सध्या देशाचा अमृतकाळ सुरू आहे म्हणतात, तुमचं काय मत?
– रंजना सावकार, नाशिक
काळ कुठलाही येऊ देत… पण वेळ येऊ नये.
मला लग्नाच्या आधीच आई बनायचं आहे. पण, बदनाम व्हायचं नाहीये. आता तुम्हीच याचा मार्ग सांगा.
– रेवती साळुंके, रेणापूर
नंतर माझं नाव घेऊन बदनाम करायला तुम्ही मोकळ्या!
काही माणसांचा चेहरा आणि काहींचे उद्योग पाहिल्यावर माणसाचा जन्म माकडापासून झालेला असणार, अशी खात्री पटते. मग डार्विनचा सिद्धांत का बरं मान्य करत नाहीत लोक?
– सीताराम चाळके, बेलापूर
(हा प्रश्न पडला तेव्हा आरसा पाहत होता का?) तुम्ही मान्य करा आणि सांगा तुमचे पूर्वज माकड होते म्हणून… कोणी अडवलंय? आम्हाला नका तुमच्यात घेऊ.
तुम्हाला तुमची बायको सर्वात चांगली केव्हा वाटते?
– क्रांती पेडणेकर, कणकवली
माझी बायको चांगलीच आहे (ती हे सदर वाचते ताई!)
प्रियकर नदीत बुडत असेल, तर किनार्यावर उभी असलेली प्रेमिका काय म्हणेल?
– जॉन बॅप्टिस्टा, सांताक्रूझ
नशीब मी वाचले… फोन बरोबर असता तर लाइव्ह दाखवता आलं असतं… सेल्फी घेतला असता… रील बनवली तर किती लाइक मिळतील? वगैरे वगैरे (खोटं वाटत असेल तर तुमच्या प्रेयसीसमोर स्वतः बुडून बघा).
द्रौपदी पाच पांडवांची पत्नी बनू शकते, तर मी पाच बायकांशी लग्न नाही करू शकत?
– मोरेश्वर शेंडे, चंद्रपूर
त्या तुम्हाला जुगारात हरल्या तर?? दु:शासन कोण असेल? त्याला चालेल का ते विचारा?
वाघ आणि बायको एकसाथ समोर आले तर तुम्ही कोणाला घाबराल?
– विराज साळगावकर, दादर
वाघाला घाबरेन.. तुमच्या बायकोला मी का घाबरू???
काही लागलं, दुखलं, कोणी मारलं, तर तोंडातून ‘आई गं’ असाच शब्दप्रयोग का बाहेर पडतो? ‘बापा रे’ असा शब्दप्रयोग का नाही बाहेर पडत?
– शंकर पाटील, सातारा
बापाला कळलं तर त्याच्याही हातून पडेल अशी भीती असते.. आपल्या बाबांना विचारून बघा.
वाघ कधी गवत खातो का?
– मोहन फणसे, भांडुप
वाघ गवत नाही… पण घोसाळं, दोडका, कारलं अशा न आवडणार्या भाज्याही गपचूप खातो… (प्लीज, कोणाला सांगू नका.)
लहानपणी शाळेत शिक्षकांनी मारलेली थप्पड आणि मोठेपणी एखाद्या मुलीने मारलेली थप्पड यांच्यात काय फरक आहे?
– सुजाता पेंडसे, गिरगाव
आवाजाचा (विश्वास ठेवा… परीक्षा घेऊ नका… गाल सुजण्यात काहीही फरक पडणार नाही.)
‘नेकी कर कुएं में डाल’ अशी म्हण आहे, तिच्याशी तुम्ही सहमत आहात का?
– नेमीनाथ मुरकुटे, परळ
मी २०१४ला माझं मत दिलंय. आता सहमत व्हायची पण भीती वाटते.
पतीला आवडावे म्हणून पत्नी साजशृंगार करते, बायकोसाठी तुम्ही काय करता?
– शालिनी फडणवीस, नागपूर
मी माझं पोट वाढू देत नाही… बायकोने कितीही पुरणपोळ्या वाढल्या, तरी पिशवीत भराव्यात तसा पोटात पुरणपोळ्या भरत नाही मी. तूपसुद्धा खूप पीत नाही मी… कळलं का फडणवीस ताई नागपूरकर!
लग्न झाल्यावर तुम्ही पहिल्यांदा बायकोला भेटलात तेव्हा तिच्या डोळ्यांत तुम्हाला काय दिसलं?
– रेवा धडफळे, सातारा
बायकांना एखादी वस्तू स्वस्तात मिळाल्यावर होणारा आनंद… (स्वतःची किंमत अशीच वाढू शकते).
बळीचा बकरा आणि नवरा यांच्यात फरक काय?
– महेंद्र सोनकांबळे, बेलापूर
एकाला खरेदी करून बळी देतात… दुसरा स्वतः खर्च करून स्वतः बळी जातो.