(राजधानीतलं कुठलंसं पोलीस ऑफिस, एक मोठ्या भिंगाचा चष्मा घातलेला सत्तरीतला म्हातारा काठी टेकवत आत येतो.)
वृद्ध : नमस्कार साहेब.
अधिकारी : नमस्ते! आपलं काय काम होतं? खास अपॉइंटमेंट घेतलीत माझी?
वृद्ध : मी चिंपांझी.
अधिकारी : चिंपांझी? हे असं नाव आहे?
वृद्ध : मी संक्षेप सांगितला हो! पूर्ण नाव चिंतामण पांडुरंग झिंजुर्डेकर असं चिंपांझी आहे.
अधिकारी : काय काम काढलंत पण आपण?
वृद्ध : आमची शिंत्रे गुरुजींच्या स्मरणार्थ उत्कृष्ट कायदा सुव्यवस्थेचा पुरस्कार वितरण करण्याची परंपरा आहे. त्यासाठी आम्ही योग्य अशा व्यक्तींची निवड करतो नि…
अधिकारी : पण हे शिंत्रे कोण?
वृद्ध : माझ्या बायकोचे आजोबा. स्वातंत्र्यलढ्यातील एक अपरिचित क्रांतिकारक.
अधिकारी : हे नाव पहिल्यांदा ऐकतोय मी. काय क्रांतिकार्य केलंय त्यांनी?
वृद्ध : ब्रिटिश अधिकार्यांना जिवे मारण्याच्या योजना आखलेल्या.
अधिकारी : मग? त्याबद्दल कारावास भोगला का त्यांनी?
वृद्ध : नाही हो! योजना आखल्या, पण मनातल्या मनात!
अधिकारी : (डोक्याला हात मारून घेतो.) मग आता काय अपेक्षा आहे तुमची?
वृद्ध : तुमच्या कर्तव्यदक्ष कर्मचारी, अधिकार्यांची सूची वा नावं सुचवा ना. त्यातील काहीजणांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
अधिकारी : असं होय? हे बघा, हे! यांनी शेतकरी आंदोलनाच्या वेळी महत्त्वपूर्ण काम केलेलं.
वृद्ध : काय केलं? शेतकर्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवल्या की…?
अधिकारी : असली फडतूस कामं नाही केलीत हो!
वृद्ध : मग सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांची माहिती शेतकर्यांना देवविली का?
अधिकारी : काहीही काय बोलताय?
वृद्ध : अहो, मग नेमकं केलं काय या अधिकार्यांनी?
अधिकारी : त्यांनी ठिकठिकाणी रस्ते खोदले, खिळे ठोकले, डंपर/कंटेनर आडवे उभे केले, शेतकर्यांना अडवलं आणि मुख्य म्हणजे आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानवादी असल्याचा शोध लावला.
वृद्ध : आणि शेतकर्यांच्या आडून काही हुल्लडबाज घुसून लाल किल्ल्यावर गेले होते, त्यांना यांनीच पकडलं का?
अधिकारी : नाही हो, त्यांचे पुराव्यासाठी फोटो हेच काढत होते!
वृद्ध : कळली यांची कर्तबगारी! आता पुढले दाखवा.
अधिकारी : हे पुढचे अधिकारी आहेत विद्यार्थी आंदोलनाच्या वेळी भरीव कामगिरी केलेले?
वृद्ध : थेट विचारू?…
अधिकारी : विनासंकोच विचारा!
वृद्ध : शेठच्या विद्यार्थी संघटनेची पोरं विद्यापीठात घुसून धुडगूस घालत असताना यांनी त्यांना अडवलं का?
अधिकारी : छे हो, कॅम्पसमध्ये घुसून पोरांपोरींची डोकी हेच फोडत होते की!
वृद्ध : कमाल कर्तबगार आहेत हेही! पुढले दाखवा!
अधिकारी : हे त्या प्रसिद्ध लिव्ह इन प्रकरणाचा तपास करणारे… तुकडे करून प्रिâजमध्ये ठेवले ते…
वृद्ध : ओह… मग यांनी त्या आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे जमा केलेत की…?
अधिकारी : असल्या बकवास गोष्टी आमचे अधिकारी करत नाहीत.
वृद्ध : मग केलं काय यांनी?
अधिकारी : आरोपी मुसलमान आहे असा शोध लावला आणि महाराष्ट्र पोलिसांवर खापर फोडलं.
वृद्ध : म्हणजे आरोपीने प्रेयसीच्या पूर्ण मृतदेहाची विल्हेवाट लावली तोवर झोपा काढल्यात असेच ना? पुढला कर्तव्यदक्ष अधिकारी दाखवा!
अधिकारी : हे बघा.
वृद्ध : हे काय करतात?
अधिकारी : मधून मधून प्रधानसेवकांना धमक्या येतात बघा, खलिस्तानवाद्यांच्या, नक्षल्यांच्या वा दहशतवाद्यांच्या…
वृद्ध : हो, हो! बातम्यांत येतं की नाव छापून… पुढे?
अधिकारी : पुढे काय, पुढे?
वृद्ध : आरोपी शोधून किती काढलेत की त्यांच्या संघटना खणून काढल्या?
अधिकारी : छे हो! त्यांना अशा धमक्या आल्या आहेत, असं हे योग्य वेळी पत्रकार परिषद घेऊन मिडियासमोर जाहीर करतात.
वृद्ध : अजून काही नग उरलेत की संपले सगळे?
अधिकारी : हे एक आहेत की! यांनी आताच महिला सुरक्षेबाबत भरीव काम केलंय.
वृद्ध : काय सांगता? काय केलं असं यांनी?
अधिकारी : कुस्तीपटूंचं आंदोलन झालं ना…?
वृद्ध : बृजभूषणला अटक केली की काय? बातम्यांत कुठे वाचलं नाही…
अधिकारी : नाही हो, आंदोलन करणार्या त्या महिला कुस्तीपटूंना गचांड्या धरून जंतर मंतरवरून हटविण्याचा निर्णय घेणारे हेच!
वृद्ध : एकूण राजधानीतलं पोलीस खातं शेठना शोभेल असंच काम करतंय तर…
अधिकारी : अर्थात! पूर्ण जगभरात नावं काढतंय आमचं पोलीस खातं!
वृद्ध : तुमची पण कमाल आहे.
अधिकारी : धन्यवाद!
वृद्ध : ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी, त्याचं कौतुक सांगताय. या पुरस्कारासाठी तुम्ही सांगितलेल्या नमुन्यांमधूनच निवड करायची असेल, तर मग या सगळ्यांचे शिरोमणी तुम्हीच शोभता. त्यांनी जनाची सोडली असेल, तुम्ही मनाचीही सोडली आहे!