• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मिस्टर कणेकर, तुम्हाला पण पर्याय नाही!

- अमोल उदगीरकर

Nitin Phanse by Nitin Phanse
June 2, 2023
in विशेष लेख
0

चित्रपट आणि क्रिकेटच्या रसाळ रसग्रहणापासून ते विविध विषयांवर रंजक ललित फटकेबाजीपर्यंत काहीही वर्ज्य नसलेले अत्यंत लोकप्रिय लेखक शिरीष कणेकर येत्या ६ जून रोजी ८० वर्षांचे होत आहेत. त्यानिमित्त आजच्या पिढीने त्यांना दिलेली ही कडक मानवंदना!
– – –

‘मी शिरीष कणेकर वाचतो’ किंवा ‘मला लेखक शिरीष कणेकर आवडतात,’ या विधानांना बौद्धिक वर्तुळात प्रतिष्ठा नाही. तशी ती कुमार सानू, हिमेश रेशमिया, अल्ताफ राजा आवडण्याला पण नाही. लता मंगेशकर, नौशाद, अनिल विश्वास, मदन मोहन यांच्यावर निस्सीम प्रेम करणार्‍या कणेकरांची सानू, रेशमिया, अल्ताफ यांच्याबद्दलची मतंही अतिजहाल असण्याची शक्यता आहेच. आपलं नाव या लोकांसोबत एका श्वासात घेतलं जावं, हेही त्यांना खटकण्याची शक्यता आहे. बट लेट्स फेस इट. वैचारिक क्षेत्रातले ढुढ्ढाचार्य कणेकरांच्या नावानेच नाक मुरडत असली तरी ‘कणेकर आवडतात’ म्हणून अनेकदा लोकांची मैत्री होते. महफिलीला रंग चढला की कणेकरांच्या लिखाणातले उतारे मोठ्याने वाचून दाखवले जातात. अनेक वाचक वाढदिवसाला कणेकरांची पुस्तकं एकमेकांना भेट देतात. कणेकरांची पुस्तक अजूनही ‘बेस्ट सेलर्स’ यादीत दिमाखाने वावरत असतात. लेखकाचा कनेक्ट डायरेक्ट वाचकांशी जुळलेला असला की असं प्रेम लेखकांना मिळतं.
कणेकरांबद्दल आणि त्यांच्या लिखाणाबद्दल ‘मिलेनियल्स’ना (१९८१ ते १९९६ या कालखंडात जन्मलेली पिढी) असणारं आकर्षण खरं तर काहीसं अनाकलनीय आहे. कणेकर ज्या लोकांबद्दल लिहितात, ज्या फिल्मस्टार्सबद्दल, ज्या संगीताबद्दल, खेळाडूंबद्दल लिहितात त्यातले बहुतेकजण (लतासारखा एखादा अपवाद वगळता) ऐंशीचं दशक सुरू होण्यापूर्वीच अस्तंगत झाले होते. आमच्या पिढीला दिलीपकुमारचं जे दर्शन झालं होतं, ते फारसं सुखावह नव्हतं. मदनमोहन, अनिल विश्वास, सी. रामचंद्र, नौशाद, तलत महेमूद, डब्ल्यू. जी. ग्रेस, वॉली हॅमंड, व्हिक्टर ट्रम्पर ही नावं आम्हाला माहीतच नव्हती, तर त्यांच्या डोंगराएवढ्या कर्तृत्वाबद्दल माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. पण कणेकर एवढ्या प्रेमाने आणि आपुलकीने यांच्याबद्दल लिहीत होते की आम्ही शोधून शोधून मदन मोहन ऐकला, तलत महेमूद ऐकला आणि डब्ल्यू. जी. ग्रेस सेहवागसारखाच हातोडा चालवत असतील का, याबद्दल कल्पनारंजन पण केलं. कणेकर म्हणजे मिलेनियल्सला त्या काळाशी जोडणारा धागा होते. ‘मिलेनियल्स’ ही ट्रान्सफॉर्मेशनच्या काळातली पिढी आहे. त्यांनी दूरसंचार क्रांतीपूर्वीचं जग म्हणजे मोबाईल आणि गॅजेट्स येण्यापूर्वीचा काळ बघितलेला आहे. जागतिकीकरणपूर्व लायसन्स राज आणि प्रत्येक गोष्टीसाठी लायनीत उभं राहणं अनुभवलेलं आहे. आता त्यांनी नव्या जगाशी जुळवून घेतलं असलं तरी उन्हाळ्याच्या सुट्टीसारख्या निवांत अशा त्या जुन्या जगाबद्दल मिलेनियल्सला नितांत आपुलकी आहे. तो जुना (म्हणजे १९९६पूर्व) काळ किती साधा सरळ गुंतागुंतविरहित होता, याबद्दल सोशल मीडियावर उमाळे काढणारी हीच ती त्रिशंकू पिढी. ही पिढी भूतकाळाच्या एका तुकड्यात रुतून बसली आहे आणि तिला त्या नॉस्टॅल्जिक करणार्‍या काळातून बाहेर पडायचं नाहीये. कणेकरांचं बहुतेक लिखाण असंच एका भूतकाळाच्या तुकड्यात रुतून बसलं आहे. मिलेनियल्सला आणि कणेकरांना जोडणारा धागा आहे तो हा.
कणेकरांच्या लिखाणात येणारे सिंगल स्क्रीनमधले सिनेमा बघतानाचे अनुभव, वडील हयात असताना वडिलांशी असणारे अवघडलेले संबंध, सोशल मीडियापूर्व जगाचे संदर्भ, आपल्या सिनेमाने आक्रमकपणे विकलेला पलायनवाद, वेगाने बदलत जाणार्‍या जगात आपण ‘मिसफिट’ होत चाललो आहोत का ही मन भिरभिरीत करणारी असुरक्षितता, हे या मिलेनियल्सला काहीसं आत्मचरित्रात्मक वाटतं. आपण आपल्या ‘नॉस्टॅलजिया’बद्दल छातीठोक असावं, हे कणेकरांचं लिखाण वाचून या पिढीला कळलं असावं. आता ही पिढी सोशल मीडियावर नव्वदच्या दशकाबद्दल, त्या काळातल्या चित्रपटांवर आणि संगीतावर भरभरून लिहीत आहे, याचं थोडं क्रेडिट कणेकरांनाही द्यायला हवं.
मराठी संकेतस्थळं साधारणतः एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात उदयाला यायला लागली. ‘मायबोली’, ‘मिसळपाव’, ‘उपक्रम’, ‘ऐसी अक्षरे’ या संकेतस्थळांवर मराठी भाषिक एकत्र येऊन वेगवगेळ्या विषयांवर चर्चा करायला लागले. अनेकदा तिथं साहित्यिक चर्चा पण व्हायच्या. त्या चर्चांमध्ये कणेकरांचा उल्लेख अपरिहार्य होता. तिथं पण बहुतेक कणेकरांच्या लिखाणाबद्दल जिव्हाळा असणारे लोक असायचे आणि कणेकरांच्या नावाने नाक मुरडणारे अल्प लोक असायचे. मग नंतर फेसबुकने एक वेगळा प्लॅटफॉर्म मराठी लेखकांना उपलब्ध करून दिला. तिथं पण लोक कणेकरांच्या लिखाणाचे संदर्भ द्यायला लागले, कणेकरांच्या हुकुमी वनलायनर्सचा वापर व्हायला लागला आणि कणेकरांबद्दल चर्चा व्हायला लागल्या. त्या अर्थाने कणेकरांना सोशल मीडियाने ‘संदर्भहीन’ होऊ दिलं नाही. प्रस्थापित माध्यमांना आव्हान देणार्‍या सोशल मीडियाने कणेकरांबद्दलच आकर्षण जिवंत ठेवलं. सोशल मीडियापासून काहीसं फटकून राहणार्‍या कणेकरांना तरी याची जाणीव असेल का याबद्दल साशंकता आहे. एरवी मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये कणेकरांच्या लिखाण्ााबद्दल चर्चा होत आहे, एखादा समीक्षक कणेकरांच्या लिखाणाची समीक्षा करत आहे, असं चित्र कल्पनाशक्तीचे घोडे कितीही पळवले तरी डोळ्यासमोर येत नाही.
कधी कधी कणेकरांचा चित्रपट समीक्षक असा उल्लेख होत असला तरी आपण समीक्षक नाही हे कणेकर पण ठासून सांगतील. असलेच तर कणेकर रसास्वादक आहेत. ‘गंगा जमना’बद्दल ते जे भरभरून अप्रतिम असं लिहितात त्याला चित्रपट समीक्षणाच्या काहीशा रूक्ष प्रांतात नेणं योग्य नाही. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांची तुलना करणारा लेख वाचून लिखाणाचं आणि स्मरणशक्तीच कसलं जबरदस्त वरदान या लेखकाला लाभलं आहे असं वाटत राहतं. जगावर आणि माणसांवर वैतागलेले आणि लिखाणातून अनेकांना बोचकारे काढणारे कणेकर बी.एस.व्ही. राव या आपल्या माजी बॉसबद्दल आणि अरूण साधूसारख्या लेखक मित्राबद्दल डोळ्यातून पाणी येईल असं लिहून जातात. आपल्या लहानपणीच गेलेल्या आईबद्दल आणि आईनंतर आपला सांभाळ करणार्‍या वडिलांबद्दलचं त्यांचं प्रेम अनेक लेखांतून दिसतं. सतत लोकांवर टीका करणारे कणेकर स्वत:वर पण दिलखुलास ताशेरे ओढतात. आपण पत्रकार असलो तरी मनाने भित्रे कारकूनच राहिलो किंवा अरूण साधू आपल्यापेक्षा कितीतरी मोठा लेखक आहे, अशी कबुली स्वत:कडे पारदर्शकतेने पाहणार्‍या लेखकाची आहे. कणेकरांचा आयुष्यातला काही काळ मालेगावमध्ये गेला असला तरी ते अस्सल मुंबईकर. त्यांच्या लिखाणात पण तो खास ‘शिवाजी पार्क’ इसेन्स आहेच. तरी कणेकर मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रातल्या वाचकांमध्ये लोकप्रिय आहेतच. ग्रामीण-निमशहरी भागात लोकप्रियता असण्याचं भाग्य फार कमी मराठी लेखकांना मिळालं आहे.
कणेकरांनी कधीही सामाजिक वा राजकीय भूमिका घेतल्या नाहीत. कणेकरांचा तो पिंडच नव्हता. वाचकांना उत्तम वाचनाचा अनुभव देणं आणि त्यांचं मनोरंजन करणं मात्र त्यांनी भरभरून केलं. कणेकरांचं सगळंच लिखाण आवडलं आणि काहीच खटकलं नाही, अशातला भाग अर्थातच नाही. मध्यंतरी एका सिनेमात सिद्धार्थ जाधवने एका आयटी प्रोफेशनलची भूमिका केली होती. त्यावर सिद्धार्थ कसा आयटीमधल्या माणसासारखा ‘दिसत’ नाही यावर त्यांनी अख्खा लेख लिहिला होता. मराठवाड्यातून आलेल्या माझ्यासारख्या माणसाला तो लेख प्रचंड खटकला होता. ‘वजायना मोनोलॉग’ नाटक पूर्ण न बघताच त्या नाटकाची सालपटं काढणारा लेख त्यांनी लिहिला होता. लेखक कितीही आवडता असला तरी त्याला स्वत:च्या वैचारिक मर्यादा असू शकतात हे पुन्हा जाणवलं. कणेकरांना नवीन काही आवडतच नाही का असा प्रश्न पण अनेकदा पडलेला. पण वाचक-लेखक यांच्यात, एकतर्फी का होईना, दीर्घकाळ एक बॉण्ड तयार होत असताना असं कधी कधी होणारच.
अनेकदा वाचक आपल्या आवडत्या लेखकाचं ‘प्रोफाईल’ मनातल्या मनात तयार करत असतो. त्याच्या स्वभावाबद्दल, प्रत्यक्ष आयुष्यात तो कसा असेल याबद्दल आडाखे बांधत असतो. कणेकर कसे असावेत प्रत्यक्ष आयुष्यात? काही लोकं सोडले तर बहुतेक जगावर त्यांचा प्रचंड रोष असावा. जगाबद्दल आणि माणसांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड कडवटपणा असावा. त्यांच्या लिखाणातला कर्कटकासारखा टोकदार विनोद हा त्यांचा या जगाविरुद्धचा प्रोटेस्ट असावा. लाडका दिलीपकुमार आणि प्राणप्रिय लता मंगेशकर जगातून निघून गेल्यावर त्यांना या जगाशी जोडून ठेवणारे मोजके धागे पण तुटून गेले असावेत. पण कणेकरांनी लिहितं राहायला पाहिजे. ऐंशीव्या वर्षी आमच्यासाठी त्यांनी लिहीत राहिलं पाहिजे, अशी अपेक्षा ठेवणं अन्यायकारक असलं तरी आमचं स्वार्थी मन ऐकायला तयार नाही. त्याला कणेकरांचं भूतकाळाशी जोडणारं लिखाण पाहिजेच आहे. शेवटी कणेकरांच्याच भाषेत सांगायचं तर ‘लता मंगेशकर, सुनील गावस्कर आणि आयुर्विमा यांना पर्याय नाही,’ हे मान्यच. पण मिस्टर शिरीष कणेकर, तुम्हाला पण पर्याय नाहीच आहे. तुमच्या सगळ्या गुणदोषांसकट तुम्ही आमचे आवडते लेखक आहात.

Previous Post

डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

Next Post

नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

Next Post

नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.