ग्रहस्थिती : बुध वृषभ राशीत, मंगळ, शुक्र कर्केत, केतू तुळेत, हर्षल, राहू, गुरु मेष राशीत, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीत, शनि कुंभेत. विशेष दिवस : १७ जून दर्श अमावस्या सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी सुरु आणि १८ जून रोजी सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी समाप्त. २२ जून रोजी विनायकी चतुर्थी.
मेष : छोट्या मोठ्या तक्रारी कुणाकडे करू नका, व्याप वाढू शकतो. तरुणांचे भाग्योदय होतील. शिक्षण, नोकरीत नव्या संधी चालून येतील. नवे घर घेण्याचे नियोजन झटपट मार्गी लागेल. मनासारखे घर मिळेल. घरात वागताना बोलताना काळजी घ्या. वाद निर्माण होऊ शकतात. प्राध्यापक, शिक्षकांसाठी उत्तम काळ आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. धारदार वस्तूंपासून जपा. समाजात, मित्रांबरोबर बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा.
वृषभ : या आठवड्यातील सुरुवातीचे दोन-तीन दिवस कंटाळवाणे जातील. नंतर मनासारखी कामे होतील. नोकरी-व्यावसायात सुवार्ता कानी पडेल. आर्थिक बाजू भक्कम राहिल्याने महागडी वस्तू खरेदी कराल. वास्तूविषयक व्यवहारात कमिशन मिळेल. नोकरीत प्रसंगावधान ठेवा. कामात चुका टाळा. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, विदेशात जाण्याचे योग आहेत. नव्या ओळखींचा फायदा होईल. घरात वाद घडू देऊ नका. खर्च जपून करा.
मिथुन : अनेक दिवसांपासून प्रतीक्षित गोष्टी पूर्ण होतील. कामातला उत्साह वाढेल. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर येईल. तरुणांना मोठे यश मिळेल. उच्चशिक्षणाची संधी मिळेल. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळाल्याने आर्थिक बाजू भक्कम होईल. कामानिमित्ताने प्रवासात आरोग्याची काळजी घ्या. जुने दुखणे डोके वर काढेल. प्रेम प्रकरणात वाद होईल. धार्मिक कार्याला वेळ द्याल.
कर्क : सार्वजनिक ठिकाणी बोलताना, वागताना काळजी घ्या. नोकरीत तणाव राहील. सरकारी कामे मार्गी लागतील. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. काम पुरे करण्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नका. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. लॉटरी आणि सट्ट्यापासून दूर राहा. पत्रकार, संपादकांना चांगला काळ. कलाकारांचा सन्मान होऊ शकतो. वाहन जपून चालवा. अपघात टाळा.
सिंह : मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबियांबरोबर गैरसमजातून वाद निर्माण होतील. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नका. काही जणांचा भाग्योदय घडेल. नोकरीत उत्तम काळ. नव्या नोकरीची संधी मिळेल. संगीतकार, संपादक, कलाकार व संशोधकांना सन्मानाचे योग आहेत. मुलांना स्पर्धापरीक्षेत यश मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. छोटेखानी कार्यक्रमात जुने मित्र भेटतील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. संततीकडे लक्ष द्या.
कन्या : मन अस्वस्थ राहील, त्याकडे दुर्लक्ष करा. ध्यानधारणेसाठी वेळ द्या. भाऊबहिणीची चिंता लागून राहील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होईल. काहीजणांच्या बाबतीत अचानक मोठा खर्च निर्माण होईल. भागीदारीत वाद तुटेपर्यंत ताणू नका. स्पर्धकांवर मात करण्यासाठी बुद्धीकौशल्याचा वापर करावा लागेल. मौजमजेसाठी पैसे खर्च करू नका. पैशाचे नियोजन काळजीपूर्वक करा. उधार-उसनवारी नको.
तूळ : पती-पत्नीत वाद टाळा. व्यावसायिकांना लाभदायक काळ. नोकरी शोधणार्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. कोणताही करार कागदपत्रे तपासूनच करा. मेडिकल क्षेत्रात काम करणार्यांसाठी काळ उत्तम आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. वायफळ खर्च टाळा. नोकरीच्या ठिकाणी अधिकचे काम करण्याची तयारी ठेवा. चटपटीत खाणे टाळा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील.
वृश्चिक : एखाद्या घटनेने डोक्यात घर केल्याने मानसिक त्रास होऊ शकतो. कामात मन रमवा. अवांतर गोष्टींत रमू नका. व्यसनी मंडळींपासून दूर राहा. नोकरीत उत्कर्ष घडवणारा काळ. नव्या संकल्पनांचे व्यावसायिक रूपांतर कराल. शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवा. सामाजिक कामासाठी वेळ खर्च कराल. थकीत येणे वसूल होईल. व्यावसायिकांना अडथळे येतील. पण कौशल्याच्या जोरावर ते सही सलामत बाहेर पडतील. प्रेमप्रकरणात अडथळे निर्माण होऊ शकतात, काळजी घ्या. वाणी सांभाळा.
धनु : मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी पैसे खर्च होतील. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. विदेशात उच्चशिक्षणासाठी जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. अचानक धनलाभ होईल. नोकरीत प्रमोशन होईल. घरातील वादाकडे दुर्लक्ष करा. विवाहेच्छुकांचे लग्न जमू शकते. व्यावसायिकांनी आळस झटकून कामाला लागावे. संततीकडून शुभवार्ता कानावर पडेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.
मकर : भागीदारीतील व्यवसायात हा आठवडा त्रासदायक जाईल. सरकारी कामात कायद्याची चौकट पाळा. नियम तोडून कोणतेही काम करू नका. आईवडिलांची काळजी घ्या. कुणाला सल्ला देताना काळजी घ्या. नोकरीत धावपळ होईल. काहीजणांना विदेशात जाण्याची संधी मिळेल. खिशात पैसे राहतील. येणी वसूल होतील. पैसे विचारपूर्वक उसने द्या. बँक कर्ज मंजूर होईल. कोर्टात दावे रेंगाळतील. संततीकडून मन:स्ताप होईल. कामासाठी प्रवास घडेल..
कुंभ : गुरुकृपेमुळे अडकलेली कामे मार्गी लागतील. काहींना अचानक मोठी कामाची संधी चालून येईल. नोकरीत बदली होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. अडकलेले काम गोडीत काढून घ्या. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. व्यावसायिकांनी नव्या संधींचा योग्य लाभ घ्यावा. कुणावरही अति विश्वास टाकू नका. कामाच्या ठिकाणी मोजकेच बोला. प्रेम प्रकरणात वादाची ठिणगी पडेल असे काही बोलू नका.
मीन : खर्चाचे प्रमाण वाढणार असल्यामुळे पैशाचे नियोजन नीट करा. मित्रांबरोबर बोलताना काळजी घ्या. चेष्टामस्करी टाळा. तरुणांच्या बाबतीत मनासारख्या घटना घडतील. मालमत्तेचे प्रश्न, सरकारी कामे मार्गी लागतील. पित्ताचा त्रास असणार्यांनी काळजी घ्यावी. नवीन वाहन घेण्याचा विचार मार्गी लागेल. मौजमजेसाठी पैसे खर्च कराल. वर्षा विहाराच्या निमित्ताने भटकंती होईल.