मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी, धक्काबुक्की, ढकलाढकली, रेटारेटी असते. यात समजून घेणारे असतात तसेच चिडणारे, संतापणारेही असतात. अशा या गर्दीत भांडणं होतात. शब्दाला शब्द वाढतात. एकमेकांना धमकावणं, आवाज देणं होतं. अशी ही भांडणे नित्याचीच. पण कधी कधी प्रकरण मारामारीपर्यंत जातं. समोरच्या व्यक्तीने शिवी दिली याचा राग येऊन एखादा हाणामारीवर उतरतो. इतर लोक शांत करू पहातात. पण शांत न होता अधिक तुटून पडणारा सांगतो की त्याने मला आईवरून शिवी दिली. त्यामुळे मी त्याला सोडणार नाही.
लोकल प्रवासात किंवा इतर कुठेही कधी काहीही भांडण झालं की रागाच्या भरात शिव्या दिल्या जातात, त्या काही समोरच्या व्यक्तीच्या आप्तांबद्दल (आई, बहिणीबद्दल) ठरवून वाईट बोलायचे असते म्हणून नव्हे; राग आला की अशाच शिव्या देण्याची लागलेली सवय म्हणून ती व्यक्ती ते बोलते. अशावेळी ज्याला शिवी दिली जात आहे तो प्रत्येक जण मारामारी करायला जाईलच असं नाही. एखादाच मारामारीपर्यंत जातो. कारण, जशी एकाला शिव्या द्यायची सवय लागली आहे, तशी दुसर्याला छोट्या छोट्या गोष्टीवरून राग आवरता न येऊन मारामारी करायची सवय लागली आहे.
एक बातमी वाचली होती. काहीच कामधंदा न करणार्या एका तरुणाला त्याचे आजोबा बडबड करत राहायचे. सतत कटकट करत रहायचे. तुला काही कामधंदा करायला नको. ऐतखाऊ आहेस, खायला काळ आणि भुईला भार आहेस. गिळायच्या वेळीच (जेवायच्या वेळी) बरोबर घरात येतोस. एरव्ही भिका मागत फिरत असतोस. भीक मागूनच तू पोट भर. घरी कशाला येतोस भिकार्या, असं म्हणायचे. आजोबांच्या या रोजच्या बोलण्याने एक दिवस नातू खूप संतापला आणि घरातली हातोडी आजोबाच्या डोक्यात मारून त्याने आजोबाचा खून केला. नातवाला वाट्टेल तसं बोलत राहिल्यामुळे आजोबाला प्राण गमवावे लागले.
अशा बातम्या आपल्याला नव्या नाहीत. नातवाने केला आजोबाचा खून, मुलाने केली आईची हत्या अशा अनेक बातम्या आपण आजवर वाचल्या, ऐकल्या आहेत. आता आपण सोनलची गोष्ट पाहू.
सोनलचं ज्याच्याशी प्रेम जमलं तो मुलगा आपल्या जातीतला नाही म्हणून घरच्यांनी लग्नाला विरोध केला. सोनलने घरच्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही. शेवटी तिने घरातून निघून जाऊन त्याच्याशी लग्न केलं. लग्न केल्यानंतर तिने घरच्यांना फोन केला आणि लग्न केल्याचं सांगितलं. घरचे म्हणाले ‘तू आम्हाला मेलीस. आम्ही तुझ्या मैतालाही येणार नाही.’
सोनलला हे शब्द खूप लागले. ती सतत दुःखी होती. त्यामुळे तिचं नवदाम्पत्यजीवन तिला आनंदाने जगता येईना!
सोनलच्या घरच्यांनी रागाच्या भरात शब्द वापरले होते. आपल्या मुलीबद्दल आपण काय बोलतोय, तिला काय वाटेल याचा त्यांनी विचार केला नाही. ते नाराजी वेगळ्या शब्दात मांडू शकले असते. आईवडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केल्यानंतर काहीजण त्यांचा जीवही घेतात तर काहीजण राग शांत झाल्यावर काही काळाने मुलीशी पुन्हा संबंध प्रस्थापित करतात. नंतर कधीतरी पुढे ‘आपण ते शब्द बोलायला नको होते’ असं वाटू शकतं. आपली माणसं आपल्याला इतकं वाईट बोलली हे मनात ठेवून मुलं कायमची दुरावूही शकतात किंवा समंजसपणे म्हणूही शकतात की जाऊ दे ना! बोलले तर बोलले. आपले आईवडीलच बोलले ना? मांजरीच्या पिलाला मांजरीचे दात लागत नाहीत.
बरोबर आहे. मांजरीचे दात मांजरीच्या पिलाला लागत नाहीत. पण ते लागू नये याची तिने काळजी घेतलेली असते. पिलांना दातात धरून मांजर सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवत असते. आपले शब्द मुलांच्या जिव्हारी लागायला नकोत, याची पालकांनी काळजी घ्यायला हवी.
निलेशचं उदाहरण पाहू.
निलेश अभ्यासात कमकुवत होता. सर वर्गात त्याला जेव्हा प्रश्न विचारीत अन् त्याला उत्तर येत नसे, तेव्हा सर त्याला ‘तू दगड आहेस’ म्हणत. ‘अक्कलशून्य गाढव आहेस’ असं म्हणत. यामुळे निलेशमध्ये शाळा, शिक्षक आणि अभ्यासाबद्दलची भीती वाढत गेली. त्याच्यात न्यूनगंड निर्माण होत गेला.
आपण सारेच अनेकदा असे काही शब्द वापरतो, असं काही बोलून जातो की नंतर विचार करत बसण्याची वेळ येते. म्हणूनच आपण बोलताना विचार केला पाहिजे. काळजी घेतली पाहिजे. आपण वापरलेले शब्द दुसर्याला दुःखी करू शकतात. प्रसंगी आपल्याला खूप महागात पडू शकतात याचे आपल्याला भान असले पाहिजे. आपल्या वाट्टेल त्या बोलण्यावर समोरच्याने कसे ‘व्यक्त’ व्हावे हे आपल्या हातात नाही. त्यामुळे आपल्या बोलण्याचा काहीही परिणाम होऊ शकतो. धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून सुटलेले शब्द परत येऊ शकत नाहीत, असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही.
राम गणेश गडकरी यांच्या ‘संगीत भावबंधन’ नाटकात नायिकेच्या शब्दांनी दुखावलेला नायक असं काहीसं म्हणतो की ‘लतिके, बाण जिथून सुटतो तिथे त्याची कोणतीच साक्ष असत नाही, पण तो जिथे जाऊन भिडतो तिथे जखम होते. अन् जखम बरी झाली तरी व्रण शिल्लक राहतोच.’
एकूण शब्द हे शस्त्राहूनही अधिक धारदार असतात आणि ते शस्त्राहून अधिक घायाळ करू शकतात असं आपण आजवर वाचत ऐकत आणि मान्य करत आलो आहोत. पण खरंच या म्हणण्यात तथ्य आहे का? हे पूर्ण सत्य आहे का?
आपण शब्द जपून वापरावे, आपल्या शब्दांनी लोक अपमानित होऊ नयेत, घायाळ होऊ नयेत, जखमी होऊ नये असं वाटणं काही चुकीचं नाही. पण दुसर्याच्या शब्दांनी जखमी व्हायचं नाही, असं आपण ठरवू शकत नाही का? मंडळी, शब्द म्हणजे खरोखरच शस्त्र आहेत का की आपण त्याच्यापासून वाचूच शकत नाही? धारदार तलवारीने आपल्यावर हल्ला केला, प्रहार केला तर आपला देह घायाळ होणारच. पण शब्द मनाला लावून घ्यायचे नाही हे आपण करू शकतो ना?
ट्रेनमध्ये धक्काबुक्की झाली, त्यात कोणी काही बोललं म्हणून मारामारी करावी का? कुणी सतत कटकट करतो म्हणून आपल्याला इतका राग यावा का, की आपण त्याच्यावर प्राणघातक हल्ला करावा? कुणी आपल्याला काही म्हटलं म्हणून आपण तसे ठरतो का? समोरची व्यक्ती आपल्याला जे काही म्हणत आहे, त्याची आपण छान चिकित्सा करावी.कुणी आपल्याला अक्कलशून्य गाढव म्हणालं तर स्वत:ला सांगावे. ही व्यक्ती अतिरंजित बोलते आहे. शून्य अक्कल फक्त निर्जीव वस्तूला असू शकते. मी निर्जीव वस्तू नाही. मी सजीव मनुष्यप्राणी आहे. त्यामुळे मी ‘अक्कलशून्य’ असू शकत नाही.
आपण इतरांसाठी शब्द जपून वापरायला हवेच, पण दुसर्या कुणी आपल्यासाठी काही अपशब्द वापरले तर त्याने दुखवायचं की नाही हे ठरवण्याचं स्वातंत्र आपल्याला आहे, हे आपण विसरता कामा नये. आपण जेवढे विचारी बनू, तेवढी आपण कुणाच्या शब्दाने घायाळ होण्याची शक्यता कमी होईल.
थोर मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस म्हणतात. ‘स्टिक्स अँड स्टोन्स माइट ब्रेक माय बोन्स, बट वर्डस् नेव्हर हर्ट मी.’