• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हाफ प्लेट

- अनिल महाजन (व्हायरल)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 22, 2023
in व्हायरल
0

भावेंच्या खानावळी बाहेर लावलेला बोर्ड वाचत उभा होतो. शेवटची ओळ लाल भडक अक्षरात होती. लिहिलं होतं, ‘तुमच्याकडे प्लेटचे सात रुपये नाहीत, ही आमची चूक नाही! अर्धी थाळी आम्ही देत नाही, याची नोंद घ्यावी!’
मी खिश्यातली नाणी तळहातावर ठेवून मोजली. अवघे चार रुपयेच काय ते माझ्याकडे होते. आतून येणार्‍या आमटीच्या सुगंधाने, भूक अगदी जिभेवर येऊन बसलेली. काय करायचं, सुचत नव्हतं.
खिडकीतून आत बघितलं, भावे देवपूजा करण्यात व्यस्त होते. पूजा अर्चा करणारी माणसं माणुसकी जपून असतात असं शाळेतले माझे शिक्षक सांगत असत. भावेंना भेटून विनंती करून पाहावी, चारमध्ये जे काही ते देतील ते, खाऊन आश्रमातल्या खोलीत जाऊन पडावं असा मध्यमवर्गीय विचार, मनात आला.
पण मग पाठोपाठ दुसरा विचार देखील दाखल झाला. कोकणातली माणसं नियमाची पक्की असतात, सात रुपये तुमच्याकडे नाहीत ही आमची चूक नाहीय, असं स्पष्ट लिहिलेलं असल्यावर भावे माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता म्हणतील, बाहेरच्या फलकावरील शेवटची ओळ वाचा!
वाढपी दोन माणसांना वाढत होता. पापड, दही, कोशिंबीर आणि काय काय… एक नाणं तुळशीखाली पुरून ठेवलं, तर दुसर्‍या दिवशी त्याचे दोन होतात… मग दोनचे चार… आजी, गोष्ट सांगताना सांगत असे.
आश्रमात तुळशीची रोपं होती. चार आणे पुरून ठेवले तर उद्या आठ मिळतील. जेवण होईल, शिवाय बाकी एक रुपया दुसर्‍या दिवशीसाठी लागणार्‍या सात साठी पुरून ठेवण्यास कामी येईल… एक रूपया रोज शिल्लक राहील आणि सातची सोय लागेल…
शिकला सवरलेला मी, पण असे शिक्षणावर काजळ फासणारे विचार, मनात येत होते. त्याचं कारण म्हणजे, आत उठलेला भुकेचा ज्वालामुखी!
शेवटी मनावर किलोभर वजन ठेवून आत शिरलो. भावेंची पूजा एव्हाना आटोपली होती आणि ते गल्ल्यातली नाणी मोजण्याचं काम करत होते. हात जोडून त्यांना नमस्कार केला. माझ्या सारख्या शिक्षित, तरुण माणसाने छानपैकी धोतर नेसलेलं पाहून त्यांना खूप बरं वाटलं असावं, कारण त्यांच्या डोळ्यांमध्ये मला समोरच्या गणपतीसमोर लावलेल्या समईची ज्योत दिसली…
‘विनंती करायला आलोय मी…’
‘बोला नं..’
‘मी… मी फलकांवर लिहिलेली शेवटची ओळ दोन वेळा वाचून समजून घेतलीय… पण तरीही विनंती करायला आलोय… माझ्याकडे चारच रुपये आहेत. अर्धी थाळी द्याल?’
‘वाचून समजून घेतलीय असं म्हणालात. काहीतरी गल्लत झालीय तुमची. नीट वाचलं नसावं किंवा मग वाचलेलं नीट समजलं नसावं. हा संपन्न देश अजूनही मागासलेला आहे, त्याचं कारण माहितीय? नियम न पाळणे! माझा मुलगा आला तरी त्याला देखील अर्धी प्लेट मी देणार नाही.’ भावे बोलले.
‘चूक झाली माझी, पण…’
‘पण काय?’
‘एक प्लेट घेऊन आम्ही दोघांनी शेअर केली तर… तर चालेल?’
‘रिकामं ताट देईन. किती, काय, कसं वाटायचं ते तुमचं तुम्ही ठरवा.’
‘म्हणजे एका थाळीत दोघं जेवू शकतो ना…?’
‘हो. त्या बाबतीत फलकावर काही सूचना वगैरे नाहीय नं? मग विचारायचंच का? शंका संपल्या असतील तर आता कामाला लागू मी?’ भावेंनी विचारलं.
बाहेर पडलो. भाजी आमटीच्या सुगंधाने पाय, जणू आवळून ठेवले होते. अन्नाची भूक मोठी वाईट! भट्टी जळली नाही, तर भूकेशिवाय डोक्यात इतर कांही येण्याची शक्यता, अजिबात नसते. आश्रमात परतावं, तुळशीचं छान फुललेलं रोप पाहून, त्या खाली चार रुपये गाडून ठेवावेत, अश्या खूप गोष्टी मनाला जवळ दूरची फेरी मारून आणीत होते.
फलकाची बाजू पाहून उभा झालो. का कोण जाणे, भावेंचं मन लोण्यासारखं विरघळायला लागेल, माझ्याविषयी दया नाहीतर नाही, सहानुभूती वाटेल त्यांना आणि मग ते माणसाला पाठवून मला आत बोलावून घेतील आणि… भात, आमटी भाजीची ती थाळी, माझ्या पुढ्यात असेल असं वाटायला लागलं होतं.
माझ्या खांद्याला कुणाचा स्पर्श झाला, म्हणून दचकायला झालं. मग वाटलं, भावे… ते असतील… या… वगैरे म्हणतील ते! वळून पाहिलं, तर शाळेच्या शेवटच्या वर्षात वगैरे शिकणारा तरुण मला खेटून होता. पदार्थांची यादी वाचून झाल्यावर त्याचे डोळे लाल रंगात लिहिलेल्या त्या ओळीवर थांबले. तिथेच थांबून राहिले. त्याने खिशातली नाणी मोजून बघितली. एकदा. दोनदा…
‘सात, नाहीयेत? जेवायचं आहे नं? माझ्याकडे पण, सात नाहीयेत. एक काम करूयात? अर्धी-अर्धी थाळी वाटून घेऊयात?’
‘अर्धी थाळी? पण माझ्याकडे अर्ध्या थाळीसाठी लागणारे साडेतीन पण नाहीयेत. तीन… फक्त तीन रुपये आहेत माझ्याकडे!’ तरुण बोलला.
‘हरकत नाही. तीन तुझे. चार माझे. चल ये आता पटकन… खूप वेळेपासून पोटाला घट्ट आवळून उभाय मी! ’
आम्ही दोघं आत शिरलो. भावेंना सात देऊन टोकन घेतलं. भावे ना हसले, ना बोलले. रिकामं टेबल पाहून आम्ही बसलो… एक थाळी… बरोबर एक रिकामी आण… एका वाढपी मुलाला बोललो. हिस्से करून खाणारे कदाचित आम्ही पहिलेच असूत म्हणून त्या मुलाने भावेंच्या दिशेने बघितलं… भावेंनी होकारार्थी मान हलवली आणि दोन थाळ्या आमच्या पुढ्यात आल्या… एक रिकामी. दुसरी भात, आमटीची!
छान जेवण झालं!
मुलगा म्हणाला, ‘काका, आभारी आहे तुमचा. बारावीची परीक्षा द्यायला म्हणून इथे आलोय. घरून येतांना आईने मोजकेच पैसे दिलेयत. म्हणाली, आहे त्यात आयुष्य घालवायची सवय करून घे!’
‘उद्या दुपारी… भेटाल? तीन घेऊन येईन…’ तरुण बोलला. जी गोष्ट मी विचारणार होतो, ती त्यानेच विचारून माझ्यावर आलेलं दडपण नाहीसं केलं होतं.
आश्रमाकडे वळताना खिडकीकडे हटकून लक्ष गेलं… भावे माझ्याकडेच पाहात होते… उद्या येईन तेव्हा बुडाशी अजून एक लाल ओळ असेल, का कसे… एक प्लेट घेऊन दोघांना जेवता येणार नाही… विचार मनात आला काय आणि जिभेवर रेंगाळून असलेला आमटीचा स्वाद क्षणात अदृश्य झाला!
आश्रमात पोहचलो आणि नजर तुळशीकडे गेली. बिचारी! लोकांच्या मनातल्या जाती जातीचा विचार मनात अजिबात न आणता माझी ही तुळस, कुठल्याही मातीला आपलंसं करून आपल्याबरोबर मातीचं आयुष्य फुलवीत जाते… तुळशीच्या अनेक गोष्टी आजी सांगत असे. पण मी दरिद्री, तिने सांगितलेली चारचे आठ ही एकच गोष्ट मला का बरे आठवावी? तुळशीवरून एकदा मायेने हात फिरवून खोलीकडे वळलो.
दुसर्‍या दिवशी अकराच्या आधीच भावे भोजनालयाच्या पुढ्यात जाऊन उभा झालो. आधी फलक वाचला… मला अपेक्षित होतं तशी नवी ओळ वगैरे तिथे नाहीसं पाहून मनातल्या मनात भावेंचे आभार मानून कोपरा गाठला. भावे आतून कुठूनही मला पाहू शकले नसते, अशी ती जागा होती. कडक माणूस आहे, न जाणो उद्या डोक्यात काही नवी गोष्ट शिरली तर?
बाराकडे काटे वळले. बारावीची परीक्षा द्यायला म्हणून आलेला तो तरुण अजूनही आला नव्हता. तो आलाच नाही तर? विचार मनात आला काय, माझी तगमग वाढीस लागली. मन समुद्रात एकाच वेळी भरती, ओहोटी सुरू होत्या. जागा सोडली तर भावे बघतील, माझा भुकेला आणि मग केविलवाणा चेहरा पाहून त्यांना काय काय वाटेल! वेळ प्रसंगी माणसाला पाठवून ते मला धक्के मारून जागा सोडायला लावतील, असा विचारदेखील आला.
शेवटी, तो आला! खूप अवस्थ होता. म्हणाला, ‘काका, आज चार पुरवण्या घेतल्या. शाळा सोडायला वेळ लागला मला. धावत आलो. वाटत होतं, माझी वाट पाहून तुम्ही निघून गेला असाल… मला उपाशी राहावं लागलं असतं…’ तो बोलला. प्रत्येक शब्दापरत त्याच्या फासळ्या वर खाली, खाली वर होतांना पाहून मला भरून आलं. अन्न निर्मितीसाठी जगभर प्रसिद्ध असलेला हा देश माझ्यासारख्या लोकांना एक वेळचं अन्न देऊ शकत नाही?
‘चल, आता आत जाऊयात. तू येशील की नाही, काळजी करत उभाय इथे. ये…’
भावेना सात रुपये देऊन कुपन घेतलं. त्यांची कैची छाप मिशी आमच्या दोघांकडे पाहून छानपैकी हसली. त्यांच्या चेहर्‍यावर हसू? माणूस पलटी तर मारणार नाही ना? नाहीतर असं हसू का म्हणून?
वाढपी आला. एक थाळी, एक रिकामी. कुपन त्याच्याकडे देत मी बोललो. तो पण हसला. म्हणाला, आता सांगायची गरज उरली नाहीय! त्याची नजर चालत धावत, भावे बसून होते तिथे पोहोचली. भावेंनी होकारार्थी मान हलवली. माझा जीव जीवात परतला!
पाकातल्या पुर्‍या आणि अळूची वडी आजची स्पेशल डिश होती. आपल्या या देशात परीक्षेइतकं मोठं ओझं दुसरं कुठलंही नसावं. भूक, वस्त्र वगैरे गोष्टी त्यानंतर येणार्‍या. सगळ्यांनाच परीक्षेत घवघवीत यश हवं असतं. अगदी वरचा वर्ग, मिळवायचा असतो. पुढे आयुष्यात सतत अपयशी होत जाणार्‍या माणसाची मात्र आम्ही फारशी दखल घेत नाही… शाळेची पुस्तकं म्हणजे कोवळ्या मनांना लागलेली वाळवी… हसण्या खेळण्याच्या वयाचा भुसा पाडत जाणारी…
माझा नवा तरुण मित्र अभ्यासापेक्षाही आईच्या आशा, अपेक्षांचं ओझं वाहून किती पांढरा पडलाय, हे पाहत होतो. अर्धी प्लेट ठीकाय पण आज, आज मी वाटे करतानाच सात-तीन असा हिशोब ठेवला होता. म्हणजे सात हिस्से त्याला… अभ्यासाचा शिल्लक डोंगर त्याला सहज चढता यावा, माझी धडपड म्हणून होती. त्याने आढेओढे घेतले, पण मी नाही ऐकलं…
पुढचे सहा दिवस असेच छान गेले. माझा तरुण मित्र आज ना उद्या त्याच्या गावी जाईल. पुढे चार-तीन कुणाबरोबर, हा प्रश्न मन ढगाळून आलं की इंद्रधनु बनून प्रगट व्हायचा आणि मग… नाहीसा व्हायचा. आश्रमाच्या पायरीवर निवांत बसून राहायचो तेंव्हा वार्‍याच्या हलक्या झोक्याबरोबर छानपैकी डुलणारी तुळस पाहून मनात विचार यायचा, तुळशीच्या बुडाशी बुद्धी पेरली, तर ती दुप्पट व्हायची नाही?
माझा तरुण मित्र गावी परतला. त्याला निरोप द्यायला म्हणून बस स्टेशनवर गेलो होतो. तेंव्हा त्याचे डोळे भरून आले होते. गाडी सुटायच्या बेतात असताना अचानक तो मला येऊन बिलगला… दादा… तुम्ही नसता तर…
खांद्यावर ओल्या झालेल्या सदर्‍याला सोबतीला घेऊन जेव्हा आश्रमाकडे जायला निघालो तेव्हा, मन भरून आलं होतं. त्याला वाटलं होतं, माझ्यामुळे दहा-एक दिवस अर्ध्या पैशांमध्ये त्याचं भागलं होतं. पण वस्तुस्थिती वेगळी होती… तो भेटला म्हणून माझ्या पोटाची सोय लागली होती!
भावे भोजनालयाच्या समोर उभ्या पिंपळाखाली उभा होतो. आतल्या मुलांची धावपळ सुरु होती… त्यांना पाहून आई आठवली… मला, बाबांना जेवण मिळावं म्हणून ती अशीच चोवीस तास राबायची… ही मुलं कुणाच्याही आईपेक्षा कमी नाहीयेत, माझी खात्री पटली होती!
खिशातली नाणी काढून मोजून घेतली. आज माझ्याकडे फक्त तीन रुपयेच होते! हाफ प्लेट घेणारा माझ्यासारखा दरिद्री मिळायला हवा होता. खानावळीच्या दिशेने जो कुणी येईल, आशाळभूत नजरेने मी त्याचा वेध घेत होतो. मंदिराबाहेर उभ्या भीक मागून जगणार्‍या भिकार्‍यांच्या रांगेत माझी भर पडलीय, असं वाटून गेलं…
एक वयस्कर गृहस्थ फलक वाचल्यानंतर खिश्यातून नाणी काढून मोजताना पाहिलं मी. रस्ता ओलांडून पलीकडे पोहोचलो. भावे पूजा करत होते म्हणून खिडकीबाहेर त्यांचं लक्ष अजून यायचं होतं.
आधी मी माझा परिचय दिला. त्यांचा परिचय असणं, गरजेचं नव्हतं. हाफ प्लेट महत्त्वाची होती. त्यांना मी समजावून सांगितलं आणि अजिबात वळण न घेता त्यांनी तयारी दर्शवली.
त्यांचे चार, माझे तीन… भावेंकडून सात रुपयांचं टोकन घेतलं. भावे पहिल्यांदा छानपैकी हसले. म्हणाले, तो पोरगा.., गेला?
जेवण झाल्यावर आम्ही आमच्या वाटेला लागलो…
पुढचे अकरा दिवस असे जसे गुलमोहराच्या पाकळ्यांच्या सड्यात न्हाऊन जायचे… कधी तीन, चार तर कधी, चार तीनचे… पोटात थोडं फार पडलं की माझं तुळशीकडे हटकून दुर्लक्ष व्हायचं. पण ती बिचारी, कधी एका शब्दाने बोलायची मात्र नाही!
आता माझे वयस्कर मित्रदेखील गाव सोडून गेले. त्या दिवशी पिंपळाखाली उभा मी, नवा भागीदार धुंडाळत होतो. दीड झाला पण फलकापाशी थांबून एकाने देखील खिश्यातून नाणी काढून मोजली नव्हती… आज उपास ठेवावा लागणार असल्याची एकूण चिन्हं होती…
बाहेरच्या लोकांसाठी दोन वाजता खानावळ बंद होते… भावे आणि काम करणारी मंडळी दोन ते तीनच्या मध्ये जेवतात, वाढपी पोराकडून मला समजलं होतं… वेळ वाढवून द्या… असं भावेंना सांगून ते काय ऐकणार होते?
शेवटी दोनला दोन मिनिटे कमी होती. रस्ता ओस पडला होता. या पुढे कुणी येऊनही उपयोग होणार नव्हता. जड पावलांनी आश्रमाकडे जायला म्हणून वळलो. इतक्यात… माझ्या खांद्यावर कुणी आपला हात ठेवल्याचं लक्षात आलं… वयस्कर गृहस्थ गावी गेलेच नसावेत…
वळून पाहिलं… भावे होते! त्यांच्या निळ्या डोळ्यांमध्ये निळं, शांत हसू होतं… ‘माझ्याबरोबर हाफ प्लेट चालेल…? या… खूप म्हणजे खूप भूक लागलीय…’ भावे बोलले.
माझ्या हाताला त्यांनी आपल्या बोटांमध्ये, बांधून ठेवलं होतं… त्यांच्या मागोमाग, आत शिरलो…

Previous Post

बिनलशीचा चॅम्पियन

Next Post

बाबा… सोबत आहेत… राहतील

Next Post

बाबा... सोबत आहेत... राहतील

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.