शिवसेनेच्या रौप्य महोत्सवाचे वर्ष १९९१. १९ जून १९६६ रोजी स्थापन झालेल्या शिवसेनेला २५ वर्षे पूर्ण झाली. साहाजिकच शिवसैनिकांमध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण होते. मराठी अस्मितेचा आणि हिंदुत्वाच्या विचारांचा रौप्य महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात जोरात साजरा करावा, तो प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवावा असा निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत घेतला. सामाजिक बांधिलकी जपणार्या शिवसेनेने या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने संपूर्ण राज्यात रक्तदान मोहीम घेण्याचे ठरवले. हजारो बाटल्या रक्त देण्याचे शिवसैनिक व जनतेला आवाहन करण्यात आले. त्यासाठी विरोधी पक्षनेते मनोहर जोशी यांनी रक्तपेढ्यांचे प्रमुख आणि आरोग्य खात्याचे अधिकारी यांची बैठक बोलवली. शिवसेनेची ही योजना राज्य सरकारला समजताच राज्याच्या आरोग्य खात्याने १९ तारखेलाच रक्तदान शिबीरे आयोजित केली. पण राज्य सरकारच्या आरोग्य खात्यापेक्षा शिवसैनिकांनी जास्त रक्ताच्या बाटल्या गोळा केल्या.
त्यावेळी पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी शिवसेनेच्या रौप्य महोत्सवाचा धावता आढावा महाराष्ट्र टाइम्समधील लेखात घेतला. ‘१९ जून १९६६ ते १९ जून १९९१ अशा शिवसेनेच्या प्रवासात अनेकदा सहप्रवाशांशी वादविवाद झाले. राजकीय घात-अपघात झाले. १९ जून १९६६ रोजी ज्या व्यक्तीकडे या संघटनेचे नेतृत्त्व होते, त्याच बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आजही नेतृत्त्व शाबूत आहे. आजच्या राजकारणात २५ वर्षांची शिवसेना ही एक महत्त्वाची शक्ती बनली आहे. शिवसेनेकडे दुर्लक्ष करून आता महाराष्ट्रात राजकारण सोडाच, समाजकारणही करता येणार नाही. एवढी ताकद सतत वादाच्या भोवर्यात सापडणार्या या संघटनेने गेल्या २५ वर्षांत निश्चितच उभी केली आहे. हेच या संघटनेचे खरे यश आहे,’ असे त्यांनी लिहिले.
मराठीतले सुप्रसिद्ध कादंबरीकार प्राध्यापक ना. सी. फडके यांनी शिवसेनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षासंबंधी लिहिलेल्या एका लेखात म्हटले की, ‘विवेकाच्या संतपणापेक्षा अविवेकाची त्वरा व उत्कंठा अनुभवा’ हे त्यांचे तत्त्वज्ञान शिवसेनेने आत्मसात केले होते की काय, असे मानण्यास जागा आहे. बाळासाहेब प्रश्नाच्या दोन्ही बाजू काळजीपूर्वक ऐकून घेत. त्यावर साधक-बाधक विचार करत आणि मग निर्णय घेत. एकदा निर्णय घेतला की त्यात बदल नाही, पुढे-मागे नाही की अंमलबजावणीत वेळ दवडणेही नाही. ‘गर्दी, शिवसेना आणि बाळासाहेब’ हे आता समानार्थी शब्द झाले आहेत. शिवसेनेच्या रौप्य महोत्सवासंबंधी टीका-टिपणी करणारे छोटे-मोठे लेख वृत्तपत्रातून आले होते.
शिवसेनाप्रमुखांनी रौप्यमहोत्सवी वर्षात शिवसेनेत आमूलाग्र बदल करण्याची घोषणा केली. त्यांनी असेही सांगितले की संघटनेत शिरणार्या अनिष्ट प्रवृत्ती आम्ही दूर करू. कोणत्याही प्रकारची गटबाजी शिवसेनेत होऊ देणार नाही. अत्यंत अभूतपूर्व अशा रौप्यमहोत्सवी सोहळ्यात बोलताना बाळासाहेबांनी स्वत:च त्यांचे सामर्थ्य कशात आहे ते सांगून टाकले. शिवसेना वाढवण्याचे, टिकवण्याचे एवढ्या सहकार्यांना स्नेहरज्जूंमध्ये प्रदीर्घ काळ बांधून ठेवण्याचे, लक्षावधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचे सामर्थ्य आपल्याला कसे लाभले, हे सांगताना शिवसेनाप्रमुख म्हणाले, ‘पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत मी माझे हात स्वच्छ ठेवलेत. जे असेल ते समोरासमोर स्पष्टपणे बोललो, म्हणून शिवसेनेला आज हे दिवस दिसलेत. मी जेव्हा तुमच्यासमोर व्यासपीठावर येतो तेव्हा मी काय बोलायचं ते ठरवून येत नाही. तुम्हाला पाहिलं की मला एक बेहोशी चढते आणि त्या बेहोशीत माझी कुलस्वामिनी एकवीरा माता, तुळजा भवानी आणि छत्रपतींचा आशीर्वाद माझ्याकडून हे सारं बोलवून घेते. गणपतराव बोडस तुम्हाला माहिती असतील, त्यांना पिण्याचं प्रचंड व्यसन होतं. नाटक सुरू व्हायच्या अर्धा तास आधी ते म्हणे, सतत पीतच असायचे. त्यांना सांगावं लागायचं, आज नाटक कोणतं, त्यात तुमची भूमिका कोणती, एन्ट्री केव्हा आणि एकदा का हे सांगितलं आणि थोडासा आधार देऊन स्टेजवर एन्ट्री देण्याइतपत उभं केलं की त्यांना रंगमंचाची नशा चढायची. मद्याची नशा नाहीशी व्हायची. असा अभिनय करायचे की सर्वांनी म्हणावं वा! माझंही तसंच आहे.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच एक क्षुल्लक कारणास्तव जातीय दंगल झाली. त्यावेळी जोगेश्वरीच्या या जातीय दंगलीच्या संदर्भात शिवसेनाप्रमुखांनी जाहीर सभा घेऊन हिंदूंना धीर दिला. यावर्षी महागाईविरोधात शिवसेनेने सर्वत्र आंदोलन केले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे येथे शिवसैनिकांनी धारा तेल साठेबाजांविरुद्ध ठिकठिकाणी आंदोलन करून, साठेबाजांना पकडून लोकांना स्वस्त दरात धान्य व धारा तेलाचे वाटप केले.
देशाचे पंतप्रधान चंद्रशेखर यांचे औटघटकेचे सरकार एप्रिल १९९१मध्ये संपुष्टात आले आणि देशाची नववी लोकसभा विसर्जित झाली. देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल पुन्हा वाजले. मे १९९१मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीला देशवासीयांना सामोरे जावे लागले. महाराष्ट्रात शिवसेना भाजपाची युती झाली. शिवसेना १७ तर भाजपाने ३१ जागा लढवण्याचे ठरले. ‘राष्ट्रभक्तीचा अंगार’ या नावाची एक व्हिडीयो कॅसेट प्रसिद्ध झाली. शिवसेनाप्रमुखांनी आक्रमकपणे हिंदुत्वाचा प्रचार केला. परंतु महाराष्ट्रात सेना-भाजपाचे फक्त १० खासदार निवडून आले. भाजप ६ तर सेना ४. त्यातील मराठवाड्यातील ३ आणि मुंबईतून सेनेचा एक खासदार निवडून आला. काँग्रेसला २२० जागा मिळाल्या, तर भाजपला ११७ जागा मिळल्या. काँग्रेसची केंद्रात सत्ता आली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान झाले.
२८ ऑक्टोबर १९९१ रोजी भारत-पाक क्रिकेट सामना मुंबईत घेण्याचे ठरले. त्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला. हा सामना होऊ देणार नाही, अशा इशारा शिवसेनेने दिला. हा क्रिकेट सामना घेऊ नये म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माधव मंत्री यांना शिवसैनिकांनी घेराव घातला, तर २०-२५ शिवसैनिकांनी विभागप्रमुख शिशिर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर कुदळी चालवल्या आणि तेलही ओतले. हा सर्व प्रकार पाहून पाकिस्तानने संपूर्ण भारत दौराच रद्द केला. शिवसेनेचा विजय झाला. त्यानंतर आजतागयात भारत-पाक क्रिकेट सामना मुंबईत झाला नाही. मुंबईत शिवसेना असेपर्यंत ते शक्यही नाही. शिवसेनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील ही देशाभिमानी आणि हिंदूंना सुखावह वाटणारी घटना प्रत्येक देशवासीयाच्या हृदयावर कायमची कोरली गेली आहे.