिंकण्याची भूक आणि चिवटपणा यांच्या बळावर जोकोव्हिच दोघात तिसरा झाला. जोडगोळीचं त्रिकुट कधी झालं ते समजलंच नाही.
नदाल-फेडररमध्ये ग्रँडस्लॅम जेतेपदं वाटली जायची. जोकोव्हिचच्या शिरकावानंतर तिघांमध्ये वाटली जायची. हे तिघे बहरत गेले, मोठे होत गेले. जिंकत गेले, विक्रम मोडत गेले. एकाच कालखंडात तीन दिग्गजांना अनुभवण्याची दुर्मीळ संधी चाहत्यांना मिळाली. त्रिकुटापैकी ‘रॉजहंसा’ने निवृत्तीची भैरवी आळवली आहे. वय आणि दुखापती पाहता नदाल कधीही ती घोषणा करु शकतो. जोकोव्हिचचा विजयरथ आगेकूच करतोच आहे. त्याची ग्रँडस्लॅमची पोतडी भरभक्कम भरली आहे. त्याने स्थापित केलेल्या विक्रमांच्या आसपासही येणं अवघड आहे. पण हा चॅम्पियन बिनलशीचा आहे सांगितलं तर? होय.
जोकोव्हिचने अद्यापही कोरोनाची लस घेतलेली नाही. हे ऐकल्यावर तुमचं जोकोव्हिचवरचं प्रेम कमी होईल का? अख्ख्या जगाने कोरोनाची लस घेतली. यालाच कशी सूट मिळाली असं तुम्हाला वाटतंय का? आम्हाला लशीसाठी एवढा आग्रहरुपी सक्ती केली, मग जोकोव्हिचला वेगळा नियम का? जोकोव्हिचने लस घेतलेली नाही मग त्याला भविष्यात कोरोना होण्याचा जास्त धोका आहे ना? हे आणि असे शेकडो प्रश्न तुमच्या मनात रुंजी घालतील. जोकोव्हिचच्या देदीप्यमान कारकीर्दीपेक्षा त्याच्या आयुष्यातल्या ना-लस धोरणावर पुस्तक होईल एवढ्या नाट्यमय गोष्टी घडल्या आहेत.
मार्च २०२०मध्ये तुमच्या आमच्या आयुष्यात कोरोना नावाच्या संकल्पनेचा प्रवेश झाला. कोरोना होण्याआधी आपण एकदिवसीय लॉकडाऊन, थाळीनाद अनुभवला. मग अचानक लावलेला २१ दिवसीय लॉकडाऊन अनुभवला. मग कोरोनाने विळखा घातला. पहिली लाट, दुसरी लाट. मृत्यूचं तांडव बघितलं. असह्य वेदना झेलल्या. आप्तस्वकीयांना गमावलं. घरात कोंडले गेलो. बघता बघता माणूस जाताना पाहिलं. सगळं तंत्रज्ञान हाताशी असूनही असहाय्य झालो. स्मशानं अपुरी पडू लागल्याने मोकळ्या जागेत होणारे अंत्यसंस्कार पाहिले. स्थलांतरित कामगारांची परवड अनुभवली. कुचंबणा पाहिली. अभूतपूर्व संकटातही काहींनी माणुसकी दाखवली, काहींची माणुसकी वारल्याचं दिसलं. लस आली. लस घेण्यासाठी आरोग्यसेतूवर बुकिंगसाठी झुंबड उडाली. लसकेंद्रावरही गर्दी. सॅनिटायझर, मास्क, डिस्इन्फेक्टंट रोजच्या जगण्याचा भाग झाले. लशीचं दुसरं आवर्तनही झालं. लाखो माणसांचा जीव घेतल्यावर कोरोनाचा विषाणू हळहूळू मंदावू लागला.
कोरोनाने कोणालाही सोडलं नाही. त्याने श्रीमंत-गरीब भेद केला नाही. बर्फाळ भाग-वाळवंटी प्रदेश असा भेद केला नाही. विकसित-विकसनशील असा भेद केला नाही. अख्ख्या जगाला कोरोनाने विळखा घातला. सगळे भरडले गेले. माणसाने मेंदूचातुर्याच्या बळावर लस विकसित केली. लस आल्यावर बचावाची किमान ढाल तयार झाली. मृतांचा आकडा कमी होऊ लागला. वर्क प्रâॉम होम आणि झूम मीटिंगा कमी होऊन आपण हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलो. आपल्या मोबाईलमध्ये आणि सॅकमध्येही लशीचे दोन डोस घेतल्याच्या पावत्या शाबूत आहेत. पण जोकोव्हिचकडे यातलं काहीच नाही. कारण त्याने कोरोनाची लसच घेतलेली नाही.
‘मी लशीच्या विरोधात नाही. लहानपणी मी विविध आजारांसाठी लस घेतली आहे. लसविरोधी चळवळीशी माझं नाव जोडलं जाऊ नये. पण लस घ्यायची की नाही, हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो जपला जावा’, असं जोकोव्हिचने म्हटलं आहे. कोरोना लस न घेतल्यामुळे एखाद्या गुन्हेगारावर ओढवेल तशी परिस्थितीही जोकोव्हिचवर ओढवली आहे. गेल्या वर्षी जोकोव्हिच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. ही स्पर्धा होते ते व्हिक्टोरिया राज्य, टेनिस ऑस्ट्रेलिया यांनी जोकोव्हिचला स्पर्धेत बिनालशीचं असतानाही खेळता यावं यासाठी तरतूद केली. ऑस्ट्रेलियाचे कोरोना नियम अत्यंत कठोर होते. ऑस्ट्रेलियावासीयांना कठोरात कठोर नियम असताना जोकोव्हिचला सूट का? असा प्रश्न उभा राहिला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जोकोव्हिचला प्रवेश मिळणार नाही म्हटलं. आता झाली पंचाईत. ऑस्ट्रेलियात लसीकरण मोहीम ऐन भरात, विलगीकरणाचे काटेकोर नियम असताना जोकोव्हिचचं काय होणार हा प्रश्न ऐरणीवर आला.
ऑस्ट्रेलियात काही महिन्यांवर निवडणुका होत्या. नागरिकांना दुखावणं मॉरिसन यांना परवडणारं नव्हतं. राज्यातील न्यायालयाने पंतप्रधानांविरोधात निर्णय दिला. मॉरिसन सरकारने विशेषाधिकारांअंतर्गत जोकोव्हिचचा परवाना रद्द केला. हा निर्णय केंद्रीय न्यायालयाने वैध ठरवला. आरोग्य आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं सरकारने स्पष्ट केलं. हा सगळा प्रकार होत असताना जोकोव्हिचला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. जोकोव्हिचने न्यायालयीन लढाई जिंकली, पण सरकारच्या निर्णयानंतर त्याला डिपोर्ट केलं गेलं म्हणजे बोर्याबिस्तर गुंडाळून मायदेशी परतावं लागलं. ऑस्ट्रेलियाने देशात येण्यावर तीन वर्षांची बंदीही घातली.
प्रवेशबंदी झाल्यानंतर जोकोव्हिचने कोरोना होऊन गेल्याचं कबूल केलं. कोरोना संसर्ग झालेला असताना तो सार्वजनिक ठिकाणी गेल्याचं त्याच्या बोलण्यातील विसंगतीमुळे स्पष्ट झालं. डॉक्टरांनी विशिष्ट कारणामुळे लस घेऊ नका, असा सल्ला दिला असेल तर ठीक; पण जोकोव्हिचच्या बाबतीत तसं काही नाहीये. त्यामुळे जगाने लस घेतलेली असताना जोकोव्हिचचं बिनलशीचं राहणं शास्त्राविरोधात जाणारंही आहे.
विम्बल्डन स्पर्धा आयोजकांनी बिनलशीच्या जोकोव्हिचला खेळण्याची परवानगी दिली. जोकोव्हिचने नेहमीच्या शिरस्त्यानुसार जेतेपद पटकावलं. पण वर्षअखेरीस होणार्या यूएस ओपन स्पर्धेत बिनलशीच्या जोकोव्हिचला खेळण्याची परवानगी देता येणार नाही, असं आयोजकांनी स्पष्ट केलं. फिट असूनही केवळ बिनलशीचा असल्याने जोकोव्हिचला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.
नवं वर्ष-नवं राज्य असं ऑस्ट्रेलियात झालं. ऑस्ट्रेलियात सरकार बदललं होतं. गाईल्स यांच्या नेतृत्वातील सरकारने जोकोव्हिचवरची बंदी हटवली आणि त्याला बिनलशीचं खेळण्यासाठी अनुमती दिली. जिंकण्याचं पेशी-धमन्यांसह बनलेलं यंत्र झालेल्या जोकोव्हिचने सालाबादप्रमाणे जेतेपद नावावर केलं. ज्या देशातून, ज्या शहरातून हाकलून देण्यात आलं तिथेच बिनलशीच्या जोकोव्हिचने जेतेपदावर कब्जा केला.
मेलबर्नच्या हार्ड कोर्टवरून जोकोव्हिच पॅरिसच्या लाल मातीवर अवतरला. लक्ष्य एकच-जेतेपद. ते पटकावलं. आता विम्बल्डनकडे कूच. ते झालं की अमेरिकावारी. गंमत म्हणजे अमेरिकेने लशीसंदर्भातील नियम शिथिल केल्याने जोकोव्हिचला तिथे खेळता येणार आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू, सपोर्ट स्टाफ, आयोजक, चाहते लशीच्या दोन डोसांसह सामने बघत असताना जेतेपदांचा मनसबदार मात्र बिनलशीचा आहे, हे चित्र कसं वाटतं?
लस न घेणारा जोकोव्हिच पहिला आणि शेवटचा भिडू नाही. लशीला विरोध याला धार्मिक कंगोरेही आहेत. जोकोव्हिच मूळचा सर्बियाचा, तिथे लसीकरणाचं प्रमाण मर्यादित आहे. जोकोव्हिचने अँटी व्हॅक्सिन मोहिमेपासून स्वत:ला दूर केलं आहे. दुर्गम भागातल्या एखाद्या माणसाने लस नाही घेतली तर एकवेळ समजू शकतो. पण जोकोव्हिचचं तसं नाही. जोकोव्हिचचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर निखर्वात फॉलोअर्स आहेत. असंख्य युवा टेनिसपटूंसाठी तो रोल मॉडेल आहे. जोकोव्हिच लस घेत नाही, आम्ही का घ्यावी असा सवाल तरुण कार्यकर्ते करु शकतात.
जोकोव्हिचवर प्रचंड अर्थकारणही बेतलेलं आहे. जोकोव्हिच लस घेत नसल्याने तो ज्यांची जाहिरात करतो असे ब्रँड नकळत बिनलशीचे समर्थक होत आहेत. जोकोव्हिच स्वत:च्या खाण्यापिण्याबाबत अतिशय जागृत आहे. अनेकदा तो स्वत:चं जेवण स्वत: बनवतो. दम्याचा त्रास असल्याने त्याच्यावर उपचारही झाले आहेत. फिटनेसदृष्टीने त्याने आहारातून ग्लुटेनयुक्त पदार्थ वजा केले आहेत. जोकोव्हिचचं सामाजिक कार्यही मोठं आहे. युद्धग्रस्त सर्बियात लहानाचा मोठा झालेला जोकोव्हिच सामाजिक कामासाठी वेळ, पैसा खर्च करतो.
जोकोव्हिचच्या वडिलांनी त्याच्या बिनलशीचं राहण्याचं समर्थनचं केलं आहे. ऑस्ट्रेलियाने व्हिसा दिला तेव्हा हा मानवाधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असल्याचं ते म्हणाले होते. त्यांनी नोव्हाकची तुलना जिझसशी केली होती. ऑस्ट्रेलियाने जोकोव्हिचला ज्या पद्धतीने वागवलं त्यावरुन आईवडिलांनी कडाडून टीका केली होती.
अलीकडचं सांगायचं तर इंडियन वेल्स आणि मियामी स्पर्धेच्या आयोजकांनी बिनलशीचं असल्याने जोकोव्हिचला प्रवेश नाकारला आहे. लस नसल्यामुळे स्पर्धा सोडाव्या लागल्या, माघार घ्यावी लागली तर त्यासाठी मी तयार आहे असं जोकोव्हिचने स्पष्ट केलंय. लस घेतली नसल्याचा परिणाम म्हणून मी ही किंमत मोजायला तयार आहे, असं जोकोव्हिच ठामपणे म्हणाला होता.
‘माझ्या शरीरासंदर्भात निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे. कोणत्याही जेतेपदापेक्षा हा अधिकार मला महत्त्वाचा वाटतो. शरीराला सुसंगत गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न आहे. वेलनेस, वेलबिइंग, हेल्थ-न्यूट्रिशन्स या सगळ्याचा मी अभ्यासक आहे. त्यासाठीच मी आहारात बदल केले, स्लीपिंग पॅटर्न्स बदलले. कोरोनाविरुद्ध अख्खं जग लढत आहे. मी लशीच्या विरोधात नाही. भविष्यात कदाचित लस घेईनही. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झाले’, असं जोकोव्हिचने सांगितलं आहे.
तमाम जगाने कोरोना लस घेतली आहे पण जोकोव्हिचचं मत वेगळं आहे. अख्ख्या जगाविरुद्ध जाणं सोपं नाही. ज्याचा खेळ पाहून निखळ आनंद मिळतो. ज्याचा खेळ नवी ऊर्जा देतो. ज्याचा निर्धार, जिद्द जगायला बळ देते असा माणूस बिनलशीचा आहे कळल्यावर अनेकांचा हिरमोड होऊ शकतो. जोकोव्हिचने हा निर्णय घेताना मला साथ द्या वगैरे म्हटलेलं नाही. पण जगात लसविरोधी चळवळ आहे हे विसरुन चालणार नाही. लशीचे फायदे जसे आपल्याला पाठ झालेत तसं लशीचे दुष्परिणाम या मंडळींना पाठ आहेत.
बिनलशीचं राहणं कितपत योग्य, माहिती नाही. कारण आपण वैद्यकीय तज्ज्ञ नाही. लस घेणं किती योग्य, तेही माहिती नाही. आपल्यापैकी बहुतांशांनी सरकारच्या धोशामुळे लस घेतली आहे. कोरोना लशीचे दोन डोस घेऊन आपल्यावर तूर्तास तरी काही विपरीत परिणाम झालेला नाही. दुसरीकडे कोरोना लस न घेताही जोकोव्हिचच्या जेतेपदं जिंकण्याच्या आन्हिकात खंड पडलेला नाही. बिनलशीचा हा चॅम्पियन फ्रेंच ओपनचा करंडक उंचावत असताना बूस्टर डोस घ्यायचा राहिलाय, लवकरच घेऊन टाकूया असं वाटणं म्हणजंच न्यू नॉर्मल म्हणावं का?…